आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gayatri Chandavarkar Article About The Jungal Book

रसिक स्पेशल: जिंदादिल जंगलनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दी जंगल बुक’ ही रुडयार्ड किपलिंगने लिहिलेली निसर्ग आणि माणसाच्या साहचर्याची निरागस गोष्ट… ही गोष्ट लिहिण्यामागचे त्याचे हेतू काय होते, गोष्टीतल्या पात्रात तो कोणती प्रतीकात्मक रुपं पाहत होता, त्याला नेमके काय सुचवायचे होते? सामान्य प्रेक्षकाला पडद्यामागच्या या रंजक गोष्टी फारशा ज्ञात नसतात… त्या जाणून घेतल्या की वॉल्ट डिस्ने स्टुडिओने ‘लार्जर दॅन लाइफ’ रूपात सादर केलेली ‘दी जंगल बुक’ ही मंत्रमुग्ध करणारी तंत्राधिष्ठित गोष्ट रुपेरी पडद्यावर पाहताना मनाला होणारा आनंद शतपटीने वाढलेला असतो…
थरारक, रोमांचक आणि भारावून टाकणारा ‘दी जंगल बुक’ हा सिनेमा नुकताच पाहिला. अत्याधुनिक स्पेशल इफेक्ट्स वापरून दिग्दर्शक जोन फेवरो याने दृक् श्राव्य युक्त सांगीतिक मेजवानीच दिली आहे. रुडयार्ड किपलिंग या नोबेल पुरस्कृत लेखकाच्या १८९४मध्ये लिहिलेल्या ‘जंगल बुक’ या पुस्तकातील कथांवर बेतलेला हा चित्रपट. पुस्तक अजूनही तितकेच लोकप्रिय आहे. याच पुस्तकावर बेतलेला १९६७मध्ये एक अॅनिमेशनपट आला आणि तोही खूप गाजला. ८०च्या दशकात दूरदर्शनवरील याचे ‘जंगल जंगल बात चली है, पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है’ या मनोवेधक टायटल ट्रॅकसह हिंदी मालिका रूपांतरही खूप गाजले.
मोगली हे साहित्य आणि चित्रपट विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय आणि आवडते पात्र. जगभरातील लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना मोगली हा अगदी जवळचा मित्र, सखा किंवा नातेवाईक वाटतो. मोगली आणि त्याचे विश्व आबालवृद्धांना इतके का भावते, आणि आताही २१ व्या शतकात त्यावर बनलेल्या चित्रपटांची मोहिनी अजूनही कायम का असावी?
रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म मुंबईचा (१८६५), पहिली सहा वर्षे ते भारतात होते, तसेच नोकरीची सुरुवातीची सहा वर्षे त्यांनी भारतात घालवली. या काळात त्यांनी खूप प्रवास केला. भारतातील माणसे, त्याची संस्कृती आणि जीवनशैली याविषयी त्यांना खूप आदर आणि आस्था होती. येथील जंगले, डोंगर-दऱ्या यांचीही त्यांना ओढ होती. इंग्रजांनी भारतावर लादलेल्या सत्तेबद्दल आणि वसाहतवादी मनोवृत्तीतून त्यांनी भारतीयांवर केलेल्या अत्याचाराची, अन्यायाची त्यांना चीड होती. भारताविषयीच्या त्यांच्या प्रेमातून, आदरातून त्यांनी ‘जंगल बुक’ हे पुस्तक लिहिले. मुंबई हे त्यांचे जन्मगाव, त्या शहराविषयी ते लिहितात ‘शहरांची माता माझीही आई आहे. कारण माझा जन्म तिच्या दारचा (गेट वे ऑफ इंडिया), अशी ही भूमी आहे जिच्या एका बाजूला पाम वृक्ष आहेत, तर दुसऱ्या बाजूला अथांग समुद्रात जग प्रवास संपवून, दमून आलेल्या बोटी वाट पाहत आहेत!” लहान मुलांवर किपलिंग यांचा खूप लोभ. लहान मुलांच्या भावविश्वाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या जोसेफायिन या लाडक्या लेकीसाठी या कथा लिहिल्या. या कथा वरपांगी स्वप्नकथा असल्या तरी त्याचा गाभा हा रूपकात्मक आहे. ही रूपकं अनेक प्रकारची विश्वं उभं करतात आणि सामजिक-राजकीय संदेश देतात. अशा रूपकात्मक विश्वांच्या संदेशांच्या घट्ट विणीतून तयार होते, एक अलौकिक-अद््भुत दृष्टांतकथा आणि त्यातच जंगल बुक या पुस्तकाचे आणि चित्रपटांचे अक्षरत्व अधोरेखित होते.
