आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅक्युलाचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवसेच्या त्या रात्री सगळी भुतं-भुतिणी स्मशानात कोंडाळं करून गप्पाड्या मारत बसली होती. द. मा. मिरासदारांच्या गोष्टींमधली गावकरी मंडळी पारावर-बिरावर बसतात तशी. आजच्या गप्पांचा विषय होता, मुंबईत सुरू होऊ घातलेलं नाइट लाइफ...

"पण त्यांचं हे असलं नाइट लाइफ म्हणजे, आपल्या अधिकारांवर आक्रमण आहे. नाइट लाइफ हे फक्त भुतांसाठीच असायला हवं.' पाठीत सुरा खुपसून खून झालेल्या एका सामाजिक आंदोलकाचं भूत म्हणालं.

"नाही तर काय बाई? या लोकांचा रात्रीच्या वेळी फारच उच्छाद होतो, बाई! तरुण पोरापोरींनी तर ताळतंत्रच सोडलंय. रात्री-अपरात्री अगदी या आपल्या स्मशानात येऊनसुद्धा प्रेमाचे चाळे करतात मेले! बघवत नाही अगदी.' जनाआज्जीचं भूत म्हणालं.
"बरोब्बर आज्जी! अरे, आम्ही काय माणसं नाही? आम्हाला काय जीव नाही? भावना नाहीत?' कालच मरून भूत बनलेले चिप्पण्णा म्हणाले.

"अहो चिप्पण्णा, काय बोलताय, ते लक्षात येतंय का? आपण माणसं नव्हे, भुतं आहोत. आणि भुतांना जीव नसतो!' सूर्याजी वैतागून म्हणाले. ते जमलेल्या सगळ्या भुतांमध्ये सर्वात सिनियर होते. जिवंतपणी त्यांनी टिळकांचा काळ पाहिला होता.
"ते काही नाही! माणसांना जर नाइट लाइफ हवं असेल, तर भुतांनीही डे लाइफ जगावं खुश्शाल! फक्त रात्रीच का म्हणून? आपण भर दिवसादेखील पछाडत जाऊ माणसांना.' सामाजिक आंदोलक.

"पण काही भुतं दिवसापण पछाडतात, ना? माझ्या नणंदेच्या मुलीची सासू मेल्यावर हडळ बनली आहे. गावाबाहेर असलेल्या पाणवठ्याजवळच्या चिंचेवर राहते. टळटळीत दुपारच्या वेळी चिंचेखालून जाणाऱ्या नववधूंना पछाडत असते ती.' जनाआज्जी.

"पण हडळीसारखे तुरळक अपवाद सोडले, तर बहुसंख्य भुतांचा संचार रात्रीच असतो.' सूर्याजी.
"पण तुम्ही काहीही म्हणा, रात्रीची गंमत दिवसा नाही येणार बुवा. अंधारात लुकलुकणाऱ्या दिवट्या, घुबडांचे घुत्कार, काळ्या मांजरांची म्यांवम्यांव, फाटकाचं करकरणं वगैरे स्पेशल इफेक्ट्सची मजा दिवसा नाही येणार बुवा.' पहिलंच मराठी पिक्चर डब्ब्यात गेल्यानं आत्महत्या केलेल्या निर्मात्याचं भूत म्हणालं.

"अहो सिनेमावाले, तुमचे ते स्पेशल इफेक्ट्स बाजूला ठेवा.' सामाजिक आंदोलक.
"तर काय? स्पेशल इफेक्ट्स कसले? साइड इफेक्ट्सच ते! हॅ हॅ हॅ हॅ...' मराठीचे मास्तर राहिलेल्या म्हात्रे गुर्जींच्या भुतानं इंग्रजी जोक केला, पण तो इतर भुतांच्या डोक्यावरून गेल्यानं कुणीच हसलं नाही.
"हे बघा, विषय असा हलक्यानं घेण्याचा नाही. प्रश्न तत्त्वाचा आहे.' लेलेंची आख्खी हयात सदाशिवपेठेत गेलेली असल्यानं, त्यांनी असं म्हणणं साहजिकच होतं.
"ते तत्त्वाबित्त्वाचं ठीक आहे, लेले, पण आपल्या मागण्या घेऊन आपण जाणार तरी कुणाकडे? "भुतांचं सरकार' नावाची गोष्ट तरी अस्तित्वात असते का?' म्हात्रे गुरुजी.
"सरकार नाही ते बरंच आहे मेलं. जिवंतपणी फसव-फसव फसवतात मेले. आता मेल्यावरसुद्धा तेच कशाला हवं? जळो ते डेलाइफ!' जनाआज्जी.

