आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Festival Issue Communication Lord Ganesh And Narad

हे आमचे भक्तच नाहीत...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीतलावर पाऊल ठेवण्याची घटिका जवळ येऊन ठेपली आहे. तरीही गणरायाची मनापासून भक्तांना दर्शन देण्याची इच्छा होत नाहीये. काय कारण आहे, गणरायाच्या निराश मन:स्थितीचे?

(गणपतीबाप्पांची पृथ्वीतलावर जाण्याची वेळ जवळ आलेली पाहून नारदमुनी बाप्पांना निरोप द्यायला कैलासावर आले आहेत.)
नारद : गणराया! अरे काय ही तुझी अवस्था! तू तर एखाद्या कुपोषित बालकासारखा दिसतोयस. काय झालंय तुला?

बाप्पा : जिथं माझं नेहमी येणं-जाणं असतं, तिथला काही तरी परिणाम होणारच की माझ्यावर मुनिवर! पण खरं सांगायचं तर भक्तांचे अपराध पोटात घेताघेताच माझं हे पोट अतोनात वाढलंय. आणि ज्या भक्तीचा मी भुकेला आहे, तीच मिळत नसल्यानं माझ्या हातापायाच्या काड्या झाल्या आहेत.

नारद : पण गणराया! तुझ्या भक्तांवर इतकं रागावण्याचं कारण तरी काय?

बाप्पा : मुनिवर! तुम्हाला माहीत नाही का, मी कशानं व्यथित झालो आहे ते? बलात्कारांच्या घटनांनी सध्या सारं वातावरण दूषित झालं आहे, त्याची तुम्हाला जाणीव नाही का?

नारद : पण या घटनांचा तुझ्या भक्तांशी काय संबंध? ते बलात्कारी नराधम वेगळेच आहेत. त्यांच्या कृत्याचा दोष तुझ्या सर्व भक्तांवर कसा लादतोस तू?

बाप्पा : कारण, त्यांनी वेळीच त्यांच्या विरोधात आवाज उठवला नाही म्हणून. जेव्हा समाजात अशा घटना घडतात, तेव्हा त्याची जबाबदारी ही त्या समाजाचीच असते. कोण्या एकाचं कृत्य म्हणून समाजाला ती जबाबदारी टाळता येत नाही.

नारद : खरंय तुझं गणराया! पण तरीही तू उदार मनानं त्यांना क्षमा करायला हवी. कितीही झालं, तरी त्यांची अतीव श्रद्धा आहे तुझ्यावर.

बाप्पा : श्रद्धा की अंधश्रद्धा? श्रद्धा असती तर दाभोलकरांसारख्या सच्च्या सश्रद्ध माणसाचा बळी पडला नसता. माझ्या व्यथेचं तेही एक कारण आहे.

नारद : अरे पण गणराया, त्या माणसानं तर...

बाप्पा : त्या माणसानं देव-दैवाची सांगड नाकारली, प्रयत्नवाद आणि विवेकवादावर भर देत अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा दिला, हेच ना?

नारद : हो. हे सारं तुझ्या विरोधातच ना? म्हणूनच तर तुझे कट्टर सनातनी भक्त चिडले होते. त्यांचा धर्मच धोक्यात आला होता, या माणसाच्या कारवायांनी.

बाप्पा : मुनिवर! निदान तुमच्याकडून तरी इतक्या संकुचित आणि चुकीच्या विचारांची अपेक्षा नव्हती. अहो! बुद्धीची, ज्ञान-विज्ञानाची देवता म्हणून आमची ख्याती आहे. ज्या माणसानं आयुष्यभर याच गोष्टींचा पुरस्कार आणि प्रचार केला, तो आमचा विरोधक कसा असू शकतो? ज्या सनातनी लोकांना तुम्ही आमचे कट्टर भक्त समजता, त्यांना आम्ही कधीच आपलं मानू शकत नाही. त्यांचं एखादं काम झालं नाही, तर ते देवांनाही पाण्यात बुडवून ठेवतात ते काम होईपर्यंत. असल्या देवबुडव्या लोकांनाच तुम्ही भक्त समजता? स्वत:च्या स्वार्थासाठी ज्यांनी देवांनाही मंदिरात कोंडून ठेवलं, त्यानं कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही, हेदेखील त्यांनीच ठरवलं. धर्म धोक्यात येतो, तो या अशा मतलबी संधिसाधू लोकांपायीच. ज्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक कळत नाही, तीच माणसं देव-धर्माचा बाजार मांडून स्वत:ची पोटं भरतात. हे आमचे भक्तच नव्हेत! हे तर आमचे कट्टर वैरी आहेत. ज्याचा जसा भाव तसा त्याचा देव असतो मुनिवर! त्या कसोटीवर दाभोलकरच खरे भक्त ठरतात. कारण त्यांनी विज्ञानातच त्यांचा देव शोधला. अज्ञानाच्या तिमिरातून जो विज्ञान व प्रज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो, तो प्रत्येक माणूस देवच असतो. देव ही काही आकाशातून पडलेली गोष्ट नाही, तर प्रयत्नवादातून मिळवलेली पदवी आहे; पण कष्ट करण्याची ज्यांची तयारी नाही, अशा आळशी लोकांनी स्वत:ची पोटं भरण्यासाठी ही संकल्पनाच गुंडाळून ठेवली. दाभोलकरांचा धर्म विज्ञान होता. त्यासाठीच त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वाईट याचं वाटतं की, स्वत:ला माझे भक्त समजणाºया काही मूर्खांनीच त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मरणाचा आनंद व्यक्त केला. असल्या निर्बुद्ध, संवेदनाहीन लोकांना भेटायचे तरी कशासाठी मुनिवर?

नारद : तुझा उद्वेग आणि आक्षेप योग्यच आहे गणराया! पण असा विवेक सोडून कसं चालेल? समाजसुधारणा ही संथ गतीनेच होत असते. त्यासाठी कधी कधी हौतात्म्यही पत्करावं लागतं; पण यातूनच नवे दाभोलकर जन्माला येतील, याची खात्री बाळग.

बाप्पा : खरंय मुनिवर! दाभोलकरांनी सुरू केलेली ही विज्ञान यात्रा खंडित होता कामा नये. कोणी आस्तिक असो वा नास्तिक! तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे; पण ही श्रद्धा माणसाला, समाजाला समृद्ध करणारी असावी. दाभोलकर मला मानत नसतीलही, पण मी त्यांना मानतो. त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची पताका यापुढे मीच वाहून नेणार आहे. मला खात्री आहे की, माझे डोळस, सश्रद्ध भक्तही या विज्ञानयात्रेचे वारकरी बनतील.
नारद : तथास्तु!

Pratikpuri22@gmail.com