आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवीलीलामृत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जंगूरावांना बर्‍याच दिवसांपासून तसं अस्वस्थ वाटत होतंच, पण अलीकडे मात्र त्यांना आपली खूपच घुसमट, कोंडी वगैरे होतंय, असं तीव्रतेनं जाणवायला लागलं होतं. जंगूराव मध्यमवर्गीय आणि मध्यममार्गी. ‘आपण भले, आपलं काम भलं’, ‘कुणाच्या अध्यात ना मध्यात’ अशा प्रवृत्तीचे. मात्र, ते संवेदनशील नव्हते असं मात्र नाही. भवतालच्या कितीतरी गोष्टी त्यांना प्रचंड उद्विग्न करीत. समाजात वाढत चाललेला गलबला, सणवार-उत्सवांना आलेलं कल्लोळी बाजारू स्वरूप, ब्रह्मांड व्यापूनही दशांगुळे उरलेला भ्रष्टाचार, हिडीस राजकारण आणि त्याहून हिडीस निवडणुकांचा प्रचार, दलितांवरचे-महिलांवरचे अत्याचार, टीव्ही वाहिन्यांवर अष्टौप्रहर घातला जाणारा मालिकांचा, कॉमेडी शोजचा रटाळ रतीब, अशा एक ना दोन, शेकडो गोष्टींनी जंगूराव पुरते गांजून गेले होते.

काय करावं ते जंगूरावांना कळत नव्हतं. शिंक येतेय-येतेय असं वाटत राहणं, पण ती येत नसल्यावर जसं ‘होपलेस फीलिंग’ येत राहतं, तसं त्यांना झालं होतं. हा असह्य कोंडमारा कुणासोबत शेअर करणंही त्यांना शक्य नव्हतं. बायको स्वैपाकपाण्याखेरीज मराठी मालिकांमध्ये गढलेली आणि मुलामुलींशी संवाद बेतास बातच. कारण दोघंही सतत आपापल्या मोबाइलवर ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ नाहीतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’मध्ये दंग!

जंगूराव चांगले वाचक होते, पण लेखक किंवा कवी नव्हते, नाहीतर त्यांनी लिहिण्यातून स्वतःला व्यक्त केलं असतं. पोरांच्या तोंडून वारंवार सोशल मीडियाचं कौतुक ऐकून त्यांनी एकदा हिंमत करून (स्वतःच्या खर्‍या फोटोसह आणि नावासह) फेसबुक अकाउंटही उघडला होता. दोन-चार ग्रुप्सवर ते मेंबरही झाले होते. पण त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे त्यांना सगळ्या ग्रुप्सच्या अ‍ॅडमिन्सनी हाकलून लावल्यानं हिरमुसून जंगूरावांनी फेसबुकचा नादच सोडून दिला होता.
बरेचदा जंगूरावांना घुसमट असह्य होऊन खच्चून ओरडावंसं वाटे- ‘आक्रोश’मधल्या ओम पुरीसारखं! पण जात्याच मवाळ असल्यानं त्यांना तेही शक्य होत नव्हतं. नाही म्हणायला, एका रात्री ते झोपेतच मोठ्यानं ओरडले होते, ‘पडलं असेल एखादं वाईट स्वप्न-बिप्न, गॅसेस झाल्यानं होतं असं’ असा विचार करून त्यानंतर बायकोनं रात्रीच्या जेवणात जंगूरावांना पावटा, राजमा, मुळा वगैरे गॅसवर्धक पदार्थ देणं बंद केलं होतं. तशीही जंगूरावांची अन्नावरची वासना उडालीच होती आणि मुळातच सडपातळ असणारे ते दिवसेंदिवस अधिकाधिक लुकडे होऊ लागले होते.
आणि अशातच त्यांची अचानक आचार्य शिव्यानंदांशी गाठ पडली.
त्याचं असं झालं - दिवाळी झाल्यावर चार-पाच दिवस आपल्या कोकणातल्या आडगावी सहकुटुंब जाऊन राहण्याचा जंगूरावांचा नेम असे. गेली दोन-चार वर्षे मात्र ते एकटेच जात. (कारण गावातल्या लोडशेडिंगमुळे बायकोला टीव्ही पाहायला मिळत नसे आणि मुलामुलीच्या मोबाइलला रेंज मिळत नसे.)

