आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रम्हगिरीच्या डोंगरात आफ्रिकेच्या ठसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी खर्च पण जास्त उत्पन्न, असे ‘श्री’ पद्धतीचे सूत्र. इंग्रजीत याला एसआरआय (सिस्टम ऑफ राइस इन्टेन्सिफिकेशन) म्हणतात. आफ्रिकेतील मादागास्कर देशात राहणारे फादर हेन्डी डी यांनी या पद्धतीचा शोध लावला. आज या पद्धतीने हळूहळू उत्पन्न वाढीचा आलेख चढत गेला आहे. पारंपरिक लागवड पद्धतीने एकरी ७ पोते भात होत होते, ‘श्री’ पद्धतीने ते प्रमाण एकरी ३५ पोत्यांवर गेले आहे.

उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न जास्त... याची हमी देणारी पद्धती असेल तर ती कोणता शेतकरी नाकारेल? आणि त्यातही उत्पन्न जास्त म्हणजे नेमके किती जास्त, तर दुप्पट तिप्पट नाही तर तब्बल सहा-सातपट! दहा वर्षांपूर्वी मी भातशेतीला सुरुवात केली, तेव्हा मला हे कुणी सांगितले असते, तर माझाही विश्वास बसला नसता. पण आज मी एका रुपयाचे कर्ज न घेता तब्बल ७ लाखांचे भांडवल जमवून चार किलोमीटरची पाइपलाइन टाकू शकलो, ते निव्वळ आणि निव्वळ सुधारित शेती पद्धतीचा ‘श्री’गणेशा केल्यामुळे.

त्र्यंबकेश्वरजवळच्या अंजिनेरी गावातलं माझं शेत. ब्रह्मगिरीच्या डोंगरांमध्ये वसलेलं. आमच्या घरची पारंपरिक भातशेती. माझ्या वाट्याला आलेल्या तीन एकरांपैकी सलग दीड एकराचा एकमेव सलग पट्टा. बाकी सारे चढउतारावरचे तुकडे-तुकडे. दीड एकराच्या सलग पट्ट्यावर आम्ही सगळ्यांप्रमाणेच भात लावत होतो. आधी घरचे कोळपी तांदूळ लावत होते. मी ‘इंद्रायणी’ला सुरुवात केली होती. दरम्यान, ‘बायफ’ संस्थेच्या वाडी प्रकल्पाच्या निमित्ताने काही संशोधक भेटले. त्यांनी भात लागवडीच्या ‘श्री’ पद्धतीची माहिती दिली. पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी खर्च पण जास्त उत्पन्न, असे याचे सूत्र. इंग्रजीत याला ‘एसआरआय’ म्हणतात - सिस्टम ऑफ राइस इन्टेन्सिफिकेशन. आफ्रिकेतील मादागास्कर देशात राहणारे फादर हेन्डी डी यांनी या पद्धतीचा शोध लावला.
 
पारंपरिक भात लागवडीत रोपांच्या चुडांची लावणी केली जाते, तर यात त्या ऐवजी एकेक रोप स्वतंत्र करून लावले जाते. पण काटेकोर मोजमाप करून. हाच काय तो फरक. संस्थेच्या प्रशिक्षण शिबिरात याची माहिती मिळाली. पण शेतकरी म्हणून पूर्ण पद्धती बदलणे धोक्याचे होते. त्यामुळे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली एक×एक मीटरचे दोन नमुना प्लॉट तयार केले. एकावर पारंपरिक पद्धतीने लागवड केली, तर दुसऱ्यावर ‘श्री’ पद्धतीने स्वतंत्र रोपांची. त्याच वेळी ‘श्री’ पद्धतीचा फायदा लक्षात आला. तेव्हापासून मी भात लागवडीची हीच पद्धत स्वीकारली. हळूहळू उत्पन्न वाढीचा आलेख चढत गेला. पारंपरिक लागवड पद्धतीने माझ्या शेतात एकरी ७ पोते भात होत होते, ‘श्री’ पद्धतीने ते प्रमाण एकरी ३५ पोत्यांवर गेले. पारंपरिक पद्धतीच्या भात लावणीत वाफ्यावरची रोपं ३० दिवसांची झाल्यावर वाफ्यावरून ती काढून चुडांने त्याची लागवड केली जाते. त्यामुळे प्रत्येक चुडात चार-पाच रोपं एकत्र लावली जातात. त्यामुळे रोपं अधिक लागतात, आणि सर्वांचे सारखे पोषण होत नाही. तसेच उशिरा काढणी झाल्याने रोपांची मुळे सुटतात, झाडाला इजा होते.
 
