आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्यशिमगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होळी म्हणा, धुळवड म्हणा, शिमगा म्हणा...
या सणाला माणसं चांगलीच सैलावतात. त्यांच्यातल्या सृजनाला धुमारे फुटण्याचा दुर्मीळ क्षणही हाच असतो. या क्षणात आसपासचं सारं जग, माणसं दृष्टीला अर्कचित्रात्मक दिसू-बोलू-वागू लागतात. बेरकी राजकारणी हा या दुनियेत सदासर्वकाळ फिट्ट बसणारा घटक असतो आणि तमाम विश्वाचं ओझं वाहणारे कवी-साहित्यिक या दुिनयेचे हक्काचे गिऱ्हाइकं असतात. आपला आवडता-नावडता कवी-साहित्यिक प्रत्येकाला जणू ‘रंगव माझं अर्कचित्र’, असं म्हणून स्वत:हून पुढे येत असतो. शिमगा सर्वार्थाने सार्थकी लागतो. अशाच काही परिचित-अपरिचित प्रतिमांच्या एकत्र येण्याने उडणारी धमाल टिपणारा हा लेख.
 
होळी, धुळवड, शिमगा, रंगपंचमी वगैरे विविध नावांनी ओळखला जाणारा सण देशाच्या विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा होतो. लोकांकडली लाकडं, गोवऱ्या, शिवाय खुर्च्या, खाटा वगैरे चोरून होळ्या पेटवणं, एकमेकांना ओले-सुके रंग, शेण-माती, चिखल, डांबर, ऑइल पेन्ट वगैरे फासणं, या दिवशी सामीश पदार्थ सेवन करण्याची, मादक पेये प्राशन करण्याची धर्माज्ञाच असल्यानं अशा घन आणि द्रव पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घेऊन यथाशक्ती धर्मपालन करणं हे तर केलं जातंच, त्यासोबतच शिवीगाळ करणं, जुगार खेळणं वगैरे पूरक उपक्रमही राबवले जातात.
 
दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान वगैरे हिंदी भाषिक क्षेत्रात होळीला ‘हास्य कवी संमेलन’, ‘महामूर्ख संमेलन’ वगैरे संमेलनं आयोजित केली जातात. त्यांचं पाहून-पाहून अलीकडे महाराष्ट्रातदेखील अशी विनोदी कवी संमलने होऊ लागली आहेत. काही मराठी वाहिन्यादेखील चारदोन विनोदी कवी पकडून, त्यांच्या गालांना गुलाल-बिलाल चोपडून कॅमेऱ्यासमोर बसवतात. हे कवी लोक आपल्या जुन्यापुराण्या, शिळ्याच कविता वाचून, स्वतःच्या कवितांना स्वतःच मोठमोठ्यानं हसून दाद देतात, आणि शिमगा साजरा करतात. महामूर्ख संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मात्र खूपच चढाओढ असल्यामुळे कदाचित अजून ती आपल्याकडे होत नसावीत. शिवाय ही महामूर्ख संमेलनं राजकारण्यांनी हायजॅक करण्याचा मोठा धोकाही आहेच.
 
असं असलं तरी, काही गंभीर प्रकृतीच्या कवींना मात्र उत्तरेच्या लोकांची अशी भ्रष्ट नक्कल करून शिमग्याला नुसत्याच विनोदी कवितांचं संमेलन भरवणं अजिबात नापसंत होतं. त्यामुळे कवितेच्या गांभीर्याला बाधा येते, असं त्यांचं मत होतं. यावर उपाय म्हणून गेल्या वर्षी या गंभीर प्रकृतीच्या काही कवींनी एक बैठक केली आणि शिमग्यालादेखील केवळ नॉर्मल (म्हणजे विनोदी नसलेल्या; ‘अॅबनॉर्मल’च्या विरुद्धार्थी नव्हे) कवितांचंच संमेलन करायचं, असं ठरवलं. त्यानुसार आयोजक कवीमंडळी कामाला लागली.
 
