आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाडशी ट्रॅक रेकॉर्ड!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या महिन्याभरात देशभरात डबे रुळांवरून घसरून किमान पाच मोठे रेल्वे अपघात झाले. मनुष्य आणि संपत्तीची मोठी हानी झाली.मात्र, गाडी रुळांवरून घसरण्याच्या घटना वारंवार का घडतात? त्या घडू नये यासाठी रेल्वेची यंत्रणा नेमकी काय खबरदारी घेते वा घेत नाही, याबाबत प्रवासी रेल्वे गाडीचे चालक असलेल्या लेखकाचे हे टिपण...

आज भारतात तब्बल ९२ हजार किमीचा रेल्वेचा ट्रॅक उपलब्ध आहे. पृथ्वीच्या २४ प्रदक्षिणा करताना जेवढे किलोमीटर पार केले जातात, साधारण तितके किलोमीटर भारतीय रेल्वे एका दिवसाला पार करते. दिवसाला जवळ जवळ २१,००० गाड्या, यात मेल पॅसेंजर, लोकल, डीएमयू, मेल मालगाड्या आदींचा समावेश आहे. दिवसाला लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या भारतीय रेल्वेचा आवाका खरं तर हबकवून टाकणारा आहे.

एरवी, रेल्वेच्या गाडीचे वजन ट्रॅकवर तोलले जाते. साहजिकच यासाठी रेल्वेचा रुळ मजबूत असणे गरजेचा असतो. रुळांची दुरुस्ती, देखभाल सातत्याने करत राहावी लागते. हे करण्यासाठी रेल्वेत स्वतंत्र इंजिनिअरिंग विभाग असतो. या विभागाचे मुख्य काम रेल्वेच्या रुळांची चोवीस तास देखभाल-दुरुस्ती करणे. या कर्मचाऱ्याला ‘गँगमन’ म्हटले जाते. हे एकेकटे नसतात. यांची गँग असते. पॅट्रोलमॅन म्हणजे गस्त घालणाऱ्याच्या हातात एक हातोडा, एक चावी, (मोठा पाना, याला रेल्वेच्या भाषतज्ज्ञ चावी म्हणतात.) आणीबाणीच्या परिस्थितीत गाडी थांबवण्यासाठी फटाके (स्वतःचा डबा-पाणी याला यात जागा असेलच असे नाही.) हिरवा-लाल झेंडा आणि आजकाल तो कोणत्या गँगचा आहे, हे कळावे म्हणून त्या गँगची नंबर असलेली पाटी असते. त्यांना चालत एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनवर जायचे असते. अंतर कितीही असले, तरी ही मंडळी येता-जाता संपूर्ण रेल्वेचा ट्रक तपासत जातात. काही अडचण आली तर तिथल्या तिथे दुरुस्त करूनच पुढे सरकतात. चावीवाला या पदावरचा कर्मचारी वरिष्ठ असतो. एखादी चावी निघाली, तर त्यावर घण मारतात. तो अनुभवी माणसानेच मारायचा असतो. कारण हे करताना रुळांची रचना बिघडली जाऊ नये, याची काळजी घेणं गरजेचं असतं. यावर प्रख्यात शिल्पकार मायकल अँजेलोचा किस्सा आठवतो. मायकलची सायकल बिघडते. दुरुस्तीला दुकानात नेतो. काम करणारा अनुभवी माणूस सायकल आडवी पाडायला लावतो आणि एकच जोराचा घण मारतो. इतक्या चटकन सायकल दुरुस्त झाल्याचं बघून मायकल खुश होतो. विचारतो, याचे किती रुपये झाले. सायकलवाला म्हणतो, ५० डॉलर्स. मायकल म्हणतो, अहो एक घण मारायचे ५० डॉलर्स खूप नाही का होत? तर तो कारागीर म्हणतो, घण मारायचे पैसे मी मागितलेच नाहीत, घण कुठे मारायचा, याचा मोबदला मागितला.

