आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नांचे मोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमाना डिसरप्शनचा म्हणजेच क्षणोक्षणी डाव मोडण्याचा आहे. जुनं जाऊन नवं येण्याचा वेग विलक्षण वाढलेला आहे. क्षणार्धात डाव मोडण्याचे परिणाम मुख्यत: माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडताहेत. या वादळात स्वत्व जपणं, ऊर्मी टिकवून ठेवणं आणि वहिवाट सोडून प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न करणं, यातच उज्ज्वल भवितव्य दडलं आहे...
 
अनंत फंदी यांची ‘बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको’ ही कविता शहाणपणाने जगावे कसे, याचे अनेक उत्तम धडे देते. एक असाही विचार ही कविता वाचताना आज मनात येतो, की गुहेत राहणाऱ्या त्या आदिम मानवाने हजारो वर्षं थोडी थोडी प्रगती करत, विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या साहाय्याने आताचं अत्याधुनिक जग निर्माण केलं आहे, ते या प्रगतीत वाटा असणाऱ्या प्रत्येकाने जर ‘बिकट वाट’ सोडली नसती तर साध्य झालं असतं का?
 
माणसाच्या आधुनिक प्रगतीची सुरुवात एका चाकापासून झाली. मातीची भांडी जाऊन पुढे लोखंडी, पितळी भांडी आणि वस्तू माणूस वापरू लागला. अनेक शतकांच्या अंतराने पुढे दिशादर्शक यंत्र आले. वाफेवर चालणारे इंजिन आले, अनेक वाहनं तयार झाली. विमानाने प्रवास करण्याची सोय झाली. हजारो मैल अंतर काही तासांत कापणे शक्य होऊन वेळ वाचू लागला. तत्पूर्वी गुटेनबर्गने छपाई तंत्राचा शोध लावला होता. मोर्स कोडमुळे टेलिग्राफद्वारे जगभर कुठेही संदेश पाठवणे शक्य झाले. पुढे टेलिफोनचा शोध लागला आणि माणसाच्या संवादाचं तो मुख्य माध्यम बनला.
 
छायाचित्रण तंत्रामुळे माणूस त्याच्या आठवणी कायमस्वरूपी जतन करू लागला. पुढे त्याने चलतचित्रं तयार करण्याची किमया शोधून सिनेमा या अतिशय प्रभावी माध्यमाला जन्म दिला. टेलिव्हिजनचा शोध लावला. माणसाची जीवनमर्यादा वाढली ती अँटिबायोटिक्स, इतर औषधांच्या गोळ्या, इंजेक्शन इत्यादींवर झालेल्या संशोधनामुळे. माणसाने उपग्रह अवकाशात सोडले. त्यामुळे माहितीचं प्रसारण, देवाणघेवाण आणि दळणवळण यात कमालीचा बदल होऊन अति आधुनिक जगाकडे माणसाने वाटचाल केली. करमणूक, माहिती देणारे कार्यक्रम, चित्रपट, खेळांचे प्रसारण घराघरात पोहोचले. विसाव्या शतकात प्रगतीचा हा आलेख उंचावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली, ती संगणकाने आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या सुसाट प्रगतीने! त्यात माहितीचे महाजाल (इंटरनेट) आणि गुगलसारखी माहिती देणारी एक स्मार्ट व्यवस्था आकारास येत गेली. आता तर जवळजवळ प्रत्येकाकडे स्मार्ट सेलफोन आहे, ज्यात हजारो अॅप्स आहेत. अगदी जगाच्या कानाकोपऱ्यातले घर शोधण्यापासून ते एखादे रेस्तराँ किंवा एखादी सेवा पुरवणाऱ्या संस्थेपासून ते घरी कपडे, वस्तू, चपला-जोडे, तसेच भाजीपाला, वाणसामान, फर्निचर, औषधेही मागवण्यापर्यंत; सिनेमाची, प्रवासाची तिकिटे बुक करण्यापासून अगदी प्लंबरला दुरुस्तीसाठी बोलावण्याचे कामसुद्धा या फोनद्वारे अगदी क्षणार्धात होऊ लागले. एका चाकापासून सुरू झालेला माणसाच्या आधुनिकतेचा हा चित्तथरारक आणि अचंबित करणारा प्रवास (अर्थात, ज्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन चाकांवर माणसाच्या आधुनिक आणि अति आधुनिक प्रगतीचा विजयरथ दिमाखाने दौडत अनेक आमूलाग्र बदल घडवत गेला, तो रथ तयार होताना गॅलिलिओसारख्या शोधकांना धर्म आणि राज या दोन सत्तांशी लढाही द्यावा लागला.) आताच्या स्मार्ट सेलफोन्स आणि रोबोजपर्यंत येऊन ठेपला आहे. तो उत्तरोत्तर अधिकच प्रगत होत जाणार आहे. 
 