शिमग्याचं सांस्कृतिकदृष्ट्या असलेलं महत्त्व अबाधित राहावं म्हणून या संमेलनात चहा-कॉफीला फाटा देऊन त्याऐवजी भांगेची व्यवस्था असावी, असाही ठराव झाला. ‘गंग से ऊंची तरंग उठै, जब अंग में आवत भंग भवानी’ असं कुठल्याशा अज्ञात सुप्रसिद्ध कवीनं म्हणून ठेवल्याचा दाखलाही दिला गेला. भांग संमेलनाआधी घ्यायची की नंतर, असा उपप्रश्न उद्भवला. तेव्हा भांग संमेलनाआधी, संमेलनानंतर आणि संमेलनादरम्यानदेखील घ्यायची, असा तोडगा काढण्यात आल्यानं सर्वांचंच समाधान झालं. शहरातले मिठाईचे सुप्रसिद्ध व्यापारी छित्तरमल गंगाप्रसाद हलवाई वाराणसीवाले (आमची कोठेही शाखा नाही!) यांनी मंचावर आणि प्रवेशद्वारावर त्यांच्या दुकानाची जाहिरात करणारे फ्लेक्स लावण्याच्या मोबदल्यात भांगेचं प्रायोजकत्वही पत्करल्यामुळे कवींसोबतच श्रोत्यांनाही भांग पुरवण्याचं ठरलं. असं केल्यानं एरवी कवी संमेलनांकडे ढुंकूनही न पाहणारे लोकदेखील संमेलनाला गर्दी करतील, असाही सुप्त हेतू होताच. हल्ली कवी संमेलनांना ‘कवी संमेलन’ न म्हणता ‘काव्यहोत्र’, ‘काव्ययज्ञ’, ‘काव्ययाग’, ‘काव्यदिंडी’, ‘काव्ययात्रा’, ‘काव्यवारी’, ‘काव्यजाम्बोरी’, ‘काव्यधुमाळी’ अशी नावं देण्याची प्रथा असल्यानं या संमेलनासाठी ‘काव्यशिमगा’ हे नाव मुक्रर करण्यात आलं.  
 
धुळवडीचा, म्हणजेच शिमग्याचा, दिवस आला. या दिवशी सूर्य मावळल्यानंतर बरेच रसिक लोक हँगओव्हरच्या किंवा हँगओव्हरपूर्वीच्या विविध अवस्थांमध्ये जात असल्यानं काव्यास्वाद वगैरे घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. हे लक्षात घेऊन संमेलनाची वेळ सकाळी दहा वाजता ठेवली होती. आधी कयास केला होता, त्याप्रमाणेच मंचावर कवी-कवयित्रींची आणि मंचासमोर श्रोत्यांची दाट गर्दी झाली. मंचावर निसर्गकवी, संसर्गकवी, उपसर्गकवी, भावकवी, तावकवी, संतकवी, तंतकवी, पंतकवी, खंतकवी (हा नव्यानं उदयाला आलेला प्रकार आहे. हे कवी आपल्या कवितेत सतत कसली ना कसली खंत व्यक्त करत असतात), शिशूकवी, महाकवी, किंचित कवी, विद्रोही कवी, नर्मविद्रोही कवी (विद्रोही कवींच्या तुलनेत हे शिवीगाळ कमी करतात), प्रेमकवी, चारोळीकार, मंगलाष्टककार, वगैरे कवींची मांदियाळी होती. वात्रटिकाकार, विनोदी कवींना मात्र पूर्णपणे मज्जाव होता. बहुतेक जण आपापल्या कॉलनी-मोहल्ल्यात रंग वगैरे खेळून आल्यानं (काही जण आधीच ‘लावूनही’ आले असावेत) सारखेच खरकटे, पारोसे आणि रंगीबेरंगी दिसत होते. निवेदकानं ओळख करून दिल्याशिवाय कोणाचीही ओळख पटणं दुरपास्त होतं. छित्तरमल गंगाप्रसाद हलवाई वाराणसीवाले (आमची कोठेही शाखा नाही!) यांनी भांगेचे विविध प्रकार आणले होते. म्हणजे दूध, खसखस, सुका मेवा वगैरेंमध्ये छानलेली नेहमीची भांग होतीच; त्याशिवाय चखणा म्हणून भांगेचे पकौडे, भांगेची बर्फी, भांगेची कुल्फी, एवढंच काय, भांगेचं श्रीखंडदेखील होतं. 
 
