आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कफाकरिता वासंतिक वमन करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवीन वर्ष सुरू झाले की पहिला सण येतो मकरसंक्रांत! असं म्हणतात की या दिवसापासून दिवस तिळातिळाने वाढतो आणि रात्र मोठी होते. अगदी खरं आहे ते. आता सकाळी सूर्य लवकर उगवायला सुरुवात होते व तो उशिरा मावळायला लागतो. दक्षिणायनाची सुरुवात होऊन ऊन तापण्यास प्रारंभ होतो. याच गरमीने शरीरात थंडीत साचलेल्या कफाचे विलयन व्हायला लागते. पातळ झालेल्या कफाला वमनाद्वारे शरीराबाहेर काढण्याची हीच खरी वेळ आहे.

वमन म्हणजे काय?
शरीरातील प्रकुपित झालेल्या दोषांना मुखावाटे ज्या उपक्रमाच्या साहाय्याने काढले जाते त्या कर्माला वमन असे म्हणतात. या कर्मामुळे प्रामुख्याने कफदोष व अनुषंगाने पित्तदोष ऊर्ध्वमार्गाने बाहेर काढला जातो. वमन कर्मामध्ये रुग्णाला औषधी द्रव्ये देऊन मुद्दाम उलटी करविली जाते. या उलटीद्वारे प्रामुख्याने कफ व पित्त बाहेर काढले जातात. येथे होणारी उलटी म्हणजे व्याधी अवस्था नसून वमन ही कफाची उत्तम चिकित्सा होय. थंडीच्या दिवसात शरीरामध्ये कफदोषांचा संचय झालेला असतो. त्यामुळे खोकला, दमा सर्दी, ब्रॉन्कायटिस असे विकार बळावतात. हाच कफ पुढे वर्षभर कफाचे नानाविध रोग निर्माण करू शकतो. म्हणून वसंत ऋतूच्या फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात प्रत्येक मनुष्याने वमन कर्म करून घेतल्यास पुढे वर्षभर कफाचे रोग होणार नाहीत याची खात्री देता येते. वमनामुळे शरीरातील साचलेला सर्व कफ निघून जातो. यामुळे वारंवार होणारी जुनाट सर्दी, दम्याचा आजार, अ‍ॅसिडिटी कमी होते.

वमन मुख्यत: तीन विभागांत केले जाते.
1) पूर्वकर्म - पूर्वकर्म करण्यापूर्वी वमनास योग्य अशा रुग्णाची निवड केली जाते. शास्त्रात त्यासाठी काही नियम दिले आहेत. त्यानुसारच रुग्ण वमनार्ह आहे का हे ठरवले जाते. पूर्वकर्म सुरू करण्यापूर्वी काही विशिष्ट औषधी देऊन शरीरात साठवलेल्या आमाचे पाचन केले जाते किंवा रुग्णास लंघन दिले जाते. त्यानंतर रुग्णाची प्रकृती किंवा त्यांचा आजार यानुसार स्नेहपान ठरवले जाते. साधारणत: तीन, पाच किंवा सात दिवसांपर्यंत स्नेहन केले जात असते. त्याची मात्रा रुग्णप्रकृतीनुसार ठरते. तरीही साधारण 500 एम .एल. ते 800 एम. एल. औषधीय घृत या कालावधीत दिले जाते. या सात दिवसात संपूर्ण शरीराची मालिश केली जाते. तसेच सर्वांगास औषधीय काढ्याची वाफ दिली जाते. म्हणजे शरीरास आतून व बाहेरून सर्वत्र स्नेहाने लिप्त केले जाते. इथे स्नेह म्हणजे तेल वा घृत अभिप्रेत आहे. यामुळे शरीरात मार्दवता येते. शरीरातील दोष स्निग्ध वा मृदू होतात. स्नेहनाने सर्व दोष कोष्ठात येण्यास मदत होते. तसेच यादरम्यान खाण्यापिण्याचे संपूर्ण अपथ्य असते. श्रीखंड, दही, दूध, फळे, थंड पदार्थ, आइस्क्रीम, दहीभात असे पदार्थ मनसोक्त खायला सांगितले जाते. लहान मुलांना ही एक लॉटरीच लागते. कारण आतापर्यंत सर्दी-खोकल्याच्या भीतीने पालक त्यांना असे पदार्थ द्यायला टाळत असतात.
