आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वनामधन्य !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थाटमाट नगरात मोठं जल्लोषाचं वातावरण होतं. नगरातल्या सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवासाठी नव्या राजानं दुसर्‍या एक मोठ्या मातब्बर देशाच्या राजाला पाहुणा म्हणून बोलावलं होतं. प्रजाजन गुढ्या-तोरणं उभारून डोळ्यांत प्राण आणून त्याच्या आगमनाची वाट पाहत होते. ठरल्या दिवशी तो दूरदेशीचा राजा आला. सोहळा थाटामाटानं पार पडला. त्या राजानं दोनचार शब्द थाटमाट नगरीच्या भाषेत बोलून आणि सिनेमातले डायलॉग वगैरे मारून प्रजाजनांना अगदी खुश करून टाकलं.

त्या पाहुण्या राजाचं नाव चंद्रजित प्रताप सिंह होतं, पण थाटमाट नगराधिपती त्याला प्रेमानं `चंदू’ म्हणून संबोधायचे. आपला राजा त्या पाहुण्या राजाला लंगोटी यार असल्यासारखा एकेरीत संबोधतो, येता-जाता त्याला मिठ्या मारतो, हे ऐकून-पाहून तर प्रजेच्या कानांचे-डोळ्यांचे पारणेच फिटले.

मात्र, सोहळ्याचं सर्वात मोठं आकर्षण ठरलं, थाटमाट नगरच्या राजानं परिधान केलेला अंगरखा. त्या गडद निळ्या अंगरख्याच्या उभ्या पट्ट्या प्लॅटिनमच्या जरीच्या होत्या आणि त्यांमध्ये पोशाखभर राजाचं नाव गुंफलं होतं.
असा अंगरखा यापूर्वी कोणत्याही राजानं घातला नव्हता. सदानकदा करडे-काळे रुक्ष अंगरखे घालणार्‍या पाहुण्या राजालाच काय, पण त्याच्या राणीलाही यजमान राजाचा हेवा वाटला. फुलापानांची नक्षी असलेल्या राणीच्या झग्यांकडे कुणी ढुंकूनही पाहिना.

सोहळा संपला, परदेशी राजा आपल्या देशी परतला, पण अंगरख्याचं कवित्व मात्र मागे राहिलं. प्रजाजन, वृत्तपत्रे, माध्यमे, सोशल मीडिया, सर्वत्र त्या ‘नामधारी’ अंगरख्याचाच बोलबाला. जगभर अंगरख्याचं आणि थाटमाट नगरच्या राजाच्या सर्जक कल्पनाशक्तीचं कौतुकच कौतुक

होऊ लागलं. नाही म्हणायला, यापूर्वी काही आंदोलनं, धरणीबिरणी वगैरे चळवळी करणारे रिकामटेकडे लोक आपल्या टोप्यांवर ‘मैं हूं नाना’, ‘मैं हूं तात्या’ वगैरे लिहायचे, पण इथं तर अख्खा अंगरखा होता! पाहता पाहता, राजा ‘फॅशन आयकॉन’ बनला.
अंगरख्याच्या किमतीबद्दल वेगवेगळे अंदाज केले जाऊ लागले. कुणी म्हणे, अंगरखा नऊ लाखांचा; तर कुणी म्हणे, नऊ कोटींचा. कुणी म्हणे, एका सावकारानं अंगरखा राजाला भेट दिलाय. राजा आणि त्याचे दरबारी मात्र गाल्यातल्या गालात हसत अंगरख्याबद्दल काहीही बोलणे टाळू लागले.

यथा राजा तथा प्रजा! प्रजेला राजाचं अनुकरण करणं फारच आवडायचं. म्हणून जो तो आपापल्या कपड्यांवर आपापलं नाव गुंफून घेऊ लागला. धनाढ्य शेठ-सावकारांनी कापड गिरण्यांना आपलं नाव गुंफलेल्या कस्टम-मेड कापडाचे तागेच्या तागे बनवण्याच्या ऑर्डरी दिल्या. गिरण्या अहोरात्र धडधडू लागल्या. अनेक वर्षांपूर्वी संपांमुळे बंद पडलेल्या कापडगिरण्या पुन्हा सुरू झाल्यानं भिकेला लागलेल्या गिरणी कामगारांचेही अच्छे दिन आले.

काही बंद गिरण्यांच्या जागी बांधलेले मॉल्स आणि मल्टिप्लेक्सेस जमीनदोस्त करण्यात येऊन, तिथे पुन्हा गिरण्या बांधण्यात आल्या. पैठण्या, कांजीवरम, चंद्रकळा, बनारसी वगैरेंसारख्या साड्या बनवणारे कारागीरही प्रचंड बिझी झाले. साड्यांवरच्या नक्षीत बायकांची नावे गुंफली जाऊ लागली. जरीकाम, भरतकाम, कशिदाकाम करणारेही तेजीत आले.
फावल्या वेळात कौटुंबिक मालिका बघणार्‍या बायका आता नवर्‍याचं नाव असलेले स्वेटर्स आणि मफलर्स विणत आपला वेळ घालवू लागल्या. टेक्स्टाइल डिझाइनच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारांची रीघ लागली. विणकामाखेरीज साध्या कापडांवर लाकडी ठसे, स्क्रीन-प्रिंटिंग वगैरे छपाई तंत्रांनीही नावं छापली जाऊ लागली. तरुण पोरं-पोरी पूर्वी अचकट-विचकट चित्रं आणि स्लोगन्स असलेले टी-शर्ट‌्स घालीत. आता त्यांच्या टी-शर्ट‌्सवर त्यांची स्वतःचीच ठळक नावं झळकू लागली.

