आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजारविमर्श (गजू तायडे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑफिसातून थकूनभागून जंगूराव घरी आले. बघतात काय, तर
सौ. जंगूराव हॉलमध्ये फतकल मारून अवतीभवती पडलेल्या काही नव्याकोऱ्या भांड्यांना प्रेमभरे कुरवाळत बसलेल्या. चेहऱ्यावर काहीतरी खास गवसल्यासारखं हसू.
“हे काय? दुकान काढतेयस की काय भांड्यांचं?” धप्पकन सोफ्यावर बसत जंगूरावांनी विचारलं.
“छे हो, बोहारणीकडनं घेतलीत ही भांडी. माळ्यावरच्या त्या मोठ्ठ्या गाठोड्यात कितीतरी जुने कपडे पडले होते, कधीपासून. म्हटलं आज लावूनच टाकावी विल्हेवाट.”
“बरं केलंस.”
“हा बघा चिनी मातीचा वाडगा. छान आहे ना? शिक्रण-बिक्रण करायला चांगला आहे. फक्त दोन साड्यांवर मिळाला. आणि तुमच्या लग्नाच्या सूटवर हे दूध तापवण्याचं पातेलं मिळालं.”
“छानच.”
“आणि हे बघा काय?” सौ. जंगूरावांनी वरच्या बाजूला एक हँडल असलेला, एखाद्या विचित्र यंत्रासारखा दिसणारा प्रकार हाती धरला.
“काय आहे ते?” जंगूराव.
“डो-नीडर मशीन?”
“डो-नीडर? म्हणजे?”
“म्हणजे कणीक मळण्याचं यंत्र. चार परकरांवर मागत होते मी; पण मेली बोहारीण ऐकेचना. मग तुमची ती खाकी हाफ पँट दिली वरतून आणखी.”
“काय?” जंगूराव ओरडले.“तू माझी खाकी हाफ पँट बोहारणीला देऊन टाकलीस? आता मी विजयादशमीला काय घालणार?”
“विटली होती हो ती पुरती. शिवाय आता कद्धी-कद्धी तुम्हाला गरज पडणार नाही, त्या हाफ पँटची.”
“म्हणजे काय? तुला माहित्येय, मी किती एकनिष्ठ स्वयंसेवक आहे ते. आता ऑफिस, संसार वगैरेच्या व्यापात नाही जमत म्हणा पूर्वीसारखं नेहमीनेहमी शाखेत जाणं, पण दर विजयादशमीच्या संचलनात जाण्याचा माझा नेम आहे. माहित्येयना तुला?”
“मग जा की. रोखलंय कुणी तुम्हाला?”
“हाफ पँट न घालता? तसाच?”
“शीः! काय हा चावटपणा!”
“त्यात कसला आलाय चावटपणा? शिस्तबद्ध स्वयंसेवकाला प्रॉपर गणवेश नको? छ्याः! आता पुन्हा नवी हाफ पँट शिवून घेणं आलं!”
“आज टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या नाहीत वाटतं तुम्ही.”
“आम्ही ऑफिसात कामं करायला जात असतो. टीव्ही पाहायला नव्हे!” जंगूराव चिरडीस आले.
“तरीच! अहो, गणवेश बदलल्याची बातमी आली आहे आज. ब्रेकिंग न्यूज! सगळे चॅनेलवाले तेच दाखवताहेत.”
“गणवेश बदलला? काय सांगतेस काय?”
“तर? आता खाकी हाफ पँटऐवजी दुसऱ्या रंगाची फुल पँट असणार आहे.”
“कोणत्या रंगाची?”
“ते अजून नक्की ठरलं नसावं बहुतेक. कारण एक प्रवक्ता ‘ब्राउन’ म्हणत होता, दुसरा ‘तपकिरी’. तिसरा एक जण ‘चॉकलेटी’ म्हणत होता. पण हाफ पँट बासनात गेली, हे नक्की.”
“अरेरे…” हाफ पँटीच्या गतकालातील सुखद आठवणींनी जंगूराव स्मृतीकातर, हळवे झाले. “चालायचंच. कालाय तस्मै नमः. तशी बऱ्याच दिवसांची स्वयंसेवकांची मागणी होती म्हणा, पँट लांब करण्याची.”
“आता बघा तरुण पिढी कशी रांगा लावेल शाखाशाखांवर.”
“हो. प्रत्येक काळ्या ढगाला सोनेरी किनार असतेच.”
“आणि हा चॉपिंग बोर्ड!”
“आँ?”
“चॉपिंग बोर्ड!” सौ. जंगूरावांनी एक प्लॅस्टिकचं फळकूट जंगूरावांच्या नाकापुढं धरलं. “आणखी एक फारच जुनी खाकी हाफ पँट होती, गाठोड्यात. वाळवी लागलेली. ती हाफ पँट आणि वर एक शर्ट देऊन मिळाला हा.”
“अगं तेवढी ती एक हाफ पँट तरी राहू द्यायचीस! माझ्या आजोबांची आठवण होती, ती. १९२४मध्ये स्वयंसेवक असताना घालत असत, ते ती हाफ पँट. नव्वद वर्षांपूर्वीचं वस्त्र आहे ते. ‘अँटिक व्हॅल्यू’ आहे तिला. आणि तू ती अशी भाजीपाला कापण्याच्या फळकुटाच्या मोबदल्यात देऊन टाकलीस?”
