आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gaju Tayade Article About Horror Story, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भयकथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गावाबाहेरचं स्मशान. अवसेची किर्रर्रर्रर्र काळीशार रात्र अंगावर पांघरलेलं. भयाण नीरवतेला भेदणारे घुबडाचे अभद्र्र घुत्कार आणि रातकिड्यांच्या किरकिरण्याची भेसूर संतत गाज...(जाऊ देत! अंग शहारवणार्‍या वर्णनासाठी नारायण धारप, रत्नाकर मतकरी, ऋषीकेश गुप्ते यांचं साहित्य वाचावं. सदराला शब्दमर्यादा असते.)

एका वठलेल्या झाडाखाली सकाळीच कुणी तरी पिंडदान करून गेलं होतं. कावळ्यांच्या तावडीतून सुटलेल्या शितांच्या भोवती काही भुतं जमली होती. भुतं म्हणजे ब्रह्मराक्षस, समंध, आग्या वेताळ, मुंजा, चकवा, खवीस, मटमट्या, हाकमारी, डाकीण, जखीण, हडळ वगैरे महाराष्ट्राच्या लोकधारेतली ट्रॅडिशनल भुतं नव्हेत, तर आपली नेहमीचीच जनरल भुतं. म्हणजे मेल्यावर मोक्ष न मिळालेले तुमच्या-आमच्यासारख्यांचे अतृप्त आत्मे.
मुळातच पांढर्‍याफटक असलेल्या भुतांच्या चर्या आणखीच अ‍ॅनिमिक वाटत होत्या. चेहर्‍यांवर काळजी स्पष्ट दिसून येत होती. काळजीचं कारणही तसं रास्त होतं- भुतांना लोक हल्ली अगदीच घाबरेनासे झाले होते. असं कधी झालं नव्हतं.

काळ मोठा कठीण आला होता. लोकांना घाबरवणं हे तर भुतांचं आद्य कर्तव्य! दुसरं काम तरी काय असतं भुतांना? फार तर अधूनमधून एखाद्या भोळसट बाईमाणसाला पछाडायचं (त्याला टेक्निकली ‘झाड धरलंय’ असं म्हणतात.) किंवा एखादी जागा झपाटायची. जागा तरी कसली? एखादा म्हातारा खुडुक पिंपळ, एखादी उद्ध्वस्त धर्मशाळा, नाही तर पडका वाडा! काही आधुनिक विचारसरणीची भुतं हल्ली पॉश अपार्टमेंटस, मॉल्स, मल्टिप्लेक्स वगैरे झपाटू लागलीयेत, पण हा अपवाद. (त्यांनी नक्कीच जिवंतपणी रामगोपाल वर्माबिर्माचे, विक्रंभट्टाबिट्टाचे चित्रपट पाहिले असणार.)
शिवाय प्रश्न अस्मितेचा होता. पब्लिकला घाबरवणं ही भुतांची अस्मिताच! आणि अस्मिता टिकवायची तर लोकांनी न घाबरून कसं चालेल? भैयांना ठोकून त्यांच्यात कायम घबराट निर्माण करणं, ती घबराट धगधगती ठेवणं ही महाराष्ट्रीयांच्या अनेक अस्मितांपैकीच एक अस्मिता आहे; तसंच हे! आपली अस्मिता दुसर्‍यांमध्ये भीती पैदा करत नसेल तर तिला काय चाटायचंय?

‘राजेहो, मी तं रोज रातच्याले वावरातल्या झाडाले जाऊन फासावर लटकतो, जोर्‍यात झोके घेतो, तरी कोनी भेत नाही! लोकाहिले वाटते का अजून एखांदा शेतकरी लटकला असंन फासावर! त्येच्यात काय नवलाचं हाये पाहन्यासारकं?’ कर्जापायी आत्महत्या करून भूत बनलेला एक वºहाडी शेतकरी बोलला.

हळदीचं ओलं अंग सुकण्याआधीच हुंडाबळी गेलेली एक तरुणी म्हणाली, ‘मी गेले होते माझ्या नवर्‍या-सासूला घाबरवायला. पण कसचं काय? नवरा दुसर्‍या लग्नाचा हनीमून साजरा करत होता आणि सासू काळ्या बाजारातल्या रॉकेलचा साठा करण्यात गुंतली होती- नव्या नवरीसाठी! आले बापडी गुपचूप परत!’
प्रत्येक भूत आपापलं दुखडं शेअर करू लागलं.

‘तुम्हाला सांगतो’, लिमयेकाकांचं भूत म्हणालं, ‘आधी त्या रामसे बंधूंचे शिनेमे अन् हल्ली टीव्ही चॅनेलींवर दाखवतात त्या हॉरर शिरीयलींमुळं झालंय हे! काय तो मेकप्, अन् काय तो अभिनय! शिंच्यांनी विदूषक बनवून ठेवलंय भुतांना! कसे घाबरणार लोक? भूत म्हंजे जोकर हो, चक्क जोकर!’