या दिवाळीतही नित्याप्रमाणे जंगूराव गावी गेले. एका संध्याकाळी खिन्न मनानं ते समुद्रकिनार्‍यावर फिरत होते. फिरता फिरता ते किनार्‍याकिनार्‍यानं बरेच दूरवर गेले. काळोख दाटू लागला होता. तशात दूरवर एका माडाच्या वाडीत त्यांना एक मिणमिणता दिवा दिसला. ते कुतूहलानं पुढे गेले. एका लहानशा कुटीसमोर एक वयस्क तेजःपुंज व्यक्ती डोळे मिटून ध्यानस्थ बसलेली होती. तुंदिलतनू, तुकतुकीत अंगकांती, गोबरे गुलाबी गाल. डोक्याला विशाल टक्कल आणि दोन हात लांब भरघोस शुभ्र दाढी. ‘फेंगशुई’तल्या ‘लाफिंग बुद्धा’ला लांबलचक दाढी चिकटवल्यावर तो जसा दिसेल तसे त्या वृद्धाचे रूप होते.

त्या तपस्व्याला पाहून जंगूरावांना अगदी उदात्त-उदात्त फील झालं, आपण जीएंच्या कथेत घुसल्यासारखंच त्यांना वाटलं आणि त्यांनी उचंबळून त्या वृद्धाच्या पावलांना स्पर्श केला. वृद्धानं डोळे उघडले आणि मंद स्मित करून तो म्हणाला, “ये बाळा, बस. तुला नियतीनंच या शिव्यानंदाकडे आणलं आहे. तुझ्या अंतर्मनात काहीतरी खुपतंय आणि तुला ते सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. खरं ना?”

जंगूरावांनी भडाभडा आपली घुसमट शिव्यानंदांकडे व्यक्त केली. त्यांना जरासं मोकळं-मोकळं वाटू लागलं. एक आश्वासक कटाक्ष टाकून शिव्यानंद म्हणाले, “हात्त्याच्या! एवढंच ना? तू शिव्या देतोस की नाही कधी?”
“न... नाही” जंगूराव म्हणाले. आजवरच्या आयुष्यात त्यांनी एकदा ‘साला’ आणि तीनदा ‘हलकट’ इतक्याच शिव्या दिल्या होत्या, आणि त्या दिल्यावर पश्चात्ताप पावून, एक वेळच्या जेवणाचा त्याग करून प्रायश्चित्तही घेतलं होतं. ‘च’, ‘भ’, ‘झ’, ‘फ’च्या बाराखडीतल्या अनेक शिव्या त्यांना ऐकून ठाऊक असल्या तरी त्या देण्याची कल्पनाही त्यांना कधी शिवली नव्हती.
“हं...!! तुझ्या समस्येचं तेच कारण आहे, बाळा. अरे तुझ्यासारखी भीरू माणसं रस्त्यावर उतरून काही करू शकत नसली तरी तोंड वापरू शकतात. जी भडास तुझ्या मनात साचत चालली आहे, तिचं रेचन करण्याचा एकमेव उपाय म्हणजे शिव्या घालणे!”
“प...पण महाराज, असं कुणाला शिव्या घातल्या तर मारामारी नाही का होणार?”
“बाळा, (सिंधुताई सपकाळांनंतर सर्वांना ‘बाळ’ म्हणणारे शिव्यानंदच असावेत.) विशिष्ट व्यक्तीला नाही रे शिव्या द्यायच्या. मोघम, कुणालाही लक्ष्य न करता फक्त खच्चून जनरल शिव्या घालायच्या. मोठ्ठ्यानं, बेंबीच्या देठापासून! हवं तर कुणी ऐकू नये म्हणून एखाद्या निर्मनुष्य माळावर वगैरे जाऊन द्यायच्या. शिमग्यात शिव्या देण्याची उदात्त प्रथा उगाच नव्हती रुळली. गेले ते दिवस!!” सुस्कारून आचार्य म्हणाले.

