आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडकरी-बालकवींची ‘राहून गेलेली गोष्ट’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिशांना घाम फोडणा-या नेताजी सुभाषचंद्रांचा विमान अपघात 1945 ला घडला नसता तर? नेहरूंनी 370 हे कलम जाहीर करताना सरदार वल्लभभाई पटेल दोन मिनिटे आधी आकाशवाणी केंद्रावर पोहोचले असते तर? दुस-या महायुद्धात शेवटपर्यंत जिंकत चाललेला हिटलर, रशियात हरला नसता तर? शंभरची सरासरी गाठण्यासाठी आयुष्यातल्या शेवटच्या डावात, डॉन ब्रॅडमनने फक्त चौकार मारला असता तर?... या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या जर-तरच्या उत्तरांबरोबर खेळत राहणे हा मनुष्य प्राण्याचा नित्याचा छंद आहे.
प्रत्येक काळातल्या मानवाच्या असंख्य क्षेत्रातल्या अलौकिक कामगिरीबद्दल आपल्याला नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे. मग ती जगातली सगळी आश्चर्ये असोत; शास्त्रातले निरनिराळे शोध असोत, युद्धे असोत, वा आजचे अतिप्रगत तंत्रज्ञान असो. कला साहित्यात कालिदासाचे ‘मेघदूत’, व्यासांचे ‘महाभारत’, शेक्सपियरची नाटके, मायकेल एंजेलोची शिल्पे, विन्सीची चित्रे असोत, नादिया कोमेनस्कीचे जिम्नॅस्टिक्स मधले 10 पैकी 10 मार्क किंवा आपल्या सचिन तेंडुलकरची 100 शतके असोत, तोंडात बोटे घालायला लावणारी ही कर्तृत्वे. पण या सगळ्या अस्तित्वात असलेल्या, प्रत्यक्षात साकारल्या गेलेल्या, काळाबरोबर समाजाने पाहिलेल्या, वाचलेल्या, अनुभवलेल्या घडामोडी. पण गंमत अशी की हे जग काही एवढ्याच गोष्टींनी भरलेय असे अजिबात नाही. खरे तर जेवढ्या गोष्टी घडल्या, अस्तित्वात आल्या, त्याहीपेक्षा कितीतरी पटींनी प्रत्यक्ष ‘घडू पाहणा-या, पण घडू न शकलेल्या’ गोष्टींनी हे जग बनलेले आहे. अशा कित्येक क्षणांना नियतीची साथ नसावी बहुधा.
वर दिलेल्या उदाहरणांच्या तुलनेत नाटक, सिनेमा या विषयांतल्या अस्तित्वात येऊ शकणा-या पण न आलेल्या गोष्टी लोकांसमोर फार येत नाहीत वा आलेल्या नाहीत. या ‘राहून गेलेल्या गोष्टी’तले नायकपण लाभलेली व्यक्ती म्हणजे ‘राम गणेश गडकरी’. गडक-यांच्या अपूर्ण राहिलेल्या ‘राजसंन्यास’ची रंजक गोष्ट आपण नंतर वाचूच, पण त्याहीआधी त्यांच्या न झालेल्या काही नाटकांपैकी पहिले नाटक म्हणजे ‘गर्वनिर्वाण’.