"हे बघा, आपण भुतं काय वाट्टेल तो निर्णय घ्यायला समर्थ आहोत. इट्स अवर चॉइस! आपण फक्त ठरवायचं. मात्र, आपल्या भुता-भुतांत एकमत व्हायला हवं.' सामाजिक आंदोलक म्हणाले.
"या बाबतीत आपण कुण्या जाणकार भुताचा सल्ला घ्यायला हवा.' चिप्पण्णांनी सुचवलं.
"माझ्या माहितीत असे जाणकार आहेत. गावाबाहेरच्या पडक्या गढीत वास्तव्य असतं, त्यांचं. डे लाइफ असावं की असू नये, या बाबतीत मार्गदर्शन करू शकतील ते आपल्याला.' लेले म्हणाले.
"कोण? ते चमन भगताचं भूत? तो भगत कसला आलाय, जाणकार? ढोंगी आहे तो पुरता. एकदा मी धरलेल्या "झाडा'वरून मलाच हाकलायला निघाला होता. खूप झाडफूक केली, पण मी कसला सोडतो झाड. त्या प्रयत्नात शेवटी स्वतःच जुलाब लागून मेला तो. अजूनही टरकून असतो मला. म्हणून तर दूर त्या पडक्या गढीत राहतो, एकटा!' सूर्याजी छद्मी हसून म्हणाले.

प्रत्येक भूत आपापलं मत मांडू लागलं. काहींना डे लाइफ हवं होतं, तर काही जण त्याच्या सक्त विरोधात होते. जिवंत माणसं घालतात, तशी भुतं पण हमरीतुमरीवर येऊन हुज्जत घालू लागली. गलका वाढला.

उत्सुकतेनं स्मशानातली घुबडं आणि वटवाघळं त्यांची चर्चा ऐकू लागली. भुतांचं डे लाइफ सुरू झालं, तर आपल्यालाही डबल ड्यूटी करावी लागणार की काय, हा प्रश्न त्यांना सतावू लागला. गलका वाढत गेला.

इतक्यात दुरून घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. भुतं बोलायची थांबली. टापांचे आवाज जवळ येऊ लागले आणि काही क्षणांतच एक लांबलचक, दोन घोडे जुंपलेली बग्गी तिथे येऊन उभी राहिली.
"बंदराकडे जाणारा रस्ता हाच का?' जाडजूड गाडीवानानं विचारलं. "तू कोण? आणि आमच्या चर्चेत व्यत्यय आणण्याची हिंमत कशी झाली तुझी?' सूर्याजींनी रागानं विचारलं.
"मी काउंट, ड्रॅक्युलांचा सेवक. आणि आत खुद्द काउंट आहेत. या देशातलं दोन वर्षांचं वास्तव्य संपवून काउंट स्वतःच्या जहाजानं परत ट्रान्सिल्व्हेनियाला निघालेत.'

"काय? प्रत्यक्ष काउंट ड्रॅक्युला! अलभ्य लाभ, अलभ्य लाभ! आम्हाला ड्रॅक्युलाजींचं दर्शन घडेल काय?' न बोलावताच अचानक ओबामांनी भेट दिल्यावर मोदींना होईल तेवढा आनंद म्हात्रे गुर्जींना झाला होता.

सगळ्या भुतांच्या विनंतीवरून बग्गीच्या आत शवपेटीत झोपलेला ड्रॅक्युला बाहेर आला. ख्यालीखुशाली झाल्यावर त्यालाच डे लाइफविषयी सल्ला विचारण्याचं भुतांनी ठरवलं.
"हे बघा...' काउंट आपली हडकुळी तर्जनी हनुवटीवर फिरवत म्हणाला, "माणसांची नक्कल करून आपल्या उच्च परंपरा मोडू नका. नाइट लाइफ हेच भुतांचं खरं लाइफ! शिवाय डे लाइफमध्ये भुतांना प्रचंड धोका असतो. कारण, डे लाइफचा संबंध डे लाइटशी येतो. आणि त्यासारखी घातक गोष्ट दुसरी नाही. मी स्वतः दिवसाच्या प्रकाशात बाहेर निघू शकत नाही. तसं केलं तर तत्काळ माझी माती होईल, हे ठाऊक आहे मला. तुम्हालाही तसलाच काही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहींच्या बाबतीत हे घडणारही नाही, पण विषाची परीक्षा कशाला घ्या?'

काउंटचं म्हणणं सगळ्या भुतांना पटलं. त्यांनी बहुमोल सल्ला दिल्याबद्दल काउंटचे आभार मानले. काउंटची बग्गी टपटप करत बंदराच्या दिशेनं निघून गेली आणि सगळी भुतं इतस्तत: विखरून पछाडण्यासाठी झाडं शोधू लागली...

gajootayde@gmail.com