आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हब्‍बा खातूनच्‍या भूमीतून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेली अनेक वर्षं काश्मीर धुमसतंय. त्यामागचं राजकारण बाजूला ठेवून तिथल्या माणसांच्या हालअपेष्टा आपण समजावून घ्यायला हव्यात, असं प्रकर्षाने वाटल्याने मुंबईतील एक पत्रकार तिथे पाचसहा वर्षांतले काही महिने राहिली, तिने तिथलं जनजीवन जवळून पाहिलं. त्यातूनच जन्माला आलं पुस्तक: ‘बिहोल्ड, आय शाइन, नॅरेटिव्ज आॅफ कश्मीर्स विमेन अँड चिल्ड्रन.’ हे पुस्तक का लिहावंसं वाटलं, आणि ते लिहिण्यासाठी तिथे घालवलेला काळ कसा होता, त्यातनं काय शिकायला मिळालं, हे लेखिकेने खास मधुरिमासाठी लिहून पाठवलं आहे.

छत्तीसगड राज्यातलं बस्तर आणि ओदिशामधील काही ठिकाणी जमीन अधिग्रहण, हस्तांतरण, पुनर्वसन या विषयांवरनं व्यवस्थेशी झगडणाऱ्या, मुख्यत: आदिवासींच्या बातम्या करण्यासाठी मी एका पत्रकारासोबत २०१०मध्ये गेले होते. तिथे असतानाच काश्मीरमधल्या अस्वस्थतेबद्दल थोडंथोडं कानावर येत होतं. तिथे अनेक तरुण मुलं मारली गेली होती, असं कळत होतं, परंतु वर्तमानपत्रं किंवा टीव्हीवरच्या बातम्यांमधनं तपशील उघड होत नव्हते.
 
छत्तीसगड आणि ओदिशातील लोकांसोबत अनेक दिवस घालवल्यानंतर माझ्या राजकीय जाणिवा तीव्र झाल्या होत्या. एक असंही जग असतं, अशाही घटना असतात ज्या फारच कमी वेळा जशाच्या तशा बातम्यांमधून समोर येतात, मला हे जाणवू लागलं होतं. टाइम्स आॅफ इंडियामधील माझी एक जुनी सहकारी काश्मिरात होती, तिने मला प्रत्यक्ष परिस्थिती पाहायला अनेकदा तिथे बोलवलं होतं, पण जाणं होत नव्हतं. मग या पार्श्वभूमीवर मी तिचं आमंत्रण स्वीकारायचं ठरवलं. आम्ही मैत्रिणी नव्हतो, आमची ओळख फेसबुकवरचीच होती. पण तिने मला सर्व प्रकारची मदत करायचं आश्वासन दिलं आणि मुख्य म्हणजे राहायला तिचं घर खुलं केलं. तिने मला एक धोक्याची सूचना अाधीच देऊन ठेवली होती. ती म्हणजे बऱ्याचदा जेवण म्हणजे अंडी आणि मॅगी एवढंच मिळण्याची शक्यता.

कारण सततचा कर्फ्यू आणि जीवनावश्यक वस्तूंची चणचण. पण माझी स्वयंपाकातील कौशल्यं यथातथाच असल्याने मला सोपे पदार्थच आवडतात. त्यामुळे मी म्हटलं, वंडरफुल. श्रीनगरमधल्या पहिल्याच दिवशी मी नयनरम्य अशा निगीन तलावाकाठी दोन काॅलेजकन्यकांना भेटले. त्यांच्या भयानक कहाण्या आणि या स्वर्गीय सौंदर्याची गाठ मात्र मला घालता येईना. नव्वदच्या दशकात त्यांचं बालपण गेलं होतं. त्या काळात शाळेत जाता जाता त्यांची दप्तरं तपासली जात. जिकडेतिकडे सैनिक होते, अजूनही आहेत. (सैनिक म्हणजे भारतीय लष्कर, राष्ट्रीय रायफल्स, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दर आणि सशस्त्र राज्य पोलीस. राज्यात किमान सहा लाख २७ हजार सैनिक आहेत, असा अंदाज आहे.)
 
