आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हे गणराया...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांत तुझे आगमन होणार. तुला वंदन करीत आम्ही तुझी प्रतिष्ठापना करणार. हे ‘‘आम्ही’’ म्हणजे कोण? आमच्यातील, आमचे वाटणारे, आमच्यासारखे दिसणारे; परंतु आम्हालाही अपरिचित. ‘पुढे गणपती, मागे तीन पत्ती’ असा प्रकार सर्रास करणारे. आपली लहान गावे, शहरे सोडून महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीत राजरोसपणे जुगाराचे अड्डे जमवणारे. तुझ्याआड लपून सोसायट्या, लहान-मोठ्या वस्त्यांमध्ये जाऊन पहिली पावती चारआकडीच असावी, हा आग्रह धरणारे. सारे दुकानदार चोर असतात, त्यांच्याकडून पाचआकडीच वर्गणी मिळायला हवी, म्हणत त्यांना धाक दाखवणारे. हा धमकावणीचा खेळ ते शिकले कुठून? घरातून. आसपास राहणार्‍यांनी त्यांना गर्दुले बनवले. गणेशोत्सवाच्या काळात ‘मंगलमूर्ती मोरया’ म्हणताना रात्र रात्र बाहेर राहणार्‍या काहींना रोज जिंकताना-हरताना आम्ही पाहिले. मंडळाच्या गणपतीची पूजा करताना मारामार्‍या-नाल लावणे, सारे लहानपणापासून आम्ही ऐकत गेलो, पाहत गेलो.

हे गणेशा, तुझ्यापाशी मोठ्यांची तक्रार नाही रे. रुपयाची घसरण एवढी झाली नव्हती, त्या काळात रुपयाबरोबर मूल्यांची घसरण आम्ही शिकलो. मुलीकडे पाहण्यासाठी नजरेत वासना आणि विखारच हवा. तिचे वय कितीका असेना, आसक्ती वाटली की तिच्या शरीरावर सक्ती करायची. एकाने नव्हे तर अनेकांनी. त्याबद्दल कोणतीही भयंकर शिक्षा मिळत नसते. वर्षानुवर्षे खटले चालणार्‍या या देशात आम्हाला जगण्याचे स्वातंत्र्य नको? असा खडा सवाल करीत मोकळेपणाच्या आवरणाखाली पार्ट्या-दारू-रात्रीचा नशिला सहवास आम्ही उपभोगतो. आमच्या बोटांमध्ये तुझ्या असंख्य रूपांच्या अंगठ्या असतात. गळ्यात साखळ्या असतात. त्यातही तू ठसठशीत दिसावा, अशी योजना असते. कपाळावर कुंकू-गुलाल-अंगारा असतो. तोंडात गणपती देवा, गजानना, गणनायका, अशी तुझी संबोधने असतात. तुला कोणी नाव ठेवले रे ठेवले की आमची माथी भडकतात. तुझी आरती स्वत:साठी थोडी का आम्ही लावतो? तिचा नाद सर्वदूर पोहोचायला नको? सुखकर्त्याच्या समोर केलेली सजावट-रोषणाई घराघरांत पोहोचली पाहिजे.

आवाजाची तक्रार कोणी करत असेल, प्रत्यक्ष विनायकाला कोणी विरोध करत असेल, तर दुख:कर्ता बनून आम्ही जाणारच ना? त्यातून होतात भांडणे. भडकवतात राजकीय पक्ष आम्हाला. भोसकला जातो एखादा निष्पाप. काय करणार...?

गौरीपुत्रा, आम्हाला तुझ्याबद्दल अपार प्रेम आहे. भक्ती आहे. या दहा दिवसांत ते दाखवण्याची अहमहमिका आम्हा सर्वांमध्ये असते. कोणी ही स्पर्धा निर्माण केली? लोकमान्य टिळकांनी काय केले, त्यांचा हेतू काय होता, याबद्दल नीट माहिती नाही. मात्र गल्लोगल्ली आम्ही एकत्र येतो, केवढे तरी प्रोग्राम्स करतो, यावर टीका का व्हावी? या आयोजनाचा आम्हाला काय त्रास होतो, हे कोणी जाणून का घेत नाही?

कलावंत, प्रतिभावंत, कवी सार्‍यांना बोलावणे सोपे का असते? पूर्वी त्यांचे मानधन कमी असायचे. आता तुझी मूर्ती स्वस्त वाटावी, इतके धन त्यांना द्यावे लागते. त्यांचे विचार आम्ही दिलेल्या पाकिटानुसार प्रेरक बनू लागतात. त्यांचे शब्द, गीतरचना पाकिटाच्या आकारानुसार वाढू लागते. पब्लिक डिमांडनुसार सध्या आम्हाला वागणे भाग पडते. आबालवृद्धांना आजकाल ‘आयटम-साँग-डान्स’ हवा असतो. त्यांचा रोष नको म्हणून जमा करावा लागतो पैसा. भाषणे नकोत; धम्माल ठेवा काहीतरी, हा त्यांचा आग्रह. हेही खरे की, या दहा दिवसांत आम्हाला मस्त आनंद हवा असतो. तुझ्या नावाखाली तो मिळू शकतो. पण स्वत:ला ग्रेट म्हणणारी मंडळी धनाशिवाय तुझ्या दारी का येत नाहीत, हे मात्र कळत नाही.

गजानना, प्रत्येक वर्षी आम्ही संकल्प सोडतो. आमचा चांगल्याचा संकल्प. शुभ करण्याचा, सद्वर्तनाचा, संवेदना जागवण्याचा, सहवेदनेचा, सामंजस्याचा...पण वर्षभरात आम्ही हत्या घडवून आणतो, आत्महत्या करतो, सुडाने पेटून उठतो. हीन आणि क्षुद्र होतो. हल्ले करतो-शरीरावर-मनावर-वस्त्यांवर. हेच पौरुष म्हणून उजळ माथ्याने वावरतो... तुझ्या आगमनाच्या वेळेस उत्साही नि विसर्जनाच्या वेळेस भावुक होतो... कदाचित म्हणूनच लंबोदरा तू आम्हाला क्षमा करतोस...

आठ दिवसांनी तू येशील. या वेळेस मात्र आमच्यातील वासनेचा धिक्कार करीत ये. विकारांकडे वक्र दृष्टीनेच पाहा. बुद्धीची तू देवता आहेस. तिचाच प्रसाद दे. विघ्नहर्त्या, हेच मागणे तुझ्यापाशी आहे. त्याचा स्वीकार कर.