आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नपूर्णा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दादाला सांग, मला सगळी भजी हवीत, त्याने नाही खायची या ताटलीतली... शार्दूलची तक्रार. अरे, खाऊ दे. तू तरी काय श्रीरंग, पुन्हा का करता येत नाहीत भजी? अशी कधी खायला न मिळाल्यासारखी भांडता... आई पाहुण्यांशी बोलायचे टाकून एक घाणा भज्यांचा घालायला... अन्नपूर्णा!


घरोघरीच्या या माउल्या... बाळाला पुरणपोळी हवी आहे तर घे आताच केली म्हणत, वरणाच्या डाळीत गूळ कुस्करून चपातीच्या कणकेतच पुरणपोळी बनवणारी माडगुळकरांची माता, मुलांच्या चटकमटक जिभेला रात्रीच्या राहिलेल्या आमटीत भाकरीचे पीठ मळून खमंग-खुसखुशीत थालीपीठ पानात वाढणा-या आमच्या शीतलच्याई, शिळ्या-पोळ्यांच्या चु-यात गूळ मिसळून बनवलेल्या लाडवांनी पाडवा गोड करणारी ताई, शिष्यगणांसह अतिथ आलेल्या दुर्वासांना इष्टभोजनाने अगदी वनवासातही तृप्त करणारी पुराणांतली द्रौपदी... अशी ही यादी कुठवर लांबवावी?
लहानग्याने मागावे, परिस्थितीने थांबवावे नि अन्नपूर्णेने त्यावर युक्तीने वाट काढावी असे आज, या जीवनमान उंचावलेल्या जगातही कितीदा घडते. आमच्या कोब्रा मित्राचा वाढदिवस. पब्लिकमध्ये निरामिष आहारू अशी त्याची प्रतिमा. यीस्ट, डेसिकेटेड कोकोनट, फळावळ इत्यादीने संपृक्त असा प्युअर व्हेज केक बनतो; पण त्या खटपटीला लागणारा वेळ नि शक्ती आईकडे संपत आलेली. मुलाने मोठ्या कौतुकाने सांगितले आईने ग्लुकोज बिस्किट्सचा केक बनवलाय, बघा कसा मस्त! आयसिंग आणि चेरीच्या सजावटीसह केक खुलून दिसत होता आणि चवीलाही छानच होता तो. तरी मज तिथे काही खटकलेच.
आता तुम्ही म्हणाल, ही काही वेळ आहे खटकण्याची? वाढदिवस म्हणजे मजा करायला जमलीत मंडळी. तर मंडळी, आम्हालाही समजतात आपली ही खुपणी, पण आमचंही अस्संच आहे, जिथे मंडळी गठ्ठ्याने चूक दुर्लक्षताना दिसतात तिथे आम्ही आमची पिपाणी वाजवून बहुतांचे लक्ष चुकीकडे वेधतोच.
सांगत होते, बिस्किटांचा केक. जी बिस्किटे सरळ आहेत तशी खाता येतात त्यांना असे केकात वळवून का घ्यायचे? अन्नपूर्णेच्या कौशल्याला दाद म्हणून मोठ्या वसुंधरामायेला त्रास का द्यायचा? कौतुक म्हणून कितीदा अन्नपूर्णेनेही स्वत:ला पणाला लावायचे? परिस्थिती निस्तरणे एक पण केवळ सोहळे म्हणून असे काही? असे कित्येक प्रश्न माझ्यासमोर...
थाळीमध्ये एक शीतही असेल तरी त्यामधून पुन:पुन्हा अन्न उत्पन्न होईल असा वर असलेली द्रौपदीची थाळी. वारसा सांगणा-या घरोघरीच्या द्रौपद्यांना मुद्दाम भांड्याला शिते उरवताना मी पाहते. भात संपलेला. म्हणे, हातांनी सगळी शिते पुसून नको घेऊ. अगं, पण पुन्हा स्वयंपाक करायला घेणार त्या वेळेपर्यंत ते कण भांड्याला खटखटून बसणार, मग पाणी घालून भिजत घाला नि ते खरकटे पाणी बेसिनमध्ये कण अडकू नये म्हणून बाहेर जाऊन बागेत ओता अशी कामे वाढलीच की नाही? अन्न छोटा घासभर का असेना असे मातीत घालण्याच्या माझ्या आक्षेपाचा प्रतिवाद असेल, मातीतल्या जीवाणूंना, पाखरांना होईल... पुन्हा तेच, त्यांना असे शिजवलेले अन्न घालण्याची गरज का आहे? आपल्याला बिस्किट्स खाता येत असतील तर त्याचे केक बनवण्याइतकेच पाखरांना, किड्यामकोड्यांना दाणे शिजवून घालणे हे अनाठायी. मोठेपणा म्हणून किंवा शास्त्र म्हणून नारळ करवंटीपर्यंत न खवणणे, दुधाच्या भांड्याची साय पुसून न खाणे हा प्रकार तर कितीदा पाहिलाय. कच-याच्या टोपलीत, बेसिनमध्ये मुंग्यांना सरळ निमंत्रण!
