आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एलजीबीटी' झिंदाबाद !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या शंभर वर्षांत संथ गतीने लागलेल्या व मानवी आयुष्य बदलणार्‍या शोधाचं अप्रूप केवळ दहा वर्षांत जगाची पार उलथापालथ करणार्‍या शोधांनी धुऊन टाकले आणि सार्‍यांच्या आयुष्याचा ढाचाच बदलून गेला. मानवी आचारविचार, धार्मिक राहणीमानात आमूलाग्र बदल होत, लवचिकपणा अनिवार्य झाला.
जी गोष्ट यांत्रिक परिवर्तनाची तीच मानवी संबंधांचीही. पुरुष, स्त्री आणि त्यांचे संबंध, लग्न, प्रजोत्पादन, सुखी संसार या शतकानुशतके चाललेल्या चक्रालाही कुठतरी धक्के बसले, जे शतकापूर्वीपासूनच या दोन संबंधांव्यतिरिक्त इतरही संबंध असू शकतात म्हणून समाजाला ढोसत होते, पण जनमार्‍यामुळे तेवढेच मागे फेकलेही जात होते; पण हीच शतकाहूनही जास्त काळाची संथ चाल गेल्या दशकात पुन्हा उफाळून उसळून आली. समलिंगी संबंध हे पाप नाही तर ती एक नैसर्गिक देवदत्त निर्मितीच आहे, याचा जागर सार्‍या प्रखर विरोधाला, देहांताच्या शिक्षेला सामोरा जाऊनही घुमत राहिला. पाश्चिमात्त्यांचे फॅड म्हणून, विकृती म्हणून, दुर्धर मानसिक रोग म्हणून संबोधल्या जाणार्‍या समलिंगी स्त्री-पुरुषांनी हे सारे वार सहन केले, पण ते त्यांच्या मूळ आंतरिक उमाळ्या-ऊर्मीपासून जराही दूर गेले नाहीत.
आणि मग चर्चासत्रे, अभ्यास, संशोधन, मानसिक- शारीरिक वैद्यकीय चाचण्या, त्यांचे निष्कर्ष आणि त्याच्या जोडीला समलिंगी म्हणजेच ‘गे’ समुदायाची जगभर घट्ट मुठीने बांधली गेलेली नाळ, यामुळे या विषयाकडे हेटाळणीच्या चश्म्यातून न बघता त्यांना संवेदनशीलतेच्या दारात आणून ठेवले.
तीस-पस्तीस वर्षांपूर्वी बीबीसीच्या ‘चॅनल फोर’ने हिजड्यांवर केलेला माहितीपट पाहून माझी त्या समाजाबद्दलची नुसती उत्सुकताच चाळवली नव्हती तर समाजाकडून त्यांना मिळणार्‍या तुच्छतापूर्वक, अस्पृश्य वागणुकीमुळे कणवही निर्माण झाली होती. पण त्या वेळी कणवेचे रूपांतर ना त्या कोणाबरोबर संवाद साधण्यात झाले, ना जास्त खोलात जाऊन अभ्यास करण्यात.
गेल्या चार-पाच वर्षांपासून हिजडे-समलिंगी-बहुलिंगी यांचे संबंध, त्यांची लग्ने, त्यांच्यावरील हल्ले, कोर्टकचेर्‍या आणि उच्च न्यायालयाची निरीक्षणे व निकाल या संबंधीच्या बातम्या, लेख, पुस्तकेही उपलब्ध होऊ लागली, तेवढी जागरूकता सुजाणांच्या वर्तणुकीतही बदल घडवून आणू लागली. समलिंगी म्हणजे कुणी साथ पसरवणारा रोगी नाही, त्याला आपल्यात सामावून घेण्यास काही धोका नाही... निदान इतपत इतरांची दृष्टी साफ झाली. याच विषयाच्या निमित्ताने अनेक समलिंगी व हिजड्यांशी माझी गाठभेट झाली. कधी सहज तर कधी मी स्वत:च पुढाकार घेऊन त्यांच्याच मोहल्ल्यात-अड्ड्यात जाऊन. अनेक गोष्टींची उकल मला त्यामुळे झाली.
