आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फॉरएव्हर पाप्युलर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नो ऑर्किड फॉर मिस ब्लँडिश’ या 1941मध्ये तुफान खपलेल्या जेम्स हॅडली चेसच्या कादंबरीवर जॉर्ज ऑर्वेलने ‘रॅफल्स (ई. डब्ल्यू. हॉर्नंग या लेखकाने निर्माण केलेले ‘जंटलमन थीफ’ प्रकारातले पात्र) अँड मिस ब्लँडिश’ हा तुलनात्मक लेख निबंध लिहिला. तोपर्यंत तर चेसची दखल वाङ्मयीन जगाने घेतली नव्हती.


जेम्स हॅडली चेस हा मुळात पुस्तक धंद्यातला माणूस. त्याचा जन्म आणि वास्तव्य इंग्लंडमधले, पण त्याच्या कादंब-या प्रामुख्याने अमेरिकेत घडतात. त्याच्या कादंबरीची भाषा ही सोपी सुटसुटीत अमेरिकन असते. अमेरिकन स्लँग म्हणजेच, बोलीभाषेचा वापर त्यात विपुल असतो. नकाशे, पर्यटनविषयक पुस्तिका आणि अमेरिकन्स स्लँग डिक्शनरी यासारख्या गोष्टींचा मुबलक वापर करून त्याने कादंब-यांमधून अमेरिकन वातावरण निर्माण केले. शिवाय बँकिंग व्यवसाय, कॅसिनो व्यवसाय, गाड्यांची मॉडेल्स या सा-यांबाबत संशोधनातून आलेल्या माहितीमुळे तो कधीही संदर्भ आणि तपशिलात चुकत नसे.


‘वल्चर इज द पेशंट बर्ड’ या कादंबरीत एक अट्टल गुन्हेगार अनेक सराईत गुन्हेगारांना एका बेटावर बोलवतो आणि त्यांना एक दुर्मीळ हिरा चोरायला लावतो. प्रत्यक्षात हिरा चोरताना ते मरतील आणि विरोधकांचा काटा काढला जाईल, अशी त्याची योजना असते. आपल्याकडे यावरून ‘शालिमार’ हा सिनेमा बनवण्यात आला होता. ‘माय फेअर लेडी’ फेम ‘रेक्स हेरिसन’ने यात काम केले होते. मूळ कादंबरीत हि-यांमध्ये भयानक विष ठेवलेले असते आणि ते सुकले असेल म्हणून गुन्हेगार त्याच्यावरून बोट फिरवतो आणि रक्त येते, पण प्रत्यक्षात नवे विष नुकतेच भरलेले असते. थोडक्यात, तो चोरणाराही मरतो. या प्रकारचा शेवट त्याच्या अनेक कादंब-यांमध्ये दिसतो.


साधारणपणे नव्वदपेक्षा अधिक कादंब-या जेम्स हॅडली चेसने लिहिल्या. त्यापैकी 50पेक्षा अधिक कादंब-यांवर सिनेमे झाले. ऑर्कि डचा पुढचा भाग ‘फ्लेश ऑफ द ऑर्किड’ या नावाने प्रसिद्ध झाला. या दोन्हीमध्ये ‘फेरोल ब्लँडिश’ या तरुणीच्या पलायनाची आणि पळवण्याची गोष्ट आहे. पहिल्या कादंबरीत 18 वर्षाची झाल्यावर तिला संपत्ती मिळणार असते. त्यामुळे तिला पळवण्यात येते. पण पळवून नेल्यावर तिचा लैंगिक छळ सुरू होतो. कादंबरीतील खळबळजनक गोष्ट हीच होती. जॉर्ज ऑर्वेलने चेसच्या लेखनशैलीचे कौतुक करताना म्हटले आहे की, उत्तम लेखनाचा नमुना; एकही शब्द त्यात वाया घालवलेला नाही किंवा कुठल्याही बेसूरपणाला यात वाव नाही. माणसे यात एकमेकांना क्रूरपणे ठार मारून टाकतात; त्यांच्या जगण्यात नियतीचा वाटा कमी आहे, हा मुद्दा ऑर्वेलने मांडला.


चेसच्या लेखनातील प्लॉट कमालीचे कल्पक असत. उदाहरणार्थ, एका धनाढ्य माणसाची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी त्याच्या बायकोच्या लहान बहिणीला मुलगी म्हणून त्या घरात आणणे किंवा एक रत्नजडित खंजीर चोरण्यासाठी नव्हे, तर एका तिजोरीत ठेवून येण्यासाठी गँगस्टरला पैसे देणे किंवा एखाद्या बँक मॅनेजरने स्वत:ची बँक लुटणे. चेसच्या लेखनावर जेम्स केनसारख्या गुन्हेगारी कथालेखकाचा तसेच विल्यम फॉकनर आणि जॉन स्टाइनबॅक यांच्या लेखनाचा पगडा होता. त्याचे मूळ नाव रेने रेमंड असले तरी वाचकांना जेम्स हॅडली चेसचेच नाव ठाऊक आहे. 1906मध्ये जन्मलेला चेस 1985 पर्यंत जगला. मात्र, आजही त्याची लोकप्रियता वादातीत आहे.