आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्री बर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दे वाशप्पथ असा विचार मनात कधीच आला नव्हता. राकेश असा मुलगा नव्हताच मुळात. म्हणजे मीपण तशी नव्हते तरी! घंटा वाजली. प्राजक्ता तशीच वळून वळून बघत तिच्या वर्गात गेली. आता मात्र मी नवीनच पेचात पडले होते. ‘ए शारे, सांभाळ हं. हे काय चाल्लंय. तो बोलत नाही तुझ्याशी, प्राजक्ता वेगळंच सांगतेय, दादाचं वेगळंच चालूये. काय अर्थ आहे याचा?’ - मन


मी नि:शब्द. संशयाचं पिल्लू मनात शिरलं ना की काय काय होतं याचं प्रत्यक्ष चित्रीकरण करावं इतकी वाईट परिस्थिती होती ती माझ्या लेखी. मग मी माझं लक्ष जाणून बुजून अभ्यासात वळवायला सुरुवात केली. राकेशचा विषय मनात येऊच द्यायचा नाही. घरी गेलं कीसुद्धा खायचं, प्यायचं आणि अभ्यासाला लागायचं. शाळेतही मुद्दाम बार्इंना शंका विचारायच्या. जाता-येता क वर्गाकडे बघायचंच नाही. कुठेही राकेशचा विषय काढायचा नाही, बोलायचं नाही. मी हळूहळू स्वत:वर नियंत्रण ठेवू लागले. माझ्यातला बिनधास्तपणा जणू हरवू लागला होता. आणि याला कारणीभूत होते ती मीच!
या सा-यामुळे माझा स्वभाव आता घुमा होत होता. मी एकटं राहणं प्रीफर करू लागले. निष्क्रिय झाले. एखादी गोष्ट पटली नाही की ती खोडून काढणारी मी आता कुठल्याच गोष्टीवर प्रतिक्रिया देत नव्हते. निरुत्साही झाले होते. फक्त आजूबाजूला काय चाललंय हे पाहायचे. दरम्यान, राकेशही माझ्याशी बोलायला आला नाही. मीच त्याला असं सांगितलं असल्यामुळे दुस-या कुणाला याचं दोषी मानणं शक्य नव्हतं.


