आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री निमित्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मिहिर काहीसा खुशीतच घरी आला. त्याचा चेहरा पाहत आजी म्हणाली, ‘आज काहीतरी खास दिसतंय?’ पाठीवरची सॅक कॉटवर फेकत मिहिर आजीकडे पळाला. आजीला घट्ट बिलगत म्हणाला, ‘आजीऽऽ आज मला एक नवीन मित्र मिळाला. पण.. पण त्याच्याशी मैत्री कशी करायची हेच मला समजत नाही गं.’
‘अरे, आपल्या मित्राला जे जे आवडतं ते ते द्यावं त्याला. त्याच्या आवडीचा खाऊ दे त्याला. त्याच्या आवडीचं सरबत दे त्याला. आणि त्याला एक मस्त गिफ्ट दे. बस्स! तुझा मित्र खुश! सांग बरं तुझ्या या नव्या मित्राला काय खायला आणि प्यायला आवडतं?’

आजोबांनी असं विचारताच मिहिर गालातल्या गालात हसला. एका डोळ्याने हळूच आजीकडे पाहत मिहिर म्हणाला, ‘अंऽऽ माझ्या मित्राला कुठलंच सरबत आवडत नाही, बाटलीत मिळणारी थंड पेयपण आवडत नाहीत. पण त्याला खाण्याच्या बाबतीत कुठल्याच खोड्या नाहीत. तो मातीसुद्धा खातो.’
ऐकताच आजोबा किंचाळले, ‘शीऽऽ घाणेरडा!! माती खातात का कधी?’
‘म्हणजे तो मातीच खातो असं नाही काही. तर तो सारखा मातीतच असतो. पण खातो मात्र उष्टंखरकटं आणि शेणसुद्धा!’ आता मात्र आजोबा वैतागले. ‘तुझा मित्र इतका घाणेरडा असेल असं वाटलं नव्हतं हं मला! काय नाव त्याचं?’
‘त्याचं नाव कडुलिंब!’
‘काऽऽय? क डू लिं ब? हॅ!! असं कधी कुणाचं नाव असतं का? उगाच मला शेंड्या लावू नकोस.’
इतक्यात पदराला हात पुसत आजी बाहेर आली. म्हणाली, ‘अहो असं काय करताय? तुमची पण कमालच आहे हं. आज त्याची एका झाडाशी मैत्री झालीय. त्याचं नाव कडुलिंब!’
आजोबांनी हसतच मिहिरच्या पाठीत एक धपका घातला. मग आजीने नेहमीचा मंत्र म्हणायला सुरुवात केली, ‘आधी हातपाय धू. कपडे बदल. जेवण तयार आहे. जेवायला चल.’
जेवायला बसल्यावर मिहिर नवीन मित्राची गोष्ट सांगू लागला. आज शाळेतून येताना एका झाडाच्या बाजूला नुकतंच उगवलेलं एक कडुलिंबाचं रोप दिसलं. स्मिता म्हणाली, ‘आपण ते उपटूया आणि आपल्या घरी कुंडीत लावूया.’ मिहिरला वाटलं, त्याला आहे तिथेच ठेवूया. कारण उपटताना जर काही चुकलं तर ते झाड जखमी होईल. स्मिताला वाटलं, जर का हे आत्ताच उपटलं नाही तर एखादवेळेस रस्त्यावर फिरणारी जनावरं ते खाऊन टाकतील. त्यामुळे या नवीन मित्राशी कशी दोस्ती करावी हे काही त्या दोघांना कळेना.
‘तुम्ही काय करायचं हे काही मी सांगणार नाही. ते तुमचं तुम्हीच ठरवलं पाहिजे. पण एक लक्षात घे, प्रत्येक मित्राशी मैत्री करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणजे या तुझ्या मित्राला आत्ता तुमच्या मदतीची गरज आहे. वर्षभरात तो चांगला बळकट झाला की तो तुम्हाला मदत करायला लागेल. आणि पाच वर्षांनी तुम्ही जरी त्याच्या डोक्यावर बसलात तरी तो हलणार नाही. काऽय समझे? सांग बरं तुझ्या काही मित्रांची नावं पटापट.’
‘आजोबा, मला मित्र खूप आहेत. उदा. तो पिळपिळीत शेपटीचा टायगर कुत्रा, आपल्या घरातल्या कुंड्या, आमचा वर्ग आणि मी बसतो ते बाक, ब्लू टीशर्ट व ब्लॅक फेडेड जीन्स, मी तुमचा व आजीचा काढलेला फोटो, माझी गोष्टीची पुस्तकं... आजोबा, खूप आहेत हो माझे मित्र.’
‘अरे लबाडा, आम्ही तुझे मित्र नाही वाटतं?’ असं आजीने विचारताच खुर्ची ढकलून मिहिर उठला. उष्ट्या हाताने आजीला मिठी मारत म्हणाला, ‘असं काय गं बोलतेस आजी? तुम्ही दोघे तर माझे बेस्ट फ्रेंड आहात! आणि या मित्रांसाठी काय करायचं ते मला समजतं हं आजोबा.’ मिहिरला जवळ ओढत आजोबा म्हणाले, ‘शाब्बास! मैत्री म्हणजे फक्त एकमेकाची काळजी करणं किंवा सतत एकमेकांना मदत करणं नव्हे तर एकमेकांना समजून घेणं. जसं आपण एकमेकांना समजून घेतो तसं!’
‘आणि मित्र कधी विचारत बसत नाही मी हे करू का ते करू? त्याला समजतं आणि तो करतो. कारण त्याला समजतं, प्रेम आणि त्या प्रेमातूनच उमजते मैत्री,’ असं आजीने म्हणताच मिहिरने मान डोलावली. ‘आता मला कळलं, त्या कडुलिंबाबद्दल आम्हाला प्रेम वाटलं होतं, पण त्यातून मैत्री तयार झाली नव्हती. कारण मैत्री झाली असती तर आम्ही तुम्हाला विचारत बसलोच नसतो.’ अगदी बरोब्बर! ‘नुसत्या प्रेमाने नव्हे तर प्रेमळ कृतीने पूर्ण होते मैत्री’ अशी एक चिनी म्हण आहे, असं आजीने म्हणताच मिहिर म्हणाला, ‘आता मला कळलं काय करायचं ते? मी आणि स्मिता आताच जातो.’ हात धुऊन मिहिर सुसाट पळालासुद्धा!
तुम्हाला काय वाटतं, मिहिरने काय प्रेमळ कृती केली असेल? मला कळवाल? मी तुमच्या प्रेमळ पत्रांची वाट पाहतोय -