आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Matkari Article About Fandry Marathi Film

‘फँड्री’ कसा पाहावा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय पातळीवरल्या फिल्ममेकर्सशी, इतर भाषिक समीक्षकांशी बोलताना आपल्याला नेहमी जाणवतं, की त्यांच्या दृष्टीने मराठी चित्रपट एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. त्यात काहीतरी वेगळं, एक्सायटिंग घडतंय. प्रत्यक्षात मात्र मधला चार-पाच वर्षांचा काळ हा वेगळ्यापेक्षा व्यावसायिकतेलाच अधिक महत्त्व देणारा आहे, असं दिसून येतं. त्यात आश्चर्यकारक काही नाही, कारण वेगळा सिनेमा हा व्यावसायिकतेऐवजी नाही तर तिला पर्याय म्हणून अस्तित्वात येतो. असं असूनही परिचित आणि वेगळं याचा तोल सांभाळणं, ही कोणत्याही चित्रपटसृष्टीची गरज असते. गेला काही काळ हा तोल ढळतोय की काय, असं वाटायला लावणारा होता. मात्र नुकताच प्रदर्शित झालेला नागराज मंजुळेचा ‘फँड्री’ आणि एरवी व्यावसायिक गणिताने बांधलेल्या ‘झी’सारख्या संस्थेने सारी गणितं बाजूला सारून त्यांना दिलेला आधार, हे चित्र आशादायक आहे.
यात एका गोष्टीवर काही प्रमाणात प्रेक्षकांकडून थोडी टीका झालेली दिसते, ती म्हणजे त्यांच्या जाहिरात तंत्रातून करण्यात आलेली दिशाभूल. पोस्टर्स, ट्रेलर्समधून त्यातल्या रोमँटीक अँगलवर देण्यात आलेला भर, जे पाहताना ‘शाळा’पासून ‘टिपी’पर्यंत चित्रपट प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभे राहतील, किंवा पब्लिसिटीसाठी वापरलेलं आणि चित्रपटात नसलेलं अजय/अतुल या गाजलेल्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेलं गाणं. या सगळ्यातून हा चित्रपट जसा असेल अशी आपली कल्पना होते, तसा तो नाही. मला वैयक्तिकदृष्ट्याही या प्रकारची दिशाभूल आवडत नाही, , पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर आणि फिल्म पब्लिसिटी. चांगला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचायला क्वचित गनिमी कावा वापरायला हरकत नाही, अशा मताचा मी आहे. एकदा का प्रेक्षक चित्रपटगृहात पोहोचला, की तो चित्रपटात गुंततो का? हा खरा प्रश्न; आणि मला वाटतं, ‘फँड्री’बाबत बहुसंख्य प्रेक्षकांसाठी तरी या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे.
‘फँड्री’ हा विशिष्ट चित्रप्रकारात बसणारा चित्रपट नाही. तो फॉर्म्युला ठरवून काम करत नाही. पण त्याच्या विषयाबद्दल एका वाक्यात सांगायचं, तर एका विशिष्ट , काहीशा स्थित्यंतराच्या काळात अस्तित्वात आलेलं जांबुवंत कचरु माने उर्फ जब्या (सोमनाथ अवघडे) या आडगावात राहणार्‍या कैकाडी समाजातल्या शाळकरी मुलाचं अनुभवविश्व, तो आपल्यासमोर उभं करतो. हे विश्व अनेक पैलूंचं बनलेलं आहे. त्यात त्याला आपण अमुक जातीचा असल्याचा आणि त्यातून पडणार्‍या मर्यादांशी जोडलेला न्यूनगंड आहे. पडेल ते काम करून कसंबसं कुटुंब पोसणार्‍या आपल्या वडलांमध्ये (किशोर कदम) जब्याला आपलंच भविष्य दिसत असल्याने कदाचित, त्यांच्याबद्दल राग आणि कीव याचं मिश्रण त्याच्या मनात आहे. नाही म्हणायला थोडा आशावादही आहे; प्रामुख्याने शालीवरल्या एकतर्फी प्रेमातून आणि गावाने ओवाळून टाकलेल्या चन्क्याशी झालेल्या (नागराज मंजुळे) मैत्रीमधून पुढे येणारा, आपल्याहून बर्‍या परिस्थितीतल्या मुलांचा थोडा हेवा आहे; पण परिस्थितीवर मात करण्याची, या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची जिद्द आहे. ‘फँड्री’ची पटकथा ही या सर्व बाजूंचा विचार करत जब्या हा नक्की कसा आहे, याचं चित्र उभं करत नेते. महत्त्वाचं आहे, ते हे चित्र. त्यापुढे जब्याचा एखादा छोटा विजय वा पराजय दुय्यम मानावा लागेल. फँड्रीची पटकथा सरधोपट पद्धतीने प्रेमकथा वा अन्यायाविरुद्धच्या लढ्याची गोष्ट वा आणखी काही बनत नाही ती त्यामुळेच. त्या उलट ती अधिक गुंतागुंतीचा आशय मांडते. आपल्या जिवंत नायकाच्या सुखदु:खाच्या प्रातिनिधिक चढउतारांमधून एका समाजाच्या जगण्याचा आढावा घेते.
