आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परत कोपच्यात: न्यायाधीश महोदय, न्यायाधीश महोदय...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभक्ती, ईश्वरनिष्ठा, धर्मपरायणता हे सर्वोच्च गुण आहेत. पाकिटमारी, कर्जबुडवेगिरी, दरोडेखोरी, तस्करी या नाममात्र अवगुणांकडे दुर्लक्ष करून मोठ्या मनाने आरोपींची न्यायाधीश महोदयांनी निर्दोष मुक्तता करावी...

न्यायाधीश महोदय, कठड्यात उभा असलेला हा बापुडवाणा, केविलवाण्या चेहऱ्याचा इसम एक खिसेकापू आहे. तसं असल्याचं तो स्वतःदेखील अमान्य करत नाहीये. खिसे कापणं हा त्याचा पिढीजात धंदा आहे. आपल्या खानदानी गुरूकडून पाकिटमारीचे यथासांग शिक्षण घेऊन अनेक वर्षांच्या सरावानं, तो आपल्या धंद्यात निष्णात बनला आहे. अर्थातच प्रत्येक धंद्यात असतात तशा या धंद्यातही जोखमी आहेत. आणि म्हणूनच परवा तो बसमध्ये एका प्रवाशाचं पाकीट मारताना पकडला गेला. समूहाचं मानसशास्त्र आपल्याला ठाऊकच आहे, न्यायाधीश महोदय. बसमधल्या समस्त लोकांनी त्याला बुकल-बुकल बुकललं आणि पोलिसांच्या हवाली केलं. अनेक दिवस त्यानं हप्ता पोचता न केल्यानं, एरियातल्या पोलिसांचीही त्याच्यावर खुन्नस होतीच. पोलिसांनीही त्याला गुन्हा कबूल करेपर्यंत धू-धू धुतलं. अखेर त्यानं आपला परवाचा गुन्हा तर कबूल केलाच, न्यायाधीश महोदय, शिवाय मागच्या आठ वर्षांत केलेल्या सगळ्या गुन्ह्यांचीही कबुली दिली.

मात्र न्यायाधीश महोदय, सदरहू आरोपी हा अत्यंत देवभक्त माणूस आहे. तो भल्या पहाटे उठून देवपूजा केल्याशिवाय पाकिटमारीच्या आपल्या धंद्यासाठी घराबाहेर पडत नाही. अनेकदा मोठं घबाड हाती लागलं असताना, त्यानं सत्यनारायणाच्या पूजादेखील घातल्या आहेत. त्याच्या वस्तीतल्या लोकांसाठी भंडारा घालून अन्नदानही केलं आहे. गल्लीतल्या गणेशोत्सवात, नवरात्रात आणि दहीहंडीत यानं दिलेल्या देणगीचा आकडा सर्वात मोठा असतो. म्हणून न्यायाधीश महोदय, सर्व साक्षीपुरावे त्याच्या विरोधात असतानाही या आरोपीची ईश्वरनिष्ठा लक्षात घेऊन त्याची निर्दोष सुटका करावी, अशी मी माननीय न्यायालयाला विनंती करतो.

न्यायाधीश महोदय, जबरी दरोडा घालण्याचा आणि खुनाचा आरोप असलेला हा इसम एक निर्ढावलेला, सराईत दरोडेखोर आहे. अत्यंत कुप्रसिद्ध अशा ‘चड्डी बनियन गँग’चा हा म्होरक्या आहे. एक महिन्यापूर्वी एका वृद्ध दांपत्याच्या घरात दरोडा घालताना याच्या हातून त्या म्हाताऱ्या नवरा-बायकोचा खून घडला. ऐनवेळी शेजारपाजारचे लोक धावून आल्यानं हा पकडला गेला, मात्र याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा अजूनही पोलिस शोध घेत आहेत. या इसमाने आपल्या गँगच्या साथीने आजवर शेकडो घरफोड्या आणि दरोड्यांमध्ये भाग घेतला आहे आणि लाखोंचा ऐवज लुटला आहे. दरोडा घालत असताना अनेक लोकांनी प्रतिकार केल्यामुळे केवळ नाइलाजानं याला, काही खूनही करावे लागले आहेत.

केवळ दुर्दैवाने हा पकडला गेला आहे, न्यायाधीश महोदय. दैवदुर्विलास म्हणतात तो हाच. याच्या दुर्दैवाचं कारण आहे, त्याची गोमातेप्रति असलेली भक्ती. हा खरा गोभक्त आहे. गाईला चारा घातल्याशिवाय हा स्वतःच्या तोंडात घास घालत नाही. याचे इतर साथीदार दरोडा घालताना अंगाला एरंडेल तेल चोपडतात, ज्यामुळे कुणी त्यांना पकडलं तरी, त्यांना सुळ्ळकन निसटून जाता येतं. मात्र हा आरोपी तसं करत नाही. हा अंगाला गोमूत्र चोपडून कामगिरीवर जातो. म्हणूनच याचे साथीदार निसटून गेले आणि हा एकटा तेवढा हाती लागला. न्यायाधीश महोदय, गोमाता, गोमूत्र आदींवर अशी अढळ निष्ठा असलेल्या व्यक्तीला तुरुंगात टाकणे, खरंच कितपत योग्य राहील, याचा विचार न्यायालयाने करावा आणि या गोपुत्राची निर्दोष सुटका करावी, अशी मी माननीय न्यायालयाला विनंती करतो.
न्यायाधीश महोदय, ही निबर चेहऱ्याची, दगडासारख्या थिजलेल्या नजरेची आरोपी स्त्री देशभरातल्या सगळ्या राज्यांमधल्या अल्पवयीन मुलींची वेश्याव्यवसायासाठी तस्करी करते. गरीब घरातल्या वयात आलेल्या मुली शोधायच्या आणि त्यांना नोकरी, व्यवसाय, भरपूर कमाई वगैरेंची आमिषं दाखवून फूस लावायची आणि मोठमोठ्या शहरांतल्या कुंटणखान्यांत, डान्स बारमध्ये विकायचं, हा या बाईचा व्यवसाय आहे. न्यायाधीश महोदय, काही अत्यंत दरिद्री आईबाप तर स्वतः होऊनच आपल्या मुली पैशाच्या मोबदल्यात हिच्या हवाली करतात. ही बाई समाजातल्या अनेक लब्धप्रतिष्ठितांना मुली पुरवण्याचं कामही करते.

