आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतिहासात हरवलेला कालिदास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कविकुलगुरू कालिदास, सर्गराज नाटककार कालिदास, दर्शनशास्त्र कोविद कालिदास, ज्योतिषपंडित कालिदास, वैद्यराज कालिदास, गुप्तरत्न राजकवी कालिदास, अमात्यश्रेष्ठ कालिदास, अलंकाधीश महाराज मातृगुप्त ऊर्फ कालिदास, पंडित कालिदास, योगर्षी कालिदास, परिक्रमापुरुष कालिदास... एकाच आयुष्यात ही सारी बिरुदे एकाच माणसाने मिरवली. हाताशी राजसत्ता होती, तरीही ज्याने कुठेच स्वस्तोम माजवले नाही की ज्ञानाचे अवडंबर माजवले नाही; असा हा कालिदास भारतीय संस्कृतीला पडलेले एक गूढ स्वप्न आहे.

कालिदास केव्हा, कुठे जन्मला-वाढला, त्याचे गाव-शीव याचा कशाचाही थांग इतिहासाला आजपर्यंत लागला नाही. स्वत:ला असे गूढ ठेवण्यात कालिदासाच्या मनाचे विशालपण होते, की त्याला परिस्थितीने स्वत:बद्दल बोलूच दिले नाही, हेही कुणाला नक्की सांगता येत नाही. की अपुर्‍या इतिहासलेखनाचा कालिदास बळी ठरला, हेही नक्की ठरवता येत नाही. कालिदास विक्रमादित्याच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी एक होता, हे स्पष्ट झाले तरी पहिला विक्रमादित्य की दुसरा विक्रमादित्य, हे इतिहासकारांना नक्की सांगता येत नाही. शिवाय तो स्त्री होता की पुरुष होता, याचाही काहींचा संभ्रम अजून मिटला नाही. कालिदास एक होता की अनेक, की अनेक कवींनी त्याचे नाव लावून त्याचे मोठेपण लाटण्याचा प्रयत्न केला, हेही गुलदस्त्यात आहे. त्याचे निधन कुठे-कसे-कधी झाले, तेही कुठे नमूद नाही. कालिदासाचा जन्म माळव्यात झाला होता, असे मानले तर त्याला अधिकृत मानता येईल. कारण माळवाच मुळी गुप्त घराण्याकडे पहिल्या शतकाच्या पूर्व काळात आला. ज्या वेळी परमारवंशी राजा महेंद्रदित्य याचा पराक्रमी पुत्र विक्रमादित्य सत्तेत होता आणि त्याची राजधानी उज्जयिनी होती, बौद्ध तार्किक दिग्नाग याच्याशी कालिदासाच्या बर्‍याच झटपटी झाल्याचे दाखले आहेत. तो कालिदास हाच असेल तर शकारी सम्राट विक्रमादित्य याचा अधिराज्य काल, मगध आणि पाटलीपुत्र यांचे संदर्भच लागत नाहीत. बाराव्या शतकात दक्षिणावर्तनाथ आणि चौदाव्या शतकातील मल्लिनाथ यांच्या टीका लक्षात घेता, कालिदासाचा काल चौथ्या शतकापर्यंतचा मानता येतो. चंद्रगुप्त दुसरा हाही क्षत्रप आणि शकांचा पाडाव करणारा राजा होता, त्यानेही विक्रमादित्य हे बिरुद लावले होते. रघुवंशाबद्दल याला प्रचंड अभिमान होता, म्हणून त्याने कालिदासाला राजकवी बनवले असावे आणि त्याच्याकडून रघुवंशी राजांच्या प्रेम-पराक्रम, त्याग व कर्तव्य पालन यांच्या आदर्श कथा लिहून घेतल्या असाव्यात. कालिदासाच्या अभिव्यक्ती शैलीवर बौद्ध परंपरेचा स्पष्ट प्रभाव जाणवतो, यावरून त्याचा कार्यकाळ वैदिकांच्या दुही अवस्थेतला मानायला बराच वाव आहे. कालिदासाच्या साहित्यकृतीत आलेल्या राजांचा काळ इसपूर्व आहे. परंतु हा सगळा अनुमानांचा खेळ होतो. कालिदासाचा काळच नक्की सांगता येत नसेल, तर त्याच्या जन्म-मृत्यूबद्दल बोलणे योग्य ठरत नाही. म्हणूनच नाइलाजाने त्याच्या अजरामर मेघदूत आणि ऋतुसंहार या दोन काव्यांतील आषाढ ऋतूच्या अप्रतिम वर्णनांमुळे आषाढातील पहिला दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो.