हिजड्यांच्या जीवनाचे सरळ-सरळ दोन भाग आहेत, जे दोन्हीही तेवढेच क्लेशकारक आहेत. मी एखाद्या हिजड्याशी जेव्हा बोलतो, तेव्हा इतर हिजड्यांच्या गप्पागोष्टी, विनोद, गाणी चालू असतात. त्यांना जणू जगाची पर्वा नाहीय. ते आनंद, मस्तीत आहेत, असा आभास निर्माण होतो; पण त्याच वेळी समोरचा हिजडा त्या समाजाच्या हृदय पिळवटून टाकणार्‍या गोष्टींचा पाढा वाचत असतो...
बावीस वर्षांची रूपा नुकतीच हिजडा झाली, त्याचा आनंद तिच्या बोलण्यातून ओसंडत होता. मी खूप खूप भोगले, जिवाचा फार कोंडमारा केला, जीव द्यायचा किती वेळा तरी विचार केला... ती पूर्वायुष्याबद्दल बोलत होती. पुरुष म्हणून जन्माला आले, पण पुरुषीपणाचा अंश ना शरीरात ना मनात घेऊन. सतत मी बाई आहे, मुलगी आहे, हाच मनाचा ध्यास आणि घोषा. मोठ्याने काय, पण हळूही कुणाशी बोलण्याची सोय नाही. मग घरात कुणी नाही बघून कुंकू लाव, बांगड्या घाल, परकर नेस, एवढंच नाही तर आई-बहिणीची ब्रा अंगावर चढवून मग आरशात आपल्याच छातीकडे पाहत राहा, हा माझा रोजचा चाळा चालायचा, जो दिवसभरातला माझा सर्वात सुखाचा क्षण असायचा. तो सोडला की माझा जगाबद्दल, घरच्यांबद्दल, शेजार्‍यापाजार्‍यांबद्दल दुष्टावा. कारण माझ्या प्रती ते सारे दाखवत असलेल्या नीच वर्तनाचा तो उतारा. देव देव, अंगारा-धूप-दर्गा झाले तरी मनाला ना शांती ना समाधान. सारं आयुष्य असंच सडणार, या भीतीचं मानगुटावर भूत... आणि मग तशात या सार्‍या लोकांपेक्षा हिजड्यांची ओढ माझ्या मनाला खेचू लागली. वेश्यावस्तीतील हिजड्यांच्या अड्ड्यावर मन रमू लागले. मी मध्यमवर्गीय पांढरपेशा मुलगा होतो. पण वासना मला हिजड्यांकडे... पुढे होणार्‍या माझ्या भाईबंदांकडे खेचत होती.
सार्‍या घोळक्याने माझं स्वागत केलं एक गिर्‍हाईक आलं म्हणून... मीही त्यांच्यासारखाच लाजलो, मुरकलो... आणि मग तेही ओळखून गेले... काही महिने गेले... मी हिजडा झालो. रूपेशची रूपा झाली. एक आयुष्य संपवून मी स्त्री झालो. मी आतुरतेने वाट पाहत होतो ते नवीन आयुष्य सुरू झालं. माझ्या या पुनर्जन्माने माझं उर्वरित आयुष्य, माझं जगणं खरंच भरून पावलं का...? हाच तिचा प्रश्न इतर समलिंगी स्त्री पुरुषांनाही असावा, असं मला राहून राहून वाटलं...
समलिंगी स्त्री-पुरुषांचे पूर्वायुष्य म्हणजे, ते स्वत: ‘गे’ म्हणून प्रकट होण्यापूर्वीचं हे असंच, त्यांना स्वत:ला जाचक, मनाचा कोंडमारा असलेलं आयुष्य भोगावं लागतं. जन्म झाल्यानंतर कुठलाही मुलगा वा मुलगी समलिंगी होईल, असं ना कुठलं वैद्यकशास्त्र सांगत ना भविष्य. पौगंडावस्थेत वा थोडं आधी समलिंगींची होणारी घालमेल घरच्या-बाहेरच्यांचे दडपण, समाजाकडून नैतिकतेचा दबाव, यामुळे अधिकच वाढते. आणि अशा वेळी जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीशीसुद्धा बोलता येऊ शकत नाही.
