आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराच्या शोधात एक म्हातारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्ही दोघी, म्हणजे मी भावना आणि ही अस्मिता, कर्तृत्वहीनांचं हत्यार आहोत. तलवारही आहोत आणि ढालही. आम्हाला पुढे करून स्वतःच्या कर्तृत्वहीनतेवर पांघरूण घालता येतं. अस्मितेपुढे आणि भावनेपुढे कोणतंच अपील नसतं. म्हणूनच हल्ली सारे लोक टरकून असतात आम्हाला. कुठं काही बोललं, काही केलं तर आम्ही दुखावल्या तर जाणार नाही ना, म्हणून सावध राहायला लागलेत लोक हल्ली.

दिवस मावळायला आला होता. म्हाताऱ्याच्या पायांत आता त्राण उरलं नव्हतं. देशोधडीला लागून किती दिवस, आठवडे, महिने, वर्षं, युगं लोटलीत, हे म्हाताऱ्याला आता आठवेनासं झालं होतं. अजून त्याला कुठंही आसरा मिळाला नव्हता. त्याची आशा आता क्षीण झाली होती, पण अजून पुरती मेली नव्हती. दमलेल्या पायांना घटकाभर विसावा द्यावा म्हणून तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शिळेवर बसला, हातातली काठी त्यानं बाजूला आडवी ठेवली आणि तो आपली दुखरी पावलं चोळू लागला.

इतक्यात म्हाताऱ्याला दोन तरुण मुली येताना दिसल्या. दोघींचेही चेहरे क्षुब्ध दिसत होते. म्हाताऱ्याजवळ येऊन त्या थबकल्या आणि त्याला न्याहाळू लागल्या. म्हाताऱ्यानं विचारलं, “कोण गं तुम्ही पोरींनों? आणि कुठं निघाला आहात अशा लगबगीनं?”
“माझं नाव भावना, आणि ही अस्मिता. आम्ही आमच्या भावांच्या भेटीला निघालो आहोत,” त्यातली एक तरुणी उत्तरली.
“अरे वा. छान नावं आहेत. जरा वेळ बसा की इथं. थकला असाल,” म्हाताऱ्यानं सुचवलं. दोघींनी त्याला नीट न्याहाळलं. म्हातारा तसा निरुपद्रवी वाटत होता. दोघीही त्याच्या समोरच्या शिळेवर बसल्या.
“पण तुम्ही दोघीही अशा रागावलेल्या, दुःखी का दिसताहात बुवा? कुणी काही त्रास दिला का तुम्हाला?”
“आम्ही दुखावल्या गेलोत,” भावना उत्तरली.
“प्रचंड दुखावल्या गेलोत,” अस्मितेनं दुजोरा दिला.
“पण नेमकं झालं तरी काय असं दुखावून जायला?” म्हाताऱ्यानं कुतूहलानं विचारलं.
“नेमकं एकच असं कारण सांगता येणार नाही. लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणानं आम्हाला दुखावतच असतात. कधी आमच्या थोर पुरुषांची निंदानालस्ती करतात, कधी आम्ही अमुक जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, देशाच्या, भाषेच्या आहोत म्हणून आम्हाला उणं लेखतात,” अस्मिता उद्वेगानं बोलली.

“तुम्ही कोणत्या जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, देशाच्या, भाषेच्या आहात पोरींनो?” म्हातारा.
“नेमकं एकच असं सांगता येणार नाही. आम्ही सगळ्याच जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, देशाच्या, भाषेच्या असतो,” भावना.
“हे जरा मोघम होतंय,” म्हातारा गोंधळून म्हणाला, “जरा आणखी स्पष्ट करून सांगाल का?”
“आजोबा, आम्ही सर्वसंचारी आहोत. आम्ही दोघीही प्रत्येक जातीत, धर्मात, प्रांतात, देशात, भाषेत असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, देशाच्या, भाषेच्या लोकांच्या अंतरंगात आमचं वास्तव्य असतं. मात्र आमच्या जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, देशाच्या, भाषेच्या नसलेल्या कुणीही काहीही आम्हाला न रुचणारं किंवा न पचणारं काही बोललं तर आम्ही पटकन दुखावल्या जातो,” अस्मितेनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

“अच्छा, म्हणजे लोकांची जन्मदत्त जात, धर्म, प्रांत, देश, भाषा वगैरे त्यांची अस्मिता असते आणि त्यात त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात असं मी समजतो. त्यात स्वकर्तृत्वाचा भाग नसतो तर,” म्हातारा म्हणाला, “पण मग सगळेच लोक ऊठसूट एकमेकांच्या भावना आणि अस्मिता दुखावत असणार. नाही का?”
“तर काय? लोकांना निमित्तंच लागतात आम्हाला दुखवायला,” भावना म्हणाली.
“पण तुम्ही दुखावल्यानं नेमकं काय घडतं? म्हणजे असं बघा, तुमच्यातल्या एखाद्या थोर व्यक्तीविषयी कुणी अनुदार वक्तव्यं केली, तुमच्या भाषेला हीन लेखलं, तुमचा धर्म कनिष्ठ आहे असं म्हटल्यानं नेमका काय तोटा होतो? त्या थोर व्यक्तीची थोरवी संपुष्टात येते का? तुमच्या भाषेचा गोडवा घटतो का? धर्माचं श्रेष्ठत्व नष्ट होतं का? असं काहीच घडत नसेल तर मग तुम्ही दुखावण्याचं कारण काय? तुमच्यावर कुणी टीका केली, अगदी अश्लाघ्य भाषेत खालच्या पातळीवर उतरून शेरेबाजी केली तर काय बिघडतं? त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य होणार नाही का?”

