आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेट वेल सून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल आजमध्ये एकदोन गोष्टी पहिल्या नी बरीच भीती वाटली. माझ्या बहिणीच्या होस्टेलमध्ये एक चर्चा! विषय - एक मरायला टेकलेलं कुत्र्याचं बारीकसं पिल्लू. ते असावं की नसावं यावरची प्रदीर्घ संवादसत्रे. नि मग मला साक्षात्कार झाला की मराठी/हिंदी वाहिन्यांवरच्या जगण्याशी साधारण संबंध नसलेल्या सीरियल्स का चालत असतील!


वेळ खूप आहे खूप जणांना आणि त्याचे काय करायचं ते नेमकं ठरवता आलं नाही की ‘कुत्र्याचं पिल्लू’ हा मीटिंग भरवण्याइतका मोठा विषय होतो. रात्री 9.30 ते 1.30 या प्रदीर्घ कालावधीत सगळ्यात हुशार वागलं ते छोटूसं पिल्लू. लोकांना बोलताना बघून ते शांतपणे एका टोपलीत जाऊन बसलं नि वचावचा भांडणारे लोक, एकमेकांच्या अकला काढून पांगल्यावर बाहेर आलं. त्याचे केस, त्याचा वास, त्याची शी-शू यानं कदाचित अर्थशास्त्र विषयावर पोस्ट ग्रॅज्युएशन करायला भारतातल्या विविध भागांतून आलेल्या मुली जीव गमावू शकणार अशी परिस्थिती निर्माण झालेली.


एकीकडे या मुली नि दुसरीकडे त्या पिल्लाला कोणी खाईल, ते मरेल या काळजीनं व्याकुळ झालेल्या मुली एकत्र आल्या. तात्त्विक चर्चा, टोमणे, भांडणं यांचा एक जंगी कार्यक्रम केला आणि एकमेकांना bitches
म्हणत आपापल्या खोलीत गेल्या.
मला पिल्लू नि मुली, दोघांची काळजी वाटली. तशी मला माझीही वाटतेच. एकदम त्या कुत्र्याशी रिलेट केलं मी! घाबरलेलं ते नि बिचकलेली मी. निर्णयक्षमता आणि सहनशक्तीच्या इतक्या चिंधड्या उडलेल्या!
जग इतकं फक्त आपल्यापुरतं होऊन जातं की त्यात बाकी काही बरोबर असायला नि ते मान्य करायला जागाच नाही उरलेली. सगळीकडे राडा नि टॅÑफिक जॅम.
दुसरा प्रसंग तर आणखी गमतीशीर. त्या दिवशी पुण्याहून मुंबईला घाईघाईत यायला लागलं. सकाळी 7.14ला स्टेशनला पोहोचले, 7.15ला ट्रेन सुटायची. समोर ही मोठी रांग. फार विचार न करता ट्रेनमध्ये शिरले. म्हटलं सरळ टीसीला गाठून दंड भरूया. एक जागा तर मिळेलच! टीसीने पासधारकांच्या महिलांच्या डब्यात, पावती करून, एक जागा दिलीन बसायला. एका एका अख्ख्या बाकावर एक अशा पहुडलेल्या समस्त स्त्रिया अन्यायाविरुद्ध पेटून उठल्या आणि ‘असे कसे तुम्ही देऊ शकता जागा, नियमात बसत नाही’ म्हणून त्यांनी त्याला घेरलं. ‘एक मुलगी आहे, की एकदा अ‍ॅडजस्ट करून घेऊ शकत, गर्दीही नाहीये,’ असे त्याने म्हटल्यावर त्यांनी त्याला ‘त्या कशा पहाटे चार वाजता उठतात, त्यांना कसे काय काय करावे लागते, त्यांच्यावर अन्याय होतो,’ असे दमदाटीने बजावले.
मग तोही इरेला पेटला. ‘बघतोच मी कसे उठवता तुम्ही तिला तिथून,’ असे म्हणून तोही तिथेच कोट वगैरे काढून माझ्यासाठी थांबला. तो तिथून गेला की मग? या कल्पनेने मला थोडा घाम फुटला. आजूबाजूला अनेक मतप्रवाह दिसत होते. काही जणींना मी म्हणजे समाजाला निर्माण झालेला धोका वाटायला लागले. काही जणींनी माझ्या नि टीसीच्या घराण्याचा उद्धार केला. माझी ा४’’ ङ्मल्ल फाटली होती.
मधेच एका बाकावर उभं राहून ‘अहो मूर्ख बायकांनो, कान नि डोळे उघडा नं जरा. आपापल्या वैतागातून, न जमलेल्या गोष्टींच्या त्राग्यातून, मोडलेल्या झोपेतून बाहेर येऊन ऐका नं, बघा नं आजूबाजूला?’ असं म्हणायची इतकी इच्छा होत होती. आणि तसं केलं तर लोणावळ्याच्या दरीत माझा ‘दी एंड’ होईल ह्याचीही खात्री होती.
कौतुक वाटलं ते मला त्या टीसीचं. तासभर त्यानं खिंड लढवली; पण त्याला बाकीचीही कामं होतीच. मग एकदम उठला. माझ्या बाजूला आला नि म्हणला,‘ कॉफी प्यायची? चल, या बायका मरू देत.’
जीव मुठीत धरून मी बाहेर आले. पंजाबी होता टीसी. आम्ही तीनचार डबे पुढे आलो. तो मला म्हणला, एक मिनिट थांब. त्याने गाडीचा दरवाजा उघडला नि एक मोठ्ठा दीर्घ श्वास घेतलान. ‘थोडा रिलॅक्स करता हूँ. फिर चलते है,’ असे म्हणून मग तो मला डेक्कन क्वीनच्या सुप्रसिद्ध चीजटोस्ट अन् कॉफीसाठी घेऊन गेला. त्याच्या जोडीने दोन बंगाली, एक यूपीचा असे आणखी दोघे जण होते. नाश्त्यासाठी त्याची वाट पाहत थांबलेले. ‘कुछ पंगा हुआ क्या?’ असे त्यांनी विचारल्यावर या जसपाल नावाच्या बहादूर टीसीने त्यांना रामकहाणी सांगितली.
आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा झाल्या. एकानं मला एका सीनियर टीसीच्या निरोप समारंभाला यायचं निमंत्रण दिलंन. तो सहज बोलता बोलता म्हणला. ‘वाईट वाटून घेऊ नका; पण औरते कमीनी होती है. मुझे तो डर लगता है. मैं तो कभी उन के पास टिकट न भी हो कुछ बोलता नही. क्या पता बाद में क्या कम्प्लेंट कर दे. लोग तो औरत को सपोर्ट करते है. आप लिखो कुछ औरते जो अत्याचार करती है उस के बारे में!’
मला त्यांच्यात आल्यानंतर पुन्हा त्या होस्टेलमधल्या कुत्र्याशी रिलेट करावंसं वाटलं. चांगल्या अर्थानं. तिथेही सगळ्या विरोधाला पुरून उरून त्याची कड घेणा-या मुली होत्या आणि इथेही त्या सगळ्या बायकांपासून मला वाचवणारा जसपाल होता.
पण काळजी वाटली.
आणि वाटलं, बरंच बरं नाहीये आपल्या लोकांना.
‘लगे राहो मुन्नाभाई’मधले संवाद आठवले. ‘अरे मामू, वो बेचारा बहोत बीमार है. उसे ग्रीटिंग भेजो. बोलो get well soon.l