आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाकटा गंधर्व आणि पिंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्पनेच्या भराऱ्या भन्नाट. पण त्या सत्यात उतरताना आश्चर्य, खेद, हर्ष, दु:ख, वियोग आदी भावना उचंबळून येतात, मग तो धाकट्या गंधर्वांनी घातलेला पिंगा का असेना...
आमची ‘बलदण्ड नाटक मण्डळी’ वऱ्हाड प्रांताचे टूरवर असतानाची ही हकिगत. कंपनीचा मुक्काम एलिचपूर येथे पडला असता, तेथे कंपनी रा. रा. काकासाहेब खाडिलकरांचे ‘संगीत मानापमान’ आणि रा. रा. गोविंदराव बल्लाळांचे ‘संगीत शारदा’ या नाटकांचे खेळ करीत असे. तेथील बाविशी या थेटरात होणारे दोन्ही खेळ मोठीच बहार आणीत असत आणि एलिचपूरच्या पंचक्रोशीतील नाटकषोकिनांची मोठीच गर्दी उसळत असे.
‘मानापमान’ नाटकात भामिनीचा पार्ट करणारे विख्यात ज्येष्ठ नट होते, रा. रा. भिकाजी अमळनेरकर उपाख्य ‘धाकटा गंधर्व’, तर ‘शारदा’ नाटकामध्ये भुजंगनाथाचा म्हणजेच श्रीमंतांचा पार्ट करणाऱ्या नटवर्य रा. रा. आप्पासाहेब किरगुटकर यांचे वयमान प्रत्यक्षातदेखील अवघे पाऊणशे असून इतर सगळे नट म्हणजे कंपनीत नव्याने भरती झालेली तरुण पोरे होती.
एके दिवशी एक अप्रिय प्रसंग घडला. ‘शारदा’ नाटकात शारदेचा पार्ट करणाऱ्या मास्टर जगन्नाथ यास कंपनीच्या बिऱ्हाडातील पिठले अती खाल्याने बाधून एकाएकी त्यास ढाळ लागून वांत्याही सुरू झाल्या. डाक्टरांस बोलावले असता, त्यांनी मास्टर जगन्नाथास तातडीने परतवाड्याच्या म्हणजेच एलिचपूर क्याम्पातल्या मिशन इस्पितळात भरती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तत्काळ तसे करण्यात आले, कारण जगन्नाथास याक्यूट डायरिया या रोगाने ग्रासले होते.
कंपनीचे मालक म्हणून आमचेसमोर मोठाच पेचप्रसंग उभा राहिला. मास्टर जगन्नाथास तीन आठवडे इस्पितळातून सुटी मिळावयाची नव्हती. आणि शारदा नाटकाचे खेळ लागलेले असून त्यास याडव्हान्स बुकिंगही खूपच झाले होते.
अशा वेळी दुपारी भोजनोत्तर आम्हास खिन्नपणे विड्या ओढीत बसलेले पाहून भिकाजी उपाख्य धाकटा गंधर्व आमचेकडे आले, आणि आमचा हात हाती घेऊन लडिवाळपणे म्हणाले, “मालक, असे खिन्न का बसलात?” खरे तर, धाकटा गंधर्वांनी आम्हांस लडिवाळपणे मालक म्हणणे, आम्हांस पसंत पडत नसे, तरी आम्ही त्या वेळी ते कानाआड करून आमचेसमोरचा पेच त्यांचे कानी घातला. “ मालक, जगन्नाथ नसला म्हणून काय झालं? मी आहे ना! मी करीन हो शारदेचा पार्ट!” धाकटा गंधर्व म्हणाले, तसे आम्हांस विडीचा ठसका लागला, कारण धाकटा गंधर्वांची उमर पासष्ट वर्षे होती, आणि नाटकातील शारदेचे वय चवदा! तसे आम्ही त्यांजपाशी बोललो असता त्यांस फारच वाईट वाटलेले दिसले.
“नटाचे का वय पाहावयाचे असते मालक? भामिनीची भूमिका नाही का करीत आम्ही? कालच्या मानापमानाच्या खेळात आमच्या ‘धनी मी वरिन कशी अधमा’ला सहा वन्समोर मिळालेत.”
