आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉरिनची कलावंतीण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमीसारखीच दुपार. बाहेर उन्हाचा कडाका असला तरी कनातीच्या सावलीत गारवा होता. आदल्या रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या खेळामुळे थकलेल्या कलावंतांनी जमिनीला पाठ टेकलेली. झिरकं आणि भाकरी जेवतच मी मंदाताईंशी गप्पा मारत होते. गप्पा ऐन रंगात आल्या असतानाच मंदातार्इंना शोधत ‘भागा’ धावत कनातीत आली. ‘मम्मी मम्मी, तुझं बाळ आलं.’ भागाच्या या दवंडीने सगळा फड गोळा झाला आणि पडद्यातून एका फडक्यात गुंडाळलेलं छोटंसं बाळ घेऊन हिरवट डोळ्यांच्या, भुर्‍या केसांच्या एका गोर्‍यापान विदेशी तरुणीचा प्रवेश झाला... कुटुंबात नव्या पाहुणीचे स्वागत होत असतानाच, माझे डोळे मात्र अनपेक्षितपणे तिच्यावर खिळले होते. मी बराच वेळ तिच्याकडे निरखून पाहत आहे, हे लक्षात आल्यावर ओशाळून मी भानावर आले. परदेशी आहे म्हटल्यावर मी तिला ‘हाय’ केले, तसे तिने नम्रपणे दोन्ही हात जोडून नमस्कार केला. पुन्हा एकदा ओशाळून तिच्या नमस्काराला प्रतिनमस्कार केला. ‘आय अ‍ॅम अ जर्नलिस्ट’ अशी स्वत:ची जुजबी ओळख करून देत असतानाच ‘कोणत्या वृत्तपत्राचे?’ असे तिचे अस्खलित मराठी ऐकले व माझे डोळे विस्फारले... मराठी बोलताना तिच्या ओठांची हालचाल आणि तिच्या बोलण्यातले नेमके पुस्तकी शब्द यांतच गुंतून गेल्याने माझ्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले.

पेट्रा शेमाखा ऊर्फ मंदाराणीची पेट्राताई...
‘दोन वर्षे मी पुण्यात राहून मराठी शिकले. अनेकांना माझ्या मराठी बोलण्याचे आश्चर्य वाटते, पण मी ज्या विषयावर अभ्यास करतेय, त्यानुसार त्या भागातल्या माणसांशी संवाद साधणे गरजेचे होते आणि म्हणून मी मराठी शिकले. भारतातील कितीतरी मुले जर्मन शिकतात आणि जातातच ना अभ्यास करायला, मग माझ्या मराठीचे एवढे कौतुक कशाला?’ तिचा रोख ‘जर्मनीची बाई मराठी बोलते आणि तमाशावर अभ्यास करतेय.’ अशा मथळ्याची बातमी करणार्‍या उत्साही पत्रकारांकडे होता. महाराष्ट्राची पारंपरिक कला म्हणून ‘तमाशा’ या विषयावर पेट्राने नेमका काय अभ्यास केला आहे, हे न विचारता पत्रकारांना केवळ परदेशी तरुणीचे गावाखेड्यात येणे ‘बातमी’ वाटते, याबद्दल तिच्या बोलण्यात खेद जाणवत होता.
‘पाच वर्षांपूर्वी मी जेव्हा भारतात दाखल झाले, तेव्हा मराठी नाटक या विषयाचा अभ्यास केला. एक मराठी नाटकही बसवले. मात्र, मराठी रंगभूमीवर तितक्याशा प्रमाणात नवे प्रयोग होताना दिसत नाहीत. रंगमंचाची व्यवस्था आणि एकूणच प्रेक्षकांचा मराठी नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे मराठी नाटक आहे त्याच अवस्थेत अडकणार, हे लक्षात आल्यावर मी त्यातून अंग काढून घेतले. त्याच दरम्यान एका प्रदर्शनात संदेश भंडारे यांची तमाशा या विषयावरची छायाचित्रे पाहिली. हे माझ्यासाठी वेगळे होते. त्या क्षणी एक प्रयोगशील म्हणून मी तमाशाचा अभ्यास करायचे ठरवले.’ अभ्यास करण्यापुरते तमाशा कलावंतांच्या केवळ मुलाखती घ्यायच्या आणि उपलब्ध पुस्तकांतून काही मुद्दे जसेच्या तसे उचलायचे, असे काहीसे चित्र पीएचडी करणार्‍या अनेकांच्या बाबतीत आढळते, मात्र पेट्राने सर्वस्वी वेगळा मार्ग निवडला. तमाशा कलावंतांचे जगणे अनुभवण्यासाठी तिने स्वत: तमाशा फडात राहण्याचा निर्णय घेतला. अनेक स्त्री कलावंतांशी संवाद साधता यावा, तसेच जास्तीत जास्त तमाशाचे प्रयोग पाहता यावेत, यासाठी महाराष्ट्रात नंबर वन असलेल्या रघुवीर खेडकर तमाशा फडाची निवड तिने केली आणि पाठीवर बिºहाड घेऊन या गावातून त्या गावात अशी तीही नाचत राहिली... जगाच्या नकाशावर जर्मनी नेमके कुठे आहे, हे माहीतही नसणार्‍या तमाशा कलावंतांनी पेट्राला आपलेसे केले. पीएचडी करण्यासाठी परंपरा म्हणून पेट्राने एका गाइडची सोबत घेतली असली तरी तमाशातली तिची खरी गाईड ठरली मंदाराणी.. मंदाराणीच्या सोबतीने अर्ध्या रात्रीच्या खेळावर उपजीविका करणार्‍या अनेक कलाकारांचे आयुष्य पेट्राला जवळून पाहता आले.. अनुभवता आले.. जगता आले. ‘आमी काय, कुठलंबी पानी पितो आणि कुठंबी राहतो, पण पेट्राताईला हे सगळं कसं झेपायचं, असा प्रश्न पडला होता.’ आरशासमोर मेकअप करणार्‍या मंदाराणीच्या बोलण्यात काळजी जाणवत होती. ‘सुरुवातीला आमचं तिखट जेवण तिला जाईना, लालेलाल व्हायची नुसती. पण नंतर तिने ते सगळं निभावलं. आता ती आमच्यासारखीच टमरेल घेऊन जाते. नदी असेल तर अंघोळीला आणि धुणे धुवायलाही जाते. मग सांगा, पेट्राताई आमचीच की नाही?’ मेकअपमध्ये मनापासून मदत करणारी पेट्रा आणि मंदाताई यांच्यातली मैत्री लपत नव्हती. मंदातार्इंनी दत्तक घेतलेल्या मुलीला आणण्यासाठी आणि कायदेशीर बाजूंची पूर्तता करण्यासाठी पेट्राने पुढाकार घेतला होता. गेली तीन वर्षे फडाच्या संस्कृतीत पेट्रा इतकी समरसून गेली आहे, की तिच्या वागण्याबोलण्यातही मराठीपण पुरते झिरपले आहे. मराठी बायकांसारखीच पेट्राही आरशासमोर बसून केसांचे दोन भाग करत केस विंचरते. जेवताना चपातीचा तुकडा मोडून आमटीत भिजवलेल्या भातासोबत खाते. एक परदेशी तरुणी तमाशावर पीएचडी करतेय म्हणजे, तिच्या रूपाने तमाशा खर्‍या अर्थाने ‘ग्लोबल’ होणार, हे निश्चित. त्यामुळे तिच्या फडातल्या अस्तित्वाचे कौतुक बाजूला सारून तिला दिसलेला तमाशा जाणणे अधिक औत्सुक्याचे होते. मराठी लिहिता -वाचता येत असल्याने पेट्राने तमाशावरील अनेक पुस्तकांचा फडशा पाडला. अनेक पुस्तकांतील शैली व माहिती थोड्याफार प्रमाणात वेगळी असली तरी एक मुद्दा ठळकपणे झाडून सगळ्या पुस्तकांत आला. ‘पूर्वीचा तमाशा आता राहिला नाही’ असे म्हणत अनेक लेखकांनी बदललेल्या तमाशावर ताशेरे ओढले आणि पारंपरिकतेच्या गळ्याला नख लावल्याबद्दल सध्या सुरूअसलेल्या तमाशांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. पेट्राने पाहिलेला आणि अनुभवलेला तमाशा हा बदललेला तमाशाच होता, तेव्हा तिची निरीक्षणे नेमकी काय होती?
‘काळानुसार बदल होणे हे नैसर्गिक आहे, नाही तर ती कला मरते. जुना तमाशा हाच खरा तमाशा, असे मानून चालणार नाही. आताचे प्रेक्षक हिंदी सिनेमा पाहतात त्यामुळे त्यांना तमाशात हिंदी गाणे पाहावेसे वाटते. ही प्रेक्षकांवर जगणारी कला आहे, तेव्हा त्यांना आवडतील ते बदल करणे गरजेचे असते.’ पेट्राने नेमके वर्मावर बोट ठेवले. ‘गण, गवळण, वगनाट्य हे तमाशाचे मुख्य भाग उरलेल्या तमाशात तसेच ठेवण्यात आले आहेतच ना. वगनाट्यात बदल चालतो, विनोदात बदल चालतो, मग तमाशात बदल का नको?’ असा थेट प्रश्नही पेट्रा विचारते. अनेकदा मंदाराणी सादरीकरण करत असताना तिला काही सेकंदांत कपडे बदलावे लागतात व त्यासाठीच हातावर कपड्यांचा ढीग घेऊन पेट्रा बॅकस्टेजला सज्ज असते. हौसेने नऊवारी साडी नेसून, भडक मेकअप करून तमाशा कलावंतासारखा फील घेण्याचा प्रयत्न पेट्राने सुरुवातीला केला; मात्र त्यांच्यासारखे कनातीत राहून तमाशा कलावंतांच्या जीवनाच्या अधिक खोलात जाण्यात पेट्रा यशस्वी ठरली. कधी मराठवाडा, कधी पश्चिम महाराष्ट्र, जिथे जिथे तमाशाचा फड लागेल, तिथे पेट्रा सोबत जाते. त्या गावात रघुवीर खेडकरांचा तमाशा जितका आकर्षणाचा विषय असतो, तितकेच आकर्षण त्यांना कनातीत दिसणार्‍या या गोर्‍या मेमबद्दलही वाटते. अनेकदा तमाशा कलावंतांना भेटायला येणारी मंडळी पेट्राला पाहून डोळे विस्फारतात व तिचे मराठी ऐकून तर तिला ‘फॉरिनची पाटलीण’ म्हणतात. मात्र, तमाशा कलावंतांसारखे जगणे अनुभवणारी पेट्रा ‘फॉरिनची कलावंतीण’ म्हणूनच अधिक शोभते! (क्रमश:)
bhingarde.namrata@gmail.com