2) प्रधान कर्म - अधिकतर वमनाची प्रक्रिया सकाळीच आटोपली जाते. कारण हाच कफज काळ असतो. वमन ही एक सहजसोपी प्रक्रिया आहे. त्याचा उगाच बाऊ करून मनावर ताण घेऊ नये. कारण सहजतेने होण्यासाठी काही विशेष औषधे रुग्णास दिली जातात. त्यामध्ये अगदी सरळ रुग्णास उलट्या होतात. त्या काळात रुग्णास ज्येष्ठमधाचा काढा, उसाचा रस, दूध किंवा सैंधवयुक्त पाणी असे द्रवपदार्थ उलटी करवून घेण्यासाठी वापरले जातात. साधारणत: चार - सहा किंवा आठ वमन वेग काळात रुग्णास या उलटीद्वारे प्रथम कफदोषाचे निर्हरण होते. त्यानंतर पित्त आणि वात दोष निघतो. उलटीद्वारे शरीरातील सर्व घाण बाहेर निघते व शरीराचे सर्व स्रोत मोकळे होतात. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत कुणालाही वमन देता येते.
3) पश्चात कर्म - वमन झाल्यानंतर काही दिवस म्हणजे साधारण तीन ते सात दिवस काही पथ्य पालन करावे लागते. यास संसर्जन क्रम असे म्हणतात. वमनामुळे जठरावर ताण आलेला असतो. जठराग्नी मंद झालेला असतो. तो हळूहळू प्रदीप्त करण्यासाठी पचावयास हलक्या आहाराची योजना केली जाते. नंतर हळूहळू पूर्वीसारखाच आहार सुरू केला जातो. विशेषत: चार ते आठ उलट्या झाल्यानंतरही रुग्णास कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. अशक्तपणा येत नाही. डिहायड्रेशन, हायपोटेशन होत नाही.
वमनाचे फायदे - योग्य प्रकारे वमन झाल्यास शरीरात संचय झालेल्या अतिरिक्त कफाची प्राकृत स्थिती निर्माण होते. त्यामुळे कफाचे नानाविध रोग होतात. त्यावर नियंत्रण येते. दमा, खोकला, जुनाट सर्दी, टॉन्सिल वाढणे, किचकट त्वचारोग, आमलपित्त, स्त्रियांचे विकार, मासिक पाळीत अंगावरून अधिक जाणे, सोरायसिस इत्यादी रोगांमध्ये वमनाचा चमत्कारिक परिणाम दिसून येतो. सध्या तरुणांमध्ये पिंपल्सचे प्रमाण खूप वाढले आहे. बरेच उपचार केल्यानंतर वा त्वचेवर अनेकविध क्रीम, साबण, लोशन वापरल्यानंतरसुद्धा काहीही फायदा होत नाही. अशा वेळेस वमनाचा खूप चांगला परिणाम आपणास मिळतो. त्याप्रमाणे आधुनिक जीवनशैलीची भेट म्हणून लाभलेले उच्चरक्तदाब, मधुमेह, अतिरिक्त वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण इत्यादीमध्येसुद्धा वमनाचा आश्चर्यकारक फायदा होतो. हे संशोधनाद्वारे सिद्ध झालेले आहे. तसेच स्वस्थ व्यक्तीने वमन करून घेतल्यास पुढे वर्षभर कफाचे रोग होणार नाहीत याची खात्री असते. वसंत ऋतूचा काळ साधारणत: या वेळेस 24 जानेवारीपासून पुढे दोन महिन्यांपर्यंत गणला आहे. यादरम्यान वमनास योग्य व्यक्तींनी तज्ज्ञ चिकित्सकाकडून शास्त्रोक्त पद्धतीने वमन करून घ्यावे. भारतीय शास्त्रातील आयुर्वेद ही अनमोल देणगी होय व त्याच आयुर्वेदाची अर्धचिकित्सापद्धती ही आरोग्यासाठी एक वरदानच होय. याचा प्रत्येकाने लाभ घ्यावयास हवा.