धाकटा गंधर्व त्या गाण्यात ‘अधना’ ऐवजी ‘अधमा’ म्हणतात. त्याची मौज घ्यावयास, काही ड्यांबिस मंडळी वन्समोर देतात, ही वस्तुस्थिती त्यांस सांगण्यात काही हशील नव्हते. “अहो, तेवढे चालवून घेतात लोक. भामिनीला काय? एके जागी उभे राहून पदे गावयाची असतात फक्त. पण शारदेचे तसे कुठे आहे? गोविंदरावांनीच म्हटलंय ना- ‘सुंदर खाशी सुबक ठेंगणी, स्थूल न कृशहि न, वय चवदाची’!”

“पण मग खेळ क्यान्सल करणार का मालक? किती नुकसान होईल बघा. आधीच उमरावतीच्या टूरवर घाटा झाला आहे, कंपनीला. इंद्रभुवन थेटराचे भाडेही सुटले नाही. आयत्या वेळी कोणास उभा करणार शारदेच्या पार्टात? शिवाय आम्हीही कधी काळी केला होता, तो पार्ट. शारदेची नक्कलही चोख पाठ आहे आमची.”

घाट्याचा विषय निघताच आम्ही सावरलो आणि विझलेली विडी पुन्हा शिलगावली. धाकटा गंधर्व म्हणत होते, त्यातही तथ्य होतेच. शेवटी, कंपनीमालकास नफ्याघाट्याची गणिते सांभाळावीच लागतात. नाविलाज होऊन आम्ही होकार दिला. लडिवाळ हसत, आमचा पंजा कुरवाळीत, खुंटा हलवून बळकट करीत धाकटा गंधर्व पुढे म्हणाले, “आणि बरं का मालक, आम्ही शारदेच्या खेळात एक वेगळीच मौज करणार आहोत.”
पंजा उपरण्यास पुसत आम्ही धास्तावून विचारले, “कोठली वेगळीच मौज करणार आहात?”
“असे बघा, तिसऱ्या अंकात कुबेरांच्या वाड्यातला सीन आहे. शारदा आणि तिच्या मैत्रिणी गौरीपूजेनिमित्त तेथे जमून गाणीबिणी म्हणतात असा. मज असे वाटते की, आपण त्या सीनात पोरांकरवी झिम्मा, फुगडी, पिंगादी डान्सदेखील करवून घ्यावेत. मीही नाचीन बापडा. प्रेक्षकांसही अशी नाव्हेल्टी पाहून सुख होईल.”
आता विडी आमचे तोंडाऐवजी चुकून नाकात गेली, आणिक आम्हांस पुष्कळच शिंका आल्या.
“भिकाजीपंत, आपल्या प्रेक्षकांस रुचावयाचा नाही असला बाष्कळपणा…”
“त्यात कसला बाष्कळपणा, मालक? झिम्मा, फुगडी, पिंगादी डान्स महाराष्ट्री बायकामुलींची सनातन परंपराच आहे. शिवाय पुरुषांसही असे डान्स बघावयास आवडते.”
“पण गोविंदराव बल्लाळांना आवडेल का हे?”
“गोविंदराव म्हणजे महाराष्ट्राचे शूद्रक, महाराष्ट्राचे बाण, महाराष्ट्राचे शेक्सपीअर, महाराष्ट्राचे मोल्येर, महाराष्ट्राचे मरफी, महाराष्ट्राचे… हे!” कानाच्या पाळ्या चिमटीत धरून धाकटा गंधर्व म्हणाले, “त्यांस का नाही आवडणार? नाट्यकला ही नित्य प्रवाही असल्याचे ते जाणतात. खेरीज ड्राम्याटिक लिबरटी म्हणून काही असतेच ना?”
आम्हांस रात्रीच्या खेळाची चिंता पडली असल्याकारणे, भिकाजींशी खंडनमंडनचर्चादी करण्यात स्वारस्य नव्हते. आमचे मौनास संमतीलक्षण समजून भिकाजी आनंदले. सर्व तरुण नटवर्गास आजच्या खेळात शारदेच्या पार्टात धाकटा गंधर्व उभे राहणार असल्याचे आम्ही सांगितले, तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यांवर हासू उमटले. ते हासू आनंदाचे असून कुजकटपणाचे नव्हते, अशी आम्ही स्वतःची समजूत घातली.
