आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लॅंचेटूक!!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जंगूरावांचं पाकीट हरवून दोन महिने झाले होते. तपासात काही प्रगती झाली का, ते बघायला आज ते पोलिस ठाण्यात आले होते. गेटच्या मध्यातच पडलेल्या हळद-कुंकू माखलेल्या, चिरडलेल्या लिंबाला लहानसा वळसा घालून जंगूराव वर्‍हांड्यात आले तेव्हा एक निबर हवालदार नव्यानं भरती झालेल्या कोवळ्या शिपायावर करवादत होता.
‘भाड्या, दर शन्वारी बदलायला सांगितलंय् ना तुला सायबांनी? मंग कसा इसरलास?’
‘आत्ता आनून लावतो. सायबांना सांगू नका हां! त्यांची डिशिप्लीन म्हंजे...’ जीभ चावून शिपाई म्हणाला आणि त्यानं लिंबू-मिरची-कोळश्याची माळ आणून दर्शनी भागात टांगली. बाजूलाच एका तंगडीवर उलटं लटकावलेली काळी भावली झोके घेत होती.
सीनियर साहेब अजून आले नव्हते म्हणून जंगूराव तिथंच एका बाकड्यावर टेकले; एवढ्यात आतल्या खोलीतून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. मच्छरांसाठी धूर फवारत असतील, असं आधी त्यांना वाटलं तोच एक फकीर आतून धुपाटण्याला पुठ्ठ्यानं हवा घालत बाहेर आला. लोबानचा गंध दाटून आला. तिथं असलेल्या पोलिसांवर मोरपिसांच्या झाडूनं फटकारे मारून फकीर निघून गेला. मघाचा कोवळा शिपाई एक रजिस्टर घेऊन जंगूरावांकडे आला.
‘किती लिवायचे?’ शिपाई.
‘काय किती?’
‘पैशे! सत्तेनारायनाची पूजा आहे फुडल्या आठवड्यात ठाण्यात. पाश्शे एक लिवतो!’
‘अहो पण...’ जंगूरावांनी सौम्य विरोध करून पाहिला, पण शिपायानं त्यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आग्रहपूर्वक जाणीव करून दिल्यानं त्यांचा खिसा पाचशे एक रुपयांनी हलका झालाच.
एवढ्यात सीनियर साहेब आले. जंगूरावांना पाहून मान डोलावून हसले. आत येण्याची खूण केली. दोघंही आत आले. साहेबांनी भिंतीवर टांगलेल्या अगणित बाबा-बुवा-महाराज-स्वामी-बापू वगैरेंच्या तसबिरींना भक्तिभावानं नमस्कार केला आणि मगच ते खुर्चीत बसले.
‘हं, बोला! काय सेवा करू आपली?’ सीनियर साहेब.
‘ते हेच आपलं. पाकीट हरवल्याच्या चौकशीचं काय झालं ते...’
‘हहहह! चौकशीची चौकशी करायला आलात होय? हहहह!’ साहेब पोलिसांत असले तरी रुक्ष नव्हते. त्यांना विनोदाचंही अंग होतं. ‘बरे वेळेवर आलात. परवा कळेल आपल्याला तुमचं पाकीट हरवलंय का कुणी मारलंय ते!’
‘परवा? म्हणजे परवा काही विशेष?...’ जंगूराव बुचकळ्यात पडले.
‘तर? अहो, परवा अमावास्या नाही का? तुम्ही परवा रात्री आठच्या सुमाराला या. येताना एक उलट्या पिसांची कोंबडी, तूप लावलेल्या चपात्या, दारूचा शिसा वगैरे आणावं लागेल. डिटेल यादी हेड-कॉन्स्टेबल देईल तुम्हाला. उशीर करू नका. भगत साडेआठला त्याचं काम सुरू करील. रात्री बारापर्यंत तपास पूर्ण होईल.’
‘हल्ली गुन्ह्यांचा तपास असा करतात?’ जंगूराव हबकले.
‘अहो, जमाना बदलला आहे. त्याच त्या जुनाट पद्धती नाही वापरत हल्ली पोलिस. अगदी आरोपींकडून कबुली वदवून घेण्यासाठीही पूर्वीसारखी मारहाण नाही करत आम्ही हल्ली. तिथंही मॉडर्न टेक्निक!’
‘म्हणजे पॉलिग्राफ, लाय डिटेक्टर वगैरे...?’
‘छ्या:! फारच जुनाट बुवा तुम्ही. थांबा, तुम्हाला प्रात्यक्षिकच दाखवतो. अरे, सातशेबावन्न!!’ साहेबांनी एका हवालदाराला हाक मारली. तिघंही कोठडीजवळ आले. सातशेबावन्न एक मातीची बाहुली हातात धरून तिच्या पावलांवर कोंबडीचं पीस फिरवू लागला. कोठडीतला एक आरोपी जमिनीवर गडबडा लोळत प्रचंड गुदगुल्या झाल्यासारखा खदखदा हसू लागला.
‘थांबा! थांबा!! खून मीच केलाय!!’ शेवटी गुदगुल्या असह्य होऊन तो आरोपी किंचाळला.
‘पाहिलंत? कसा पटकन् गुन्हा कबूल केला त्यानं? हे इंपोर्टेड टेक्निक आहे चौकशीचं! ‘व्हूडू’ म्हणतात ह्याला. काही पोलिस आफ्रिकेहून प्रशिक्षण घेऊन आलेत ह्याचं. कोठडीतल्या मृत्यूंचं प्रमाणही बरंच खाली आलंय ह्यामुळं. गेल्या वर्षभरात एकच आरोपी हसून-हसून मेला. सहन नाही झालं त्याला एवढं हसणं. समीक्षक होता म्हणे तो!’
ठाण्यातून बाहेर पडताना जंगूरावांचं डोकं पुरतं भिरभिरलं होतं. ते स्वत:ला बुद्धिवादी वगैरे समजत होते. ह्या सगळ्या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे करायची, असा त्यांनी निश्चय केला. जवळच असलेल्या पोलिस आयुक्तालयाकडे त्यांनी मोहरा वळवला.
‘कमिशनरना भेटायचंय्!’ केबिनबाहेरच्या हवालदाराला जंगूराव म्हणाले.
‘आज जमणार नाही.’
‘अहो, पण ते आतच आहेत ना? दुसरं कुणी आहे का सोबत?’
‘बरेच अधिकारी आहेत. शिवाय दोन-चार आत्मे पण येणारेत मीटिंगला.’
‘आत्मे?’ जंगूरावांना ऊर्ध्व लागला.
‘हां! खून झालेल्या काही लोकांच्या आत्म्यांना बोलावलंय साहेबांनी प्लँचेटवर. ते आत्मे स्वत:च सांगतील त्यांचा खून कुणी केलाय ते!’