अशा एका टप्प्यावर अनंत फंदी यांची ‘बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको’, ही ओळ जे. कृष्णमूर्ती वाचायला लागल्यावर मात्र खटकली. कारण कृष्णमूर्तींनी conformity किंवा धोपटमार्ग किवा जगरहाटीशी अनुरूपता याचा कायमच विरोध केला आहे. ते म्हणत की, हे सगळं स्वीकारणं म्हणजे समाजातील दांभिकता, अन्यायकारक, जाचक व्यवस्था आणि अनावश्यक रूढी, परंपरा यांना मानणं. समाजातील बेगडी संकल्पना, खोटी मूल्यं, चांगुलपणाचा अभाव असलेलं, प्रेमाचा ओलावा नसणारं आणि सगळ्या प्रकारच्या हिंसांनी रक्ताळलेलं थोडक्यात म्हणजे, असं सगळं अनेक उणिवा असणारं तथाकथित ‘समाजमान्य’ आयुष्य भेदरून कसंबसं जगणं. म्हणूनच त्यांनी समाजमान्यतेचा मार्ग स्वीकारणे, जगरहाटीचा धाक, बडगा मानणे, याला कायम विरोध केला.
 
गरज ही शोधाची जननी आहे, हे सत्यच आहे. मात्र आजवरचा सगळा इतिहास बघता त्यात अनेक लक्षणीय गोष्टी जाणवतात. त्या म्हणजे, जग आणि जगण्यात आमूलाग्र बदल घडवून आणणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विद्यार्थी आणि सामान्य माणसे यांनी समाजमान्यता नाकारली, अपयशाला भिऊन त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत, अनेक जोखमा त्यांनी घेतल्या. त्यांनी आजूबाजूच्या माणसांच्या भल्याबुऱ्या बोलांची, धोक्यांची किंवा कुठल्याही मर्यादांची पर्वा केली नाही. त्यांच्यातील अंत:प्रेरणांचं, आतल्या आवाजाचं त्यांनी ऐकलं, तसेच त्यांनी काळाची पावलं ओळखली आणि निग्रहाने न घाबरता, फक्त त्यांनाच दिसणाऱ्या ‘बिकट वाटा’ चोखाळल्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, व्यवस्थेला आणि त्यातील उणिवांना त्यांनी गृहीत धरलं नाही, उलट त्या बदलण्याचा ध्यास घेतला. तसेच काहीतरी नवीन किंवा वेगळे (innovative) करण्याचा ध्यास घेतला.
 
