आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर ते खंडाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोण म्हणतो पाऊस फक्त पावसासारखा असतो? कधी तो अवखळ प्रियकरासारखा अलगद येतो, तर कधी रागावलेल्या पित्यासारखा तुटून पडतो. कधी हट्टी बालकाप्रमाणे रुसून बसतो, तर कधी प्रेमळ बायकोप्रमाणे गुंजारव करतो. हट्टी प्रियकरासारखा, तर कधी नखर्‍यात येणार्‍या प्रेयसीसारखा. कारण पाऊस कसाही असो, तो तुझा आणि माझाच असतो.

नागपूरच्या कडक उन्हाळ्यात लाही लाही झाली असताना सुखद बातमी हाती आली की पप्पांची खंडाळा, जिल्हा पुणे येथे बदली झाली. नागपूर सोडले. दुसर्‍या दिवशी खंडाळ्याचा निसर्ग त्याच्याकडे आलेल्या नवीन पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार होता. राहायला मिळालेला बंगला ब्रिटिशकालीन होता. मोठमोठ्या खिडक्या, मोठे दार, उंच सीलिंग व उतरत्या छपराचे कौलारू घर. मोठा व्हरंडा. त्याच्या पायर्‍यांवर बसलो की समोर दिसणारी मोठी दरी. इथले वैशिष्ट्य असे की बरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे पाऊस सुरू होतोच. आम्हीदेखील पावसाच्या स्वागताची तयारी केली आणि न चुकता तो बरसायला लागला. कधी सरसर, कधी रिमझिम कधी मुसळधार, वेडा, धसमुसळा, बेभान. हवाहवासा आणि कधी-कधी नकोसाही.

आता पर्वतांनी हिरवागार शालू दोन-तीन दिवसांतच पांघरला. दुधाळ धबधबे पहाडांच्या अंगाखांद्यावर खळखळू लागले. हिरवेगार डोंगर. त्यावर ढग उतरलेले, हिरव्यागार दर्‍या, स्वच्छ खळखळते झरे. डोंगराच्या हिरव्या रंगात छटा तरी किती असाव्यात? पोपटीपासून काळपट हिरव्यापर्यंत. वरून धो धो बरसणारा पाऊस आणि मानवनिर्मित बोगद्यांतून सुसाट वेगाने पळणारी दख्खनची राणी अगदी दृष्ट लागावी अशी दिसायची. कधी-कधी पावसातील हमखास लागणारा मुंबई-पुणे रोडवरील जाम, कदाचित स्वत:च्याच दुनियेत मग्न असणार्‍या मानवाला ‘थोडा वेळ माझेही निरीक्षण कर रे बाबा जरा थांबून,’ असे तर सुचवत नसावा! ढग हेलकावे खात घरात प्रवेश करत आणि कधी मोठमोठ्या पर्वतांनाही झाकून टाकीत. कितीतरी दिवस सूर्यदर्शन नसायचे. न वाळणारे कपडे आणि अति पावसामुळे न मिळणार्‍या भाज्या, अशात आईच्या हातच्या पिठले-भाकरीची चव न्यारीच लागत असे. खंडाळ्याच्या घाटातील भाजे पॉइंटची तर मजाच निराळी, खरपूस भाजलेली मक्याची कणसे आणि भज्यांचा खमंग वास. अहाहा! तिथे कोणी पथिक रेंगाळला नाही ही गोष्टच विश्वासार्ह नाही. आमचे मराठीचे दीपक सर आणि त्यांनी शिकवलेल्या बालकवी आणि शांता शेळके यांच्या पावसाच्या कविता म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. माझी कवितांची आवड निर्माण झाली ती इथूनच. शनिवार, रविवार मुंबई, पुणेकर मनसोक्त भिजायला यायचे आणि घाट फुलून जायचा. खडकाळ भागामुळे चिखल नाही, दलदल नाही. छत्रीला न जुमानणारा इथला पाऊस.

वर्षा ऋतू आणि प्रेमिकांचे मिलन हा साहित्यातील संकेत पूर्वापार संस्कृत साहित्यातदेखील आढळतो. हिरवीगार वनश्री आणि उल्हसित वातावरण. आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण तीव्रतेने झाली नाही तर नवलच! ते जणू सुचवत असावे...

कोवळ्या उन्हासोबत आली पावसाची
सर, पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
तुषार किरणांनी साकारलेले इंद्रधनुष्य
निसर्गाच्या प्रेमाची सप्तरंगी प्रतिमाच जणू
असा हा खंडाळ्याचा अवखळ पाऊस आजही ढग दाटून आले की मला आठवतो.