खाडिलकरांच्या नाटकांनी महाराष्ट्रभर लौकिक मिळवायला सुरुवात केली होती. ‘कीचकवधा’ने तर देशभर हलकल्लोळ माजवला होता. त्या वेळी गणपतराव जोशींनी गडक-यांना सांगितले की, तुम्हीही या धर्तीचे नाटक लिहा. पिच्छा पुरवून गणपतरावांनी गडक-यांकडून नाटक लिहून घेतले. नाव होते ‘प्रल्हाद-चरित्र’. गडक-यांचे गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी ते नाटक वाचले. त्यांच्या हमखास ‘पंचाक्षरी’ नाव ठेवण्याच्या श्रद्धेने ‘प्रल्हाद-चरित्रा’चे नामांतर झाले ‘गर्वनिर्वाण’. गडकरी ‘नाटककार बनूनच परतण्याच्या’ शपथेवर किर्लोस्कर सोडून गेले होते. कंपनी सोडून गेले असले तरी त्यांनी लिहिलेले नाटक कसेही करून ‘किर्लोस्कर’मध्येच जावे, ही त्यांची सुप्त इच्छा होतीच. गणपतराव जोशी, श्रीपाद कृष्णांमुळे याची वार्ता किर्लोस्करचे मॅनेजर शंकरराव मुझुमदारांच्या कानावर न जाते तरच नवल. दुस-या नाटक मंडळीबरोबर गडकरी ज्या गावात होते, त्या गावात शंकरराव पोहोचले. शंकररावांना नाटक द्यायचे असले तरी लगेच त्यांच्या हातात पडू दिले तर ते गडकरी कसले? ते आणखी वेगळ्याच गावी गेले. मागोमाग शंकरराव. असे करत गडक-यांनी शंकररावांना काही महिने झुलवले. बहुधा नागपूरला एकदाची गाठ पडली. गडक-यांनी शंकररावांना आदरपूर्वक नाटकाची संहिता दिली. पण त्या ‘गर्वनिर्वाण’चे नशीब काही औरच असावे. शंकररावांनी ती संहिता रेल्वे प्रवासात कुठेतरी हरवली! गडक-यांनी एकटाकी ते परत लिहून काढले!! सरतेशेवटी ‘किर्लोस्कर’ने ते बसवायला घेतले, पण कंपनीच्या कलाकारांकडून गडक-यांची मानहानी काही कमी झालेली नव्हती. सततच्या खटक्यांनी पुन्हा एकदा भांडणे विकोपाला गेली. गडकरी कंपनीतून बाहेर पडले ते कायमचे. त्याच वेळी ‘कीचकवधा’वर बंदी जाहीर झाली होती. हेही नाटक त्यामुळे गोत्यात येईल की काय, अशी शंका निर्माण झाली होती. या सगळ्या वातावरणात या नाटकाच्या तालमी थांबल्या. काही दिवसांनी परत ते रंगभूमीवर आणण्याची तयारी झाली, पण अंतर्गत कलहामुळे गडक-यांनी ते नाटक त्या वेळी जे नष्ट करून टाकले, ते आजतागायत त्याचे कुठेही नामोनिशाण सापडलेले नाही. त्यांचे ‘तोड ही माळ’ हेही नाटक असेच कल्पना मांडून अर्धवट राहून गेलेले नाटक. पण चिंतामणराव कोल्हटकरांच्या ‘बहुरूपी’ या आत्मचरित्रातली गडक-यांची एक आठवण याहीपेक्षा कायमची चटका लावून जाणारी आहे. कला, कलेवरचे आणि कलावंतावरचे प्रेम काय असते याचा हा अप्रतिम नमुना. या प्रसंगामुळे गडकरी ही ‘कलावंत’ म्हणून काय असामी होती, याचा अंदाज येईल. ‘बालकवी’ ठोंबरे गडक-यांचे जिवलग मित्र. गडकरी खरे तर बालकवींपेक्षा आठ वर्षांनी मोठे. दोघेही कवी. पण दोघांना एकमेकांविषयी आणि एकमेकांच्या कवितांविषयी नितांत आदर. एके दिवशी गप्पा सुरू असताना दोघांमध्ये एक मजेशीर स्पर्धा रंगली. असे ठरले की दोघांनी आपापल्या कवितेचा विषय डोक्यात ठेवायचा, सांगायचा नाही. एकाने आपल्या कवितेसंदर्भात एक ओळ लिहायची, तर दुस-याने कवितेच्या विषयानुसार, पहिल्याच्या कवितेच्या ओळीपुढे, आपल्या कवितेची पुढची ओळ रचायची. दोघांचे त्यांच्या त्यांच्या डोक्यातले विषय वेगळे असले तरी समोर एकसंध निराळीच कविता आकार घेऊ लागली. ओळींवर ओळी रचल्या जाऊ लागल्या आणि चोविसाव्या ओळीवर शेवटी बालकवींनी हार मानली. काही क्षण जाताच गडक-यांनी तो कवितेचा कागद घेतला. त्याचे बारीक तुकडे करून खिडकीतून भिरकावून दिले. बालकवी म्हणाले, ‘काय करताय हे?’ गडकरी म्हणाले, ‘घटकाभरचा खेळ होता हा. तुम्ही महाराष्ट्राचे श्रेष्ठ कवी आहात. तुम्हाला हरवण्यासाठी नव्हते हे. हा पुरावा मागे राहता कामा नये.’ महाराष्ट्राचे दोन श्रेष्ठ कवी, गडकरी आणि बालकवींनी मिळून केलेल्या कवितेचे ते शब्द ‘काय’ होते, हे त्या फक्त जगन्नियंत्यालाच माहीत!