आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजुन येतो वास फुलांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकीकडे बोर्डात येणाऱ्या मुलामुलींचे फोटो झळकत असतात, दुसरीकडे नापास झालेल्या मुला-मुलींनी केलेल्या आत्महत्येच्या बातम्या असतात, तर तिसरीकडे स्वतःची खरी आवड न कळल्यामुळे, निव्वळ प्रतिष्ठेपायी नावडते शिक्षण घेणारे किंवा नोकरीत खर्डेघाशी किंवा संगणकावर मान मोडून काम करणारे असतात. या सगळ्यांचे जगणे म्हणजे, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे झालेले असते...

आपली सृष्टी जशी विपुला आहे तशीच विविधाही आहे. इथे तरतऱ्हेची झाडं, पशू, पक्षी, फुलं आणि माणसं आहेत. या सगळ्यांमधील वैविध्य तरी किती! एक माणूस दुसऱ्यासारखा नाही. रंग, रूप, गुण, स्वभाव, क्षमता आणि आवडीनिवडीदेखील प्रत्येकाच्या वेगळ्या. प्रत्येक माणसाचं वेगळेपण (uniqueness) अतिशय मौल्यवान. मात्र ते समाजाने मान्य करून जपायला, फुलवायला हवे. प्रत्यक्षात आहे सगळेच उलटे. सगळे शैक्षणिक कारखाने आणि जगभरातल्या माध्यमांचा कल एका ठरावीक साच्याची माणसं तयार करण्याकडे असतो. म्हणजेच ओरिजिनॅलिटी किंवा एकमेवाद्वितीयतेला फारसं महत्त्व नाही. समजा ती दिसली, तर पुन्हा तशीच व्यक्ती पुन्हा तयार व्हावी, यावरच सगळा भर. मग त्यासाठी स्पर्धा, तुलना, सगळ्या प्रकारच्या फुटपट्ट्या, आग्रह असं चक्र सुरू होतं.
 
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, केजी किंवा पहिलीतील प्रवेशापासून दमछाक करणारी स्पर्धा सुरू होते. जी पुढे संपूर्ण शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायात, सामाजिक व्यवस्था आणि नातेसंबंधातही दिसते. अन्यायकारक तुलना होण्याचाही हाच क्षण असतो. जसे रंग-रूप-गुण, हुशारी, बुद्धिमत्ता, क्षमता, पैसा-अडका, जमीन-जुमला आणि जीवनातील यश-अपयश. खरं तर संघर्षाबरोबरच स्पर्धा आणि तुलना या माणसाच्या पाचवीला पुजल्या असतात. त्यांचा जीवघेणा पाठलाग हा मरेपर्यंत किंवा नंतरही सुरूच राहतो. त्यामुळे एकीकडे बोर्डात येणाऱ्या मुलामुलींचे फोटो झळकत असतात, तर दुसरीकडे नापास झालेल्या मुला-मुलींनी केलेल्या आत्महत्येच्या बातम्या असतात. एकीकडे चित्रपटातील, खेळातील आणि व्यावसायिक जगात तुफान यश मिळवलेल्या ताऱ्यांचे फोटो, त्यांची उच्चभ्रू जीवनशैली आणि यशोगाथा असते; तर दुसरीकडे जीवघेण्या स्पर्धा आणि अन्यायकारक तुलना यामुळे नैराश्य आलेले, जगण्याची उमेद घालवून बसलेले, हरलेले, अपमानित आयुष्य जगत मानसोपचारतज्ज्ञाचे उपचार घेणारेही असतात. ना त्यांच्या जीवनात आनंद असतो, ना त्यांना या संघर्षाच्या गर्तेतून बाहेर पडायचा मार्ग माहीत असतो. तुकारामांच्या भाषेत सांगायचे, तर या सगळ्यांचे जगणे म्हणजे, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे झालेले असते.
 
मुलांना कुणीतरी हिरो किंवा आदर्श (रोल मॉडेल) असायलाच हवा, असाही एक आग्रह आणि त्यांनी त्या माणसासारखं व्हायला हवं, म्हणून त्यासाठी पालकही वाट्टेल ते करायला तयार असतात. शिक्षणसंस्थाही त्यामुळे ठरावीक प्रकारचं म्हणजेच समाजात यशस्वी होता येईल, पैसा आणि मान्यता मिळेल, असंच शिक्षण देतात. मग त्या मुलांना तो विषय किंवा व्यवसाय आवडतो की नाही, त्यांचं मन त्यात रमतं की नाही, याचा काहीही विचार नाही. मुलांना आणि त्यांच्या पालकांना पराकोटीच्या स्पर्धेचा आणि तुलनेचा प्रचंड जाच आणि काच. पण तरीही काहीही करून चाकोरी सोडायची नाही. कारण, सोडली तर अपयशाला सामोरं जावं लागेल आणि समाजमान्यताही राहणार नाही, याचा धाक, भीती. त्यावर कडी म्हणजे, क्षेत्र कुठलंही असो, त्यात काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायचं, अशीही अपेक्षा. म्हणजेच पहिला नंबर आणायचा किंवा खूप पुरस्कार मिळवायचे. प्रचंड पैसा आणि यश मिळवायचे. थोडक्यात काय, तर प्रत्येक पालकाला आपली मुलं किंवा काही जणांना आपण स्वतः अमिताभ बच्चन किंवा लता मंगेशकर किंवा आइनस्टाइन किवा तत्सम कुणीतरी व्हावेसे वाटत असते.
 
