आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थ आणि नियोजनाची सांगड घालूया!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे जोरदार असे स्वागत केले जाते. नवनवे संकल्पही सोडले जातात आणि साधारण चारच दिवसांत ते विरूनही जातात ही आपली मानसिकता असते; पण जसे दिवस पुढे सरकतात आणि वर्षे निघून जातात, तसे आपण जर ‘फोकस-ध्येय-लक्षी’ नाही बनलो तर आहे ती पातळी राखणे कठीण होऊन बसेल. आजच्या घडीला चलनवाढ / महागाई यांना तोंड देणे जर जड जात असेल तर अजून दोन / पाच वर्षांनी काय परिस्थिती उद्भवेल ? त्याबद्दल थिंक करा! आपले एकूण जीवन वेगवान झालेले आहे. पाच दिवसांची टेस्ट मॅच आता एक दिवसावर आली आहे आणि 20-20 चा गोंधळ धमाल करतोय. थोडक्यात काय तर प्रत्येक दिवस ...क्षण हा महत्त्वाचा आहे. आज जे पेराल, तेच उद्या-परवा उगवणार आहे हे लक्षात घ्या! म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीलाच एकेक दिवस ..एक संपूर्ण वर्ष कसे जायला पाहिजे हे आपले आपणच ठरवूया. बाह्य परिस्थिती, इतर फोर्स यांना गृहीत धरून आपले धोरण आखले पाहिजे! मुळात काय नाही करायचे हेही ठरवायला हवे, कारण अनेकदा काय होते की नवीन वर्षाचे संकल्प ठरवण्यात उत्साह असतो, खूप काही आखले जाते; मात्र जुन्या नको त्या गोष्टी विनाकारण ‘कॅरी फॉरवर्ड ‘ होतात! या कारणांनी वेळ दवडला जातो आणि ‘ दोन पावले पुढे आणि चार पावले मागे’ अशी अवस्था होते! हे सगळे यावर्षी तरी टाळूया - तेच आता पाहणार आहोत.
नियोजन
तुम्ही विद्यार्थी असा की पालक किंवा शिक्षक - कोणत्याही घटकाने - सामान्य नागरिकांनी - मुद्द्याकडे लक्ष पुरवले पाहिजे. नियोजन म्हणजे व्यवस्थापनाचे काम ! हा गैरसमज आधी मनातून दूर केला पाहिजे. कारण व्यक्तिगत पातळीवर नियोजन नसेल तर काय बोजवारा उडू शकतो हे आपण छोट्या-छोट्या उदाहरणांनी समजून घेऊया - संदीपला होमवर्क करायचा आहे, टीव्ही बघायचा आहे, कॉम्प्युटर गेम्स खेळायचे आहेत ...हे सर्व एकाच वेळी तर नाही करता येत. सर्व अर्धे केले आणि वेळेचा हिशेब न करता केले तर काय होईल? ना अभ्यास, ना टीव्ही आणि सरांचा ओरडा आणि घरच्यांची कटकट ऐकायला लागते. त्याचे बाबा प्लॅन करतात - दिवसाचा टाइमटेबल ठरवतात - वेळेवर ऑफिसला जातात, अर्जंट कामे उरकतात आणि मग संध्याकाळी समारंभ अटेंड करतात! पण हे नियोजन कौशल्य मुलामध्ये येत नाही. अशा वेळी पालकांनी समजुतीने आपले गुण मुलांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नोकरी करणारी रमाची आई किचन कामाचे नियोजन करते. त्यामुळे मुलांचा अभ्यास ती घेते, लग्न-समारंभ अटेंड करते. कटकट नाही की गोंधळ नाही!
मुलांचा कल / आवड जाणून घ्या
पालक म्हणून आपण अनेकदा वस्तू घेऊन देणे, हट्ट पुरवणे या बाबींकडे अधिक वेळ आणि पैसा पुरवतो. कारण जे आपल्याला लहानपणी मिळाले नाही ते आपण मुलांना दिलेच पाहिजे, असा जणू अलिखित कायदा असल्याप्रमाणे बहुतेक पालक वागतात. परिणामी, मुलांना फक्त घेण्याची सवय लागते. आपल्या सर्व अपेक्षा पुरवल्या जातात, अशी भावना वाढीस लागते. पुढील आयुष्य जगताना ‘नकार’ पचवण्याचा ते विचारही करू शकत नाहीत. पुढे नोकरीतही ‘सर्व मिळालेच पाहिजे’, प्रेमात - मैत्रीत फक्त मिळवण्याची अपेक्षा अनेक अपेक्षाभंगास कारणीभूत ठरते.
