आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय झालं भिजले तर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळा सुरू झाला की वाटायला लागतं, कधी संपेल हा उन्हाळा? मार्च, एप्रिल, मे पार करत करत शेवटी पावसाळा आता सुरू होणार म्हणून माझं मन आनंदित होतं.

मी चौथी इयत्तेपर्यंत ज्या प्राथमिक शाळेत शिकत होते, ती शाळा घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर होती. मला पावसात भिजायला खूप आवडायचं. मला आईने ‘रेनकोट घालून जा’ असं बजावलेलं असायचं. पण मी कधीही रेनकोट घातला नाही. आम्ही दोघी-तिघी मैत्रिणी शाळेतही पाऊस आल्यावर मस्त भिजायचो. तसंच चिंब भिजलेलीच मी घरी यायचे. एकदा चिंब भिजलेली मी रिक्षातून उतरले. मस्तपैकी पाण्याने निथळत मी घरात आले. तेव्हा मी पहिलीत होते.आईने तत्परतेने माझे कपडे बदलले. टॉवेलने भिजलेलं डोकं, अंग खसखसून पुसलं. गरम चहा प्यायला लावला. पण दुसर्‍या दिवशी सर्दी झालीच. तापही आला. अर्थातच शाळा बुडाली. आईने मला पुन्हा पावसात न भिजण्याची ताकीद दिली. तरी सर्दी-ताप बरा झाल्यावर पुन्हा पावसात भिजले. पुन्हा सर्दी, ताप आला. अशातच पावसाळा संपला. मी मनसोक्त भिजण्याची इच्छा पूर्ण झाल्याने आनंदात होते.

परत दुसर्‍या इयत्तेत गेल्यावर तेच पावसात भिजणं, सर्दी, ताप येणं, आईचं रागावणं. तिसरीत असताना तर अशी काही सर्दी झाली की, लवकर बरी होण्याचं चिन्हं दिसेनात. आई चांगलीच चिंताग्रस्त झाली. शेवटी सर्दी एकदाची बरी झाली. चौथ्या इयत्तेत असताना काही कारणास्तव आमचा रिक्षावाला सुटीवर होता. बाबांनी मला शाळेत पोचवलं. ‘शाळा सुटायच्या वेळी येतो, तू इथं गेटजवळच थांब’ असं म्हणाले. पण मी महाभाग भरपावसात भिजत पायी चालत घरी आले. मला खूप मजा वाटत होती. काय करावं तुला आता? आजारी पडायची हौसच आहे तुला!’
आई रागावली. पण मी मान वर करून म्हणाले, ‘काय झालं भिजले तर? खूप मजा वाटते.’

पण त्यानंतर माझी शाळा बदलली. हायस्कूलला जायला लागले आणि पावसात भिजणं बंद झालं. अजूनही पाऊस सुरू झाला की मला ते दिवस फार आठवतात.