आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवून पुरवून वाचावेसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्यानेच बाजारात आलेले ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ हे निरंजन घाटे यांचे पुस्तकांवरचे पुस्तक हातात आले. हातातून सोडूच नये, एकाच बैठकीत वाचून संपवावे असे हे पुस्तक जरी असले तरीही एकाच बैठकीत मुद्दामच संपवले नाही. पुरवून पुरवून वाचावे असे हे एक पुस्तक. वाचत सुटलो तर पटकन संपेल म्हणून ते वाचायची घाई न करता सावकाश वाचत राहिलो. खरे तर घाटेंना माझ्या किंवा कुणाच्याही प्रशस्तिपत्रकाची गरजच नाही. १८० पुस्तके आणि किमान पाच हजार लेख लिहिणाऱ्या लेखकाचे हे पुस्तक त्यांच्या वाचन प्रवासावर आहे. आपण नुसते म्हणतो, पण खरेच वाचन विषयाला धरून किती खोल असू शकते हे या पुस्तकातून जाणवते.

पुस्तक वाचताना त्यातल्या पुस्तकांच्या, लेखांच्या, लेखकांच्या, शास्त्रज्ञांच्या, घटनांच्या नोंदी कराव्यात म्हणून हाताशी कागद पेन ठेवले तर लक्षात आले की, प्रत्येक पानावर नोंद घेण्यासारखे बरेच काही आहे. पुस्तकातून तितकेच फक्त वेगळे काढावे असे काही नाही. पुस्तकात थातूरमातूर काहीच नाही. जे काही आहे ते वाचण्यासारखे आणि नोंद घेण्यासारखे अस्सलच आहे. मी स्वतः घाटेंच्या लेखनाकडे कधी फारसे गांभीर्याने वळलेलो नाही. मुळातच मला विज्ञानकथांची फारशी आवड नाही. त्यामुळे जेव्हा हे पुस्तक हातात आले तेव्हा आवाकच झालो. एक तर घाटेंचा लिहिता हात जाणवतो. एक शब्ददेखील वावगा नाही की अवास्तव नाही. नेमके आणि मोजके, तरीही व्यापक असे त्यांचे लिहिणे. खूपदा एखाद्या लेखक किंवा घटनेसंबंधी घाटे लिहिताना अचानक थांबतात आणि पुढच्या विषयाकडे वळतात, तेव्हा त्यांचा रागही येतो. कारण आपल्याला सहज सोपे कुणीतरी हे सांगायला हवे असे वाटत असते. घाटे फक्त त्याची चव दाखवतात. आख्खा घास आपणच शोधायचा आणि खायचा, ही लेखकाची अपेक्षा. म्हटले तर यात गैर काहीच नाही. पण आपला हिरमोड होतो. आपण चरफडत रहातो. त्यांनी किती ठिकाणाहून पुस्तके जमवली आणि इतक्या विविध प्रकारचे वाचन केले ते बघून आपण हैराण होतो.

रहस्यकथा / साहसकथा / परामानसशास्त्र / विनोदी / विज्ञान कथा / विज्ञान वाचन / अचाट महिला / शब्दकोश / चरित्र / काही झंगड पुस्तकं अशा विविध विषयांवर पुस्तकांना शोधत / वाचत / आपल्या आत मुरवत त्यांनी केलेले लेखन त्यांना साष्टांग दंडवत घालावे इतके अचाट आहे. Hats off म्हणण्यात माझी भावना पूर्ण व्यक्त होत नाही. पुस्तकात जागोजागी अनेक किस्से, म्हणी यांचा नुसता खजिना उधळला आहे. ‘आयजीच्या जीवावर बायजी उधार’सारखी म्हण आपण कशी अर्धवट वापरतो किंवा गणितज्ञ आर्किमिडीज संतापला तेव्हा त्याने असे कोडे घातले जे सोडवायला तब्बल २२०० वर्षे लागली. उमर खय्यामच्या (मूळ नाव- ओमर तंबूवाला) रुबायांचे पाच अनुवाद फिटझेराल्डने का केले, परत हे पाचही अनुवाद सरांकडे कसे आले, इंग्रजांच्या काळात काश्मीरची काही रंगीत चित्रे मेजर इ.मॅलिनोने काढली आणि त्याने फ्रान्सिस यंगहजबंड यांना त्या चित्रांवर काही लिहा म्हणून विनंती केली. हे फ्रान्सिस काश्मीरचे महाराज सर प्रतापसिंग यांच्याकडे ब्रिटिशांचे रेसिडेंट होते. ते काश्मीरप्रेमी होते. त्यांनी थोडा मजकूर न लिहिता सविस्तर असे पुस्तकच लिहून काढले. १९३३ सालातले हे पुस्तक सरांकडे कसे आले? रेखांशावरचे पुस्तक कसे निर्माण झाले, साधा पाऊस, त्याचा घेतलेला केरळ ते चेरापुंजी असा मागोवा, असे काही पुस्तक असेल हेच माहीत नाही. त्याचा अनुभव तर फारच दूर. भारतातून चीनला एव्हरेस्ट शिखरावरून जाताना प्रथमच एव्हरेस्ट शिखरांची घेतलेली छायाचित्रे, त्या वेळचा लेखकाचा अनुभव. यात लेखक म्हणातो - God is my copilot. हा अनुभव सरांनी वाचनातून घेतला आहे. हे सगळे कसे निर्माण झाले, त्यामागचे कष्ट कळवून घेण्यासाठी हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवे.