म्हणूनच बिल गेट्ससारखा माणूस त्याचं कॉलेजचं शिक्षण सोडून सॉफ्टवेअर आणि संगणक तयार करणारी एक प्रचंड मोठी कंपनी सुरू करू शकला. तीच गोष्ट स्टीव जॉब्सची. सर्वोत्तम संगणक तयार करणारी कंपनी त्यानेही कॉलेजमध्ये जाण्याच्या वयात स्थापन केली.  तंत्रज्ञानाच्या जगात अक्षरशः क्रांतीच घडवून आणणाऱ्या स्टीवने कधीही मार्केट रिसर्च केला नाही. तो म्हणत असे की, ग्राहकांना माहीतच नाही की त्यांना काय हवे आहे. आपण त्यांना खरोखरच हवी असलेली उत्पादनं करून दाखवली, तर ते ती जास्त किंमत देऊनही विकत घेतीलच. ‘अॅपल’ची नवी उत्पादने बाजारात यायची असली की ग्राहक अक्षरशः रात्रभर रांगा लावतात, हा इतिहास आहे.  
 
मार्क झुकरर्बगने या दोघांच्या पावलावर पाऊल टाकत, जाचक नियमांमुळे कॉलेज सोडलं आणि फेसबुकसारखं अतिशय लवचिक सोशल नेटवर्किंगचं माध्यम तयार केलं. ते अल्पावधीत लोकप्रिय तर झालंच; पण जनसामान्यांना ‘आवाज’ मिळवून देणारं क्रांतिकारी माध्यम बनलं. भारतात नवं सरकार निवडून यायला मदत करण्यात या माध्यमाचं किती मोठं योगदान होतं, हे आपण जवळून पाहिलं आहे. 
 
माहितीच्या महाजालाने किंवा इंटरनेटने अनेक व्यवस्थांना धक्के आणि तडे दिले. इंटरनेटने सगळ्यात महत्त्वाचे काम केले ते म्हणजे, माहिती ही एक शक्ती (power) आणि स्रोत (resource) बनली. त्यावर कमाई करणं शक्य होऊ लागलं. तसेच, सगळ्या विषयातली इतकी प्रचंड माहिती लोकांना उपलब्ध झाली, की त्यांच्या क्षमता, ज्ञान तर वाढलंच; पण माहितीची दुरपास्तता आणि मक्तेदारी संपुष्टात आली. माहितीचं लोकशाहीकरण झालं. थोडक्यात काय तर, जनसामान्यांना सक्षम आणि शक्तिशाली करणारं तंत्रज्ञान त्यांच्या हातात आहे, तसंच नावीन्यपूर्ण बदलांचं सातत्य इतकं आहे की, जुन्या व्यवस्थांना तडे जात आहेत, जसे कार्ड किंवा मोबाइल फोनने पैसे देण्याच्या सोयीमुळे बँकांची एकाधिकारशाही धोक्यात येऊ लागली आहे. ऑनलाइन खरेदी करणं खूप सोपं आणि अतिशय परवडणारं झाल्यामुळे दुकानं ओस पडू लागली आहेत. सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे आणि त्यामुळे वृत्तपत्रे, टेलिव्हिजनवरील बातम्या यांच्यावरील अवलंबून राहणाऱ्यांचे प्रमाण घटते आहे.  
 
एकंदरीत सगळीकडे डिसरपन्शनचा वरवंटा जोरात फिरतो आहे, त्यामुळे अर्थार्जनाची साधनं जाणे, संधी जाणे, जुनी व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था उदयास येणे आणि रोबोने माणसाची अनेक कामं करणे, अशी नवीन आव्हानं माणसापुढे आहेत. या आव्हानांना आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. अशा वेळी कृष्णमूर्ती म्हणतात तसं आपल्या स्वभावात, वृत्तीत आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. अनेक ‘बिकट वाटांची वहिवाट’ करावी लागणार आहे. भीती आणि सुरक्षिततेच्या भिंतींनी घेरलेलं आयुष्य सोडून मुक्त, उत्कट आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेणारं आयुष्य जगावं लागणार आहे. आपले स्वत्व आणि आपल्या ऊर्मी जपत चांगुलपणात बहरलेल्या सुंदर आयुष्याची नवी सुरुवातच आपल्याला तारणार आहे.
 
gayatri0110@gmail.com
 
 
बातम्या आणखी आहेत...