रात्री खेळ सुरू झाला. त्याही दिवशी बाविशी थेटर तुडुंब भरले होते. नांदी, नटीसूत्रधारप्रवेश, भद्रेश्वर-भुजंगनाथ, हिरण्यगर्भ-कोदंड यांचे सीन वगैरे बहारीने पार पडले, आणि पुढच्या सीनात शारदेची मैत्रिणींसह एंट्री झाली. प्रेक्षकांत शांतता पसरली. आपल्या नातींना घेऊन एखाद्या आजीने देवदर्शनास जावे, तसे धाकटा गंधर्वांचे सोंग दिसत होते. पण भिकाजींना त्यांचे धाकटेपणीच एका मोठ्या महाराष्ट्री पुढाऱ्याने ‘धाकटा गंधर्व’ ही उपाधी काही उगाच दिली नव्हती. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गाण्याने आपल्या निबरपणाची उणीव भरून काढली. शिवाय वडिलधाऱ्यांचा मान राखण्याची आपली संस्कृतीच असल्याने प्रेक्षकही निमूट होते.
“या शारदेचे भुजंगनाथाशी लग्न व्हावयास काय हरकत आहे? अनुरूप जोडा आहे अगदी.” असे आमचे बुकिंग क्लार्क रा. रा. भंजनाळकर आमचे कानी कुजबुजले. आम्हास ते पटले तरी रुचले मात्र नाही.
आणि मग तिसऱ्या अंकातला गौरीपूजेचा सीन सुरू झाला. हा सीन नेहमीच खूप रंगत असे. आजही प्रेक्षक त्यांत रंगून जाऊ लागले. थोड्याच वेळात शारदेसह मंदाकिनी, वल्लरी, तुंगा, त्रिवेणी, जान्हवी, शरयू वगैरे मुली (म्हणजे मुलींची सोंगे घेतलेली पोरे) गौरीच्या मांडणावळीपुढे फुगड्या घालू लागल्या. प्रेक्षकांसाठी खरेच ही नाव्हेल्टी होती. ते खूश दिसू लागले.
फुगडी खेळून धाकटा गंधर्वांना धाप लागल्याचे दिसत होते. पण बाकीचे कसले थांबतात? त्यांनी लगेच पिंगा घालणे सुरू केले. पिंग्यात दोन्ही हात कमरेवर ठेवून कमरेवरचे शरीर वर्तुळाकार फिरवावयाचे असते, हे सर्वांस विदितच आहे. त्याप्रमाणे धाकटा गंधर्वही करू लागले. पिंग्याची लय वाढू लागली, तसे ते अंगात झोटिंग आल्याप्रमाणे गरागरा फिरू लागले आणि अकस्मात थबकले! त्यांचा केसांचा टोप खाली पडला होता. टोप उचलावयास ते वाकले तो पुन्हा त्यांना सरळच होता येईना. नाटक तेथेच थांबले! भिकाजीपंतांना तसेच नव्वद अंशातील अवस्थेत उचलून बिऱ्हाडी नेण्यात आले.
…पुढील काही दिवस कासदपुऱ्यातील विख्यात हाडवैद्य रा. रा. उज्जमान खान धाकटा गंधर्वांवर विलाज करीत होते. मास्टर जगन्नाथ इस्पितळात आणि नव्वद अंशातील भिकाजीपंत बाजेवर असल्याने साहजिकच कंपनीस दोन्ही नाटकांचे खेळ थांबवावे लागले.
हरिहर माधव गुंजाळ कृत ‘गुंजाळगुंजन’मधून.
असे बघा, तिसऱ्या अंकात कुबेरांच्या वाड्यातला सीन आहे. शारदा आणि तिच्या मैत्रिणी गौरीपूजेनिमित्त तेथे जमून गाणीबिणी म्हणतात असा. मज असे वाटते की, आपण त्या सीनात पोरांकरवी झिम्मा, फुगडी, पिंगादी डान्सदेखील करवून घ्यावेत. मीही नाचीन बापडा. प्रेक्षकांसही अशी नाव्हेल्टी पाहून सुख होईल.
gajootayde@gmail.com