आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gajoo Tayde About Voluntarism, Rasik, Divya Marathi, Divyamarathi.com, दिव्य मराठी

ज्याचा त्याचा संकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल-परवाच नवं वर्ष सुरू झालं. न्यू इयर हा एक धर्मातीत सण आहे. गणपती विसर्जनाचा दिवस जवळ आला की, गणेशभक्तांना जशी हुरहुर लागते, तशीच हुरहुर डिसेंबर महिना सुरू झाला की, सगळ्यांना लागते. फरक एवढाच की, गणपती पुन्हा तब्बल एक वर्षानंतर येणार असतो, नवं वर्ष मात्र जुनं वर्ष संपताक्षणीच सुरू होणार असतं. म्हणूनच डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला की, ही हुरहुर नाहीशी होते आणि सगळ्यांना वेध लागतात, ते नव्या वर्षाचे.

नव्या वर्षाचं स्वागत जल्लोशात, साग्रसंगीत, विशेषतः स-झिंग करण्याची प्रथा आहे. ते कसं साजरं करतात, हे जवळपास सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे पुन्हा इथं सांगण्याची गरज नाही. मात्र याहूनही जुनी प्रथा असावी ती बहुधा नव्या वर्षाचे नवे संकल्प करण्याची.

सरत्या वर्षात आपण काय करायला हवं होतं, काय करायचं राहून गेलं, आपल्या हातून काय चुका झाल्या वगैरे खिन्न, विषण्ण विचार नव्या वर्षाची चाहूल लागताना मनात येऊ लागतात आणि म्हणूनच नव्या वर्षाचे नवे संकल्प करून ते पाळण्याचा दृढ निश्चय केला जातो. आता ते संकल्प खरोखर कितपत पाळले जातात, हा भाग अलाहिदा. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत केलेले अनेकांचे संकल्प बहुधा १ जानेवारीच्या सकाळी हँगओव्हरमध्ये झुरझुरत विरून जातात. पण संकल्प करण्याची केवळ कृतीही आनंददायी असते. म्हणूनच संकल्प केल्यावाचून कुणालाच राहवत नाही.

वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या काही प्रसिद्ध व्यक्तींनी नववर्षाचे असेच संकल्प केले आहेत आणि विश्वसनीय म्हणता यावेत, अशा सूत्रांकडून त्या संकल्पांतले काही ठळक मुद्दे हाती लागले आहेत. (खरं तर हे या सूत्रांचं स्वतःचंच ‘विशफुल थिंकिंग’ असावं, असा मला किंचितसा संशय आहे, पण ‘दिल को बहलाने के लिए ग़ालिब ये खयाल अच्छा है’) ते वाचकांना प्रेरणादायी ठरतील, असं वाटल्यामुळे त्यातले काही निवडक संकल्प इथे सादर करीत आहोत.
नरेंद्र मोदी : मी यापुढे फक्त भारतातल्या भारतातच दौरे करून उभा आडव्या देशाची ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ करीन आणि लोकांच्या मनातले खरेखुरे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उत्तरांचा मी ‘मन की बात’मध्ये समावेश करीन. हे करीत मी असताना एकही सेल्फी काढणार नाही. परदेश दौऱ्यांवर यापुढे फक्त सुषमाजीच जातील.

सुषमा स्वराज : पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ वगैरे किरकोळ परदेशदौरे हवेत कुणाला? नव्या वर्षात पंप्रनी मला युरोप-अमेरिकेत दौऱ्यांवर पाठवलं नाही तर मैं सर मुंडवाऊंगी, जमीन पर सोऊंगी, और भुने चने खाऊंगी.

मनमोहन सिंग : मी बोलेन. मी बोलत राहणार. दिवसभरात किमान ५४ शब्द मी बोलेन. मग मला लोकांनी बोलघेवडा माणूस म्हटलं तरी चालेल.

राहुल गांधी : पृथ्वीराज चव्हाणांनी सुचवल्याप्रमाणे मी माझी बॉडी लँग्वेज सुधारीन. त्यासाठी मी जिममध्ये व्यायाम करता-करता भाषणे देण्याचा सराव करीन. म्हणजे माझी बॉडी आणि लँग्वेज दोन्ही सुधारतील.

देवेंद्र फडणवीस : मी राज्यातल्या सगळ्या शाळा आणि विद्यापीठे बंद करून प्राचीन, महान भारतीय संस्कृतीला अनुसरणाऱ्या, १८५४ सालापूर्वी असायच्या, तशा पंतोजी पद्धतीच्या एकशिक्षकी शाळा गावोगावी सुरू करीन. त्यांतल्याच हुशार पंतोजींना ऋषीमुनी बनण्याचे प्रशिक्षण देऊन जंगलांमध्ये उच्च शिक्षणासाठी गुरुकुले स्थापन करीन.

शरद पवार : राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होऊन, मी येत्या काळात माझ्या राजकीय आत्मचरित्राचे पुढचे दोन खंड लिहवून घेऊन प्रकाशित करीन- १) मी पंतप्रधान कसा झालो नाही २) मी राष्ट्रपती झालो तर. याशिवाय पटेल कधीचे मागे लागलेयत (प्रफुल्ल पटेल नव्हेत, जब्बार पटेल), म्हणून ‘खंजीर पाठीत घुसला’ या माझ्या आगामी आत्मचरित्रात्मक चित्रपटाची पटकथाही लिहून पूर्ण करीन.