एक तर संपूर्ण पुस्तकातली नुसती पुस्तकांची नावे वाचूनच दमायला होते. ती मिळवणे फार पुढची गोष्ट झाली. त्याच्यानंतर त्या वेगाने वाचून तर व्हायला हवी. सरांचा वाचनाचा वेग अफाटच आहे. (रहस्यकथा वाचनामुळे माझा वाचनाचा वेग वाढला असे सर स्वतःच म्हणतात.) तरी सर एकेठिकाणी नम्रपणे म्हणतात की, माझे अवांतर वाचन कमी झालेय. लिखाणाच्या संदर्भातच आजकाल माझे वाचन सीमित झालेय. या सगळ्या घडामोडीत सरांना वाचते ठेवणाऱ्या पुण्यातल्या किताब मिनार वाचनालयाचा हेवा वाटतो. असे वाचनालय डोंबिवलीतही नाही हो. माझे वाचनालयाशी फार कधी जुळलेच नाही, म्हणूनही असेल. पण किताब मिनारचा हेवा वाटल्याशिवाय राहवत नाही.

संथ कथानक असेल तर ते ब्रिटिश लेखकाचे आणि वेगवान कथानक असेल तर ते नक्की अमेरिकी लेखकाचे हा सरांचा अनुभव आपल्यालाही पटतो. फ्रेडरिक फोरसीथ हा अगदी बारकाईने लिहिणारा लेखक सरांना आवडतो. (आपल्यालाही जाम आवडतो!) त्याच्या कथेतली वळणं आपल्याला चक्रावून टाकतात. त्याच्याबद्दल सरांनी मनसोक्त लिहिले आहे. सरांच्या मते इंग्रजी लेखक वर्णनातले बारकावे / माहिती याबद्दल चोख असण्याचा सतत प्रयत्न करतात. या संदर्भात सर गोविंद तळवलकरांचा एक किस्सा सांगतात. ललितच्या एका लेखात सम्राट अकबराबद्दल तळवलकर लिहितात की, अकबराला लंगडा आंबा खूप आवडायचा. बहुधा त्याला हापूसची चव माहीत नसावी. यावर निरंजन घाटेंनी ललितला पत्र लिहिले की, अकबराचा मृत्यू १६०५ सालातला आणि हापूसचे आगमन भारतात १८व्या शतकात झाले होते. पण ही तपशिलातली चूक निदर्शनास आणूनही संपादकांनी ती छापली नाही. त्या वेळी तळवलकरांचा दराराच इतका होता. अशा तऱ्हेची पुस्तकातली चूक इंग्रजी प्रकाशनाच्या लक्षात आणून दिल्यास ते मात्र चटकन प्रतिसाद देतात, असाही अनुभव सर ओघात सांगून टाकतात. मी असे समजतो की, सरांनी लिहिलेले हे पुस्तक हा भाग एक असावा. त्याचे पुढचे भाग संपादकांनी अवश्य पाठपुरावा करून सरांकडून लिहून घ्यावेत.

पुस्तक छापणाऱ्या समकालीन प्रकाशनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पहिल्यांदा फाँट खूप बारीक वाटला. मग लक्षात आले की, इतका खजिना परवडेबल पुस्तकात मावण्यासाठी ही तडजोड आवश्यकच होती. इतके चोख आणि व्याकरणशुद्ध पुस्तक वाचताना खरेच मजा आली. नुकत्याच आलेल्या वाङ््मय वृत्तात सतीश काळसेकर सर वाचक आणि संग्राहकांची एक साखळी तयार व्हायला हवी, असे म्हणतात. बऱ्याचदा खूप संग्रह असणारी माणसं इतरांना पुस्तके देतच नाहीत. (जो नेतो तोही प्रामाणिकपणे परत आणून देत नाही, हाही प्रत्येकाचा अनुभव!) पण या संग्रहाचे आपल्यानंतर काय करावे हा मोठाच प्रश्न बऱ्याच ग्रंथसंग्राहकांना सध्या भेडसावत आहे. आपल्या भोवतालात असलेली ग्रंथालये त्यांची जबाबदारी घेण्याइतकी सक्षम नाहीत हा मोठा दुःखद भाग सगळीकडेच जाणवतो. एका बाजूला कुरुंदकरांसारखे स्वतःचा संग्रहच नाही म्हणणारे लेखक आणि दुसरीकडे सतीश काळसेकर सरांसारखे संग्राहक ग्रंथांच्या बाबतीत एक वेगळाच विचार मांडताना, सुचवताना दिसतात. भोवतालातली मराठी आणि एकंदरच वाढणारी वाचनाची अनास्था आणि दुसरीकडे वाचण्यासाठी किंडलसारखे माध्यम वापरणाऱ्यांचा वाढता प्रभाव या कात्रीत आपला वाचनप्रवास अडकणार आहे. यातून मार्ग दाखवणारे, दिलासा देणारे, आपल्यासारख्या समानधर्मी वाचकांचा आत्मविश्वास वाढवणारे, ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ वाचायलाच हवे.
 
- गणेश कुलकर्णी, डोंबिवली
magnakul@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...