आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कैफियत एका नवसैनिकाची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेली आठ-साडेआठ वर्षे उभा-आडवा-तिरपा-उंच-सखल महाराष्ट्र डोळ्यांत प्राण एकवटून,
‘निढळावरी कर ठेवुनी' वाट पाहतो आहे त्या बहुचर्चित 'ब्ल्यू प्रिंट'च्या सादरीकरणासाठी. त्यासाठी आता १० सप्टेंबर २०१४चा मुहूर्त जाहीर करण्यात आल्याचे कळते. उम्मीद पे अवघा महाराष्ट्र कायम है!


ह्या पार्श्वभूमीवर नुकतीच एका हाडाच्या, निष्ठावंत, तळमळीच्या वगैरे नवसैनिकाची कैफियत हाती लागली. ती वाचणे नक्कीच रोचक, उद््बोधक वगैरे ठरावे.

तव्या अटेंप्टमध्ये नुकताच बीकॉम पास होऊन नोकऱ्या धुंडाळत असलेलो आणि अचानक एल्गार झालेला! आमचे साहेब घुसमट झाल्यानं घर सोडून, खुल्ला चॅलेंज देऊन, बाहेर पडलेले. सहा मार्च दोन हजार सहाचा दिवस अजून क्लिअर आठवतो ना आपल्याला! तो शिवाजी पार्क, ती प्रचंड गर्दी आणि नव्या पक्षाची घोषणा! महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ लवकरच सादर करण्याचं साहेबांनी वचन दिलेलं. आशा पालवलेल्या. हृदयात साहेबांनी जाज्वल्य मराठी अस्मितेचं पुल्लिंग का स्फुल्लिंग म्हणतात ते चेतवलेलं. भगवा सोडून, चौरंगा हाती घेऊन धुंदीतच घरी आलेलो.
“ग्राज्वेट झालात, टवाळक्या सोडा न् कामाधंद्याला लागा आता!” आमचे भारतभूषण म्हंजे तीर्थरूप करवादलेले. रिटायरमेंटला अजून तीन वर्षं बाकी होती; तरी पोराला घाण्याला जुंपण्याची घाई झालेली. ह्या जनरेशनचा प्रॉब्लेमच आहे. मायोपिक् सगळे. डोळ्यांना मायनस् पंध्रा नंबरचे चष्मे! दूरवरचं दिसणार कसं? नवनिर्माण करायचं म्हटलं तर थोडा तरी टाइम द्यायला पाह्यजे का नको? एकदा नवनिर्माण झालं की मराठी तरुणांना ढीगभर नोकऱ्या होतील ना अ‍ॅव्हेलेबल!
सळसळत्या मराठी तरुण रक्ताला काय तरी स्कोप पाह्यजे म्हणून पक्षानं एकदम महत्त्वाची विकास आंदोलनं हाती घेतलेली. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना डांबर फासणं, भूमिपुत्रांची कामं हिसकावून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या भय्या लोकांना चोपणं, छटपूजावाल्यांना डोस देणं, वगैरे. (भय्या म्हटला की कुणीच सुटत नाय साहेबांच्या तावडीतून. इव्हन अमिताभ बच्चन का असेना!)
रेल्वे भरतीसाठी बाहेरून आलेल्या दोन-चार पोरांना तर आपणही ग्रुपनं जाऊन मस्त ठोकलेलं बॉस! शिवाय तो उधळलेला समोश्यांचा स्टॉल पाह्यला असेल ना तुम्ही टीव्हीवर? त्या समोसेवाल्याला मी, पक्या अन सुरेशनंच हाकल्लेलं! त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या चाळीत समोश्यांची पार्टीपण केलेली. (‘जब तक रहेगा समोसे में आलू; तब तक राज करेगा लालू’ ह्या घोषणेमुळे आमच्या पक्षाची समोश्यांवर जामच खुन्नस आहे.)
तिकडे लालू, नितीश, पासवान वगैरे भय्या नेत्यांनी जाम शंख केलेला साहेबांच्या नावानं. कुठं कुठं खटले भरले गेलेले. पण साहेब असल्या गोष्टींना भीक घालतील तर ना!
पक्षस्थापनेला दोन वर्षं होतात न होतात तोच राज्यात निवडणुका झालेल्या. खूप मराठी अ‍ॅक्टरलोकपण उतरलेले प्रचारात. आपणही एकदम जीव तोडून काम केलेलं! साहेबांनाही आवडलं असणार, कारण एकदा गाडीत बसताना त्यांनी माझ्याकडे पाहून हसत हात हलवलेला.
त्या निवडणुकीत पक्षाचे तेरा आमदार निवडून आलेले! शिवाय नाशिकमध्येही चौरंगा फडकलेला तो वेगळाच. निवडून आल्यावरही आमचे आमदारलोक अस्मिता नाय विसरले. हिंदीत शप्पत घेणाऱ्या एका आमदाराला तर त्यांनी स्ट्रेट कानफटवलेलाच! सरकारला मात्र अस्मिताच नसल्यानं आमच्या चार आमदारांना सस्पेंड केलेलं त्या भानगडीत. पण नंतर मांडवली झालेली.