राजेश, विजय, अब्दुल, रॉबर्ट, जोशी, पाटील, कांबळे, खान, डिसूझा अशी कॉमन नावं असलेली तयार कापडं मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध होऊ लागली. कुचभल्लीवार, बुरहानुद्दीन, मॅस्करेन्हास वगैरे ऑड नावं (आणि आडनावं) असलेल्यांना मात्र ऑर्डर देऊन कापडच विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

कपड्यांवरची नावं ज्याच्या-त्याच्या ऐपतीनुसार असायची. अतिश्रीमंत शेठ-सावकार-उद्योगपती नावं गुंफण्यासाठी प्लॅटिनमची जरी वापरीत, तर साधारण धनवान असणारे सोन्याची. उच्च मध्यमवर्ग चांदी वापरीत असे, तर निम्न मध्यमवर्ग रेशीम. सामान्य जनता नायलॉन, पॉलिएस्टर वगैरेंवर समाधान मानून असे. अगदीच कनिष्ठ स्तरातले लोकं नाव मार्कर-बिर्कर किंवा लाँड्रीवाले वापरतात तसली मार्किंग इंक वापरून स्वतःच आपापल्या कपड्यांवर नावं टाकून घेत.
पूर्वी काही लोक दारोदार फिरून पुकारे करीत तांब्या-पितळेच्या भांड्यावर किंवा छत्र्यांवर नावं टाकून देत. मध्यंतरी त्यांचा धंदा बंद पडला होता, पण आता त्याला परत ऊर्जितावस्था आली. ते आता कपड्यांवर नावं टाकून देऊ लागले.
शाळकरी मुलांच्या गणवेशांवरही नावं टाकण्याची शाळांनी सक्ती केली. त्यामुळे मुलांना वेगळी ओळखपत्रे देण्याची गरज उरली नाही. सगळ्यांच्याच कपड्यांवर आता आपापली नावं असल्यानं कुणाचीच नावं लक्षात ठेवण्याचा डोक्याला ताप राहिला नाही, याचा विसरभोळ्या लोकांना फार आनंद झाला.

अगदीच दारिद्र्यरेषेखाली असणारे, भिकारी वगैरे लोकही जमेल तसे कोळसा-बिळसा वापरून आपली चिरगुटं नामांकित करू लागले. अंगभर रंगीबेरंगी डिझाइन्सचे टॅटू रंगवून घेण्याचा शौक असलेले लोक आता आपापली नावंच अंगभर गोंदवून घेऊ लागले. ‘बॉडी कॅलिग्राफी’ हा नवा कलाप्रकार भरभराटीला येऊन, चांगलं हस्ताक्षर असणार्‍या टॅटू कलावंतांची चांदी झाली.

अतिशौकीन लोक चड्ड्या-बनियन वगैरे अंतर्वस्त्रांवर, पायमोज्यांवरही नावं टाकून घेऊ लागले. ती कोणी बघोत, न बघोत, पण ती अंतर्वस्त्रे, पायमोजे घालून त्यांचा कॉन्फिडन्स मात्र वाढू लागला. काही चाणाक्ष फॅशन डिझायनर्सनी काळाची पावलं ओळखली आणि त्यांनी बिकिनीची नवी डिझाइन्स तयार केली. स्वीमिंग पूल्स, बीचेस आदी ठिकाणी सुंदर, कमनीय वगैरे फिगरवाल्या तरुणी स्वतःच्या नावांची डिझाइन्स असलेल्या बिकिनीज् घालून जलक्रीडा, सूर्यस्नान वगैरे करू लागल्या. लघळ, लंपट लोक त्या बिकिन्यांवरची नावं वाचण्याच्या निमित्ताने फाजील सलगी करत अंगचटीला येऊन कानफटात खाऊ लागले.

‘दाने-दाने पे लिखा है खानेवाले का नाम’ ही म्हण समृद्ध अडगळीत जाऊन ‘कपडे-कपडे पे लिखा है पहननेवाले का नाम’ ही नवी म्हण जन्माला आली. नगरीतले समस्त प्रजाजन आपल्या कपड्यांच्या माध्यमातून स्वनामघोष करू लागले आणि त्या मश्गुल, मदहोश उन्मादात गरिबी, महागाई, बेकारी, पर्यावरण, जमीन अधिग्रहण, महिला-सुरक्षा, दलित अत्याचार, परदेशी गुंतवणूक, दहशतवाद, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, आविष्कारस्वातंत्र्य यांसारख्या किरकोळ प्रश्नांचा नगरीत मागमूसही उरला नाही.
gajootayde@gmail.com