आयुष्यातील पहिली सहा वर्षे आईवडिलांच्या प्रेमळ सहवासात घालवल्यावर मात्र पुढली अनेक वर्षे किपलिंग यांना दूर, अतिशय कडक शिस्तीच्या, कोरड्या आणि अन्यायकारक वातावरणात काढावी लागली. त्या वास्तव्याचे चरे, ओरखडे आणि दु:ख त्यांच्या लिखाणात जाणवते. ‘जंगल बुक’ या पुस्तकातील मोगली हे अनाथ पात्र, हे त्यांच्या या वास्तव्यातील स्वतःच्या अनुभवांवर बेतले आहे. मोगली याचं अनाथ असणं, एका ‘जंगलात’ तो अगदी शिशुवयात सापडणं, लांडग्यातील एका प्रेमळ जोडप्याने त्याला वाढवणं, ‘बघीरा’ या बिबळ्याच्या रूपात त्याला त्याचा मित्र आणि मार्गदर्शक भेटणं, अनेक संकटांना सामोरे जात मोगलीचं मोठं होत त्या जंगलातला अनभिषिक्त सम्राट होणं, शेवटी तारुण्यात प्रवेश केलेल्या मोगलीने आता त्याने “त्याच्या मानवी” विश्वात जायला त्याच्या मित्रांनी मदत करणं, हे जितकं अद््भुत तेवढंच रूपकात्मकही आहे.
मोगलीचे बालपण आणि त्याचा तारुण्यावस्थेपर्यंतचा प्रवास हेदेखील एक रूपक आहे. मोगली हा त्याच्या ‘जंगली’(?) अस्तित्वातून ‘मानवी’ नागरी विश्वात जातो, मात्र तो वाढतो त्याच्या कुटुंबापासून एका वेगळ्या जगात. जे रूढार्थाने ‘जंगल’ आहे. जिथे कायदाच नाही, अशी नागरी माणसांची समजूत आहे. मोगली हा ‘आदिम’ अवस्थेतील ‘अॅडम’ आहे, जो त्या जंगलातील प्राण्यावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतो. मात्र, त्याला ‘त्याच्या’ कळपात म्हणजे, नागरी समाजात जाण्याचा सल्ला, त्याची प्रिय दोस्त मंडळी देतात.
ही कथा आहे, अनाथ मोगलीची, तशीच तो वाढतो, त्या जंगलाचीसुद्धा. हे जंगल आहे डार्विन यांच्या सिद्धांतांबरहुकूम चालणारे. जिथे जगण्याच्या संघर्षात प्रत्येकाला आपली ताकद पदोपदी सिद्ध करावी लागते. या जंगलात माणूस, प्राणी आणि निसर्गाची घट्ट नाळ बांधली आहे. तसेच जंगल हे एक रूपकही आहे, जे जीवनातील जोखीम, नाट्य आणि थरार दाखवते. उदाहरणार्थ, मोगली या बाळाला अंगाईगीत गाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करणारा ‘का’ नावाचा साप. सगळ्या प्राण्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तसेच अनेक मौजेचे क्षणही त्यांना उपभोगता येतात. जीवनात जसा धोका आहे, संघर्ष आहे आणि आनंदही आहे तेच हे रूपकात्मक जंगल दाखवते. जंगलातही साहचर्य आहे, मात्र तेही कायद्यानुरूप आहे. फक्त शेरखान याला अपवाद आहे, जो कायदा मोडतो. माणसांच्या जगात मात्र कायदे असूनही कायद्याप्रमाणे वागायची सक्ती नसते, आणि माणसांच्या या जगात नीतिमत्ता फार क्वचित दिसून येते, असाही एक आयाम या कथांना आहे. जंगलातील नीती आणि नागरी माणसांच्या नीतीतील विरोधाभास, लेखक अतिशय समर्पकपणे दाखवून देतो.
एक मानवी शिशू एका जंगलात प्राण्यांनी वाढवून, तो त्यांच्यावरच राज्य करतो, हे अशक्यप्राय स्वप्नरंजन किपलिंग हे शक्य करून दाखवतात, ते ‘अपेक्षा उलटवण्याच्या’ तंत्रांतून! लांडग्यांनी वाढवलेला ‘मोगली’ हा मुलगा जसा एक ‘विचित्र’ ‘प्राणी’ आहे, जो पूर्णपणे माणूसही नाही, पण तो लांडगा तर नाहीच नाही. लेखक म्हणतो, ‘विचित्र’ असणे म्हणजे अलौकिक असणे. प्रथम त्याला न स्वीकारणारा कळप पुढे त्यालाच, त्यांचा प्रमुख म्हणून स्वीकारतो. या कथांमधील इतर पात्रेही तितकीच रोचक आहेत. रिकी नावाचे मुंगूस हे माणसाने वाढवलेले असते. कोटिक नावचा सील हा असाच त्याच्या कळपाने नाकारलेला, पण पुढे तोच त्यांचा मुख्य होऊन त्यांना ‘माणूस’ जिथे कधीच पोहोचू शकणार नाही, अशा ‘नंदनवनात’ घेऊन जातो.
