आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील एकमेव उदाहरण :
स्वातंत्र्यपूर्व काळात वाचनालयांनी स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्याचे तर स्वातंत्र्यानंतर समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सांगलीतील गांधी वाचनालयाची कहाणी काही औरच आहे. 1917 मध्ये सांगलीतील व्यापा-यांनी एकत्र येऊन व्यापारी मोफत वाचनालय सुरू केले. व्यापा-यांंनी एकत्र येऊन वाचनालय सुरू केल्याचे कदाचित राज्यातील हे एकमेव उदाहरण असेल.
गांधींनी बसवली कोनशिला :
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणा-या या वाचनालयाला स्वत:ची इमारत नव्हती. सांगलीच्या राजेसाहेबांकडून 750 रुपयांस जागा विकत घेऊन वाचनालयाला इमारत बांधण्याचे ठरले. 1920 मध्ये महात्मा गांधी महाराष्ट्राच्या दौ-यावर होते. त्यांच्या हस्ते 12 नोव्हेंबर 1920 रोजी वाचनालयाच्या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील एखाद्या वाचनालयाची कोनशिला बसवल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. तत्पूर्वी 1920 च्या फेब्रुवारी महिन्यात लो. टिळकांनीही या वाचनालयाला भेट दिली तो काळ स्वातंत्र्यलढ्याच्या विचाराने झपाटलेला होता. हे वाचनालय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे केंद्र बनले. त्यामुळे 1940 नंतर या वाचनालयाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
नवीन दुमजली इमारती, म. गांधींच्या वस्तूंचा संग्रह :
गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वाचनालयाच्या जागेत स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या स्मृती जोपासण्याचे ठरले. त्यासाठी नवीन इमारत बांधण्यात आली. त्यासाठी गोपाळदास शहा यांनी पुढाकार घेतला. वि. स. पागे, वसंतदादा पाटील यांनी निधी उभारण्यात महत्त्वाची मदत केली. पागे यांनी गांधी स्मारक निधीतून तर वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री निधीतून वाचनालयाला मदत केली. म्हणून वाचनालयाची दोन मजली टुमदार इमारत उभा राहिली. नव्या इमारतीत गेल्यानंतर वाचनालयाचे नाव गांधी वाचनालय असे करण्यात आले. या इमारतीत गांधीजींच्या अनेक वस्तू संग्रह स्वरुपात ठेवण्यात आल्या आहेत. सांगलीच्या भर व्यापारपेठेत उभारलेल्या या वाचनालयाचा लाभ नागरिकांना झालाच शिवाय व्यापाराच्या निमित्ताने बाहेरगावाहून येणा-या शेतकरी, हमाल यांना विचारांची दिशा देण्यातही या वाचनालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अनेक उपक्रमांचे आयोजन, 44,500 ग्रंथ, 1373 आजीव सभासदांचे वैचारिक व्यासपीठ :
गेल्या 95 वर्षांत या वाचनालयाने बदलाचे अनेक टप्पे पार केले. आज 44 हजार 500 ग्रंथ संपदा असलेल्या या वाचनालयाचे 1373 आजीव सभासद, 406 सर्वसाधारण सभासद तर 20 आश्रयदाते सभासद आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वैचारिक व्यासपीठ ठरलेले हे वाचनालय आजही वाचन चळवळ बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम राबवते. गांधी जयंतीला वाचनालयातर्फे 3 वर्षे वयाच्या मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्व गटातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात.
वाचन कट्टा, नवसाहित्यांच्या
प्रकाशनासाठी मोफत उपलब्ध :
नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी वाचनालयाने नवसाहित्याच्या प्रकाशनासाठी आपल्या वाचनालयाची दारे एक रुपयाचा मोबदला न घेता कायम उघडी ठेवली. वर्धापनदिनाला सेवाभावी वृत्तीने समाजसेवेचे काम करणा-या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपराही वाचनालयाने जोपासली आहे. एखादे पुस्तक, लेखक किंवा ज्वलंत सामाजिक विषय यावर चर्चा घडवून आणण्यासाठी शनिवार कट्टा या नावाने वाचन कट्टा सुरू केला आहे. राज्य ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाचेही वाचनालयाने यशस्वी आयोजन केले आहे. विद्यमान अध्यक्ष दिलीप नेर्लीकर आणि ग्रंथपाल दिगंबर सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून ग्रंथालयाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे. सर्व 44 हजार 500 ग्रंथांचे बारकोडिंग करण्याचे काम सुरू आहे. माहितीचा सागर असलेली इंटरनेट सुविधा आपल्या सभासदांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
भविष्यातील उपक्रम
०विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका
०वि. स. पागे संशोधन विभाग
०चिल्ड्रन्स प्ले कॉर्नर
०बहुउद्देशीय सभागृह
०महात्मा गांधींचे स्मारक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.