असंच सगळं रेटत असताना एका मधल्या सुटीत मी राकेश आणि मनीषाला एकमेकांशी बोलताना पाहिलं. अचानक अंगात पूर्वीची शारदा घुसल्यागत वाटलं. त्या दोघांची मैत्री मला नेहमीच खटकायची. आणि तेव्हा तर राकेश माझा चांगला मित्र होता. आता मी त्याच्याशी मैत्री तोडलीये म्हटल्यावर मनीषाने माझी जागा घेतली तर, अशी भीती मनात जागी झाली. क्षणभर जाऊन त्या दोघांचं बोलणं तोडावंसं वाटलं; पण नंतर पावलं आपोआप थांबली. कारण त्यानंतर येणा-या प्रश्नांना द्यायला लागणारी उत्तरं माझ्याकडे नव्हती. आणि मनीषा माझी एवढी खास मैत्रीणही नव्हती की मी तिच्याशी बोलायला जाईन किंवा तिला दुसरीकडे खेचत नेईन. उगंच इकडे-तिकडे फिरण्याचा आव आणत मी त्या दोघांवर नजर ठेवत होते.
थँक्स शारू म्हणताना राकेशने मला केलेला शेकहँड त्याने दुस-याला करू नये, असं मला खूप वाटत होतं. पण त्यांचं बोलणं सुरूच होतं. ‘एवढं काय बोलताहेत हे? जा ना. तू जाऊन बघ ना.’ - मन
‘नको. मी त्यांच्याशी बोलत नाहीये ना.’ -मी
‘ही बेल कशी नाही वाजली अजून. माधवदादा झोपला की काय!’ -मन
‘थांब, आपण बघून येऊ. चल पटकन.’ -मी
मी स्टेजच्या मागून पळत पळत ऑफिसकडे गेले. मी पोहोचणार तेवढ्यात माधवदादाने बेल दिली. हुश्श झालं. मग मी माघारी फिरले; पण ते दोघं तिथे नव्हतेच! आपापल्या वर्गात गेले असतील, असा अंदाज बांधत मीही माझ्या वर्गाकडे मोर्चा वळवला. शाळा सुटेपर्यंत माझ्या डोक्यातून हा विषय गेलासुद्धा. मन पूर्ण कोरं झालं होतं.
त्या दिवशी मी खूप हळूहळू चालत घरी गेले. एकटीच गेले. लांबच्या रस्त्याने. माहिती असलेला एरिया पहिल्यांदाच पाहतेय अशा थाटात सगळीकडे नजर टाकली. स्टेशनरीसाठी प्रसिद्ध असलेलं प्रसन्न स्टोअर्स आज खूप मोठं भासलं. त्या स्टोअरमधल्या रंगांच्या पेट्यांनी जणू मला मोहिनी घातली. रोजचंच हे दुकान आज इतकं सुंदर का दिसतंय? त्याच्याच वरच्या मजल्यावर बँकपण आहे हे तर मला माहीतच नव्हतं. आणि कोप-यावरच्या मोठ्या झाडाखाली कसल्या तरी फुलांचा सडा पडला होता. मी वाकले. ओहो. बकुळ. वर पाहिलं. बकुळीचं डंवरलेलं झाड. मी वेड्यासारखी किती वेळ बघत राहिले. तोच जोराचा वारा आला. आणि एकच जोरदार पुष्पवृष्टी झाली. तशी मी भानावर आले.


मी रोज किती फास्ट चालते हे मला इतर लोकांकडे पाहून आज कळलं होतं. असंच रेंगाळत मी घरी पोहोचले. फ्रेश झाले.
तशी मी ऑलरेडी फ्रेशच झाले होते. कधीच न गेलेल्या प्रांतात गेल्यावर सगळं जसं भासेल तसं मला जाणवत होतं. खूप हलकं, जसं एखादं फुलपाखरू! आज दादाला खुन्नस दिली नाही, टीव्ही पाहिला नाही, चिडचिड केली नाही. उलट आईला चार वेळा जास्त बिलगले, जुनी चित्रकलेची वही काढून पाहत बसले, काही न बोलता चेह-यावर प्रसन्नता घेऊन बसले. जणू शेवटचा दिवस आयुष्याचा.