अनेक गूढ पुराणकथा, मनुस्मृती, आर्यार्ष, धर्मग्रंथ, अज्ञात भूभाग, पक्षी-प्राणी यांचे अद्भुत जीवनमान, गणित, भूगोल, कूट, गूढ समस्यापूर्ती यांचा उलगडा करून दाखवणारा कालिदास स्वत:च गूढ बनला, हा दैवदुर्विलास ही भारतीय साहित्य रसिकांची दुखरी जागा आहे. भोजराजाच्या पदरी असलेल्या कालिदासाने ‘नानार्थशब्दरत्न’ नावाचा ग्रंथ लिहिला. हा कालिदास इसवी पाचव्या किंवा सहाव्या शतकातील कवी असावा आणि त्याने समकालीन कवींना द्वेषाने ‘निचूल’ आणि ‘सरस’ अशा टेकड्यांच्या नावे हिणवले असावे. खरा कालिदास या दुसर्‍या कालिदासाच्या अगोदर होऊन गेला असावा, त्याच्या काव्यात उल्लेखलेल्या निचेस आणि सरस हे त्याचे समकालीन बुद्धिवंत तार्किक होते. खरा कालिदास मेघाला त्यांचे दशार्ण प्रदेशातील गाव आदराने पाहण्यास सांगतो. त्यामुळे दुसरा कालिदास हा काही मेघदूत आणि शाकुंतल लिहिलेला कालिदास नव्हता, असे स्पष्ट मत सॉलिसिटर शांताराम आत्माराम सबनीस यांनी 1938ला ‘महाराष्ट्र मेघदूत’ या ग्रंथात मांडले. परंतु त्याआधी 100 वर्षांपूर्वी इंग्रज अधिकारी विल्सन याने मेघदूताचा अनुवाद केला होता.

कोलकात्यापासून महाराष्ट्रात पोहोचायला जर एखाद्या पुस्तकाला शंभर वर्षे लागत असतील तर पुरातन कालिदास हा पहिल्या शतकाच्या पूर्वीचा कवी असला पाहिजे, असा एक मतप्रवाह आहे. इसवी सन 473मध्ये मंडसोर येथे सापडलेल्या शिलालेखात जर मेघदूतातील उत्तर मेघ भागातील पहिल्या श्लोकाचा अनुवाद आढळतो, याचा अर्थ दोन कालिदास होते, हे सबनीसांनी सिद्ध केले. त्यांच्या मते, तो काश्मिरी पंडित असावा, तो अभ्यासू व चिंतनशील सौंदर्य पूजक असावा. ज्या पद्धतीने तो हिमालयाची वर्णने करतो, त्यावरून तो काश्मीरचा रहिवासी असावा, असे त्यांना वाटते. याउलट कालिदास या नावावरून तो कालीचा भक्त व बंगालचा रहिवासी असल्याचे काहींचे म्हणणे आहे. शक संवत्सराच्या अगोदरपासून दक्षिणेत ‘आषाढाच्या पहिल्या दिवशी’ नववर्षारंभ मानला जातो, आणि कालिदासाने मेघदूताच्या सुरुवातीसच ‘आषाढस्य प्रथमदिवसे’ असा उल्लेख केल्याकडे बंगाली लोक निर्देश करतात. काहींच्या मते, तो वैदर्भीय होता; तर काही त्याचे नाते गुजरातशीही होते, असे मानतात. परंतु या सर्व पाण्यावरच्या रेघाच आहेत. मराठीखालोखाल गुजरातीत मेघदूताचे अनुवाद झाले आहेत.

कालिदासाच्या विहार शोधाच्या या परिक्रमेत काही विद्वानांनी वाद घातले, पण त्याची निर्भर्त्सना केली नाही. मात्र आधुनिक काळातील भारतीय नाटककार मंडळींनी कालिदास प्रेयसीला सोडून देतो, पुढे तिचे खूप हाल होतात आणि उपजीविकेसाठी ती अखेर वेश्या होते, या कपोलकल्पित सूत्रावर नाटके लिहिली. कालिदास विलासी आणि वेश्यागमनी होता, त्याचा मृत्यूही एका वेश्येच्या घरातच झाला; वाकाटकाच्या विधवा राणीशी त्याचे संबंध होते म्हणून विक्रमादित्याने त्याची काश्मिरात हकालपट्टी केली; तिथे त्याची हत्या झाली वा तेथून तो पळून गेला वा संन्यासी झाला... असल्या शेकडो बिनबुडाच्या वदंता त्याच्याबाबत गेल्या सात-आठ शतकांत पसरवल्या गेल्या. नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ सापडत नाही म्हणतात, ते खरेच. या काव्यमहर्षीचे कूळ आणि मूळ दोन्ही सापडले नाहीत. सत्य बाजूला सारून असत्याचे डांगोरे एखाद्याच्या माथी मृत्यूनंतरही पडत असतील, तर तो माणूस दुर्दैवी नाही म्हणावे तर काय? परंतु काळाच्या सीमा छेदून जो आपल्या प्रतिभेने जगभर आपला दबदबा दोन हजार वर्षांनंतरही कायम ठेवत असेल, तर त्याच्या प्रतिभेचे मोल कल्पनातीत आहे, असे मान्य करून त्याला वंदन करणे, अधिक निर्भेळ मनाचे द्योतक ठरेल.
ganeshhdighe@gmail.com