पण न्यायाधीश महोदय, असं असूनही या बाईची देवभक्ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं वेगवेगळ्या राज्यांची भटकंती करीत असताना ही बाई, त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक धार्मिक स्थळाला भेट देण्यास चुकत नाही. काशी, मथुरा, बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ, वैष्णोदेवी यांसारखी उत्तरेतली धर्मस्थळं, दक्षिणेतली तिरुपती, मीनाक्षी, मदुराई वगैरेसारखी मंदिरं, सगळ्या सगळ्या ठिकाणी तिनं भेट दिलेली आहे. चारी धामांची, अष्टविनायकांची, ज्योतिर्लिंगांची यात्रा तिनं अनेकदा केली आहे. एरवी दगडी भासणाऱ्या तिच्या नजरेत, न्यायाधीश महोदय, अशा पावन स्थळी भेट देताना अष्टसात्त्विक भाव दाटून येतात. तिचे अपराध कितीही जघन्य असले, तरी तिनं केलेल्या पुण्यसंचयाकडे डोळेझाक करता येणार नाही. म्हणून न्यायाधीश महोदय, या साध्वीसमान स्त्रीस निर्दोष मुक्त करणे, हाच खरा न्याय होईल.

न्यायाधीश महोदय, आरोपीच्या पिंजऱ्यात चेहऱ्यावर निर्विकार भाव धारण करून उभे असलेले हे तुकतुकीत अंगकांतीचे तुंदिलतनू गृहस्थ आपल्या देशातील एक फार मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्या विमानवाहतुकीच्या, मद्यनिर्मितीच्या, वगैरे भरपूर कंपन्या आहेत. त्यांच्या विमानांमधून कित्येक लोकांनी उड्डाणे केली आहेत, शिवाय त्यांच्या विविध मद्यांमुळे अनेकांनी विमानप्रवास न करताही उड्डाणे केली आहेत. अनेक देशांतल्या विविध उद्योगांमध्ये त्यांची भागीदारी किंवा भांडवली गुंतवणूक आहे. हे गृहस्थ रसिक, शौकीन आहेत. शिवाय ते अत्यंत प्रेमळही आहेत, न्यायाधीश महोदय. त्यांच्या कंपनीच्या दरवर्षी निघणाऱ्या कॅलेंडरमधल्या नर्मवस्त्रांकित तरुणी पाहिल्यास त्यांचा प्रेमळपणा सहज लक्षात येतो. या सद््गृहस्थांवर अनेक बँकांची कोट्यवधी रुपयांची कर्जे बुडवल्याचा आरोप केला गेला आहे. ही कर्जे बुडवून ते देशाबाहेर परागंदा होण्याच्या बेतात असतानाच, त्यांना अटक करण्यात आली न्यायाधीश महोदय.

न्यायाधीश महोदय, एवढ्या मोठ्या कंपन्या चालवायच्या, लाखोंना रोजगार द्यायचा, लाखोंना सुख द्यायचं, शिवाय आपला प्रपंचही सांभाळायचा म्हणजे, कर्जं काढावीच लागतात याविषयी आपलंही दुमत होणार नाही, अशी माझी खात्री आहे. झाला थोडा उशीर कर्ज फेडायला, किंवा बुडाले बँकांचे काही कोटी, तर असं काय मोठं नुकसान होणार आहे? मात्र त्यासाठी या आरोपीला निर्दोष सोडून द्यावं, असं मी मुळीच म्हणणार नाही न्यायाधीश महोदय. अजिबात नाही. मात्र त्यांना निर्दोष का सोडलं पाहिजे, यासाठी माझ्याकडे एक अगदी निर्विवाद, निर्भेळ कारण आहे. हे गृहस्थ पराकोटीचे देशभक्त आहेत. त्यांना अटक केल्या दिवसापासून त्यांनी सतत ‘भारतमाता की जय’ असा घोष चालवला आहे. आणि म्हणून न्यायाधीश महोदय, माननीय न्यायालयानं आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून या देशभक्त सद् गृहस्थांची तात्काळ निर्दोष सुटका करावी, अशी माझी नम्र विनंती आहे. न्यायाधीश महोदय, न्यायाधीश महोदय…
गजू तायडे
gajootayde@gmail.com