‘फँड्री’ आणखी एक इन्टरेस्टिंग गोष्ट करतो ती म्हणजे, अतिशय वास्तववादी पद्धतीने जीवनदर्शन घडवतानाही तो काव्यात्म, प्रतिकात्मक शैली जागृत ठेवतो. श्रेयनामावलीपासून सुरू असणारा जब्याचा काळ्या चिमणीचा शोध हा चित्रपटाला एक वेगळी धार आणतो, आणि या शोधातले टप्पे चित्रपटातला आशय अधिकाधिक गहिरा करत नेतात. जसा यातला पक्ष्याचा वापर, तसाच यात महत्त्वपूर्ण जागा असणार्‍या डुकरांचाही. आजच्या काळातही गावांमध्ये दिसणारी शिवाशीव, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव, त्यांमधून निर्माण होणारे सामाजिक-नैतिक तणाव, हे या दुसर्‍या प्रतीकाच्या योजनेत सामोरे येतात. आपल्याला समोर दिसतंय, त्या पलीकडे पाहण्याला प्रवृत्त करतात.
‘फँड्री’मधला सर्वात इन्टरेस्टिंग भाग आहे तो त्याचं सतत जब्याच्या दृष्टिकोनाशी प्रामाणिक राहणं. याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक प्रसंग त्याच्या उपस्थितीत घडतो, किंबहुना यातला कचरूचा वावर हा बराचसा स्वतंत्र आहे, मात्र फोकस ठरवते ती जब्याचीच व्यक्तिरेखा. हे सर्वात स्पष्टपणे लक्षात येतं, ते प्रेमप्रकरणाच्या संदर्भात. सामान्य चित्रपटीय प्रेमप्रकरणासारखा इथे दोन्ही बाजूंवर भर येत नाही. चित्रपटात शालूचं असणं हे केवळ जब्याच्या नजरेतून येतं. तिचे प्रसंग येतात, ते केवळ जब्याच्या आकर्षणाचं दृश्यरूप म्हणून. बाकी ना तिला धड संवाद आहेत, ना व्यक्तिरेखेला खोली. हा अपघात नसून योजना आहे, आणि दिग्दर्शकीय निर्णय म्हणून अतिशय योग्य! चित्रपटाकडे प्रेमकथा म्हणून पाहणं योग्य नाही, हे आपण केवळ या योजनेवरूनही सांगू शकतो.
