आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जंगूराव, पिंपळावरचा मुंजा आणि नोटांची झाडं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटाबंदीच्या निर्णयाने अमीर-उमरावांच्या कपड्यांची इस्त्रीसुद्धा मोडली नाही. मात्र मध्यमवर्गीय जंगूरावांच्या नशिबी नोटांचा पाठलाग करणं आलं. त्यात त्यांच्या नशिबी नोटा नव्हे केवळ अश्रूच आले...

जंगूराव अत्यंत त्रासले होते. महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, शेतकरी आत्महत्या, जातीय मोर्चे वगैरे प्रश्न कमी पडलेत म्हणून की काय, आता सरकारनं तडकाफडकी नोटाबंदी जाहीर केली होती. ‘नोटाबंदी’ ऐवजी ‘निश्चलनीकरण’ हा गोंडस शब्ददेखील जंगूरावांनी वापरून पाहिला होता, पण त्यामुळे त्यांचा मनस्ताप काही कमी झाला नव्हता.

तशातच स्वतःच्याच पैशांसाठी तासन््तास लायनी लावणं हीच देशभक्ती, असंही सरकार आणि त्यांचे पाठीराखे पब्लिकच्या मनावर बिंबवत असल्यानं कुरकुर करायचीही चोरी होती. उगाच आपण देशद्रोही ठरवले जायचो! घरात दहाबारा हजार-पाचशेच्या नोटा होत्या, त्या जंगूरावांनी दोनदा ऑफिसला दांडी मारून रांगेत उभं राहून बदलून आणल्या होत्या. दुसऱ्यांदा त्यांच्या बोटाला शाई पण लावली गेली होती. रोजचा खर्च चालवण्यासाठी रोकड तर हवीच. सौ. जंगूरावांना संधिवात असल्यानं त्यांना एटीएमच्या रांगेत उभं राहणं कठीण होतं. मुलं कॉलेजात जात असल्यानं त्यांनाही ते शक्य नव्हतं.

घरात लग्नकार्य असलं की अडीच लाख काढता येतात, अशी बातमी आल्यावर त्यांनी त्यांच्या मुलीलाही तुझं लग्न ठरवू या का, म्हणून विचारून पाहिलं होतं; पण अजून आपण सतराच वर्षांच्या आहोत, हे तिनं बापाच्या नजरेला आणून दिल्यानं तोही मार्ग बंद झाला होता.
राहता राहिली जंगूरावांची म्हातारी आई. एकदा हळूच जंगूरावांनी तिला एटीएममध्ये उभं राहण्याबद्दल विचारणा केली.
“मला रांगेत उभं राहायला सांगतोस मेल्या? स्वतःला पंतप्रधान समजतोस का काय?” म्हातारी प्रचंड करवादली आणि जंगूराव गप्प बसले.
स्वतःचेच कष्टानं कमावलेले, अजिबात काळे नसलेले, कधीही काढता येतील, अशा विश्वासानं बँकेत ठेवलेले पैसे आता काढता येत नसल्यानं जंगूरावांची अवस्था ‘असुनि खास मालक घरचा, म्हणति चोर त्याला…’ अशी झाली होती.
एका रविवारी दुपारचं जेवण झाल्यावर ते पैसे देऊ शकणाऱ्या एटीएमच्या शोधात वणवणत निघाले. भटक-भटक भटकूनही त्यांना कुठंच चालू एटीएम सापडलं नाही. फिरता-फिरता त्यांच्या लक्षात आलं की, आपण शहराबाहेर आलोत. चालून-चालून त्यांच्या पायांचे तुकडे पडले होते. घराकडे परतण्याआधी पायांना जरा आराम द्यावा, म्हणून ते विमनस्क अवस्थेत एका पिंपळाच्या झाडाखालच्या पारावर विसावले. खूप थकल्यानं त्यांचा बसल्या-बसल्याच डोळा लागला.

अचानक ‘ढॅण्टढॅण… ढिश्श्श्श…’ असा पौराणिक सिनेमात होतो, तसा आवाज झाला आणि जंगूरावांचे डोळे खाडकन उघडले! समोर एक अर्धपारदर्शक शरीराची ठेंगणीशी आकृती उभी होती. उभी होती म्हटल्यापेक्षा, ती हवेतच तरंगत होती. तिच्या डोक्यावर एक लांबलचक शेंडी होती- अल्लाउद्दिनच्या गोष्टीतल्या जादूच्या दिव्यातल्या राक्षसाच्या डोक्यावर असते तशी.
“काय जंगूराव? जामच त्रासलेले दिसता!”
“तर काय? या नोटाबंदीनं हालत खराब केलीय. तुला नाही होत त्रास याचा?”
“छ्या बुवा! आपल्याला पैसेच लागत नाहीत!”
“पैसेच लागत नाहीत? कसं शक्य आहे हे?”
“मी काही तुमच्यासारखा जिवंत माणूस नाही. मी मुंजा आहे मुंजा! हा पिंपळ म्हणजे माझं घर.”
“म… म… मुंजा?” जंगूरावांची बोबडी वळली.
“घाबरू नका. मी तुम्हाला त्रास देणार नाहीये. उलट मदतच करणार आहे. तुम्हाला नोटा हव्यात ना?”
नोटांचं नाव ऐकताच जंगूरावांच्या जिवात जीव आला.
“हे काय विचारणं झालं?” ते म्हणाले, “कुणाला नकोयत नोटा?”
“मग मी सांगतो तसं करा! इथून कोसभर वायव्य दिशेनं जा…”
“वायव्य म्हणजे?”
“म्हणजे, पश्चिम आणि उत्तरेच्या मधली दिशा. तर वायव्येला कोसभर जा. तिथं तुम्हाला एक नोटांचं झाड दिसेल. हव्या तेवढ्या नोटा तोडा आणि घेऊन जा घरी!”
“आणि त्या झाडाच्या नोटा जुन्या हजार-पाचशेच्या असतील तर?”
“अजिबात नाही. चलनात असलेल्या नोटाच असतील त्या.”
“मग त्या नव्या दोन हजाराच्या नोटा असतील. उपयोग काय त्यांचा? कुणी सुट्टे देत नाहीत त्या नोटांचे!”
“डोंट वरी, नव्या पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा अजून झाडांपर्यंत पोहोचल्या नाहीत. पण घाई करा. सूर्यास्ताआधी नोटा तोडा. सूर्य मावळताच त्या नोटांचे साधे कागदाचे तुकडे होतील.” एवढं बोलून मुंजा अंतर्धान पावला.