या भ्रामक आणि अन्यायकारक परिस्थितीतही तोल न ढळू देणारे, आपला आनंद न हरवणारे तसेच या तथाकथित बंधनांना आणि जाचाला झुगारून देऊन मनस्वी आयुष्य जगणारेही असतात. पण अशी माणसं विरळाच. यात कठोर स्पर्धा आणि तुलनेच्या जगात राहूनही, कुठलीही चौकट न मोडता, देदीप्यमान कृती करणारे, वेगळा मार्ग दाखवणारे काही असतात. उदा. सचिन तेंडुलकर किंवा रॉजर फेडरर. दोघांनीही लहानपणापासून उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेला. अतिशय तंत्रशुद्ध खेळणं, विनम्र वर्तन, कधीही वाईट बोलणं-वागणं नाही की कधी कुठली वादग्रस्तता नाही, अगदी वैयक्तिक जीवनातही! सगळं कसं अगदी नेमस्त, संयमित, आखीव, रेखीव आणि उत्कृष्ट. क्रिकेट आणि टेनिस यातील हे दोघे जणू देवच. क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या सचिनने विक्रमांचाही विक्रम केला, आणि निवृत्ती घेतली. जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांचं उदंड प्रेम लाभलेला सचिन अजूनही प्रेक्षकांना हवा आहे, ते त्याच्या उत्कृष्ट खेळासाठी आणि उत्तम वर्तवणुकीसाठीसुद्धा. रॉजर अजूनही उच्च दर्जाचे टेनिस खेळतो आहे. त्याचा तो अत्यंत कलात्मक, हळुवार आणि सौंदर्यपूर्ण सर्वोत्तम खेळ; प्रतिस्पर्धी खेळाडूला सन्मानाने वागवणं, त्याच्याविषयी चांगलं बोलणं, खिलाडूपणे पराभव स्वीकारणं, खेळातील त्याचं सातत्य, जागतिक दर्जाची व्यावसायिकता, यामुळे तो जगभरातील टेनिसप्रेमींचा लाडका खेळाडू आहे.
 
सचिन आणि रॉजर यांच्यात खूप साधर्म्य आहे- दोघेही आपापल्या खेळातील जिनिअस आहेत, पराकोटीची क्षमता असलेले आहेत, मुख्य म्हणजे, दोघांमध्ये चांगुलपणा ठासून भरलेला आहे. जे. कृष्णमूर्ती नेहमी म्हणत, की जगात चांगुलपणाचा साठा आहे. मात्र काही मोजकेच लोक तिथपर्यंत पोहोचतात. सचिन आणि रॉजर हे त्या मोजक्या लोकांपैकी आहेत.  कृष्णमूर्ती म्हणतात की, खरं जगणं म्हणजे चांगुलपणात बहरणं. पण याच्या अगदी उलट जगामध्ये सुरू आहे. शिक्षण, संस्कृती आणि समाज जीवन यांचा पायाच तुलना आणि स्पर्धेवर उभा आहे. त्यामुळे आपण आहोत त्यापेक्षा कुणीतरी वेगळं, अधिक सक्षम, सुंदर, आणि हुशार होण्याचा बहुतेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे मग पराकोटीची महत्त्वाकांक्षा, लालसा, तृष्णा वाढून ते मिळवण्याचं ध्येय तयार होतं. त्या ध्येयाचा ध्यासच मग माणसाच्या अंगी जो काही थोडाफार चांगुलपणा उरला असतो, तोही संपवतो.
 
ऑस्कर वाइल्ड यांच्या प्रसिद्ध ‘दी पिक्चर ऑफ डोरिअन ग्रे’मधील डोरिअन वाट्टेल ती किंमत मोजून सुख मिळवण्याच्या, कुणीतरी वेगळं बनण्याच्या ध्यासात स्वतःचा चांगुलपणा आणि सत्त्व हरवून बसतो. कारण ते सगळं मिळवण्यासाठी तो आक्रमकतेने अनेक वैध-अवैध मार्ग वापरतो, मूल्यांना पायदळी तुडवतो, हिंसा करतो, ज्यामुळे तो अक्षरशः हैवान होतो. हे सगळं करत असताना डोरिअन मात्र स्वतःचं तारुण्य आणि सौंदर्य अबाधित ठेवू शकतो. वास्तव जगण्यात माणसाला तसा कुठलाही वरदहस्त नाही; मात्र तो स्वतःची उत्तम, फसवी प्रतिमा बनवण्यात आणि लोकांमध्ये मिरवण्यात यशस्वी होतो.  खरं तर चांगलं, शांत, बहरलेलं जगणं किती सहज, सोपं आणि सुंदर आहे. मात्र माणसाने ते संघर्ष, स्पर्धा आणि तुलना या विखारी शक्तींनी बनलेली युद्धभूमी करून ठेवलं आहे. जेव्हा जेव्हा माणसातील खरा चांगुलपणा, प्रेम, सेवाभाव, सामंजस्य दिसतं, तेव्हा तेव्हा वाटतं की, माणसाने अजून सर्वनाश केलेला नाही. अजूनही पूर्णपणे वाईट किंवा निराशाजनक चित्र नाही मानवी जगाचे. कवी बा. सी. मर्ढेकरांच्या शब्दात सांगायचे तर, अजून येतो वास फुलांना! तेव्हा चांगलं घडण्याची आशा ठेवायला काहीच हरकत नाही. रवींद्रनाथ टागोरांचे दोन अतिशय आशादायी आणि कृतीप्रवण विचार नोंदवून इथे थांबते...
Every child comes with the message that God is not yet discouraged of man.
Don’t limit a child to your own learning, for he was born in another time.


gayatri0110@gmail.com
बातम्या आणखी आहेत...