यानंतर आचार्य शिव्यानंदांनी जंगूरावांना ‘शिव्या’ या विषयावर एक प्रदीर्घ प्रवचन दिलं. वेगवेगळ्या निकट-नात्यांमधील लैंगिक स्वैराचार व्यक्त करणार्‍या शिव्या, पातिव्रत्याविषयी, पितृत्वाविषयी संदेह उत्पन्न करणार्‍या शिव्या, शिव्यांमधील व्याकरणाचे महत्त्व, शिव्यांच्या उच्चारणात ‘स्पीच अ‍ँड व्हॉइस कल्चर’चे स्थान, आदी अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत त्यांनी जंगूरावांच्या मनी शिवीमाहात्म्य ठसवले.

जंगूराव गावाहून परतले तेव्हा आमूलाग्र बदललेले होते. ‘मवाळ जंगूराव’ थोड्याच काळात ‘शिवराळ जंगूराव’ म्हणून ख्याती मिळवते झाले. आचार्य शिव्यानंदांचा सल्ला पूर्णपणे कृतीत उतरवल्यानं त्यांना प्रचंड मानसिक शांती लाभली. बायको, मुलामुलीच्या, नातेवाइकांच्या आणि शेजार्‍यांच्या आदरास ते पात्र झाले. ऑफिसात त्यांचा बॉसही त्यांना वचकून राहू लागला. त्यांच्या शरीरानेही बाळसे धरले.

अशा प्रकारे जंगूरावांना जसे सौख्य-समाधान प्राप्त झाले तसे तुम्हा वाचकांनाही प्राप्त होवो, अशी मनोकामना करीत आचार्य शिव्यानंदकृत ‘शिवीलीलामृत’या स्तोत्राने या लेखाची मी सांगता करतो.
शिवी आत्म्याचा हुंकारू।
शिवी माजवि हाहाकारू।
विषधराचा फुत्कारू। शिवी माउली॥
शिवी सृष्टीचा उद्गारू।
शिवी निर्गुण निराकारू।
उच्चकोटीचा संस्कारू। शिवी माउली॥
शिवी शिवराळाचे शस्त्र।
शिवी अहिंसकाचे अस्त्र।
नागडियासी राजवस्त्र। शिवी माउली॥
शिवी प्रगल्भ आविष्कारू।
शिवी सृजनाचे आगारू।
वैखरिचा साक्षात्कारू। शिवी माउली॥
शिवी पराभूतांची आशा।
शिवी मुखदुबळ्यांची भाषा।
जणु कडाडणारा ताशा। शिवी माउली॥
शिवी रसरसलेली काया।
शिवी वाग्देवीची छाया।
ही भगवंताची माया। शिवी माउली॥
शिवी मदिरमधुर गोमटी।
शिवी ब्रह्म्याची पोरटी।
सौभाग्यकुंकु ललाटी। शिवी माउली॥
शिवी छान सुबक ठेंगणी।
शिवी लावण्याची खणी।
शारदीय मुकुटमणी। शिवी माउली॥
शिवी श्रीमंताचे तारू।
शिवी नसते कधि भिक्कारू।
बहरलेला कल्पतरू। शिवी माउली॥
शिवी मानावी तर शिवी।
शिवी जाणावी तर शिवी।
अन्यथा मिठास ओवी। शिवी माउली॥
gajootayde@gmail.com