पाय दुखत असतानाही जंगूराव शक्य तेवढी झपझप पावलं टाकत वायव्येकडे निघाले. आता जरासा झाडझाडोऱ्याचा भाग लागला. थोडं आणखी पुढं जाताच जंगूरावांना ‘ते’ झाड दिसलं. पानांऐवजी त्या झाडावर दहा-दहाच्या नोटा सळसळत होत्या.
जंगूरावांनी नोटा तोडण्यासाठी हात सरसावले. अचानक पुन्हा ‘ढॅण्टढॅण… ढिश्श्श्श…’ असा आवाज झाला आणि झाडाआडून मुंजा अवतीर्ण झाला.

“फारच अल्पसंतुष्ट बुवा तुम्ही मध्यमवर्गीय लोक!” मुंजा म्हणाला, “या किरकोळ नोटा काय कामाच्या? त्यापेक्षा असंच थोडं आणखी पुढं जा की! तिथं पन्नासच्या नोटांचं झाड आहे.”
“काय सांगतोस काय? मग तिकडेच गेलेलं बरं.” लगबग करत जंगूराव आणखी पुढं निघाले. बरंच चालल्यानंतर त्यांना पन्नासच्या नोटा लगडलेलं एक झाड दिसलं. त्या नोटा तोडाव्यात आणि घराकडे निघावं, असा विचार करत ते पुढं सरसावले तोच पुन्हा उपरिनिर्दिष्ट साउंड इफेक्ट ऐकू आला आणि मुंजा पुन्हा प्रकट झाला.
“दळभद्री रे दळभद्री तुम्ही मराठी माणसं! जास्त पैसे मिळावेत म्हणून कष्ट करायला नकोत तुम्हाला अजिबात. कर्मदरिद्री कुठले!” मुंजा जंगूरावांकडे तुच्छतेनं पाहून उद‌्गारला.
“का? आता काय झालं?”
“अहो, पन्नासच्या नोटांवर कसलं समाधान मानताय जंगूराव? तिकडे आणखी पुढं जा. शंभराच्या कोऱ्या करकरीत नोटा लागलेलं झाड आहे तिथं एक.”
“खरं की काय?” जंगूरावांचे डोळे लुकलुकले आणि ते आणखी पुढे निघाले. चालत चालत बरेच दूरवर आले. आता ते प्रचंड थकले होते. त्यांना धापही लागली होती. झाड काही दिसेना. त्यांच्या मनात निराशा दाटून येऊ लागली. एवढ्यात त्यांना शंभराच्या नोटांनी बहरून आलेलं एक झाड दिसलं.
“अरेरे!” त्यांच्या ध्यानात आलं, “आपल्याकडे पिशवी किंवा गोणीपण नाहीये एखादी. खिशांत कितीशा नोटा मावणार अशा?” मग त्यांना एक आयडिया सुचली. त्यांनी आपली पँट काढली आणि तिच्या दोन्ही पायांच्या टोकांना गाठी मारल्या. ती ‘इम्प्रोव्हाइज्ड’ पिशवी पाहून ते स्वतःवरच प्रचंड खूश झाले. नोटा तोडण्यासाठी झाडाकडे वळले… एवढ्यात…

…सूर्य मावळला आणि भराभरा काळोख दाटून आला. सळसळत्या शंभराच्या नोटांचे पाहता-पाहता साध्या कागदांचे तुकडे बनले. हातात पँटची पिशवी घेऊन उभे असलेले अर्धनग्न जंगूराव हतबुद्ध होऊन पाहात राहिले. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरारलं आणि ते हमसाहमशी रडू लागले.
‘अॅलिस इन वंडरलँड’च्या अखेरीस अॅलिसच्या अंगावर खेळातले पत्ते कोसळतात, तसे ते कागदाचे तुकडे झपाट्यानं जंगूरावांच्या अंगावर कोसळू लागले आणि जंगूराव आणखीच मोठमोठ्यानं रडू लागले...

गजू तायडे
gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...