आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरवंगार सोनं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका ठिकाणी फिरत फिरत गेलेलो. तिथे एक आजोबा भाताच्या शेताला पाणी देत होते... त्यांच्या शेतात विहीर नव्हती, पण शेजारी जे नदीच पाणी होतं, त्यात जनरेटर लावून पिकाला पाण्याची सोय करणं चालू होतं. माझ्याजवळचा ट्रायपॉड आणि मोठा कॅमेरा पाहून बाबा चांगलेच दचकले. हे मला नवीन नव्हतं. गावी लोक हिडिस-फिडिस करत नाहीत फोटो घेताना, पण घाबरलेले असतात नक्की. बाबांना ट्रायपॉडमुळे पाणी किंवा रानमोजणी करणारा वाटलो असावा. त्यामुळे स्वत:च सुरू झाले.

‘तुम्हाला भुईमुगाच्या शेंगा हव्यात का? वांगी वगैरे पण आहेत शेतात, घेऊन जा घरी लेकरं खातील.’ पोटात गोळा आला राव. त्यांची ही मदत घाबरून होती. कारण, त्या नदीचं पाणी धरणाला जात होतं आणि पाणी उपसा करायला बंदी होती. मीच समोर येऊन बोललो मग.
‘बाबा, कश्याला भेता ओ, लोक धरणच्या धरण पळवतेत. तरी त्यांचं नाव पण येत नाई कुठं. टाकू जेलमधी म्हणत लोक निवडून येतात, पण परत कुणी नाव पण घेत नाही. तुम्ही कुठं तान घेऊ राहिले. नका काळजी करू.’
माझे शब्द असतील किंवा माझी बोलायची टिपिकल मराठवाडी लकब; ते पिकलं पान एवढं खुललं की, मग सगळं सांगत बसले. मुलगा मिलिट्रीमध्ये आहे मेकॅनिक, कसा २०० रुपये घेतो जनरेटर सुरू करायचे वगैरे.

त्यानंतर मग पाणी देऊन पाइप वगैरे गोळा करायले लागले. गोल्डन अवरमध्ये एवढं सॉलिड कम्पोझिशन आणि मोमेन्ट मिळत होती मला, पण मी नाही काढला फोटो. बाबा अजूनही थोडे घाबरून होते. जर फोटो काढून निघून गेलो असतो, तर त्यांना रात्रभर झोप लागली नसती, की काय करणार या फोटुचं ह्यो बाबा आता. कारण त्यांना पुण्यात स्वतःचा व्यवसाय असून फोटो फक्त आवड म्हणून काढतो, हे सांगूनही पटलं नव्हतं. पण सुरुवातीला जो एक फोटो काढला तोही खूप छान मिळाला. सत्तरी जवळ जवळ येतानाही आजोबांनी एकट्याने पिकवलेलं हिरवं सोनं...

गणेश बागल
ganeshbgl23@gmail.com