या चित्रपटातला वास्तववाद केवळ दृश्यापुरता नाही, आशयातही तो जाणवतो. वास्तववादी कलाकृती बंदिस्त अवकाशात, जेवढ्यास तेवढी गोष्ट सांगण्यावर भर देत नाहीत. त्यांचं जग हे मूळ कथानकाच्या चहूबाजूंना पसरलेलं असतं. खर्‍या आयुष्यात गोष्टी पॉईन्ट ‘ए’ ते पॉईन्ट ‘बी’ अशा ठरावीक मार्गावर न चालता एकमेकांशी अशा जोडल्या जातात, की त्यांचा संपूर्ण आवाका सहजपणे दृष्टिपथात येऊ नये. वास्तववादी कलाकृतीही आपल्या शैलीत हा अवाका आणण्याचा प्रयत्न करतात. आपण या घटनाक्रमाचा काही भाग पाहतोय, वाचतोय; पण या पात्रांचं, त्यांच्या समस्यांचं आयुष्य त्या पलीकडेही आहे, असं जणू त्यांना सुचवायचं असतं. ‘फँड्री’मध्येही आपण पाहतो, तो अशा एका वास्तवाचा तुकडा. त्यातल्या सर्व तपशिलांचं समाधानकारक सुटसुटीत उत्तर आपल्याला मिळणार नाही आणि ते मिळावं, अशी अपेक्षा करणंही योग्य होणार नाही. चन्क्याची अशी अवस्था नक्की का झाली, शालूचं जब्याविषयी खरं मत काय, जब्याच्या अखेरच्या लढ्याचा परिणाम काय होईल, असे प्रश्न आपल्या विचारांना खाद्य पुरवतात, मात्र उत्तरं नं सांगता. या प्रश्नांचं असं कथेपलीकडल्या अवकाशाचा भाग असणं, आपल्याला एक सामाजिक वास्तव पाहात असल्याचा अनुभव देतं. असं वास्तव जे सहजी आपल्या कवेत येणार नाही, पण आपल्याला त्याविषयी विचार करतं ठेवेल.
नागराज मंजुळेची राष्ट्रीय पारितोषिक विजेती शॉर्ट फिल्म ‘पिस्तुल्या’ मी पाहिली होती. त्याचा चित्रपटीय प्रयत्न हा सामाजिक बांधिलकीच्या पातळीवर त्याच जातीचा (नो पन इन्टेन्डेड) असला, तरी प्रत्यक्ष दर्जाच्या दृष्टीने ‘फँड्री’ कितीतरी उजवा आहे. त्याच्या तांत्रिक बाजू, अभिनय वगैरे सारं उत्तम आहेच; परंतु माझ्या मते, सर्वात कौतुक व्हायला हवं ते प्रथम प्रयत्न करणार्‍या या दिग्दर्शकाच्या नजरेचं. शेवटी सार्‍यावर त्याचं नियंत्रण अपेक्षित आहे; आणि ते आपण ठेवू शकतो, हे त्याने इथे सिद्धही केलं आहे.
आता प्रश्न उरतो, तो प्रेक्षकांचा. त्यांनी ‘फँड्री’कडे कोणत्या दृष्टीने पाहावं, हा. हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही. मी स्वत: हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला, तो ‘मामी’ महोत्सवात; जेव्हा त्याची हवा तयार झाली नव्हती. त्यामुळे चित्रपट पाहताना अपेक्षांचं ओझं नव्हतं. आज एक बाजू आहे, जी चित्रपटाच्या आजवर झालेल्या कौतुकाचा, पारितोषिकांचा दाखला देऊन तो ‘आॅस्करवर्दी’ आहे असं मानते; तर दुसरी, जी त्याच्या फसव्या जाहिरात तंत्राकडे बोट दाखवून नाराजी व्यक्त करते. माझ्या मते, या दोन्ही बाजूंनी फँड्री पाहणं हे त्याच्यावर अन्यायच करणारं आहे. हे उघड आहे, की इतका चर्चेत असणारा चित्रपट, या ना त्या अपेक्षांच्या प्रभावाखाली पाहिला जाईल आणि त्या अपेक्षा अंतिमत: तुमच्या दृष्टीवर परिणाम करतील. मात्र मी म्हणेन, की अवघड असलं तरी आजवर ऐकलेलं सारं, हा चित्रपट पाहण्याआधी विसरायचा प्रयत्न करा. जितक्या मोकळ्या मनाने तो पाहाल, तितका तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक. आणि जर तो तसा पोहोचू शकला, तर मराठी चित्रपटांमधला आशादायक बदलाचा काळ अजून सरलेला नाही, असंच म्हणावं लागेल.
ganesh.matkari@gmail.com