आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कबिरा'तले 'कॅपिटॅलिस्ट' काळसेकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीश काळसेकरांना त्यांच्या ‘वाचणा-याची रोजनिशी’साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला याचा माझ्यासारखाच आनंद त्यांच्या असंख्य मित्रांना आणि चाहत्यांना झाला असणार. त्यांचे ‘असंख्य मित्र’ असं मी म्हणतो, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर खरोखरीच त्यांचे असंख्य मित्र दिसत असतात. महाराष्‍ट्रात आणि महाराष्‍ट्राबाहेर भारतभर त्यांचा हा मित्रपरिवार पसरलेला आहे.
60च्या दशकात लहानलहान गावांमधून, मध्यम वा निम्न आर्थिक स्तरातून आलेली विशीच्या आसपासची काही तरुण मंडळी महानगरात आल्यानंतर काही समान धाग्यांनी एकत्र आली होती. तुलसी परब, जसे त्या दरम्यान कोकणातून आले, तसेच काळसेकरही कोकणातून आलेले. घरी शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. सिंधुदुर्गजवळचं काळसे हे त्यांचं गाव. धामापूरजवळचं. मुंबईसारख्या महानगरात आल्यानंतर या तरुणांमध्ये आसपासच्या बहुस्तरीय जगण्यातल्या विविध परी, त्यांचे परस्परसंबंध आणि जगातल्या पसा-यातल्या अनेक गोष्टींचे अर्थ समजून घेण्यासाठीचं तीव्र कुतूहल हाही समान धागा होता. आपल्या परिघाबाहेरचं जग हे त्यामुळेच त्यांना जवळ करता आलं. साठ आणि सत्तरच्याही दशकातल्या विविध चळवळींनी रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीच्या आश्वासक नात्यांवर विसंबता येण्याच्या शक्यता वास्तवात आणल्या होत्याच. पण या पिढीतल्या तरुणांना मार्क्सवादातून आपल्याला पडत असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असंही वाटत होतं. त्या काळातल्या उलघाली, समस्या, समजून घेण्यासाठी मार्क्सवाद हा त्यांचा आधार होता. त्या काळाच्या तुकड्यात मिळालेले ‘नभ धुंडाळण्याची आस’ असलेले मित्र, त्यांच्यासोबत केलेलं पुस्तकांचं वाचन, पुस्तकांसाठी धुंडाळलेल्या लायब्र-या, दुकानं, रस्त्यावरचे पुस्तकांचे बाजार, जवळून पाहता आलेले अधोविश्वातले बहुविध स्तर आणि त्यातून निर्माण झालेली गंभीर अशी सामाजिक जाणीव, या सगळ्या शिदोरीवर काळसेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचं पोषण झालेलं आहे. त्यांच्या कवितेवर आणि गद्य लेखनावरही याच्या सकारात्मक खुणा आपल्याला दिसतात. त्यांच्या पिढीतली कविता आमच्या पिढीनं अतिशय आस्थेनं, आवडीनं आणि काही अंशी श्रद्धेनंही वाचली. अरुण कोलटकर, मनोहर ओक, तुलसी परब, वसंत गुर्जर, नामदेव ढसाळ, चित्रे आणि नेमाडे यांच्या कवितांनी आम्हाला सुरुवातीच्या काळात वेगळंच जग दाखवलं. त्याच दरम्यान काळसेकरांचे ‘इंद्रियोपनिषद’ आणि ‘साक्षात’ हे कवितासंग्रह वाचलेले होते. या कवितांवर आम्ही खुश होतो. लघुअनियतकालिक चळवळीसंबंधीचं लेखन आम्ही वाचत होतो. त्यामुळे त्यांच्या कवितेचा आणि भूमिकेचा मला परिचय होता. पण त्यांच्या- माझ्या प्रत्यक्ष भेटी तशा अलीकडच्या; दहा-पंधरा वर्षांपूर्वीपासूनच्या. एकदा त्यांच्याशी मैत्री झाली, की मग आपण वेगानं त्यांच्या आवडत्या अनेक गोष्टींमध्ये ओढले जातोच. त्या-त्या काळात वाचत असलेली मराठी-हिंदी-इंग्रजी पुस्तकं, नियतकालिकं, नवे-जुने लेखक, बाजारात नवं कोणतं पुस्तक आलं आहे, याची केवळ आस्थेनं ते माहिती देऊन थांबत नाहीत, तर अनेकदा पुस्तकांच्या प्रती विकत घेऊन मिळवून देणं, दुर्मिळ पुस्तकांच्या छायाप्रती करवून देणं, यात त्यांना मनापासून आनंद मिळत असतो, हे मी अनुभवलं आहे. त्यांचा हा आनंद निर्व्याज असतो, हेही मला माहीत आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांच्यामुळे मला अतिशय मौलिक पुस्तकं वाचता आली. यात आवडलेलं संगीत, दुर्मिळ रेकॉर्डिंग्जच्या सीडीज असाही लाभ पुन्हा मुद्दलावर व्याज न्यायानं होत असतो!