“छे. तुम्हाला नाही कळायचं ते आजोबा. आम्ही दोघी, म्हणजे मी भावना आणि ही अस्मिता, कर्तृत्वहीनांचं हत्यार आहोत. तलवारही आहोत आणि ढालही. आम्हाला पुढे करून स्वतःच्या कर्तृत्वहीनतेवर पांघरूण घालता येतं. अस्मितेपुढे आणि भावनेपुढे कोणतंच अपील नसतं. म्हणूनच हल्ली सारे लोक टरकून असतात आम्हाला. कुठं काही बोललं, काही केलं तर आम्ही दुखावल्या तर जाणार नाही ना, म्हणून सावध राहायला लागलेत लोक हल्ली. आपण पोलिटिकली करेक्ट कसे राहू, याबद्दल फार जपायला लागलेत सगळे…” भावना म्हणाली.
“आता बघाच आजोबा. हळूहळू सगळं कसं मस्त गुळगुळीत आणि मुळमुळीत होत जाणार,” अस्मिता आनंदानं म्हणाली, “लेखक, पत्रकार फुंकून फुंकून बातम्या, अग्रलेख लिहितील. व्यंगचित्रकार फक्त लहान मुलांसाठी ‘चंगूमंगू’चीच व्यंगचित्रं काढतील. विद्रोही कवी प्रेम, चंद्र, तारे, पक्षी, नक्षीच्याच कविता करतील. बंडखोर साहित्यिक ‘चंपक’-‘चांदोबा’त ‘परोपकारी गोपाळ’ सारख्या कथा लिहितील. सगळं कसं शांत शांत होईल.”
“म्हणजे ‘चंपक’-‘चांदोबा’मध्ये लिहिलेल्या मजकुरात किंवा ‘चंगूमंगू’च्या व्यंगचित्रांत भावना किंवा अस्मिता दुखावणारं काहीच नसेल म्हणता?” म्हाताऱ्यानं खोचक प्रश्न केला.
“ते आमचे नेतेलोक ठरवणार. त्यांना कशातही भावना किंवा अस्मिता दुखावणारं काहीही दिसू शकतं. त्यांनी ठरवलं की अमुक तमुक आमच्या भावना, अस्मिता दुखावणारं आहे, की आम्ही लगेच दुखावल्या जातो. आमची ड्यूटीच आहे ती.” भावना.
“पण तुम्ही दोघी जेव्हा दुखावल्या जाता त्यानंतर नेमकं काय घडतं?” म्हातारा.

“त्यासाठी आमचे तीन भाऊ आहेत ना. ते सर्व परिस्थिती हाताळतात. नेत्यांनी अमक्या अमक्या जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, देशाच्या, भाषेच्या भावना आणि अस्मिता दुखावल्या गेल्याचं घोषित केलं रे केलं, की मग आमचे हे तीन भाऊ सगळी परिस्थिती आपल्या ताब्यात घेतात. मग मोर्चे, निदर्शनं, सोशल मीडियावरची भांडणं, प्रत्यक्षातल्या मारामाऱ्या वगैरे झडतात. भावना आणि अस्मिता दुखावणारांकडून माफ्या मागवून घेतल्या जातात. कधी-कधी पेट्या-खोकी वगैरेंचं आदान-प्रदान होतं, कधी सत्तेतल्या पदांचं. मग काही काळ सारं शांत होतं… पुन्हा नव्यानं आम्ही दुखावल्या जाईपर्यंत,” अस्मिता म्हणाली.
“आता आम्ही दोघी त्या तीन भावांकडेच निघालोत,” भावनेनं माहिती पुरवली.
एवढ्यात तीन तरुण लगबगीनं त्यांच्या दिशेला येताना दिसले. म्हाताऱ्यानं आश्चर्यानं त्या दिशेला पाहिलं. अस्मितेच्या आणि भावनेच्या चेहऱ्यावर हायसं वाटल्याचे भाव उमटले.
“ते आमचे भाऊ. आम्हाला शोधत इकडेच आलेत,” भावना म्हणाली.

तिघंही जवळ आले. अस्मितेनं त्यांची ओळख करून दिली, “हे आमचे भाऊ. हा धाकटा अभिमान, मधला गर्व आणि हा थोरला माज.”
“ए थेरड्या,” थोरला म्हाताऱ्याला म्हणाला, “इथं काय गुलुगुलू बोलत बसलायस आमच्या बहिणींशी? चल फूट, आपल्या रस्त्याला लाग.” म्हातारा काठी टेकवत उठला. निमूटपणे त्यानं रस्ता धरला. भावनेला राहावलं नाही. तो पुढं चालू लागणार तोच तिनं त्याला विचारलं, “पण आजोबा, तुम्ही कोण आणि कुठं जाताहात ते नाही सांगितलंत.”
“पोरी, माझं नाव तारतम्य. मला थारा देईल अशा घराच्या शोधात फिरतोय मी. अजून आशा मेली नाही माझी. नक्कीच सापडेल एखादा निवारा. येतो मी. काळजी घ्या.”
आणि म्हातारा काठी टेकवत पुढचा मार्ग क्रमू लागला.

गजू तायडे
gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...