आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्टी कोरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ 1920 चा! गर्टी कोरी यांच्या पतीला, म्हणजे कार्ल कोरी यांना एका अमेरिकन विद्यापीठाने त्यांच्या स्वप्नातली नोकरी देऊ केली; पण अट एकच होती, ती म्हणजे कार्ल कोरी यांनी त्यांच्या पत्नीसोबत, म्हणजे गर्टीबरोबर काम करणे थांबवले पाहिजे. कार्ल कोरी यांनी याला नकार दिला आणि गर्टीबरोबर काम करणे चालू ठेवले. हा निर्णय ऐकून विद्यापीठातील भले भले लोक चकित झाले. त्यांनी गर्टी यांना बाजूला नेऊन सांगितले की, त्या त्यांच्या पतीचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत.
पुढे या जोडप्याने असे काम केले की गर्टी यांना 1947 मध्ये नोबेलने सन्मानित करण्यात आले आणि त्या विद्यापीठाने एका महत्त्वाच्या आणि अत्यंत हुशार जोडप्याला गमावले. त्या वेळी पत्नीसोबत काम करणे हे अमेरिकन सभ्य वर्तन मानले जायचे नाही. या जोडप्याने एकरूप होऊन आणि अत्यंत आदर्श असे काम निर्माण केले. आपल्या शरीरातील पेशी अन्न कसे ग्रहण करतात आणि त्यापासून ऊर्जा कशी निर्माण करतात हे अगदी मूलभूत संशोधन गर्टी आणि कार्ल यांनी केले. 1920 च्या दरम्यान हे सांगणेदेखील क्रांतिकारी होते. हे ‘कोरीचे चक्र’ आज शालेय अभ्यासक्रमात आपण शिकतो इतके ते मूलभूत आहे. स्नायू हे साखरेपासून त्वरित ऊर्जा कशी तयार करतात आणि स्नायू आणि यकृत जास्तीची ऊर्जा साठवून ठेवते जी आपल्याला हवी तेव्हा उपलब्ध असते. याचे संशोधन गर्टी यांनी केले.
गर्टी कोरी या एक अमेरिकन जीवरसायन शास्त्रज्ञ होत्या. त्या नोबेल पारितोषिक मिळवणाºया तिसºया महिला शास्त्रज्ञ, पहिल्या अमेरिकन महिला शास्त्रज्ञ आणि शरीर विज्ञानातल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत्या. यांचा जन्म 15 आॅगस्ट 1896 चा. या काळात महिलांना शिक्षणासाठी फारसे प्रोत्साहन दिले जात नसे आणि संशोधन क्षेत्रापासून दूर ठेवण्यात येत असे. त्यांच्या काकांनी त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले, मुलींच्या शाळेत घातले. मुलींच्या शाळा असत; पण मुलींना प्रत्यक्षात मात्र फारसे पाठवले जात नसे. शिवाय शरीरविज्ञानशास्त्रात प्रवेश घेण्यासाठी लागणारे विषयही शिकवले जात नसत. गर्टी यांनी मात्र हे विषय अवघ्या एका सुटीत आत्मसात केले. आणि अखेरीस त्या मेडिकल कॉलेजमध्ये गेल्या. इथे त्यांना दोन प्रियजन मिळाले ते म्हणजे, जीवरसायनशास्त्र आणि कार्ल कोरी. जीवरसायनशास्त्र तसे नुकतेच प्रगत व्हायला लागले होते. रसायनशास्त्रातील तत्त्वे वापरून जीवशास्त्रीय प्रश्नांची उत्तरे शोधायची हा या शास्त्राचा पाया. युरोपमधील परिस्थिती बिघडत चाललेली असल्यामुळे दोघांनी युरोप सोडले आणि ते अमेरिकेला गेले. गर्टी यांनी आपले संशोधन कार्लसोबत पुढे सुरू ठेवले. त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांचे स्वत:चे आणि कार्लसोबत अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. गर्टी आणि कार्ल यांना दोघांना शरीरात ऊर्जा एका ठिकाणावरून दुसरीकडे कशी जाते यात उत्सुकता होती. एका फ्रेंच शरीर शास्त्रज्ञाने शरीरात स्टार्चसारखा पदार्थ असतो हे सांगितले होते आणि तो म्हणजे ग्लायकोजेन; परंतु त्यांना हे माहीत नव्हते की ग्लायकोजेन हा ग्लुकोजच्या अनेक रेणूंपासून बनलेला आहे आणि जेव्हा शरीराला ऊर्जा हवी असते, तो मोडून ऊर्जा तयार होते. सहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनी गर्टी आणि कार्ल यांनी हे सिद्ध केले. जेव्हा आपण श्रम करतो तेव्हा स्नायूमधल्या ग्लायकोजेनचे विघटन होते आणि त्यापासून साखर तयार होते. स्नायू ही ऊर्जा शोषून घेतात व काही ऊर्जा ही लॅक्टिक आम्लाच्या स्वरूपात शिल्लक राहते आणि शरीरात साठवली जाते. या आम्लाचे रूपांतर अनेक क्रियांमधून पुन्हा ग्लायकोजेनमध्ये होते. या प्रक्रिया गर्टी यांनी प्रथम शोधल्या आणि त्याला ‘कोरीचे चक्र’ म्हणतात. हे समजल्यामुळे याचा अनेक रीतीने उपयोग करून घेता आला. आणि आजही जरा थकल्यासारखे वाटले की प्रथम ग्लुकोज दिले जाते. या शोधासाठी गर्टी यांना कार्ल आणि बर्नार्ड हौझे यांच्यासोबत 1947 मध्ये नोबेलने सन्मानित करण्यात आले. त्यांना अनेक सन्मान मिळाले. चंद्रावरच्या एका विवरला त्यांचे नाव दिले गेले.
काही काळ रेडिएशन्सच्या संशोधनामध्ये घालवल्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम झाला. त्यांच्या शरीरात लाल पेशी तयार होणे कमी झाले आणि त्यांना मज्जातंतूचा आजार झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कार्ल यांनी त्यांचा गौरव ‘एक संवेदनशील, नम्र, दयाळू, उदार, प्रेमळ आणि अध्यात्मिक व्यक्ती’ या शब्दांमध्ये केला. त्यांनी एका फेलोशिपकरिता प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्यांनी कार्ल आणि स्वत:चा उल्लेख केला होता तो कोणीतरी खोडून फक्त कार्ल यांचा उल्लेख केला. कितीही सन्मान मिळाले तरी त्यांना महिला शास्त्रज्ञ म्हणून नेहमीच हिणवले गेले, त्यांना योग्य तो दर्जा आणि आर्थिक मोबदला मिळाला नाही. मोठ्या संघर्षातून त्यांनी संशोधन केले आणि अनेक महिला शास्त्रज्ञांसाठी आदर्श निर्माण केला.
sumiba_r@yahoo.com