आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंगराोबाच्या वृत्ताची कहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एेका डोंगरोबा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे. सुवर्णाची कमळे, देवाची देवळे.
आटपाट नगर होतं. तिथं एक राजपुत्र होता. राजपुत्राला माता होती. सगळे तिला राजमाता म्हणीत असत. मातेला चिंता लेकराची, जशी देवाला भक्ताची. राजपुत्राचं दक्षिणांग कुठेही स्थिर होईना. ना राजकारणात, ना घरात, ना दारात, ना कशात. राजपुत्र लग्नाचे नावही घेत नसे. त्यामुळेही राजमाता सदा चिंतातुर असत.
राजपुत्राच्या घराण्यात पिढ्यान‌्पिढ्या सत्ता होती. राजपुत्राचे प्रपितामह, पितामह, पिता, सगळ्यांनी नगरावर राज्य केले होते. राजमातेनेही परंपरेस अनुसरीत राज्य करावे, अशी दरबाऱ्यांची इच्छा. पण मुळात परदेशी वंशाची असल्याने राजमाता सिंहासनावर बसल्यास आपण केशवपन करू, असे एका जहाल विरोधक बाईने घोषित केले. दरबाऱ्यांचा हिरमोड झाला. निरुपायाने राजमातेने आपल्या विश्वासातल्या एका वृद्ध दरबाऱ्याची सिंहासनावर प्रमुख-मंत्री म्हणून स्थापना केली. तो राजमातेच्या वतीने राज्यशकट चालवू लागला.
पहिली पाच वरुषे आनंदाने गेली. पुढची पाच वरुषे मात्र सत्ता उताराला लागली. वृद्ध प्रमुख-मंत्री आणखीच वृद्ध झाले, दिसंदिस मौन राहू लागले. मंत्री भ्रष्टाचार करू लागले, शेतकरी आत्महत्या करू लागले. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात उरला नाही. हा सर्व काळ राजपुत्र बाह्या सरसावत इकडे-तिकडे फिरू लागला, आपल्याच प्रमुख-मंत्र्याने काढलेल्या आदेशांचे कागद फाडू लागला, गरीब शेतकऱ्यांच्या घरात जाऊन जेवू लागला. अन्नाला आधीच महाग असलेले शेतकरी टेकीला आले.
तशातच एका सत्तातुर नरेशाचा उदय झाला. हा नरेश मुळात एका लहानशा संस्थानचा राजा. त्याला आता आटपाट नगराचा नरेश होण्याची वासना झाली. त्याला एका सनातनी मठाचा मोठा पाठिंबा. मठ कट्टर लोकांचा. मठाचा राजमातेला आणि तिच्या अनुयायांना तीव्र विरोध. मठाधिपतीनं हुकूम सोडला, ‘करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा.’ नगरातले, परदेशातले सगळे शेठ-शाहुकार गोळा करा. त्यांच्याकडून मोठी धनसंपत्ती जमवा, सर्वत्र दवंड्या पिटा, रामराज्याची भुलावणी द्या आणि छोट्या नरेशाला मोठा नरेश बनवा. धर्माचे रक्षण करा. तरच धर्म तुमचे रक्षण करील.’
पुढची दोन वरुषे छोट्या नरेशाने नगरभर यात्रा काढल्या, जत्रा भरवल्या, मेळे भरवले, खेळे भरवले. राजमाता आणि दरबारी आपापल्या महालातून सारे काही निमूट बघत होते. नरेशाचा वाऱ्याच्या वेगाने धावणारा वारू आवरणे, त्यांच्या हातात राहिले नव्हते.
अखेर व्हायचे तेच झाले. वैशाखातील एके दिवशी छोटा नरेश मोठा नरेश बनला. घराण्याची सत्ता गेली. राजमातेच्या आणि राजपुत्राच्या मनाची प्रचंड घालमेल झाली. काळजास चैन पडेना, डोळ्यास डोळा लागेना.
इकडे नरेशानं आपले मंत्री निवडले. मंत्र्यांमध्ये आणि दरबाऱ्या-मानकऱ्यांमध्ये मठाच्या अनुयायांचा मोठा भरणा होता. पाहता पाहता दिवस सरले, महिने उलटले. रामराज्याची चाहूल प्रजाजनांना लागेना. नरेशाने परराष्ट्रांना भेटी देण्याचा
सपाटा लावला. हा देश झाला, की तो. तो देश झाला की हा. एकामागून एका देशांना नरेश भेटी देऊ लागला.