“अँटिक व्हॅल्यू म्हणे! भोकं-भोकं पडली होती सगळीकडे. शिवाय जीर्ण होऊन तुकडे पडायला आले होते तिचे.”
“म्हणून काय झालं? काळाचा ऐतिहासिक दस्तऐवज असतात, अशा गोष्टी. लंडनच्या क्रिस्तीजनं किंवा सदबीजनं, हसतहसत घेतली असती ती लिलावासाठी.”
“तुमच्या आजोबांची हाफ पँट म्हणजे काय मोदींचा स्वनाम लिहिलेला सूट आहे, लिलावात विकायला? आता गुपचूपच हा गिळा आणि नाक्यावरून भाजी आणून द्या मला.”
बोहारणीकडून मिळालेल्या हँडलच्या पातेल्यात बनवलेला चहा पिऊन, जंगूराव पिशवी घेऊन बाहेर पडले.
खाली सोसायटीच्या आवारात त्यांना शेजारचे केसाळ दंड्याभाऊ भेटले. नाक, डोळे, कपाळ वगैरे विशिष्ट क्षेत्रे सोडल्यास, त्यांच्या अंगभर केसांचं दाट जंगल होतं. केसाळ दंड्याभाऊ लहानपणापासूनच एकनिष्ठ स्वयंसेवक होते. ते नियमितपणे शाखेत जायचे. आता त्यांचे दोंद सुटून लवथवती विक्राळा झाले असले, तरी ऐन तरुणपणी ते अगदी व्यायामखोर होते. लाठी फिरवण्याच्या खेळात ते नामांकित होते. कपाळावरची अजूनही पुरती न दबलेली चार-दोन टेंगळं याचा पुरावा देत होती.
दंड्याभाऊ हाती एक पाच-सहा फुटाचा, सव्वा इंच व्यासाचा, प्लंबर लोक वापरतात, तसा पाइप घेऊन स्वतःभोवती गरागरा फिरवत होते.
“हे काय दंड्याभाऊ? तो पाइप कशाला फिरवताहात?”जंगूरावांनी नवल वाटून विचारलं.
“पाइप? पाइप नव्हे, दंड! हा दंड आहे.”
“पण दंड लाकडाचा, की बांबूचा, की वेताचा, की कसलासा असतो ना?”
“जंगूराव, जग बदलतंय. तुम्ही पण जगासोबत बदलायला शिका. पोलिसांच्या हातातल्या लाठ्या बघितल्यात का हल्ली कशा असतात?”
“कशा?”
“पारदर्शक प्लॅस्टिकच्या. मग आपणच का म्हणून जुन्या पद्धतीच्या लाठ्या वापरायच्या? आता गणवेश बदलला तशा इतर अ‍ॅक्सेसरीज पण बदलायला नको? मी नागपूरला याबद्दलचं एक निवेदन पाठवलंय. प्लॅस्टिकचे दंड वापरले जावेत, अशी मागणी केली आहे. आणि ती स्वीकारली जाईल, अशी माझी पूर्ण खात्रीआहे. आणि म्हणूनच सध्या या पाइपावर सराव करतो आहे. बाकी या नवीन प्रकारच्या दंडाचं एक छान आहे हां. हा फिरवताना चुकून कपाळावर आपटला तरी टेंगूळ येत नाही.”
“हे छानच. सेफ्टी फर्स्ट! एकूणच तुम्हाला गणवेशातला बदल आवडलेला दिसतोय.”
“तर काय हो! खरं तर कित्येक वर्षांपूर्वीच हा बदल व्हायला हवा होता. खूप फायदा झाला असता त्यामुळे.”
“खराय. एव्हाना कितीतरी तरुण स्वयंसेवकांची भरती झाली असती फुल पँटीमुळे. त्या हाफ पँटीमुळे कितीतरी पोरं काचकूच करायची शाखेवर येण्यात.”
“ते तर झालंच, पण माझा स्वतःचाही खूप फायदा झाला असता. चिक्कार पैसे वाचले असते माझे.”
“हाफ पँटीची फुल पँट झाल्यानं तुमचे पैसे वाचले असते? ते कसे काय बुवा?”
“आता कसं सांगू तुम्हाला? जरासं प्रायव्हेट आहे हो ते.” केसाळ दंड्याभाऊंचे केसांआड दडलेले गाल आरक्त झाले आहेत, असा जंगूरावांना भास झाला.
“असू देत. सांगण्यासारखं नसेल तर राहू देत.”
“नाही. खरा स्वयंसेवक सत्य सांगायला भीत नाही. मी हे सांगितलंच पाहिजे.” दंड्याभाऊ ठामपणे म्हणाले, “अहो, एवढी वर्षं दर पंधरा दिवसांनी पायांना वॅक्सिंग करून घेण्याचा खर्च वाचला असता ना माझा!”
gajootayde@gmail.com
बातम्या आणखी आहेत...