पॅट्रोलमॅन दुसऱ्या स्टेशनवर किती वाजेपर्यंत पोहोचायला हवा, याचे आराखडे तयार असतात. त्यांना १५ मिनिटांपेक्षा जर जास्त उशीर झाला, तर त्या दिशेची वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून थांबवली जाते. (वाहतुकीला रेल्वेत यातायात असेही म्हणतात. बऱ्याचदा प्रवास म्हणजे यातायातच असते. त्यामुळे ज्याने कुणी हा शब्द शोधला, त्याचे कौतुक एकेकाळी पुलंनादेखील वाटले होते.) रेल्वेचा रूळ अशा तऱ्हेने रात्री-अपरात्री तपासणे जिकिरीचे काम असते. आजकाल काही जणांना वॉकी-टॉकी दिली जाते. ज्यामुळे चटकन जवळच्या स्टेशनांशी संपर्क साधला जातो. आम्ही चालक मंडळी, या गँगमनने रात्री-अपरात्री मारलेल्या शिटीला प्रतिसाद देत निर्धास्तपणे गाडी चालवत असतो.
रेल्वेत तुम्ही कितीही शिकलेला असू दे, पण  अनुभवाला अपार महत्त्व आहे. या विभागात पूर्वी कष्टकरी माणसं लागायची. काळानुरूप ही माणसं निवृत्त झालीत किंवा होत आहेत. नवीन येणाऱ्या पिढीत जुन्या काळच्या निष्ठेचा अभावच दिसतो. एक तर खूप शिकलेली माणसं आजकाल या विभागात दाखल होतात. बाहेर इतकी बेरोजगारी असताना, फारसे पर्याय उपलब्ध नसताना एम.एस्सी., बी.एस्सी. झालेली मुले या विभागात निवडली जाताना, रेल्वेत शिरण्याचा मार्ग या नजरेनेच या नोकरीकडे बघतात. 

प्रवासी दिवसभर ट्रॅकवर कचरा टाकत असतात. गाडी स्टेशनात थांबली असताना शौचास बसतात. एकदा लोकलमध्ये माझ्या शेजारी फर्स्टक्लासमध्ये बसलेला माणूस थोडासा वाकला आणि बाहेर ओकला. मला वाटले, त्याला माझ्या मदतीची काही गरज असावी. मी त्याच्या पाठीवर हात ठेवला म्हणालो, काही त्रास होतोय का? तर तो चमकून बघायला लागला म्हणाला, मी थुंकलोय, ओकलो नाही. अक्षरशः शिसारी आली. ओकल्यासारखा तो थुंकला होता. अशा रुळांवर रात्री-अपरात्री चालणे सोपे नाही. मुंबईत माहिमजवळ जिथे मध्य-पश्चिम रेल्वे एकमेकांना भेटतात, तिथे ट्रॅकवर काम करायला जाणाऱ्या माणसांना तिथल्या घाणेरड्या दर्पाने अक्षरशः चक्कर आल्यासारखे होते. पण तरीही सिग्नल आणि इंजिनिअर विभागातले कर्मचारी तिथल्या रुळांची देखभाल करायला नित्यनेमाने जातातच. आपण मुंबईत नेहमी स्टेशनजवळ रुळावर ईएमयू स्टॉपचा बोर्ड बघतो. तो नेहमी स्वच्छ का दिसतो, याचा कुणी विचारच करत नाही. पण इंजिनिअरिंग विभागाचा कर्मचारी गस्त घालताना त्याच्या जवळच्या कपड्याने तो बोर्ड पुसूनच पुढे सरकतो. वाटले, तर अगदी साधे काम, पण कुणीही बघत नसताना निष्ठेने करणे हा मोठा गुण रेल्वेतल्या अशा निष्ठावान कर्मचाऱ्याकडे असतो. नंदन निलकेणी जेव्हा ‘आधार’चे सर्वेसर्वा म्हणून निवडले गेले तेव्हा माणसे निवडताना, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सुचवले की रेल्वेतली माणसं निवडा, कारण ती निष्ठावान असतात. आपल्याकडे ट्रॅकवर काम करणारी टी.टी.एम. नावाची मशिन्स आहेत. रेल्वेच्या ट्रॅकवर अनेक प्रकारची कामं करण्याची क्षमता यात असते. रूळ तपासणे, खडी स्वच्छ करून परत ट्रॅकवर पसरणे, (खडीची साइजसुद्धा ठरलेली असते) यापासून सगळी कामे ही मशिन्स करतात. आपल्याकडे प्रत्येक कामासाठी वेगळी मशिन्स असतात. अमेरिकेत ‘रेल रोड’ नावाच्या कंपनीची एक सलग गाडी असते. अखंड नवीन रूळ टाकताना जुना उखडून टाकण्याच्या कामापर्यंत सगळी कामे मशीनच्या साहाय्याने होत असतात. दिवसाला तीन-चार किमीचा ट्रॅक तयार होऊन तो लगेच १६०-१६५ च्या वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठी वापरण्यास दिला जातो. इतकाच ट्रॅक आपल्याकडे बनायला तब्बल महिना लागतो आणि यावर वेग हळूहळू वाढवला जातो. म्हणजे २०-४५-७५ अशाप्रमाणे आपल्याकडे गाडीचा वेग वाढवला जातो. तिथली आधुनिकता, समृद्धी आपल्याकडे अजून तरी आलेली नाही. म्हणजे, तिकडे एक साधा हातोडा हवा असेल, तर पाच-पाच हातोडे तयार असतात, तेच आपल्याकडे, आपण जेव्हा पाच हातोड्यांची गरज नोंदवतो, तेव्हा एखादा हातोडा मुश्किलीने उपलब्ध होतो.