‘नाही तर काय? शिवाय त्या अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्त्यांचा चावटपणा! म्हणे भुताखेतांवर विश्वास ठेवू नका! लोकही मेले तसलेच. आपण दिसलो तरीही ‘भुतं नाहीतच’ म्हणणार! पूर्वी आपण दिसलो की काय छान बोबडी वळायची नै लोकांची!’ सुमाआज्जी म्हणाल्या.
‘मला वाटतं आपण आपला अ‍ॅप्रोच जरा बदलायला हवा.’ जिवंतपणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेले डॉ. खोपटकर म्हणाले. ‘...म्हणजे असं पाहा, आपण जिवंत असतानाही आपल्याला कुणी घाबरत नसे. मग आता मेल्यावर कसे घाबरतील? आपण स्वत:च्या रूपांऐवजी वेगळीच रूपं घेऊन लोकांना घाबरवलं पाहिजे. भुतं आहोत आपण! हवं ते रूप धारण करू शकतो.’

‘तेही करून झालंय हो. एकदा मी पोलिसाचं रूप घेऊन एका चोराला घाबरवायला गेलो. घाबरण्याचं तर सोडा, माझ्या हातात शंभराची नोट कोंबून सटकला की तिथून तो!’ रासवट चेहर्‍याचं एक भूत म्हणालं.
‘मी नगरसेवकाचं रूप घेऊन माझ्या जुन्या वॉर्डातल्या एका बाईला भीती दाखवायला गेलो तर तिनं गटार तुंबल्याच्या तक्रारी केल्या. मी विकट हास्य केलं तर तिनं मला लाटणं फेकून मारलं हो टाळक्यावर!’ एक मवाळ भूत म्हणालं. भुतांना टेंगूळ येत नाही; नाही तर त्यानं पुराव्यादाखल तेदेखील दाखवलं असतं.

नेमकं कोणतं रूप धारण केल्यानं लोक घाबरतील, यावर मग बरीच चर्चा झाली. एकेक भूत आपापलं मत सुचवू लागला. इन्कमटॅक्सवाले, विमा एजंट, दाऊदभाई, शक्ती कपूरसारखे व्हिलन लोक, निरनिराळे प्राणी-पक्षी, वगैरे अनेक रूपं चर्चिली जाऊ लागली. पण नक्की कोणतं रूप घेतल्यास लोकांना भीती वाटेल, यावर एकमत होईना. उत्तररात्र उलटून गेली तरी चर्चा काही थांबेना.
***
‘गावापासून दूर, स्मशानाच्या जवळच एक दारूचा गुत्ता होता. एक निबर चेहर्‍याचा माणूस तिथं रात्रभर मैफल जमवून जड पोट, जड डोळे अन् जड पावलांनी आपल्या घरी निघाला होता. लवकर घरी जाऊन अंथरुणावर अंग टेकावं, म्हणून त्यानं स्मशानाचा शॉर्टकट घेतला. चालता चालता त्याच्या पापण्या लवू लागल्या, तशी त्याला सिगारेटची हुक्की आली. मघाच्या मैफलीत ढापलेल्या पाकिटातून त्यानं एक चारमिनार काढली. माचिससाठी खिसे चाचपले. माचिस सापडेना. एवढ्यात त्याचं लक्ष स्मशानातल्या एका अर्धवट जळणार्‍या चितेकडे गेलं.

‘चला, लाइटची सोय झाली...’ असं पुटपुटत त्यानं चितेच्या जाळावर चारमिनार शिलगावली. दोन्ही फुप्फुसं धुरानं भरून घेतली. आधीच मनाची तरल अवस्था होती. त्यात निकोटीनचा महापूर आणि स्मशानाचं गूढ वातावरण. अचानक त्याला स्फूर्ती आली- कवितेची! जातिवंत कवी होता तो माणूस! त्याला तिथंच उभ्या उभ्या कविता झाली. कवी ती नवजात कविता मोठमोठ्यानं म्हणू लागला.-
दग्ध चितेचे विदग्ध प्राक्तन
ज्वालांची ही लागट थरथर।
घट मातीचा फुटून रडतो
अश्रू त्याचे वाहति झरझर?
स्फोटक कवटी फुटता लगबग
स्मशानयात्री पांगति भरभर।
जाता, डोळा अश्रु आणुनी
दु:ख दाविती केवळ वरवर?
सुतकाचे तू स्नान करून घे
भादरून घे डोई सरसर।
मारून डुबकी अरबी खाडित
हरहर गंगे, गंगे हरहर?’
***
...ती कविता कानावर पडताच सगळी भुतं प्रचंड दचकली, धसकली, शहारली, घाबरली! थरथरत त्यांनी कवीकडे पाहिलं. तल्लीनतेनं कविता आळवणार्‍या त्या भयंकर माणसाला पाहून ती चळचळा कापू लागली. अंगावर भीतीचे काटेच काटे येऊन त्यांना निवडुंग बनल्यासारखं वाटू लागलं! एवढा भयानक प्रकार त्यांनी कधीच अनुभवला नव्हता! क्षणार्धात भुतं दशदिशांना सैरावैरा पळाली.
मात्र, आपला प्रश्न आता सुटला आहे, हे पळता पळता सगळ्यांना उमजलं. आता कोणत्या रूपात जाऊन लोकांना घाबरवायचं, हे त्यांना पुरतंच कळलं होतं!!