काळसेकरांना प्रिय असलेल्या चार गोष्टी कोणत्या, असं विचारलं तर त्यांचा थोडा परिचय असलेलेही सांगू शकतील की, पुस्तकं, मित्र, प्रवास आणि खाद्यजीवन सार्थ करणारे विविध पदार्थ या त्यांच्या अत्यंत प्रिय गोष्टी आहेत. या चारही गोष्टींसाठी त्यांच्याकडे अखंड रसरसता उत्साह असतो आणि त्यांच्या या उत्साहाचा हेवाही वाटतो. ज्ञानावरची श्रद्धा आणि मैत्री ही मूल्यं त्यांना सुरुवातीच्या मुंबईतल्या वास्तव्यानं दिलेली असल्यानं, ते आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल एखाद्याने उदारपणे मेवा वाटावा, तसं भरभरून सांगत असतात. वाचतो ते वाटून घ्यावं; इतरांनाही त्यात सामील करून घ्यावं, या निखळ प्रेरणेनं ते लिहीत असतात, हे वारंवार ध्यानात येतं. त्यांच्या वाचनातल्या पुस्तकांची रेंज ही विस्मित करणारी आहे. संतवाङ्मयापासून अलीकडच्या पाश्चात्त्य लेखकांपर्यंत आणि त्यातही पुस्तकांवरची पुस्तकं (बुक्स ऑन बुक्स), सारामागो-मार्क्वेझसारख्यांची, गायक -संगीतकारांची आत्मचरित्रं, तादेउश्झ रोजोविच, मेहमूद दरवेश, शिम्बोर्स्का आणि जगभरातल्या अशाच कवींच्या कविता, प्रवासवर्णनं, पक्षी-पर्यावरणविषयक पुस्तकं, मुलाखती, वैचारिक साहित्य असं प्रचंड वैविध्य काळसेकरांच्या वाचनचारित्र्यात आहे.हे सर्व उत्साहानं मिळवून वाचणं आणि तत्परतेनं मित्रांना-वाचकांना कळवणं, हा त्यांचा स्वभावभूत विशेष झालेला आहे.
बँकेतून निवृत्त झाल्यानंतर काळसेकरांनी पेणला हौसेनं घर बांधलं. त्या घराचं नाव ‘कबिरा’. लॉरी बेकर यांचे शिष्य गोपाल यांनी डिझाइन केलेली ‘चित्रकुटीर कलाग्राम’ ही कलावंतांसाठीची मोठ्या टेकडीवरची अतिशय देखणी अशी वसाहत आहे. काळसेकरांच्या या वेगवेगळ्या लेव्हल्स असलेल्या देखण्या घरात चोहीकडे पुस्तकंच पुस्तकं दिसतात.
जिन्याच्या शेजारच्या भिंती, खोल्यांमधल्या भिंती छतांपर्यंत पुस्तकांनी भरून गेलेल्या आहेत. अतिशय मायेनं नीट वर्गवारी करून ही सगळी पुस्तकं मांडलेली आहेत. एवढ्या पुस्तकांना सांभाळणं, म्हणजे व्याप असणारच. मग त्यांना वाळवी आणि इतर कीटकांपासून वाचवण्यासाठीची औषधं वगैरे शोधणं आलं. (मागे त्यांनी पुस्तकांची निगा राखण्यासाठी काही साहित्य मिळतं का, याचा तपास घेत असताना ‘वेखंडाची पूड यासाठी कशी गुणकारी आहे’ अशा काहीशा आशयाचा इंग्रजी लेख मिळवून मलाही पाठवला होता!) जागा मिळेल तिथं नवनवी पुस्तकं येऊन विनातक्रार बसतात. दर वेळी नवी खरेदी करताना ‘या वेळी मी आता पुस्तकं नेणार नाही’ असं ते म्हणता म्हणता, काही पुस्तकं दर प्रवासानंतर घरी येतातच. त्यांच्याबरोबर दोनदा दिल्लीच्या जागतिक पुस्तक मेळ्याला मीही होतो. तेव्हा हे मी पाहिलं आहे. एकदा तर त्यांनी काहीच न्यायचं नाही, असा भीष्मनिश्चय केला होता; पण कुठेतरी वॉल्टर बेंजामिनच्या लेखनाचे खंड दिसले आणि अखेर मोहाला बळी पडून त्यांनी ते ओझं आणलंच!