मुलाचा ‘कल’ काय आहे, हे न जाणून घेताच बाबाला वाटते किंवा आईची इच्छा म्हणून बाबू सायन्सला जातो किंवा बेबी आर्ट्सला जाते आणि मग अपयशी म्हणून गटांगळ्या खातात! आणि याला जबाबदार कोण? खापर मुलांवर किंवा शिक्षण पद्धतीवर फोडले जाते.
हे टाळण्यासाठी लहानपणापासून मुलांकडे बारकाईने पाहा-मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या म्हणी कागदी नाहीत किंवा फक्त मार्क मिळवण्यासाठी नाहीत. त्यातील व्यावहारिक अर्थ लक्षात घ्या.कोणत्या विषयाचा कंटाळा येतो, कोणते आवडतात. हे पाहा. शिक्षक, मुलांचे मित्र यांच्याशी संवाद साधत राहा.....मग पाहा, भ्रमनिरास होणार नाही.
दहावी आणि बारावी या मुख्य टप्प्यांवर अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज अनेक मार्गदर्शक वर्ग आहेत, तिथे चाचण्या केल्या जातात. अगदी 100% टक्के जरी नाही तरी ब-याच प्रमाणात मुलांचा कल कळू शकतो.
पैसा / अर्थ व्यवस्था
अर्थमंत्री हा जसा राज्याला लागतो तसा घरालाही आवश्यक असतो. आजचे आई-बाबा पैसे कमावण्यासाठी धडपड करतात आणि मुलांवर खर्च करताना मागे-पुढे पाहत नाहीत. महागडे कपडे घेणे आणि जिथे फी जास्त अशा शाळेत किंवा क्लासमध्ये आपल्या अपत्याला घालणे, म्हणजे आपले पालक-कर्तव्य झाले असे अनेकजण मानतात; पण प्लीज, पैसे गुंतवताना किंवा अशा प्रकारे खर्च करताना तारतम्य बाळगा. अलीकडे ‘महाग ते चांगले’, अशी एक चुकीची संकल्पना आपल्या सगळ्यांच्या मनात घट्ट बसलेली आहे. ती आधी काढा. माहिती घ्या, आपापसात चौकशी करा, तुलना करा, तरच तुमचा पैसा कारणी लागेल, वाया जाणार नाही!
महत्त्वाच्या टिप्स
नियोजन - दिवसाचा कार्यक्रम तयार करा - सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे वेळापत्रक तयार करा.
प्रत्येक आयटेम किती महत्त्वाचा आहे, हे आधी अधोरेखित करा. महत्त्वाचा, साधारण आणि नेहमीचा अशी वर्गवारी करा.
नंतर वेळेनुसार वर्गवारी करा - सकाळी, दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी करायची कामे अशी विभागणी करा
उदाहरणार्थ : महत्त्वाचे साधारण नेहमीची कामे
सकाळ - - -
दुपार - - -
संध्याकाळ - - -
नियोजन हे फक्त वेळ किंवा पैसा यांचेच नसते; विचार, भावना यांचेही असू शकते.
कामांच्या संदर्भातील कागदपत्रे आधी शोधून ठेवा. ती काढून ठेवा, कारण ऐनवेळी त्यासाठी वेळ गेला तर तुमचे नियोजन बिघडू शकते.
नियोजन करताना फक्त आपला विचार करू नका (म्हणजे इतरांचा करा असा अर्थ नाही!); पण प्रवास, इतरांचा वेळ अशा अन्य बाबींचा विचार करा. नियोजन हे एकतर्फी नसावे, सर्वांगीण चौफेर दृष्टिकोनातून केलेले असावे. म्हणजे ते फसणार नाही.
नियोजनात ऐनवेळी बदल करण्याइतकी ‘लवचीकता’ असावी, खूप ‘टाइट’असू नये. नाहीतर एक मीटिंग रद्द झाली किंवा क्लास कॅन्सल झाला ...मधल्या वेळेत करायचे काय? अशी गोची होऊन बसते!
आपल्याशी संबंधित व्यक्ती, घरातील माणसे, ऑफिसमधील माणसे , मित्र, नातलग हे नियोजनवादी असतील असे नाही (सहसा नसतातच!) पण त्यांच्या अनियोजितपणाचा, ढिसाळपणाचा आपल्याला फटका बसणार नाही अशी खबरदार आपणच घ्यायला हवी! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण अर्थ आणि नियोजन यांची सांगड घालूया आणि नवीन वर्ष हे मागील पानांवरून पुढे ...असे नाही, अशी आपण स्वत:शीच ‘खूणगाठ’ बांधूया.
rmjoshi52@yahoo.co.in