आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबांची ऊर्जाप्रवाही ‘इन्व्हेस्टमेंट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या घरात अनेक वर्षांपूर्वीपासून एक रिच्युअल आहे. वाचनाचं, बाबांनी घरच्यांसाठी केलेल्या. नव्या साहित्याच्या आणि अर्थातच बाबांनी लिहिलेल्यासुद्धा. साहित्य मग ते कोणत्याही प्रकारचं. मग ती भाषणं असतील, लेख असतील, कथा असतील, नाटकं आणि पटकथाही. नाटकांची/पटकथांची वाचनं अर्थात पुढे इतरांसमोरही होतात. दिग्दर्शकांसमोर, निर्मात्यांसमोर, नटसंचासमोर. पण हे वाचन त्याआधीचं. पूर्वीपासून या वाचनाला आम्ही चौघं असणं गृहीत. आई (प्रतिभा मतकरी), मी, सुप्रिया (सुप्रिया विनोद) आणि अर्थात ते स्वत:. एकदा का वाचन झालं की मग चर्चा/ गप्पा. काही वेळा या वाचनाच्या आधी आईसाठी एक खास वाचनही होत असे, पण नेहमीच नाही. मी शाळेत असल्यापासून यात फार बदल झाल्याचं आठवत नाही. एक्स्टेंडेड फॅमिलीचा, म्हणजे पल्लवी आणि मिलिंदचा शक्य तेव्हा सहभाग हा एक बदल, आणि हल्ली सर्वांच्या वेळांच्या अडचणीमुळे काही वेळा आम्हाला बाबांकडून ऐकायला न मिळता स्वत: वाचायला लागणं हा दुसरा बदल. हे आमच्या कोणाचं फार आवडतं आॅप्शन नाही. हा नाइलाज. इन्व्हेस्टमेंट ही कथा माझ्या आठवणीप्रमाणे, मी वाचली; ऐकली नाही. त्यामागे कारण काय हे आता आठवत नाही; वेळा जमणं ही बहुधा नित्याची अडचण असावी, पण पटकथेचं वाचन चांगलं स्मरणात आहे.
बाबांची वाचनाची पद्धत उत्तम (नाटक उद्योगातल्या अनेकांना आधीच माहीत असल्याप्रमाणे) आहे. व्हॉइस मॉड्यूलेशन्समधून व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे उभ्या करणं, त्यांना अचूक साधतं. त्यामुळे आणि कथेची पारायणं झाल्यामुळेही चित्रपट कसा होणार हे आम्हाला तेव्हाच दिसायला लागलं. पण कथावाचन आणि पटकथा वाचन यांत एक मोठा फरक असतो, जो इथेही होता. कथेचं वाचन हे शांतपणे केवळ रसास्वादाच्या नजरेने पाहता येतं. पटकथेच्या वाचनात, ‘चला, कामाला लागा’ अशी एक अनुच्चारित सूचना असते. ‘कामाला लागणं’ हे काही आम्हाला नवीन नाही. वेळोवेळी बाबांच्या डोक्यातून नव्या नव्या योजना येत असतात, आणि त्या आल्या की त्या दृष्टीने सगळं घरच पावलं उचलतं. मग ती बालनाट्ये जोरात होती त्या काळातली सुटीतली मुलांची नाटकं असोत, कार्यशाळा असोत, ‘सूत्रधार’ने केलेली राज्य नाट्य स्पर्धेतली नाटकं असोत, ‘गहिरे पाणी’सारखी मालिका असो, वा ‘इन्व्हेस्टमेंट’सारखा चित्रपट. अर्थात, इथे एरवीपेक्षा एक मोठा फरक होता, की नाटकं, मालिकांप्रमाणे चित्रपटाचा आवाका आमच्या हातात राहण्याएवढा छोटा नव्हता. तरीही तो व्हायला हवा, हे बाबांनी पक्कं डोक्यात घेतलं. त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीची ती तर्कशुद्ध पुढची पायरी होती. ती गाठता येणार नसेल, तर इतर काही करण्यातही फार मुद्दा नव्हता.
2006/7 ते साधारण 2011 पर्यंतचा काळ हा साधारणपणे त्यांच्यासाठी तरी या एकाच गोष्टीवर केंद्रित झाला होता. फिल्म करणं हे खूपच महत्त्वाचं बनलं. तीही कुठलीही नाही, तर ‘इन्व्हेस्टमेंट’ची फिल्म. खरं तर ‘इन्व्हेस्टमेंट’चं कथारूप इतकं स्ट्राँग होतं की, इतर निर्माता-दिग्दर्शकांनीही स्वारस्य दाखवलं होतं; पण बाबांचा त्याला तत्त्वत: विरोध होता. आम्हा सर्वांना तो मान्यही होता.
‘इन्व्हेस्टमेंट’च्या आशयाचा तोल हा नाजूक होता. एक तर ते बाबांचं आजच्या समाजाविषयी, त्यातल्या प्रवृत्तींविषयी असणारं स्टेटमेंट होतं, निरीक्षण होतं. वरवर पाहता ती एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि त्यांच्या आयुष्यातल्या एका गुंत्याची गोष्ट असली, तरी त्याचा आशय हा या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. त्यात मांडलेले दृष्टिकोन महत्त्वाचे होते. संस्कार-पारंपरिक आणि आधुनिक, व्यक्तिगत प्रगतीच्या बदलत्या कल्पना, मुलं आणि पालक यांमधलं आजचं नातं, समाज घेत असलेली नवी दिशा अशा बर्‍याच गोष्टींविषयी त्यात बोललं जात होतं, तेही संदेश देण्याचा आविर्भाव न आणता. गोष्टीला प्रमुख स्थान देत. हा तोल जरा इकडेतिकडे होता तर चित्रपटच बदलला असता. त्यामुळे तो कोणा दुसर्‍या दिग्दर्शकाकडे सोपवणं अवघड होतं. काही लोक विशिष्ट ओळखींमध्ये अडकतात. बाबा बर्‍याच वेगवेगळ्या ओळखींमध्ये अडकले आहेत. कोणी त्यांना आपण लहानपणी पाहिलेल्या बालनाट्याशी जोडलंय, कोणी मोठ्या वयात पाहिलेल्या व्यावसायिक नाटकांशी, कोणी गूढकथांशी वगैरे वगैरे. या लेखक म्हणून असलेल्या ओळखीत अनेक नाटकं, मालिका दिग्दर्शित करूनही त्यांची दिग्दर्शक ही ओळख दुय्यम राहिली आहे. पण आम्हाला ही ओळख आहेच. त्यामुळे निर्माता शोधताना वेळ गेला तरी चित्रपट दुसर्‍या कोणाला देण्याचा विचार आमच्या कोणाच्याच डोक्यात आला नाही. पण हा तिढा सुटणार कसा, हा प्रश्न होताच. तो अचानक सुटला, तो 2011च्या उत्तरार्धात; बाबांच्या सतत या चित्रपटाविषयी चाललेल्या विचारमंथनातून.