आवणीनंतर झाडाची बरीच ऊर्जा ते नुकसान भरून काढण्यात खर्ची होते. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होतो. त्याऐवजी ‘श्री’ पद्धतीत पहिल्या १०-१२ दिवसांतच रोपांची लावणी केली जाते. त्यामुळे ती कोवळी असतानाच रुजतात आणि त्यांच्या मुळांना इजा पोहोचत नाही. या पद्धतीत एकेक रोप वेगळे करून एकल रोप २५×२५ सेंटीमीटरच्या अंतरावर दोरीच्या गाठी मारून काटेकोरपणे रांगेत लावले जाते. त्यामुळे प्रत्येक रोपाला स्वतंत्रपणे पोषण मिळते, झाडाची पूर्ण कार्यक्षमतेने वाढ होते. रोपांना जास्तच फुटवे येतात. लोंब्या अधिक लांब वाढतात. त्यात जास्तीचे दाणे भरतात आणि आपोआपच उत्पादकता वाढते.

पारंपरिक पद्धतीतील तण आणि पाणी या दोन्ही प्रश्नांना यात पर्याय मिळाले आहेत. २५ सेंटीमीटरच्या रांगांमध्ये लागवड झाल्याने दोन रांगांच्या मधून कोळपणी यंत्र सहज फिरवता येते. त्यामुळे दोन वेळा हे यंत्र भाताच्या रांगांमधून फिरवले, तर तणाचा बंदोबस्त होतो. आलेले तण जमिनीत दडपले जाऊन हिरवे खत तयार होते. वाटेत येणारी मुळे छाटली गेल्याने नवीन पांढरी मुळे उगवतात, ज्या द्वारे रोपांना अधिक पोषण मिळते. दुसऱ्या कोळपणीनंतर तण उगवतच नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे कोळपणी यंत्र आम्ही आमच्या हाताने घरच्या घरी वापरू शकतो. त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो. मी आतापर्यंत जसे शेतासाठी एक रुपया कर्ज घेतले नाही, तसेच आतापर्यंत एक रुपयांची मजुरीही दिलेली नाही. सगळी कामे आम्ही कुटुंबीय घरच्या घरी करतो. ‘श्री’ पद्धतीने ते अधिकच सोपे झाले आहे.

भाताच्या खाचरांमधील पाणी व्यवस्थापनासाठीही ही पद्धत खूप उपयोगी ठरते आहे. पारंपरिक पद्धतीत भाताच्या शेतात भरपूर पाणी भरून ठेवावे लागते. पावसाने ओढ दिली तर रोपं कोमेजतात. यात पाणी साठवायचे नाही, तर अतिरिक्त पाणी काढून द्यावे लागते. त्यामुळे कमी पाण्यावरही ही रोपं जोमदार होतात. पावसाने ओढ दिली, तर काढून देण्याचे पाणी अडवणे फक्त गरजेचे असते.

‘श्री’ पद्धतीने मी एकरी ७ क्विंटल तांदळाचे उत्पादन ३५ क्विंटलपर्यंत पोहोचविले आहे. महाराष्ट्राला तांदळाचे कोठार म्हटले जाते, पण महाराष्ट्राचे तांदळाचे उत्पादन एकरी ८ क्विंटल आहे. पंजाबमधील तांदळाची उत्पादकता १५ क्विंटल आहे. आणि माझ्या शेतातील भाताची उत्पादकता ३५ क्विंटल. सुधारित शेती करा, हाच माझा शेतकरी बांधवांना सल्ला आहे. मी त्यामुळेच शेतीत यशस्वी झालो, तुम्हीही व्हा..
 
- शब्दांकन : दीप्ती राऊत
diptiraut@gmail.com
बातम्या आणखी आहेत...