हॉटेलमध्ये जेवायला गेले निपूर्ण थाळी जास्त असेल तर घरच्यासारखेच लागेल तितकेच वाढून घेऊन भाताची डिश,आमटी-भाजीची वाटी जेवणापूर्वी मी ताटाबाहेर काढून ठेवते. ताट उचलणा-याला आठवणीने सांगते ते उष्टं-खरकटं नसल्याचं. तो हसून सगळे एका हाताने उष्ट्या ताटात गोळा करतो. फेकून का देणार हे? या माझ्या प्रश्नार्थक चेह-याला अर्थातच! असे नजरेतल्या गुर्मीचे उत्तर. याला काय करावे?
माझ्या अतिआग्रहाने एका नवपरिणिता मैत्रिणीने घरातले अन्न, ओला कचरा, सुका कचरा असे वेगवेगळे (तिच्या मते) नस्ते उपद्व्याप अवलंबिले. दोन-तीन दिवसांतच ती सांगत आली, तू म्हणतेस म्हणून मी तीन पिशव्या ठेवतेय. पण केर गोळा करणा-या मावशी तर सगळं एकत्रच करतात. माझा वेळ, दर वेळी तीन पिशव्या शोधण्याची खटपट त्या केरात लोटतात.
तिचंही बरोबर होतं. मी लोकांना पटवण्याची वेगवेगळी साधने शोधत राहते. कधी सुंदरसं मिळून जातं, कधी असे सगळेच मुसळ केरात. गोष्टी तशा छोट्याच, एकत्र येतात तेव्हा परिणाम विचार करावा लागेल इतका!
अन्नपूर्णेचा एक वारसदार आमचा सुबोट. सुट्टीत आईसोबत विद्यापीठात येऊन काहीबाही शिकतो. तिथल्या प्राण्या-पक्षांशी दोस्ती करतो. कावळ्यांना आणि कुत्र्यांना आपल्यासारखीच पोळी मिळावी म्हणून हट्ट. आईने सांगितले, रोज आठ-दहा पोळ्या जास्तीच्या माझ्याच्याने नाही होणार. तुझ्या मित्रांसाठी तू कर हव्या तर. दहाव्या वर्षीच पोळ्या करायला शिकली स्वारी. आपल्यासारखीच पोळी आपल्या या दोस्तांसाठी हवी का? असा प्रश्न न करता या बहाण्याने मुलगा पोळी शिकतो याचे मी का कौतुक केले? आज हौसेने करेल साताठ पोळ्या. आपोआपच त्यातले कष्ट कळायला लागतील. पोळी सहज फेकून देण्याचा उद्दामपणा होण्याची शक्यता कमी. जगण्याला आयाम मिळेल त्याच्या.
एरव्ही सालस असलेल्या आमच्या एक शेजारी पोळ्यांच्या गि-हाइकांच्या डब्यातले थोडे पीठ दररोज मारतात अशी तक्रार मी लहानपणी आईला केल्याचे स्मरते. काणाडोळा करू नये, त्यांना समज द्यावी असे मी म्हणताच आई म्हणाली होती, पदरात पाच पोरी, नव-याच्या दारूच्या नि मटक्याच्या व्यसनांना वारस नाही म्हणून रोज मारहाण, स्वत: उपाशी राहतील, पण त्या छोट्या मुलींचे काय? तुमच्यापेक्षा लहानच आहेत त्या, त्यांना नको काही जेवायला? सांगून, मागून लोक देतील असं तुला वाटतं. जग इतकं चांगलं असतं तर नव-याच्या उपद्व्यापांची किंमत त्यांना का चुकवावी लागती?
मला अन्नपूर्णेचे नवेच रूप दिसले होते...