आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदकफू’वर झेंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रक्त गोठवणारी थंडी, अंग आंबवून टाकणारे गारगार वारे, उणे पाच डिग्री तापमान, बाजूला फक्त ढग, गर्द धुके, पाठीवर आठ किलो ओझे, पायात मोठाले जड बूट, थंडीपासून वाचण्यासाठी अंगावर जाडजाड कपडे, आधाराला काठी, संगतीला कधी थरारक, तर कधी नितांतसुंदर निसर्ग...

जमिनीपासून 3,636 मीटर उंचीवरचं हे गिरीविश्व अनुभवत सोलापुरातील शिक्षिकांनी दार्जिलिंगचे ‘संदकफू’ शिखर लीलया सर केले. जिद्द, अगम्य ध्येयासक्ती आणि आत्मविश्वास अंगी बाणला तर विजय हसखास मिळतो याचं हे उदाहरण. हे आव्हान पेलणारे कोणी युवक, युवती नव्हत्या, तर एका ध्येयाने प्रेरित झालेल्या चाळिशी पार केलेल्या महिला होत्या.
सेवासदन शाळेच्या मुख्याध्यापिका उषा हंचाटे वय वर्षे 52, शिक्षिका संगीता नगरकर वय वर्षे 41, लक्ष्मी कुलकर्णी वय वर्षे 56, दीपाली गोन्याल वय वर्षे 52 आणि सुरेखा सुरवसे वय वर्षे 40 यांनी ही मोहीम फत्ते केली. तिघींनी वयाची पन्नाशी पार केली असली तरी त्यांची उमेद सोळा वर्षांच्या मुलीलाही लाजवेल अशी होती. 19 ते 26 नोव्हेंबर हे आठ दिवस या शिक्षिकांच्या डायरीत सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.
यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑ फ इंडियाच्या सोलापूर शाखेत या पाचही जणींनी आपले नाव नोंदवले. समन्वयक अविनाश पत्की, तांबोळी यांनी ट्रेकिंगचे नियोजन करून मार्गदर्शन केले आणि सुरू झाला एक प्रवास...
ट्रेकचा कालावधी
आठ दिवसांच्या या ट्रेकिंगमध्ये पहिले दोन दिवस बेस कॅम्पला मुक्काम होता. तेथील हवामानाशी रुळल्यानंतर पुढचे ट्रेकिंग सुरू झाले. दार्जिलिंग, न्यू जलपाईगुडी, कोलकाता, हैदराबाद ते सोलापूर असा प्रवास करत या पाच शिक्षिका परतल्या.
ट्रेकिंगची तयारी
तीन महिन्यांपूर्वी या ट्रेकिंगचे नियोजन आणि नाव नोंदणी झाली. प्रवासात काहीही त्रास होऊ नये यासाठी पहाटे 6 ते 8 या वेळेत चालण्याचा सराव केला. तसेच ट्रेकिंगच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक कपडे, चालताना पायांना त्रास होऊ नये असे बूट, शक्ती टिकून राहण्यासाठी ड्रायफ्रूट्स, प्रवासात काही त्रास जाणवला तर लागणारी औषधे घेण्यात आली.
गिर्यारोहणातील टप्पे
‘संदकफू’वर ट्रेकिंग करताना निसर्गाचे भयप्रद आणि अतिशय सुंदर रूप एकाच वेळी अनुभवले. निसर्गसौंदर्याचा इतक्या जवळून पहिल्यांदाच अनुभव घेतला. काय सांगू, किती सांगू असे या शिक्षिकांना झाले होते. एकीकडे उणे पाच डिग्री तापमान, धुक्यामुळे पाच फुटांवरचेही काही दिसत नव्हते. जोरदार थंड वारे, समोर एव्हरेस्टची शिखरे, आजूबाजूला ढगच ढग, धुक्यांनी परिसर वेढलेला, सभोवती विविध रंगांची आणि प्रकारची फुले हा सौंदर्याविष्काराचा अनुभव सांगताना त्या हरखून गेल्या होत्या.