तिथे जाऊन स्थायिक झालेल्या मूळच्या आटपाट नगराच्या वासियांना आपल्या मिठ्ठास वाणीने भुलवू लागला. मधल्या काळात मठानुयायी मंत्री-दरबारी आपल्या विदूषकी बोलण्याने प्रजाजनांचे मनोरंजन करीत, त्यामुळे प्रजाजनांना तात्पुरता आपल्या दु:खीकष्टी जीवनाचा विसर पडू लागला. पण मनोरंजनाचा समय संपताच प्रजाजन पुन्हा कष्टी होऊन बसत.
आणि अशातच नरेशाच्या वतीने नगरात दवंडी पिटली गेली- ‘ऐका हो ऐका! आजपासून नगरातील समस्त शेतकऱ्यांच्या जमिनी नरेशांना हव्या तेव्हा, हव्या त्या किमतीला राज्याच्या मालकीच्या केल्या जातील हो! या निर्णयावर कोणताही उजर चालणार नाही किंवा कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही हो!’
शेतकरी धास्तावले. आधीच अवर्षण, अवकाळी पाऊस, गारपीट, नापिकीने हैराण झालेले शेतकरी पटापटा जीव देऊ लागले. नगरभर खळबळ माजली. या आदेशाला जागोजागी विरोध होऊ लागले. या अन्यायाविरोधात प्रजाजन मेळे भरवू लागले, संताप प्रकट करू लागले. राजमाता, स्वतः राजपुत्र आणि राजपुत्राचे मरगळ आलेले दरबारी खडबडून जागे झाले. अनायासे त्यांना आपले तेज दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली.
नरेशाने नव्या कायद्यावर चर्चा करण्यासाठी, तो लागू करण्यासाठी लवकरच दरबार भरवण्याची घोषणा केली. राजमाता राजपुत्राकडे आली आणि म्हणाली, ‘बाळा बाळा, दरबारी जा. कायद्याला विरोध कर.’
‘विरोध कसा करू आई? माझी गात्रे शिणली आहेत, तोंडून आवाज फुटत नाही. सत्तेच्या प्राणवायूच्या अभावाने माझी घुसमट झाली आहे.’
राजमाता हताश होऊन निघून गेली. राजपुत्र मंचकी पहुडला. त्याला नीज येईना. झुंजूमुंजू होता-होता त्याला पेंग येऊ लागली आणि एक धीरगंभीर आवाज त्याचे कानी आला.
‘ऊठ, मरगळ झटक. कामाला लाग.’
राजपुत्राने खाडकन डोळे उघडले. हे कोण बोलले त्याचा तो कानोसा घेऊ लागला.
‘तू- तू कोण?’ राजपुत्र कसाबसा बोलला.
उघड्या खिडकीतून एक प्रकाशपुंज आत आला होता. राजपुत्राचे डोळे दिपले. त्या प्रकाशपुंजातून पुन्हा आवाज आला, ‘मी डोंगरोबा! डोंगराचा देव! राजपुत्रा, तुझ्या लोकांमधल्या सतत संचारामुळे अतिपरिचयादवज्ञा झाली आहे. तुला काही दिवस अज्ञातवासात जायला हवे. पुढचे छप्पन्न दिवस अज्ञातवासात घालव. त्याने तुझ्यात नव्या ऊर्जेचा संचार होईल. मात्र, तू या काळात कुठे आहेस, याचा पत्ता कुणालाही अजिबात लागता कामा नये. हे शक्य असेल, तरच हे व्रत कर. नाहीतर उतशील, मातशील, घेतला वसा टाकशील.’
‘नाही डोंगरोबा. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.’ राजपुत्राने त्या प्रकाशपुंजाला मनोभावे नमन केले, आणि प्रकाशपुंज अंतर्धान पावला.
निश्चय केल्याप्रमाणे राजपुत्र अज्ञातवासात गेला. नगरात तर्ककुतर्कांना उधाण आले. राजपुत्राचा ठावाठिकाणा लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; पण जिथे राजमातेलाच पत्ता ठावकी नव्हता, तेव्हा इतरांस तो कसा समजणार?

छप्पन्न दिवस सरले आणि राजपुत्र नगरात परतला. आता तेजःपुंज दिसणाऱ्या अशा त्या राजपुत्राने शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आणि नरेशाच्या दरबारात अत्यंत ओजस्वी वक्तृत्वाचे प्रदर्शन केले.
नंतर आपल्या व्रताचे पारणे फेडायला म्हणून राजपुत्राने डोंगरोबाच्या डोंगरातल्या देवळापर्यंत पदयात्रा करून डोंगरोबास कृतज्ञतापूर्वक नमन केले.
डोंगरोबा राजपुत्रास प्रसन्न झाला तसा तो ही कहाणी श्रवण-वाचन करणारांसही होवो. अशी ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

gajootayde@gmail.com