आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गढवाल पोचमपल्ली वगैरे....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंतच्या आपल्या साडी सफारीमध्ये आपण आपल्या महाराष्‍ट्रापासून सुरुवात केली आणि जवळदूरचे अनेक प्रदेश पाहिले. प्रत्येक प्रदेशाने आपापले हुकमी एक्के आपल्यासमोर पेश केले, तिथल्या ठेवणीतल्या व खास साड्यांच्या रूपाने. आता आपण पाहू आपल्या अगदी जवळचा, शेजारचा प्रदेश, आंध्र प्रदेश. हा कोणी असातसा नव्हे हो, गढवाल, पोचमपल्ली, वेंकटगिरी, धर्मावरम, मंगलगिरी असे एकापेक्षा एक हुकमी एक्के घेऊन असलेला आहे हा. येथील साडी संस्कृती अनेक पदरांनी नटलेली आहे. विविध रंगांच्या ताण्याबाण्यांची ही एक खास झलक मधुरिमाच्या मैत्रिणींसाठी...
धर्मावरम
रेशमी साड्यांसाठी जगप्रसिद्ध. या साड्यांचे काठपदर वा अंग यांच्यात नेहमीसारखा काँट्रास्ट नसतो. एक तर ते सारख्या रंगाचे असतात, असलाच हलका काँट्रास्ट असतो. मात्र काठ रुंद असतात व काठपदर यांच्या वर असलेली विणकामाची डिझाइन्स साक्षात ऐश्वर्यसंपन्न अशीच म्हणावी, अत्यंत कलाकुसरीचे, शालूवजा, अस्सल जरीची अर्थात सोन्याच्या तारांनी तयार केलेली असतात. या साड्या टसर सिल्क वा रॉ सिल्कमध्येही
उपलब्ध असतात.
पोचमपल्ली
इकत पद्धतीने केलेली नाजूक देखणी लावण्यवती ही. इकत म्हणजे संबळपुरीप्रमाणे, ताणेबाणे, डिझाइन असेल त्याप्रमाणे बांधून रंगवले जातात व मग साध्या पद्धतीने विणून साडीत त्यांचे रूपांतर होते. बहुतकरून रेशमी असलेली ही साडी तिच्या आणखीन एका खुबीसाठी ओळखली जाते. एकेकदा ही साडी दोन्हीकडून नेसली जाऊ शकते. हे कसे बरे साधतात? तर, दोन्ही काठ वेगवेगळ्या रंगांचे असतात. खालचा समजा गडद निळा तर वरचा पाचू हिरवा व यांना मॅचिंग पदर एका बाजूला गडद निळा आणि दुस-या बाजूला पाचू हिरवा. ज्या वेळेस जो वाटेल तो पदर म्हणून घ्यायचा की त्यास मॅचिंग काठ खाली बॉर्डर म्हणून येतात. आज जादू निळाईची तर उद्या हिरवाईची.
वेंकटगिरी
सुती व रेशमी या दोहोंत मिळणारी ही साडी आपल्याला अचंबित करते ती तिच्यातील चंदेरी सोनेरी किरणांनी. अंगच्या उठावदार पण नेत्रसुखद रंगांमुळे व काठपदरावरील रेखीव जामदानी पश्चिम बंगालच्या तांत जामदानी प्रकारच्या डिझाइन्समुळे या किरणांची चमचम खास नजरेत भरते. डिझाइन्स असतात पारंपरिक बुट्ट्यांची, पानडीची, राघूमोरांची तर कधी सुंदर गुंफण साध्या पण रचनात्मक भूमितीय मोटिफ्सची.
गढवाल
एक अति सुंदर नयनरम्य साडी प्रकार. जगभर प्रसिद्ध असलेला. हे ठिकाणच मुळी यासाठी प्रसिद्ध आहे. यांची ओळख या साडीमुळे आहे. साडीचे अंग सुती, काठपदर मात्र रेशमी. हे तिन्ही वेगवेगळे विणून मग त्यांना एकत्र जोडले जाते. श्रीमंत परंपरा सांगणारे कुयरी वा इतर मोटिफ गुंफून काठपदरावरील डिझाइन्स तयार केली जातात. पिवळा, पोपटी, गुलाबी वा गहू हे यातील खास रंग. आणि खासियत हिची अशी की म्हणे ही साडी घडी करून काड्यापेटीत मावते. आदानप्रदानाला सोपी. त्यामुळे परदेशवारीतल्या भेटवस्तू म्हणून हिला विशेष मागणी असते.
मंगलगिरी
सुती साड्यांमध्ये आपले मानाचे स्थान असणारी ही साडी. सौंदर्य तर अंगचेच मात्र खासियत अशी की हिच्यातील सूत हिच्या माहेरघरीच तयार होणारे बरे. निसर्गाचे लेणे, ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, सांस्कृतिक समृद्धी, तंत्रज्ञानयोगे आधुनिक चमक अशा वैविध्याने नटलेल्या या प्रदेशाने त्याच्या साड्यांमधून ते वैविध्य प्रकट केले नसते तर नवल नाही.