आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोटली रेअर! (लेन्स आय)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘इंडिया नॅचरल वॉच’ नावाची वेबसाइट आहे. तिथे भारतातले सर्वात उत्कृष्ट वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आणि त्यांचं काम झळकत आहे. त्या ग्रुपच्या फाउंडर मेंबरने तीन वर्षांपूर्वी एक फोटो अपलोड केलेला. तो होता, एका पक्ष्याचा पोर्टेट. ज्यात त्याचे केस न‌् केस दिसत होते. जबरीच होता तो फोटो. तिथे एका वयोवृद्ध फोटोग्राफरने कॉमेंट केलेली. त्यांचं वय झाल्याने आता ते फोटोग्राफी करत नाहीत, व्हीलचेअरवर असतात. पण, ज्याने फोटो अपलोड केलेला, त्याचे ते गुरू होते. त्यांचं म्हणणं होतं, ‘खूपच छान फोटो आहे. हा फोटो पाहून आनंदही झाला आणि दु:खही. भारताची वाइल्ड लाइफ फोटोग्राफी खूप वेगळ्या दिशेने जात आहे, ते पाहून वाईट वाटलं.
गुगलवर पक्ष्यांचं नाव टाकलं की, हा पक्षी असा दिसतो, असे फोटो हजारो मिळतात; पण त्यात पक्ष्यांचे वेगळे फोटो फार कमी असतात. त्यात ते भांडण करताना वा त्यांच्या जगण्यातले बदल हे फार कमी दिसतं. हल्ली... स्पर्धाच लागली आहे, कोण फोटोग्राफर जास्त जवळ जातो, याची.’
अपेक्षेप्रमाणे खूप लोकांना हे आवडलं नाही. त्यात एक जण बोललाही की, तुम्हीच का टाकत नाहीत असा फोटो मग? त्यावर त्या जुन्या जाणत्याचं उत्तर होतं, हल्ली चालतासुद्धा येत नाही, जमेल की नाही माहीत नाही; पण मी प्रयत्न करेन. त्यानंतर १५-२० दिवसांनी त्यांनी फोटो उपलोड केला. एका हेरॉनचा. तळ्याकाठी, सूर्यास्त होताना पडलेली किरणं आणि त्यात हेरॉनची लागलेली समाधी, असा काहीसा. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘आता असा फोटो मी परत जरी ठरवलं तरी मिळणार नाही मला पुन्हा. पण यात आपण ज्याला habitat shot म्हणतो, तो दिसतोय का तुम्हाला?’ सर्वांना हे पटलं आणि मलाही तेव्हा दिशा मिळाली. म्हणून ठरवलं होतं, अॅक्शन आणि पक्ष्यांचं ‘जग’ दिसेल, असं काही करत राहावं. खूप काही जमलं नाही मलाही; पण चार-सहा फोटो मिळाले, गेल्या दोन वर्षांत; जे आता परत कधीच नाही मिळणार, असे. परत एकदा इथे टाकतोय...
ganeshbgl23@gmail.com