आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोचीडगोची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत-महंत, साधू, धार्मिक कट्टरतावादी वगैरे लोकांनी लावलेल्या रेट्यामुळे अंधेर्नग्रीत गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊन आता दोन वर्षं झाली होती. महाराजांना आत्ता कुठं जरा निवांत-निवांतसं वाटू लागलं होतं. गोवंश हत्याबंदीची काटेकोर अंमलबजावणी झाल्यामुळे या कायद्याला रसाळ गोमटी फळे आली होती. राज्यात गाईबैलांची संख्या बेसुमार वाढू लागली होती. इतकी, की जर अंधेर्नग्रीत लोकशाही असती, आणि गाईबैलांना मतदानाचा अधिकार दिला असता तर महाराजांना निर्विवाद बहुमत मिळालं असतं.

अर्थात, चांगल्यातल्या चांगल्या गोष्टीतही विरोधक खुसपटं काढतच असतात, तसं या बाबतीतही घडत होतं. कसाई, चर्मोद्योगावर पोट असणारे लोक देशोधडीला लागले होते. सतत वाढत्या महागाईमुळे कधी तरी सठीसामाशी केवळ ‘बडे का’ मांसच परवडू शकणाऱ्या लोकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढू लागलं होतं. आणि असल्या अत्यंत किरकोळ गोष्टींवरून महाराजांचे विरोधक त्यांच्यावर टीका करू लागले होते. अर्थात, असल्या फालतू विरोधकांपुढं कच खाऊन हा कायदा रद्द करण्याइतके महाराज लेचेपेचे नव्हते.

असं सारं काही छानछान चाललं असताना, एक नवंच संकट ओढवलं. गोवंशाच्या झालेल्या बेसुमार वाढीमुळे गोवंशावर जगणारे गोचीड आणि गोमाश्या यांचं प्रमाणही भयंकर वाढलं होतं. त्याचा सामान्य प्रजेला अतोनात त्रास होऊ लागला होता. आधीच अंधेर्नग्रीत डासांची, ढेकणांची पैदास फार, त्यात पुन्हा गोचीड आणि गोमाश्यांची भर. प्रजा कातावली आणि महाराजांकडे गाऱ्हाणं घेऊन आली.
“अरे मग तुम्ही लोक स्वतःच त्या गोचीड आणि गोमाश्यांचा नायनाट का करत नाही?” महाराजांनी विचारलं.
“कसा करणार महाराज? आधीच गुरंढोरं एवढी वाढली आहेत, की त्यांचं मेन्टेनन्स करताना नाकी नऊ येतात. कुणी ती विकत पण घेत नाही. आम्ही स्वतःच गोचीड अन‌् गोमाश्या मारत बसलो, तर पोटासाठी कामं कधी करणार?”
“हां, ते पण खराय म्हणा, प्रधानजी!”
“आज्ञा महाराज.”
“ताबडतोब सरकारी खर्चानं राज्यात गोचीड आणि गोमाश्या निर्मूलन मोहीम सुरू करा.”
“जी महाराज.”
प्रजाजन निघून गेले आणि प्रधानजींनी गोचीड आणि गोमाश्या निर्मूलन मोहिमेची आखणी सुरू केली.
ही बातमी संत-महंत, साधू, धार्मिक कट्टरतावादी वगैरे लोकांच्या कानी जाताच त्यांच्यात एकच खळबळ उडाली. त्यांनी धर्मसंसद भरवली. त्यात गोचीड आणि गोमाश्या निर्मूलन मोहिमेचा विषय चर्चेला आला. त्यांनी सर्वसहमतीनं एक निर्णय घेतला. अशा बाबतीत त्यांचं नेहमीच एकमत होत असे. मग धर्मसंसदेचे काही प्रतिनिधी दरबारात येऊन महाराजांना भेटले.
“महाराज, हे काय चालवलंत तुम्ही?” कपाळी भस्म फासलेल्या एका बुवानं विचारलं.
“ज्यांच्या नावातच ‘गो’ आहे अशा पवित्र जिवांची हत्या करणार?” एका लंगोटीधारी संन्याशानं सात्विक संतापानं पृच्छा केली.
“ते काही नाही. ही गोचीड आणि गोमाश्या निर्मूलन मोहीम आत्ताच्या आत्ता मागे घ्या!” एका शुभ्रवसनधारी, थुलथुलीत तोंद असलेल्या बुवानं आदेश दिला.
“पण हे साधुजनहो, त्या पवित्र कीटकांमुळे पवित्र गोवंशाला आणि आमच्या प्रजाजनांना किती त्रास होतो आहे, हे आपणास माहीतच आहे ना? आम्ही दुसरा कोणता उपाय योजावा बरे?” महाराजांनी काकुळतीनं विचारलं.
“ते आम्ही कसं सांगावं?” खदिरंगारासारखे डोळे आणखी लाल करून एक उग्रवर्णी बैरागी म्हणाला, “मग तुम्ही कशासाठी बसला आहात, या सिंहासनावर? आं?”

धर्मसंसदेचं प्रतिनिधीमंडळ निघून गेलं आणि महाराज पडेल चेहऱ्यानं बसून राहिले. प्रधानजींना महाराजांची ही विकल अवस्था पाहवेना. सगळ्याच गोष्टींमधला प्रधान असतो, तसेच आपले हे प्रधानजी पण फार हुशार आणि चतुर होते. त्यांच्या डोक्यात गोचीड आणि गोमाश्यांची पर्यायी व्यवस्था कशी करायची, याची एक अभिनव कल्पना घोळत होती.
“महाराज, असे सचिंत होऊ नका. माझ्याकडे एक आयडिया आहे.” प्रधानजी म्हणाले.
“अरे वा, कोणती? सांगा बघू पटकन!” महाराजांचा चेहरा उजळला.