...काय पोलिस आहेत का कोण? प्लँचेट काय न् भानामती काय?... मंत्रालयात शिरताना जंगूरावांच्या डोक्याच्या शिरा आणखीच तडतडत होत्या. गृहमंत्र्यांच्या कानावर हे पोहोचवलंच पाहिजे, असं त्यांनी पक्कं ठरवलं होतं. मोठ्या मिनतवारीनंही गृहमंत्री पाच मिनिटांसाठी उपलब्ध झाले.

‘नमस्कार साहेब!’ जंगूराव.
‘थू: थू:!’ तंबाखूच्या दोन चुकार पत्त्या जिभेनं उडवत गृहमंत्र्यांनी जंगूरावांना बोलण्याचा इशारा केला, तसा जंगूरावांनी आपल्याला पोलिसांच्या आलेल्या अनुभवाचा अथपासून इतिपर्यंत पाढा वाचला. सात्त्विक संताप त्यांच्या चेहर्‍यावरून नुसता ओघळत होता.

‘ज्याची प्रज्ञा स्थिरावली’ आहे असे गृहमंत्री उत्तरले, ‘बडे-बडे शहरोन् में अयसे छोटे-छोटे हादसे होतेच रहते हय. शासन यात पूर्ण लक्ष घालील. कुणाचीही गय केली जाणार नाही. कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू! डान्सबारबंदी झालीच पायजेल!’

‘आं?’ जंगूराव अवाक् झाले! एक-दोनदा त्यांनी जबड्याची निरर्थक उघडमीट केली.
जितकं बोलण्यासारखं होतं तितकं सगळंच बोलून संपल्यामुळे गृहमंत्र्यांनी पुढच्या मुलाखतीसाठी ‘नेक्स्ट!’चा पुकारा केला, ‘गाय छाप’चा तोबरा भरला आणि गुळणी धरून गायीसारखाच गरीब चेहरा करून ते मख्ख बसून राहिले. जंगूरावांना बाहेर पडण्यावाचून गत्यंतर राहिलं नव्हतं.
‘सिंहासन’ चित्रपटाच्या शेवटी निळू फुलेला वेड लागतं तसं आपल्यालाही लागणार न् आपण ‘उष:काल होता होता काळरात्र
झाली...’च्या बॅकग्राउंडवर सैरावैरा पळत राहणार, अशी भीती वाटून जंगूरावांनी थेट घरचा रस्ता पकडला.

जंगूरावांना वाटलं होतं, तेवढं काही सरकार कर्तृत्वहीन नव्हतं. शिवाय निवडणुका तोंडावर आल्यानं आचारसंहिता लागू होण्याच्या आत अनेक लोकप्रिय निर्णयांचा धडाकाच सुरू झाला होता. अशाच एका मंत्रिमंडळांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शुचिर्भूत होऊन प्रवेश केला. हसतमुखानं ते म्हणाले, ‘मंडळी, काल बाबाजींच्या आश्रमात गेलो होतो. त्यांनी अनुकूलता दाखवली आहे. शिवाय कुलदेवतेनंही उजवा कौल दिला आहे. त्यातच सकाळपासून माझी उजवी पापणी लवते आहे, हा शुभसंकेतही आहेच; तेव्हा नवं विधेयक ताबडतोब आणलं पायजेलाय्!’

अत्यंत उत्साहानं नवीन विधेयकावर चर्चा सुरू झाली. ‘जनतेच्या श्रद्धा पाहता राज्य पोलिस भरतीत शिपायापासून ते आय. जी. पर्यंत केवळ बाबा, बुवा, भगत, मांत्रिक, चेटकिणी आदींचाच समावेश करण्यात यावा’ हे नव्या विधेयकातलं मुख्य कलम होतं!
(gajootayde@gmail.com)