आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बायकोचा मित्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलमचं हेडिंग वाचून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. किंवा काही तरी खमंग वाचायला मिळेल या आशेने तुम्ही अधीर झाला असाल, नाही का? पण तुमच्या मनातला हा (गोड) गैरसमज काढून टाका. मध्यंतरी वपुंचं ‘पार्टनर’ पुन्हा वाचण्याचा योग आला. त्यातलं, ‘काही शब्द वेगवेगळे असले की ऐकायला किती सुंदर वाटतात. जसे बायको आणि मित्र; पण हेच दोन शब्द जर एकत्र कानावर पडले तर...’ हे वाक्य वाचलं अन् डोक्यात विचार सुरू झाले. काळानुरूप अनेक बदल आपण स्वीकारले. कधी गरज म्हणून, तर कधी अपरिहार्यता म्हणून; पण पुरोगामी विचारांचा पोकळ डंका पिटणा-या आपल्या समाजात अजूनही काही गोष्टींकडे स्वच्छ नजरेने बघितलं जात नाही. विवाहित स्त्री-पुरुषांची मैत्री ही त्यापैकीच एक. माझी एक मैत्रीण आहे. आॅफिसमधला तिचा एक सिनियर तिचा बेस्ट फ्रेंड होता. होता अशासाठी की, मैत्रिणीच्या नव-याला बायकोच्या मैत्रीबद्दल कळल्यावर त्याने तिला नोकरीच सोडायला लावली. माझी मैत्रीण यामुळे दुखावली. नोकरी सुटली म्हणून नाही, तर सच्चा मित्र गमावला म्हणून. सिनियर-ज्युनियर, स्त्री-पुरुष यापलीकडे त्यांच्यात एक निखळ नातं होतं. जिवाभावाच्या मैत्रीचं. जबाबदारी-काळजीच्या ओझ्यानं दबलेल्या माझ्या मैत्रिणीला त्या नात्यानं जगायला शिकवलं होतं, आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं होतं, छोट्या-छोट्या गोष्टीतला आनंद भरभरून घ्यायला शिकवलं होतं. मैत्रिणीच्या कंटाळवाण्या रूटीन आयुष्यात रंगांची उधळण केली होती त्या नात्यानं. निराशेने काळवंडलेल्या या मैत्रिणीच्या आयुष्याला आत्मविश्वासाची सुरेख किनार मिळाली ती याच नात्यामुळे. मित्रासोबत होणा-या विविधांगी विषयावरच्या चर्चेनं तिचं व्यक्तिमत्त्व-करिअर ख-या अर्थानं बहरलं होतं. स्वत:च्या मर्यादांचं भान राखून केलेल्या या मैत्रीनं त्या दोघांनाही, माणसाच्या भौतिक गरजांइतक्याच बौद्धिक गरजाही महत्त्वाच्या असतात हे शिकवलं होतं; पण मैत्रिणीच्या नव-याच्या वागण्यानं ते सुंदर नातं कोमेजलं. पाश्चिमात्य संस्कृतीतल्या फ्रेंडशिप डेसारख्या अनेक गोष्टींचं अनुकरण आपण केलं. त्याच्या समर्थनार्थ पळवाटाही शोधल्या. मात्र, हे डेज साजरे करण्यामागचा निखळ दृष्टिकोन मात्र आपल्याला कमावता आला नाही. तुम्हाला काय वाटतं?