“असं बघा, हे सगळे साधू-महंत वगैरे स्वतःला गोवंशाचे कैवारी म्हणवतात ना? मग आपण गोचीड आणि गोमाश्यांच्या पालनाचा भार त्यांच्यावरच टाकायचा. त्यांना नाही म्हणता येणार नाही. तशानं ते स्यूडो-धार्मिक ठरतील.”
“पण गोचीड आणि गोमाश्यांच्या पालनाचा भार त्यांच्यावरच टाकायचा म्हणजे, नेमकं काय करायचं?”
“सगळ्या गोवंशाच्या अंगावरचे गोचीड आणि गोमाश्या गोळा करायच्या आणि त्यांना या साधू, महंत, बैरागी वगैरेंच्या दाढ्या आणि जटांमध्ये सोडायचं. त्या पवित्र जंजाळामध्ये हे पवित्र कीटक सुखेनैव नांदतील. त्यांना मिळणारा खुराक तर परमपवित्र असेल.”
महाराज प्रचंड हर्षभरित झाले आणि त्यांनी प्रधानजींना बक्षीस म्हणून पाचशे रुपयांचा पोस्ट डेटेड चेक दिला.

प्रधानजी कामाला लागले. साधू-संत स्वतः गोचीड आणि गोमाश्यांचा प्रतिपाळ करणार, ही बातमी एव्हाना अंधेर्नग्रीच्या प्रजाजनांमध्ये व्हायरल झाली होती. ‘साधू साधू’ म्हणत प्रजाजन या धर्मरक्षकांना धन्यवाद देऊ लागले. तमाम संत, महंत, बैरागी, जोगी, धार्मिक कट्टरतावादी वगैरे लोकांची अवस्था मात्र ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी झाली होती.

त्या काळातच अंधेर्नग्रीत एक मोठी यात्रा भरली होती, आणि त्या यात्रेत खूप मोठ्या संख्येनं नागा साधू जमले होते. प्रधानजींनी सर्वप्रथम आपला मोहरा या पुष्ट शरीराच्या आणि झुडुपदार जटाजूट, दाढ्या बाळगणाऱ्या नागा साधूंकडे वळवला. शिपायांच्या मदतीनं नागांच्या दाढ्या आणि जटांमध्ये वस्ती करण्यासाठी गोचीड आणि गोमाश्या सोडण्यात आल्या. पण हा प्रयोग काही यशस्वी झाला नाही. कारण या नागा साधूंच्या दाढ्या-जटांमध्ये आधीपासूनच मोठ्या प्रमाणात उवा आणि पिसवा वस्ती करून होत्या. त्या उवा आणि पिसवांना गोचीड आणि गोमाश्यांचं आपल्या भूमीवरचं हे अतिक्रमण अजिबात पसंत पडलं नाही. त्यांनी जोरदार मुकाबला करून गोचीड आणि गोमाश्यांना पळवून लावलं.

नागांचा पर्याय रद्दबातल ठरल्यावर राज्यातल्या इतर नॉन-नागा दाढी आणि जटा असलेल्या साधूंना या कामी जुंपलं जाणार, अशी खबर लागताच त्या दाढी-जटाधाऱ्यांचं धाबं दणाणलं. मग त्यांनी एक शक्कल काढली. सगळ्यांनी दाढीमिशा सफाचट करून तुळतुळीत गोटे करून घेतले. आता घ्या म्हणावं. कशी जिरवली?

प्रधानजी पेचात पडले. महाराजांचा चेहरा पुन्हा पडला. पण हार जातील ते प्रधानजी कसले? त्यांनी आणखी एक युक्ती केली. दुसऱ्या दिवशी अंधेर्नग्रीत दवंडी देण्यात आली.

“ऐका हो ऐका! अंधेर्नग्रीचा नवा कायदा ऐका! अंधेर्नग्री नरेशांच्या आज्ञेवरून राज्यातल्या समस्त साधू, संत, संन्यासी, बैरागी, योगी, महंत, बुवा, बापू वगैरे धर्मपरायण जनांस सूचित करण्यात येते की, आजपासून त्यांना आपल्या काखांतले केस भादरण्याची सक्त मनाई करण्यात येत आहे हो! उपरिनिर्दिष्ट केलेल्यांपैकी जो कुणी आपल्या काखेतले केस भादरील त्यास सुळी देण्यात येईल हो! या कायद्यापासून सामान्य प्रजाजनांना मात्र सूट देण्यात आली आहे हो! ऐका हो ऐका!”

मात्रा लागू पडली. अंधेर्नग्रीतील सर्वच्या सर्व गोचीड आणि गोमाश्या त्यानंतर तमाम साधू, संत, बैरागी, योगी, महंत, बुवा, बापू वगैरेंच्या काखांमध्ये आनंदाने वास करत्या झाल्या. समस्त गोवंश आणि प्रजानन आनंदी झाले आणि त्यांनी प्रजाहितदक्ष महाराजांचे शुभ चिंतिले. महाराजांनी प्रधानजींना बोनस बक्षीस म्हणून पाचशे रुपयांचा आणखी एक पोस्ट डेटेड चेक दिला...

गजू तायडे
gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...