किपलिंग हे अनेक रूढार्थांना छेद देतात. जसे भाषा आणि जाणीव यात मानवाचे वेगळेपण सिद्ध होते. पण प्राण्यांना बोलते करून, त्यांनी या ‘वेगळेपणाच्या’ मुळावर घाव घातला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लेखक खोडतो, तो म्हणजे ‘माणूस हा जन्मतः काही गुण घेऊन येतो, की त्याला घडवावे लागते?’ लांडग्यांनी वाढवलेला मोगली, जेव्हा नागरी माणसात येतो, तो प्रसंग, ती भेट ही ‘निसर्ग’ आणि ‘संस्कृती’ यांच्यातील नसून ‘दोन भिन्न संस्कृतींची ती भेट आहे, हे लेखकाला आवर्जून सांगायचे आहे.
वरील मुद्द्याशी निगडित एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक आणि धगधगता राजकीय आयामही या रूपक कथेला आहे. कारण ही कथा लिहिली आहे, ब्रिटिशराजमध्ये! मोगली हे रूपक आहे, मुळात सुसंकृत आणि शक्तिशाली असलेल्या पण पारतंत्र्यामुळे असहाय झालेल्या भारताचे. कथेतील लांडग्यांचा कळप हा ब्रिटिशांची लष्करी शक्ती दर्शवतो. मूठभर वसाहतवादी इंग्रजांनी एका असामान्य संस्कृती असणाऱ्या खंडप्राय देशाला अंकित करून, तेथील जनतेचा छळ करून, त्यांच्यावर नवीन संस्कृती लादली. फक्त १८५७ मध्ये ब्रिटिशांना रक्तरंजित उठावाला तोंड द्यावे लागले. नंतर अनेक दशके त्यांना विरोध झाला नाही. वसाहतवादी ब्रिटिशांनी औद्योगिकीकरणाची सुरुवात केली. जन्म, मृत्यू तसेच लग्नाच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली. त्याचबरोबर रस्ते, रेल्वे आणली आणि दवाखाने, शाळा, विद्यालये, सरकारी ऑफिसेस उभारली. शहरांचा विकास केला आणि प्रथमच मध्यमवर्ग उदयाला आणला. नैतिकतेचे नियम धाब्यावर बसवून ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणातून त्यांनी हिंदू आणि मुस्लिम असा संघर्ष सुरू केला. हा संघर्ष धर्माधारित सामाजिक जाणिवांच्या आणि अस्मितांच्या वसाहतवादी धोरणांचा परिपाक होता. पहिल्या महायुद्धानंतर संपूर्ण स्वातंत्र्याची मुळं रुजू लागली आणि स्वातंत्र्य लढा सुरू झाला. यात रिकी हे मुंगूस, सापांच्या अतिक्रमणाला लढा देते. ही गोष्टही वसाहतवादावरील एक प्रखर समीक्षा आहे. ‘जंगल बुक’मधील अनेक कथा या ब्रिटिश वसाहतवाद, पिळवणूक करणारी व्यवस्था, सत्तेचा गैरवापर यावरील रूपकात्मक कथा आहेत. भारतावरील इंग्रजांचे अधिराज्य, सांस्कृतिक-सामाजिक दबाव आणि भारतीय संस्कृतीचा परिचय असणाऱ्या किपलिंग यांनी, एका बालकाच्या विश्वात, जिथे मानवसदृश प्राणी, त्यांचे विश्व, त्यांचे कायदे, नीती, निसर्गाशी घट्ट नाळ जोडलेली अशी जीवनशैली दाखवली आहे. मग परकीय आक्रमण, वसाहत आणि हक्कांची पायमल्ली होऊन जीवनसंघर्ष, मग स्वातंत्र्याकडे वाटचाल, असे कथानक रचले आहे.
‘जंगल बुक’ हा एक कॅलिडोस्कोप आहे, ज्यात मानव आणि त्याच्या प्राणी जगताच्या व निसर्गाच्या नात्याकडे आणि राजकीय-सामाजिक जीवनाकडे अनेक चौकटींतून पाहता येतं. कोणत्याही काळात मोगली आणि त्याचे रोमांचक, नाट्यमय आयुष्य तितकेच भावणारे आहे. कारण प्रत्येकात एक मोगली दडलेला असतो. ज्याला अनेक जोखमींना तोड द्यावे लागते, आयुष्यातील थरार आणि नाट्य अनुभवयाचे असते आणि स्वतः चे स्थान मिळवायचे असते. मात्र निसर्ग की संस्कृती या वैश्विक प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने शोधायचे असते!
गायत्री चंदावरकर
gayatri0110@gmail.com