आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gandhali Kadam's Artical On Vaious Shades Of Happiness

आनंदाचे तरंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालपर्यंत ज्या शाळेत मी विद्यार्थिनी होते, फुलपाखरासारखे स्वैर आयुष्य जगले होते, त्याच राजर्षी शाहू कन्या प्राथमिक विद्यालयात आता माझ्या चिमण्या विद्यार्थिनींची ताई झाले होते. शिकवण्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. लवकरच ही शाळा माझी आणि मी शाळेची कधी झाले हे कळलंच नाही. माझ्या चिमण्या बाहुल्या ‘मॅलम-मॅलम’ करत माझ्याभोवती किलबिल करत जमा होतात तेव्हा अगदी स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. परंतु हे सुख मला सहजासहजी नाही मिळालं. त्यासाठी मला कष्ट घ्यावे लागले. कारण पहिलीच्या वर्गात शिकवणा-या त्या मॅडमला त्या लेकरांची आई व्हावं लागतं. त्या चिमुकल्यांच्या मनात भीती असते. त्यांच्या मनातली ही भीती दूर करण्यासाठी शाळा म्हणजे त्यांचं दुसरं घरच आहे हे पटवून देण्यासाठी खूप कसरत करावी लागते. त्यांना बोलतं करण्यासाठी शब्दांची बाग फुलवावी लागते. गाणी, गप्पा, गोष्टी, नकला करून, त्यांना हसवून त्यांचा विश्वास जिंकावा लागतो, तेव्हा कुठे त्यांची किलबिल सुरू होते. हाच त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा असतो.
त्यांच्या मनातली भीती दूर झाल्यावरच त्या माझ्याजवळ यायला लागतात. काही विचारायला, काही सांगायला लागतात. त्यांच्या इवल्या हातांना धरून त्यांना अक्षराचं वळण शिकवणं, भिरभिरणा-या डोळ्यांना स्थिर ठेवून वाचायला शिकवणं सोपं जातं. काही दिवसांनीच माझ्या चिमण्या सुंदर, वळणदार अक्षरात शब्द लिहितात, वाचतात, गोष्ट सांगतात, स्पर्धेत भाग घेतात, तेव्हा स्वत:च्या कामाचा एवढा अभिमान वाटतो की बस्स. वाटतं की या जगात आपण सर्वात सुखी आहोत. या माझ्या चिमण्यांसाठी मी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवते, स्पर्धा घेते आणि स्पर्धा झाल्यानंतर बक्षीसही देते. मला वाटतं की त्यांचं बालपण सुखद आठवणींचा ठेवा व्हावं. आणि त्यात माझा खारीचा तरी वाटा असावा. शिक्षण म्हणजे अकारण लादलेलं ओझं वाटण्यापेक्षा आनंदोत्सव व्हावा. मात्र हे करण्यासाठी शिक्षकांना अपार कष्ट घ्यावे लागतात. पण हे सर्व मनापासून केल्यावर आपले विद्यार्थीही आपल्याला मनापासून दाद देतात. आणि मग आपले मनच आपल्याला आदर्श शिक्षक असा पुरस्कार देतं.