अरुण जेटली : पंतप्रधानांनी मला दिलेल्या सल्ल्यानुसार माझ्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडवाणीजींचा आदर्श ठेवून मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन, आणि काळा झगा चढवून अरविंद केजरीवालांवर भरलेल्या मानहानीच्या खटल्यात कोर्टात उभा राहून स्वतःचीच वकिली करीन.

गिरीश बापट : मी यापुढे केवळ ‘संस्कार’, ‘आस्था’ यांसारख्या धार्मिक, प्रबोधनपर आणि आध्यात्मिक वाहिन्याच पाहीन आणि तरुणांवर चांगले संस्कार घडून येण्यासाठी त्यांचा राज्यभर प्रचार आणि प्रसार करीन.

रामदास आठवले : नव्या वर्षाचा नेहमीच होतो आनंद; मी आहे महाकवी स्वच्छंद; येथून पुढे यमकबद्ध कविता बंद; आता एकच ध्यास, मुक्तछंद, मुक्तछंद!

भालचंद्र नेमाडे : ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या माझ्या पुस्तकाचे पुढचे भाग कधी प्रकाशित होणार आहेत, हे मी येत्या वर्षात खरेखरे सांगूनच टाकणार आहे. शिंगरोबाची शपथ!

विश्वास पाटील : माझ्या कादंबऱ्या लई भारी असतात, असं मला अनेक वाचकांनी सांगितलं आहे, म्हणूनच मी यापुढे माझ्या पुस्तकांसाठी प्रकाशकांकडे दर पानाऐवजी दर किलो रॉयल्टी द्यावी, अशी मागणी करणार आहे.

दाऊद इब्राहिम : नुकताच माझ्या साठीचा भावपूर्ण सोहळा पार पडला. आता वय झाल्यामुळे पूर्वीसारखी कामं होत नाहीत. भारत सरकार मला वाईला सरकारी कोट्यातून एखादं घर देत असेल, तर शरण येऊन, पट्टेरी पायजमा घालून तिथंच नातवंडं खेळवत निवृत्तीचे दिवस घालवीन म्हणतो.

|सलमान खान : मी दारू पिणार नाही… मी दारू पिऊन गाडी चालवणार नाही… मी गाडी पिऊन चिंकाराची शिकार करणार नाही… मी शिकाराची चिंकार करताना दारू चालवणार नाही… मी शिकारा चालवताना गाडीची चिंकार करणार नाही… मी गाडी पिताना दारूची शिकार करणार नाही… (ही वाक्यं नंतर खोडलेली आढळली) …मी काहीच करणार नाही!

किरण राव : नवरा-बायकोतल्या गोष्टी चारचौघांमध्ये अशा जाहीरपणे सांगायच्या म्हणजे काय? यापुढे मी घरगुती गोष्टी सोडल्या, तर आमीरशी दुसरं क्काहीक्काही बोलणार नाही. तीळ भिजत नाही त्याच्या तोंडात.

संजय लीला भन्साली : थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर मी काढलेल्या चित्रपटामुळे, विशेषतः त्यातल्या नाचगाण्यांमुळे, अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या, ही गोष्ट माझ्या मनाला लागून राहिलेली आहे. म्हणून मी पुढचा चित्रपट दुसऱ्या बाजीरावावर काढून त्यात एकही नाचगाणं ठेवणार नाही.

आसाराम बापू : गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बलात्काराच्या आरोपावरून अटकेत पडल्यापासून माझा वेळ मी केवळ ईशोपासना, उपवास, ईशचिंतन, आत्मचिंतन, अध्यात्म, इंद्रियनिग्रह आदींमध्येच घालवत असून मला साक्षात्कार झाला आहे की, मोक्षप्राप्तीसाठी तुरुंगासारखी शांत जागा दुसरी कोणतीच असू शकत नाही. म्हणून मला कायम इथेच राहू द्यावे, अशी मी सरकारला विनंती करणार आहे.

योगी आदित्यानंद : हा देश सर्व धर्मांच्या लोकांचा आहे. इथे सर्वांनी एकदिलाने राहिले पाहिजे. यापुढे मी धर्माधर्मांत कलह लावणारी आगखाऊ विधानं करणार नाही, हिंदू-मुस्लिम एकतेसाठी आजन्म प्रयत्न करीत राहणार. (असाच संकल्प साक्षी महाराज, साध्वी प्राची, ओवेसी बंधू आदींनीही केल्याचे कळते.)

राम माधव : मी गपचाप बसेन. हाताची घडी, तोंडावर बोट.
सदरहू सदरलेखक : ‘परत कोपच्यात’ हे माझ्या सदराचं तिसरं आवर्तन सादर करताना, ते गांभीर्य, सद््भिरुची, करुणा, ऋजुता, प्रगल्भता यांनी ओतप्रोत असेल; आणि त्यात उपहास, खिल्ली, टवाळी, उडाणटप्पूपणा वगैरेंचा अजिबात समावेश असणार नाही.
(gajootayde@gmail.com)