आज जेवणही जरा जास्त चविष्ट लागलं, गादी अजून मऊ वाटली, झोप जरा शांत लागली. सकाळही त्याच शांततेत झाली.अगदी आंघोळ करताना पिअर्सच्या वडीचा वासही हवाहवासा वाटला. मस्त वाटत होतं. तयारी झाल्यावर मी शाळेत जायला निघणार तेवढ्यात दादा म्हणाला, ‘शारे, आज मला काम आहे तुझ्या शाळेकडे संध्याकाळी. मी येता-येता घ्यायला येईन तुला.’
‘हो चालेल ना. टाटा.’
दादाला एक मस्त स्माइल देऊन मी निघाले. याचं दादाला खूप आश्चर्य वाटलं असणार. ‘एरवी, तू अजिबात येऊ नको. माझ्या मैत्रिणी चिडवतात मला लहान मुलगी म्हणून, मी मोठी झालीये,’ वगैरे उत्तरं दादाला मिळायची. पण आज जादू झाली होती. मी निघाले. कालसारखी हळूहळू चालत, तरंगत, रस्ता न्याहाळत, रमतगमत शाळेत पोहोचले. नेहमीप्रमाणे गेटवर चिंचाबोरांची हातगाडी. बाजूलाच फूलवाली बाई. इतक्यात राकेश दिसला.
मी त्यालाही एक स्माइल दिलं. तोपण हसला. आज आमच्यात रोजसारखं कोल्डवॉर झालं नाही. तेवढ्यात आनंद आला.
‘शाऽऽऽरू’
‘अंऽऽऽडू.’
‘हा हा हा. आज चिडली नाहीस! सूर्यच उगवलाय ना नक्की?’
‘हो मग. तू उठून काहीही फालतू बोलशील आणि मी त्याला भीक घालत बसू का!’
‘अरे शारदा, काय डायलॉग मारते तू. व्वाह. प्रेमात पडलीस की काय! सांगायला पाहिजे त्या कदमला.’
‘फुर्र, वळू. निघ चल,’ मी खिदळत बैलाला हाकलतात तसा आविर्भाव करत त्याला हाकलला.
‘हा हा हा. टाटा, चल वर्गात भेटू.’
मलाही आश्चर्य वाटलं की मी आनंदला कसं एवढं लाइटली घेतलं! असो. मी वर्गाकडे आगेकूच केली. आणि वाटेत प्राजक्ताकडून कळलं की राकेश आणि मनीषा हे दोन दिवसांत येऊ घातलेल्या घटसंमेलनाचं सूत्रसंचालन करत होते.
ओह! म्हणजे. ओ ओ ओके. म्हणून काल मधल्या सुटीत ते एवढं बोलत होते तर.
माझ्या मनातले संशयाचे पिल्लू लुटुलुटू शेपटी हलवत एकदम शिस्तीत एका रांगेत बाहेर पडले. कुठे तरी थोडंसं खटकलं. मनीषा आणि राकेश एकत्र म्हटल्यावर कुठेतरी चलबिचल निर्माण झाली. थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली. मी वर्गाकडे जायला लागले तेवढ्यात ऑफिसच्या दिशेने पाठक सरांनी आवाज दिला. ‘भावे भावेऽऽऽ इकडे ये पाच मिनिटं.’
मी गेले आणि काय! राकेश आणि मनीषा तिथे ऑलरेडी प्रेझेंट होते.
‘हं, भावे. दोन दिवसांनी म्हणजे 25 तारखेला आहे आपलं घटसंमेलन. तर त्यासाठी. तुझ्या लक्षात आलंच असेल. स्वागतगीत बसवायचं आहे. म्हणजे गॅदरिंगला झालं तेच. हे दोघं अँकरिंग करतील. त्यांची थोडी प्रॅक्टिस घ्यावी लागेल. बाकी तू तर बेस्ट आहेस. तुझी खात्रीच आहे. तर माझा तिसरा तास आहे ना तुमच्या वर्गावर? तेव्हा ये तळघरात. तिथे आपण तालमी रंगवू बरं का! तुम्ही दोघं पण ऐका.’
‘हो सर. येऊ.’
सरांची परवानगी घेत मी बाहेर पडले. मागून राकेश आणि मनीषाही आले.
‘राकेश, तू जाशील तेव्हा मलाही बोलव. दोघं सोबत जाऊ,’ मनीषा म्हणाली.
‘बरं! शारू, मी जाताना तुला दिसेलच. तू तेव्हाच निघ. मग आपण सोबत जाऊ मनीषाला बोलवायला.’
मनीषाचा जोही काही डाव होता तो सरळ सरळ फसला. मला तिचा अकारण राग येत असल्याने राकेशच्या अशा उत्तराचा मला निखळ आनंद झाला. काल ते दोघं इतकं का बोलत होते हे मला कळलं होतं, आता ते दोघं माझ्यासमोर प्रॅक्टिस करतील हेही मला माहीत होतं. त्यामुळे मनीषा कितीही काहीही करो, मी समोर असेनच ही खात्री माझ्या डोळ्यातून चमचम करत होती.

(क्रमश:)
avkpd08@gmail.com, esahity@gmail.com