आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवस सुनेचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच घडलेला प्रसंग. मुलगी पाहायला रीतसर मंडळी मुलीकडे आली होती. मुलगी इंजिनिअर, बुद्धिमान तसेच चांगला पगार कमावणारी. चेह-यावर आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. तिला विचारण्यात आले. ‘तुला स्वयंपाक येतो का?’ ती क्षणात ‘नाही’ म्हणून उत्तरली. सगळे जण एकदम अवाक् झाले. मुलाची मावशी म्हणाली, अगं, कधीतरी केला असशीलच ना? स्वत:साठी म्हणजे स्वत:चे पोट भरण्यासाठी तरी स्वयंपाकाशी गट्टी करावी लागते. त्यावर मुलगी उत्तरली, ‘अहो काकू, त्याचे काय आहे ना, मी म्हटले आता लग्न झाल्यावर सासूकडूनच स्वयंपाक शिकून घ्यावा. उद्या मी कितीही जरी चांगले रांधले तरी त्या म्हणणार अगं, आपल्याकडे हा पदार्थ असा बनवतात. आपली पद्धत ही अशी आहे आणि माझ्या रेसिपीला कुणी असे नाव ठेवले तर मला वाईटच वाटणार ना! त्यापेक्षा मी लग्नानंतर शिकायचा स्वयंपाक असे धोरण ठेवले आहे आणि शिकायला काय लागते फारसे? मी लगेच शिकून घेईन.’ उपस्थितांपैकी काहींना तिचे म्हणणे रास्त वाटले तर काहींना ती ‘आगाऊ’ वाटली. अर्थात मुलाकडच्या मंडळींचा नकार आला.


करिअर करणा-या मुलींना आठ-दहा तास घराबाहेर नोकरीनिमित्त राहिल्यावर स्वयंपाकाला फारसा वेळ मिळत नाही. त्यात कमी वेळात जास्तीत जास्त साधायचे असते, त्यामुळे सांगोपांग चर्चा तीही एखाद्या पदार्थाबाबत अथवा त्याच्या कृतीबाबत करणे त्यांना फारसे प्रस्तुत वाटत नाही. ‘शॉर्टकट’ वापरले जातात.


परंतु त्याला दुसरी बाजूही आहे हं. आजच्या या नोकरी करणा-या सुना भाग्यवानही आहेत. माझ्या दोघी-तिघी मैत्रिणींना सुना आल्या, पण त्यांच्या हातातील काम काही सुटले नाही. सुनेला गरमगरम खाऊ घालण्यात त्यांना कोण आनंद असतो! गरमागरम तळलेला वडा अथवा थालीपीठ, डोसा तव्यावरून सुनेच्या ताटात पडतो. एखाद्या सुसंस्कारित सुनेला अवघडल्यासारखेही वाटत राहते. आपल्याच भाग्याचा तिला हेवा वाटू लागतो. सुनेला वाढणा-या सासूला मात्र नकळत तिचा काळ आठवतो. ती क्षणिक हिरमुसतेही, परंतु परत आनंदाने आपल्या कौटुंबिक स्वास्थ्याचा आनंद घेते. तिला सुनेच्या कर्तृत्वाबद्दल मनापासून अभिमान असतो. त्यात ती कुठेही आपले ‘सासूपण’ डोकावू देत नाही.


सुनेला घरकाम आवडत नाही किंवा स्वयंपाक करता येत नाही, यावरून घरात कुरबुरी वाढत जाऊन त्याची मजल घटस्फोटापर्यंतही जाऊ लागली आहे. आपली कन्या कितीही लाडकी असली तरी उद्या तिला तिच्या संसारासाठी स्वत:चे योगदान देणे आवश्यकच आहे. तेव्हा तिला घरकाम करावे लागते या गोष्टीचा बाऊ करण्यात काहीच अर्थ नाही. कितीही उच्च पदावर ती काम करीत असली तरी घरातील स्वयंपाकघराची ती अनभिषिक्त सम्राज्ञी असते. हाताशी काम करणारी माणसे असली तरी कामे तिलाच करवून घ्यायची असतात. श्रमप्रतिष्ठा खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी युवक-युवतींनी थोडे आत्मपरीक्षण करणे नक्कीच गरजेचे आहे.