आयटी क्षेत्रात काम करणारी अशी पुरुष आणि स्त्री जोडपी ही त्यांच्या जोडीदाराच्या सान्निध्यात माझ्याशी खूप सहजपणे बोलत होती. त्यांच्याही आयुष्याचे दोन भाग, पहिला सार्‍यांना अज्ञात असलेला पण त्यांना स्वत:ला त्रास देणारा असा होता. आणि ‘गे’ म्हणून प्रकटीकरणानंतरचा दुसरा स्वत:ला सुखसमाधान देणारा होता, असे त्यांनीही स्वत:चे अनुभव विशद करत सांगितले. या सार्‍या समुदायाची एक खंत राहून राहून जाणवते आणि ती म्हणजे, त्यांना समाजाकडून मिळणारी उपेक्षा, तिरस्काराची भावना. काही वेळा त्यांच्या सान्निध्याने रोग होईल, या समजुतीने जाणीवपूर्वक पण न दाखवता दिलेली वागणूक.
हिजडे त्या दृष्टीने सहज वेगळे दिसणारे, वागणारे असल्याने खड्यासारखे समाजातून नेहमीच दूर फेकले गेलेले. लक्ष्मी त्रिपाठीसारखी एखादीच हिजडा जी माध्यमांतून सहजपणे फिरते आहे, सार्‍यांशी हात मिळवते आहे. आपल्या रुबाबात राहते आहे. पण तरीही सुंदर दिसणारी स्त्री हिजडा असेल तरी कुणी पुढे होऊन तिच्याशी बोलेल, ही शक्यताच विरळ. हिजड्यांपेक्षा तिच्याबरोबरच्या माणसांवरच सार्‍या नजरा रोखल्या जातील, ही सार्थ भीती सारी वस्तुस्थिती माहीत असणार्‍यांनाही असते आणि म्हणून हिजड्यांप्रती कितीही सहानुभूती दाखवली तरी ते त्यांच्या सार्‍या आयुष्यभर परिघाबाहेरच राहणार.
एका हिजड्याने एका परिषदेत मला बोलून दाखवले होते. तो म्हणत होता, तू दिवसभर सगळ्यांबरोबर गप्पा मारत, टाळ्या देत, खाणं-पिणं घेत त्यांच्या टेबलावर जात होतास; पण एखाद्या तरी हिजड्याबरोबर चहाचा घोट घेतलास का...? नाही. तो तू घेणार नाहीस. उलट त्या सार्‍या समलिंगी जोडप्यांबरोबर खुशाल जाऊन मिसळशील, कारण त्यांचं समलिंगी आकर्षण वरवर कुणाच्या लक्षातही येत नाही. एका खोलीत दोन स्त्रिया राहिल्या काय वा पुरुष, ते सारं हॉस्टेलसारखंच असतं. तुमच्या ‘मनुष्य’ जातीला ते सहजी लक्षात येत नाही. पण आमचं रूप, आमचं वागणंच आम्हाला समाजरेषेच्या आत येऊ देत नाही. इतर ठिकाणचं तर जाऊ देत, पण इथेही आमच्या समस्या समजावून घ्यायला आलेल्या तुम्हाला, आमच्यात मिसळण्याची हिंमत देत नाही.
माझ्याकडे उत्तराकरिता शब्द नव्हते. बाजूला बसलेलं एक ‘गे’ जोडपं हे सारं ऐकत होतं. त्यांची व्यथा हिजड्यांहून थोडी वेगळी होती. समाजात ‘गे’ मिसळतात, एकमेकांच्या घरी जातात, पार्ट्या करतात, त्यांना ओळखीत सामावून घेतलं जातं, इतपत त्यांची समाधानाची बाजू असते; पण आजही हे आपल्या जोडीदाराची ओळख माझा जन्मसाथी म्हणून करून देऊ शकत नाहीत वा बिनधास्तपणे हातात हात घालून फिरू शकत नाहीत आणि अनोळखींना आपली ओळख सहजी होऊ देत नाहीत. समाजाचा हिजडा-समलिंगींबद्दलचा ग्रह हीच त्यांना टोचणारी बोच आहे, असं समान धागासूत्र मला जाणवत राहिलं. या सार्‍यातून आशेचा किरण आहे, तो माध्यमातून येणार्‍या लेख-चर्चांना मिळणार्‍या प्रतिसादाचा.
त्याच आशा-प्रतिसादातून या सार्‍यांना खुल्या दिलाने आपल्यात सामावून घेणार्‍या ‘माणुसकी’चा माणूस घडेल... उद्याचा निरोगी-निरामय मनाचा!
या दृढ आशेचा!!
kumar.nawathe@gmail.com