ट्रॅक चांगला असणे, नसणे यासाठी जमिनीची प्रतवारीही महत्त्वाची ठरते. उपनगरात रुळांवरचा अॅक्सल लोड कमी असला तरी दिवसाचे तब्बल २२ तास गाड्या धावत असतात. बाहेर, मात्र पाच ते सहा हजार टनांची मालगाडी, १२०० टनांच्या मेल, गाड्या सतत धावत असतात त्यामुळे दुरुस्ती, देखभाल यासाठी फार कमी वेळ उपलब्ध असतो. मुंबईबाहेरच्या ठिकाणी ठरावीक गाड्यांनंतर इंजिनिअरिंगचे ब्लॉक दिले जातात. बऱ्याचदा भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीसमोर ही गँगमन मंडळी जीव लावून काम करत असतात आणि त्यातच त्यांचा कधी कधी जीवही जातो.

गेल्या कैक वर्षांत फक्त गाड्या वाढल्या, पण त्याला लागणाऱ्या पायाभूत सुविधांची वानवाच आहे. प्रत्येक गोष्टीचे एक आयुष्य असते. संपूर्ण आधुनिकीकरण करण्याइतका पैसा रेल्वेकडे नाही. फक्त महानगरातच कामे करावीत, असा रेल्वेचा कधीच विचार नसतो. रेल्वेला संपूर्ण देशाचा विचार करावा लागतो. घरात मुलगा जास्त काम करतो म्हणून त्याला जास्त जेवण आणि मुलगी शिकतेच आहे, अजून लहान आहे म्हणून कमी जेवण, असा भेदभाव रेल्वे करू शकत नाही. इतकी बिकट परिस्थिती असताना गाड्या काय पडतीलच, असा विचार रेल्वे चुकूनही करत नाही. रेल्वेला शून्य अपघातांचीच अपेक्षा असते.
 
- गणेश मनोहर कुलकर्णी
magnakul@rediffmail.com
लेखकाचा संपर्क : ९८१९९५७८५२
बातम्या आणखी आहेत...