पहिला टप्पा दार्जिलिंग ते टूमलिंग 11 किमीचा होता. नंतर टूमलिंग ते कालिपोखरी हा 14 किमी, कालिपोखरी ते ‘संदकफू’ 7 किमी, ‘संदकफू’ ते गुरदूम हा 14 किमी व गुरदूम ते रिमबिक हा टप्पा 13 किमीचा असा त्यांचा प्रवास होता. ‘संदकफू’वर पोहोचताच समोर पाहिलं तर एव्हरेस्ट, कांचनगंगा, थ्री सिस्टर्स, मकालो, लोटस ही शिखरे दिमाखात उभी. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कष्टाचं सार्थक झाल्याची भावना सुखावून गेली. शिक्षिका पुढे सांगू लागल्या. समोर ऊन दिसायचे. मात्र, जवळ गेल्यावर तो फक्त आभास असल्याचे कळे. दम लागल्यावर थांबलो की घाम येई आणि क्षणात त्याचाही बर्फ होई. हुडहुडी भरे... एक टप्पा पूर्ण केल्यावर रात्री मुक्काम पडे. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी रात्री कॅम्प फायर हा मनोरंजनाचा कार्यक्रम होई. यात आम्ही इतकी मजा केली की दहा वर्षांनी लहान झाल्यासारखे वाटू लागलेय. खळाळतं पाणी, पक्ष्यांची किलबिल, वा-या चा आवाज, हातांना लागतील असे ढग, समोर धुके, आजूबाजूला विविध रंगांची फुले, थंड वातावरण, समोर एव्हरेस्टची शिखरे अशा वातावरणात स्वर्गात आल्यासारखेच वाटे
सर्वांचे एकच ध्येय- चालताना श्वास घ्यायला त्रास होई. हळूहळू लहान लहान पावले टाकत चालावे लागे. चालून चालून पाय प्रचंड दुखायचे. तरी रात्री कॅम्प फायरमध्ये नाचून थकवा घालवत होतो. त्या सात ते आठ दिवसांत अंघोळ नाही, दात घासणे नाही. फक्त एकच लक्ष्य होते, संदकफू गाठायचे. या ध्येयापायी या महिलांनी आपला घर, संसार या दहा-पंधरा दिवसांत बाजूला ठेवून दिला होता.
उत्साही महिला - उषा हंचाटे यांचा हा नववा ट्रेक, तर संगीता नगरकर यांचा चौथा. दीपाली गोन्याल दुस-या दा ट्रेकिंगसाठी गेल्या होत्या. शिक्षिकांच्या मते ट्रेकिंगमुळे वर्षभराचे टॉनिक मिळते. उत्साह टिकून राहतो, आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली जाते. ट्रेक पूर्ण झाल्यानंतरही त्याच्या आठवणींनी परत उत्साह येतो. तसेच मुलांना स्वावलंबनाचे धडे मिळतात. वेळेचे महत्त्व कळते. सहभागी लोकांमध्ये मैत्रीची भावना निर्माण होते. आपल्या कामाचा, इतर ताणतणावाचा येथे आल्यावर विसर पडतो व नवीन उमेद येते.
उद्दिष्ट गाठल्याचे समाधान
संदकफूच्या परतीच्या प्रवासात एक उद्दिष्ट गाठल्याचे समाधान होते. पहिलाच उतरायचा टप्पा 14 ते 15 किलोमीटरचा होता. संपूर्ण जंगलातून जायचे होते. वाटेत एकही दुकान नाही, टपरी नाही. सर्वांचे सहकार्य अत्यंत मोलाचे होते. प्रत्येकाची प्रत्येक जण आपुलकीच्या नात्याने काळजी घेत होता. प्रत्येक आनंदाच्या क्षणी सर्व मिळून एकत्र आनंद लुटत होते. ग्रुपमध्ये लहान असलेलेही आम्हाला नावाने हाक मारायचे. चढावर तसेच उतारावर हक्काने हात धरून पुढे न्यायचे.
लक्ष्मी कुलकर्णी, शिक्षिका

कुटुंबातील सदस्यांचे प्रोत्साहन
एवढ्या उंचीवर गेल्यावर आपल्या बरोबर कोणते सहकारी आहेत, ते कोणत्या राज्यातील आहेत याचा विचारही मनात येत नाही. फक्त एक टीम असल्याप्रमाणे आम्ही सर्व जण तेथे वागत होतो. बरोबर नेलेले ड्रायफ्रूट वगैरे पदार्थही कोणीही आपापले काढून खात नसे. सर्वांच्या हातात दिल्याची खात्री झाल्यावर तो पदार्थ खाल्ला जाई.
सुरेखा सुरवसे, शिक्षिका

...आणि जिवात जीव आला
आतापर्यंत मी दहा वेळा ट्रेकला जाऊन आले. आम्ही सोलापुरातून केवळ पाच महिलाच संदकफूला जाऊन आलो. आयुष्यात एकदा तरी ट्रेकिंगचा अनुभव घ्यावा. अशा प्रसंगातून परस्पर सहकार्य, एकी, वेळेचे महत्त्व यांचा अनुभव येतो. निसर्गसौंदर्याचा आविष्कार पाहून मन थक्क होते.
उषा हंचाटे, मुख्याध्यापिका

नवी शक्ती मिळते
2007मध्ये मी पहिला हिमाचल प्रदेशातील सारपास या ट्रेकचा अनुभव घेतला. संदकफूला जाताना निसर्गाच्या अगदी जवळ आल्यासारखे वाटत होते. तेथे पोहोचल्यावर वर येईपर्यंत केलेल्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटले.
दीपाली गोन्याल, शिक्षिका

madhavi.kulkarni0@gmail.com