काव्यवाचन सुरू झालं. विविध रंगाढंगांच्या कवितांची मंचावरून बरसात सुरू झाली. पक्षी, नक्षी, प्रियकर, प्रेयसी, प्रेम, वात्सल्य, निसर्ग, भाव, भक्ती, बंडखोरी, शिवीगाळ वगैरेंनी युक्त कवितांचं वाचन आणि गायन सुरू असतानाच प्रायोजकांची माणसं मंचावर आणि श्रोतृमंडळीत सर्वत्र फिरून भांग आणि भांगयुक्त चखणा अगत्यपूर्वक, आग्रह करकरून सर्व्ह करत होती. फुकट मिळतंय, म्हटल्यावर लोकही खाण्यापिण्यात अनमान करत नव्हते. हळूहळू सगळ्यांचे रथ जमिनीपासून दोन अंगुळे वर गेले. भांगेचा प्रभाव आणि कानी पडणाऱ्या विविधरसयुक्त कवितांच्या संयोगानं सुंदर रसपरिपोष होत होता. भांगेचं एक असतं, पिताना गोड, गारेगार लागल्यानं लोक पीतच राहतात आणि ती कधी, कशी आणि किती चढली ते कळतच नाही. इथं तर सगळी रेलचेलच होती. कवी मंडळींचं आणि श्रोत्यांचंही भान हरपलं होतं. तशातच एक कवी माइकपुढे आला. त्यानं आपल्या कवितेचं पहिलं कडवं वाचलं. त्याबरोबर श्रोतृवृंदातून दणदणीत ‘वन्स मोअर’ची दाद आली. कवी सुखावला. त्यानं ते पहिलं कडवं पुन्हा वाचलं. पुन्हा श्रोत्यांनी ‘वन्स मोअर’ दिला. आता रसपरिपोषानं चरमसीमा गाठली होती. कवी आणि श्रोत्यांत अद्वैत निर्माण झालं होतं. कवी पुनःपुन्हा तेच कडवं वाचायचा आणि श्रोते पुनःपुन्हा ‘वन्स मोअर’ म्हणून ओरडायचे. असं कित्येक तास सुरू होतं. काळोख पडला, रात्र झाली, मध्यरात्र झाली. तरी तेच सुरू राहिलं. केव्हा तरी पोलिसांची गस्त घालणारी जीप तिथं आली. मंडपातलं दृश्य पाहून पोलिसांना वेड लागायची पाळी आली. त्या रंगीबेरंगी गर्दीत कोणाची ओळखही पटत नसल्यानं अखेरीस पोलिसांनी फायर ब्रिगेडची गाडी मागवून कवी आणि श्रोत्यांना पाण्याचे फवारे मारून धुतलं. त्या फवाऱ्यांमुळे रंगात आलेला काव्यशिमगा मात्र थांबला. गारेगार पाण्याच्या स्पर्शानं सुखावून सारे जागच्या जागीच लवंडले. मंडपात बेहोश विखरून पडलेल्या कवींना आणि श्रोत्यांना दुसऱ्या दिवशी त्यांच्या-त्यांच्या घरचे लोक ओळख पटवून गाड्या, रिक्शा, हातगाड्या वगैरेंमध्ये घालून घरी घेऊन गेल्याचे कळते. यंदा काव्यशिमगा झाला नसला तरी गेल्या वर्षीच्या काव्यशिमग्याचं कवित्व अजून संपलेलं नाही... 
 
gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...