त्यांच्यासोबत प्रवास करणं ही मौज असते; पण सरळ साधे प्रवास त्यांना भावत नाहीत, असं दिसतं. जास्तीत जास्त कठीण आणि अवघड यात्रा झाली की, ते खुशीत असतात. ‘...पण मजा आली की नाही!’ असं वर त्यांचं म्हणणं असतं. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहेच. दिल्लीत गेलो की हिंदी साहित्य विश्वातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक यांच्या हमखास भेटी होतात. काही वर्षांपूर्वी कडाक्याच्या दिल्लीच्या गारठ्यात जीव नसलेल्या उन्हात एक रंगलेली उबदार मैफल आठवणीत आहे. विष्णू खरे, मंगलेश डबराल, वीरेंद्र डंगवाल असे मोठे कवी आलेले होते आणि आम्ही दुपारी अकरा वाजता भेटलेलो; संध्याकाळी साडेपाचपर्यंत गप्पांमध्ये रंगून गेलेलो होतो. तशाच गप्पांच्या मैफली उदय प्रकाश, ज्ञानरंजन, चंद्रकांत देवताले अशा कवी-लेखकांबरोबर मुंबईत, नागपुरात किंवा पेणच्या ‘कबिरा’त झालेल्या-स्मरणात आहेत.
लघुअनियतकालिकांच्या चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते, अशी काळसेकरांची ओळख तर आहेच. लोकवाङ्मय प्रकाशनगृहाचे ते सल्लागार आहेत आणि त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्तेपण यांमुळे त्यांना महाराष्‍ट्राच्या कोप-याकोप-यांतून नवनवे लेखक धुंडाळणं, त्यांच्या लेखनावर नजर ठेवून त्यांची पुस्तकं प्रकाशित होतील असं बघणं, हे शक्य होतं. त्यांचं कार्यकर्तेपण त्यांनी बँकेच्या युनियनमध्ये काम करताना आणि प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून काम करतानाही निष्ठेनं सांभाळलं आहे. ‘पीडब्ल्यूए’च्या परिषदा-सभांमुळे त्यांचा भारतातील विविध भाषांमधल्या बांधिलकी मानणा-या साहित्यिकांशी जिवंत संपर्क राहू शकला. यामुळेच त्यांना उलट बाजूने स्वत:च्या भाषेकडे, लेखनाकडे चिकित्सक रीतीनं पाहता आलं. हा थेटपणा चळवळीतून आलेला आहे आणि त्यांच्या मालवणी असण्यातूनही आलेला आहे.
त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या तीव्र आवेगी प्रेमकविता आणि प्रखर मार्क्सवादाची पार्श्वभूमी यामुळे त्यांची जी प्रतिमा आपल्यासमोर असते, त्या उलट त्यांना मी अतिशय मऊ, प्रेमळ आणि प्रसंगी भावूक असलेलंही पाहिलं आहे. हेच त्यांच्या ऐसपैस माणूसपणाचं मर्म आहे. त्यांचं पुस्तकांवरचं प्रेम, त्यांच्याकडचा प्रचंड ग्रंथसंग्रह, त्यांचा विस्तृत असा मित्रपरिवार यामुळे काळसेकर समृद्ध झाले आहेत. हे त्यांच्यासाठी मौलिक भांडवल आहे. त्या अर्थानं ते ‘कॅपिटॅलिस्ट’ आहेत. पण त्या असण्यात औदार्य अधिक आहे. देत राहणं, वाटून घेणं अधिक आहे. साहित्य अकादमीचा सन्मान त्यांच्यासारख्या बहुश्रुत असलेल्या, सखोल सामाजिक जाणिवेच्या कवी-लेखकाला कधी तरी मिळायला हवा होताच. तो मिळाल्याच्या बातमीनं त्यांना स्वत:ला किती आनंद झाला असेल, माहीत नाही; पण त्यांच्या सर्वदूर पसरलेल्या असंख्य मित्रांना तो निश्चितच झाला आहे.
ganesh.visputay@gmail.com