दुसऱ्या दिवशी आम्ही क्रीरी या गावी गेलो. तिथे ३६ दिवसांपासून सतत कर्फ्यू लागलेला होता. तिथे आम्हाला काही मुलं भेटली, त्यांच्या आईवडलांच्या सफरचंदांच्या बागा होत्या. कर्फ्यू इतका कडक होता की, पिकलेली फळं तोडायलाही घराबाहेर पडणं अशक्य होतं. रस्ते आणि बागांमधून सतत गस्त सुरू असायची. अनेकदा सैनिक घरांच्या उघड्या खिडक्यांमधून त्यांच्या बंदुका घुसवत असत. पुढच्या वर्षी मी परत गेले. कर्फ्यू असताना, आजारी मुलीला डाॅक्टरकडे घेऊन जाणाऱ्या एका बाईच्या पाठीत कशा गोळ्या घालण्यात आल्या होत्या, हे तेव्हा मला कळलं. तिला मुलीला जवळच्या सरकारी दवाखान्यात न्यायचं होतं. पण वाटेतच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या काही जवानांनी तिला अडवल्यानं ती उलटी फिरून घराकडे पळू लागली. पळणाऱ्या या बाईवरच गोळीबार करण्यात आला, ज्यामुळे तिच्या मणक्याला जबर दुखापत झाली आणि सहा महिने अतिशय वेदनांमध्ये काढून अखेर ती मरण पावली. हे ऐकल्यावर, जिथे लष्कराचं तुमच्या खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यावर नियंत्रण असतं, ते तुम्हाला बेदरकारपणे गोळ्या घालू शकतं, अशा परिस्थितीत जगण्याला काय अर्थ असेल, या विचारात मी पडले. अशा लष्करमय वातावरणात लहान मुलं आणि स्त्रिया सर्वात असुरक्षित असतात, हे मला जाणवलं. त्यामुळेच एका तरुण काश्मिरी मैत्रिणीच्या सूचनेवरून मी ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून कहाण्या शोधू लागले.  तेव्हा मी ऐकलं हाफ विडोजबद्दल, ज्या ना धड विवाहित होत्या, ना विधवा. या अशा स्त्रिया होत्या, ज्यांच्या नवऱ्यांना जवानांनी चौकशीसाठी उचललं होतं, विशेषकरून नव्वदच्या दशकात, आणि ते नंतर कुणालाच दिसलेले नव्हते. असं म्हणतात की, त्यांचा छळ केला गेला, कोठडीतच ते मरण पावले आणि सार्वजनिकरीत्या एखाद्या बेवारस व्यक्तीसारखं त्यांचं दफन करण्यात आलं. जवानांनी केलेल्या लैंगिक हिंसाचाराबद्दलही मला माहिती मिळाली, ते जणू युद्धातलं एक हत्यारच बनलं होतं. छळ आणि हत्या यांच्याबद्दलही माझ्या कानावर आलं.
 
हे ऐकत असतानाच मला काश्मिरी स्त्रियांच्या लवचीकपणाचा, कणखरपणाचा अंदाज आला. लय आणि संगीत त्यांच्या रक्तात होतं. मला १६व्या शतकातील हब्बा खातून या काश्मिरी कवयित्रीची माहिती मिळाली. काश्मीरचा राजा युसुफशाह चाक या तिच्या प्रियकरासोबत तिने काही दिवस अत्यानंदात काढले, पण काही काळातच मोघलांनी त्याला तुरुंगात टाकलं आणि त्याला तुरुंगातच मरण आलं. त्याची कबर दूर बिहारमध्ये आहे. तो दूर गेल्यानंतर हब्बा अस्वस्थ झाली, तिच्या युसुफच्या शोधात भटकत राहिली, क्षणभंगुर सुखाची तिची गाणी गात राहिली. काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नांची, स्वप्नं पूर्णत्वाला नेण्याच्या इच्छेची ती प्रतिनिधी आहे, असं आजही मानतात. काश्मीरमधले माझे काही दिवस अविस्मरणीय केले काश्मिरी मुलींनी, पिवळ्याधम्मक मोहरीच्या शेतात फिरणाऱ्या, बागांमध्ये झाडांवर चढून हब्बा खातूनची गाणी गाणाऱ्या काश्मिरी मुलींनी. माझं प्रेमाने आदरातिथ्य करणाऱ्या छानशा काश्मिरी मैत्रिणींना तर मी विसरूच शकत नाही. दूध कावा किंवा नूनचाय ही पारंपरिक पेयं आणि चविष्ट पदार्थ त्या मला खिलवत आणि नंतरच त्यांच्या कहाण्या सांगत. हे मी माझ्या पुस्तकात म्हटलं आहेच, पण पुन्हा म्हणते की, मी आज जी आहे, ती त्यांच्यामुळे. त्यांनी मला दिलेल्या वेदनांच्या, कणखरपणाच्या आणि संघर्षाच्या कहाण्यांची भेट माझ्यासाठी मोलाची आहे.
 
 frenym@gmail.com

पुढील स्‍लाइडवर वाचा, Lol of the lonely pine या हब्बा खातून यांच्या कवितेचा हा अनुवाद...
बातम्या आणखी आहेत...