काळ एकदम फास्ट गेलेला. आमचे भारतभूषण रिटायर होऊन आता ए. के हंगल झालेले. मला मात्र नोकरी मिळेना. तशात आमच्या मातोश्री माझ्या लग्नासाठी पोरी शोधू लागलेल्या. एकदा तिनंही केलेला ना घोळ! एक मुलगी दाखवलेली. तिला मी आणि मला ती पसंत पडलेलो. लग्न ऑल्मोस्ट फिक्स होतं. पण अचानक मुलगीवाल्यांकडून नकार आलेला. मी ‘नेव्ही’त आहे असा त्यांचा आधी गैरसमज झाला होता म्हणे. कारण ‘मुलगा काय करतो?’ ह्या प्रश्नावर मातोश्रींनी त्यांना ‘मुलगा नौसैनिक आहे’ असं सांगितलेलं! नंतर त्यांना खरं काय ते कळलेलं. जाम वैतागलेलो ना आपण!
ह्या घटनेनंतर तीर्थरूप आणि मातोश्री कायमचे गावी संगमनेरला निघून गेलेले. मला राहायला चाळीतलं घर आहे, पण आता नाय म्हटलं तरी दोन टायमाला नीट जेवणाचा जरा प्रॉब्लेमच झालेला ना! वय वाढल्यानं नोकरीचे अर्ज पण डायरेक्ट कचऱ्याच्या कुंडीत जाऊ लागलेले. मग आंदोलनं, दहीहंडी, गणपती, वगैरे पक्षकार्यांमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घेऊ लागलेलो. नायतरी दुसरा कामधंदा काय? वरच्या नेतेमंडळीमुळे खावटी-पिवटी परस्पर सुटते. शिवाय निष्ठेनं काम केलं तर साहेब अगदी आमदारकीचं नाही, तरी नगरसेवकपदाचं तिकीट, अ‍ॅटलिस्ट पक्षात छोटंमोठं पद तरी देतील असं कायम वाटतं. अजून आठ वर्षांनंतरही वाटतं!
सुरेश साला गद्दार निघाला! एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला लागलेला न् पाटण्याला गेलेला पोस्टिंगवर. पाटण्याला!!!! पक्यानं मागेच एक श्रीमंत पोरगी पटवलेली न् आता सासऱ्याच्या बिझनेसमध्ये पार्टनर बनलेला. कधी आपल्याला फारच कडकी आली तर पक्या करतो मदत अधूनमधून. पण आता पुरता बदल्लेला तो. एक टायमाला आपल्या काठीला काठी लावून टोलनाके फोडणारा हाच तो पक्या ह्यावर विश्वासच नाही बसत. बघावं तेव्हां आपल्याला डिवचत असतो भेंडी!
मागे पक्या बोल्लेला, “काय रे? हे तेलकट वडा न् चिकन सूप वगैरे पब्लिकमध्ये बोलणं शोभतं का तुझ्या साहेबांना?” आपण तडकलोच! ‘तुझ्या’ साहेबांना म्हणे! आपणही बोल्लो, “हे बघ पक्या, फालतू भंकसबाजी नको. तुला म्हाइतै का, काका म्हणजे साहेबांचे विठ्ठल! त्यांचे बडवे त्यांना आजारपणातही तेलकट वडे खाऊ घालायचे. पुरस्कृत वडे असल्यानं फुकटात मिळत असणार ना! मग आमच्या साहेबांनी विठ्ठलाला महागातलं चिकन सूप पाजलेलं, अन् तसं ते बोल्ले तर काय चुकलं?”
साहेबांना कुणी काही बोल्लं की आपल्याला फार खराब वाटतं. पब्लिक पण ना, कायतरी खुसपट काढतच असतं. कुणीतरी काल बोल्लं, “साहेब स्वतः उभे राहणार होते ना निवडणुकीत? मग आता का नाही म्हणतात?”
काय सांगायचं ह्या येड्यांना? अरे बाबांनो, साहेब बोल्ले ना, कायतरी जेनेरिक का जेनेटिक प्रॉब्लेम झालाय् म्हणून? मग? एखाद्याच्या प्रॉब्लेमचीपण कदर नाय तुम्हाला? अन् कुठून राहणार उभं? ह्या मतदारसंघातून राह्यले तर त्या मतदारसंघवाल्यांना वाईट वाटणार, अन् त्या मतदारसंघातून राह्यले तर ह्या मतदारसंघवाल्यांना खराब फील होणार! होल महाराष्ट्र त्यांचाच ना! शिवाय मुख्यमंत्री होण्यासाठी आधी लगेच निवडून नाय काय यावं लागत!
आणि आपल्या पब्लिकला पण ना, जरापण पेशन्स नाय्यैत. सारखं-सारखं आपलं ‘कुठाय् ब्ल्यू प्रिंट, कुठाय् ब्ल्यू प्रिंट’! वर त्या ब्ल्यू प्रिंटच्या नावानं ‘बीपी, बीपी’ म्हणत कसलेकसले फालतू जोक मारतात व्हाट्सअ‍ॅपवर, फेस्बुकावर अन् कुठंकुठं! एकजण तर बिलकूलच कुजकटासारखं बोल्लेला अगदी! म्हणला,“म्हाइतै तुमच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये काय असणाराय् ते! ‘खळ्ळ’ अन् ‘खट्याक्’ हेच दोन शब्द सारखे-सारखे रिपीट केलेले असणारैत!” आपली तर तडकलेलीच ते ऐकून, पण मराठी माणूस आहे म्हणून सोडून दिलेलं! अरे, एवढ्या मोठ्ठ्या राज्याच्या कंप्लीट विकासाची ब्ल्यू प्रिंट बनवायची म्हणजे सोपं काम आहे का? अभ्यास करावा लागतो त्याच्यासाठी! मागे साहेब गुजरातच्या दौऱ्यावर काय फक्त ढोकळा-फाफडा खायला न्हवते गेलेले!
साहेबांचं प्रत्येक गोष्टीत टायमिंग असतं. एकदम पर्फेक्ट टायमिंग! आता आठ
वर्षांच्या अथक अभ्यासानंतर बघाच कशी फस्क्लास ब्ल्यू प्रिंट येते ती! घोडामैदान जवळच आहे बॉस!!

gajootayde@gmail.com