आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतबाधा, दैवी प्रकोप, छिन्न मनस्कता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक तरुण एका कंपनीत कामाला होता. एक दिवस त्याला भीती आणि संशय वाटू लागला. कंपनीतील लोक त्याच्याकडे पाहून हसतात, त्याला पाहून गप्पा मारतात, असे त्यास नित्य वाटू लागले. त्यामुळे त्याची झोप उडाली. त्यानंतर लोक त्याच्यावर लक्ष ठेवतात, त्याचे फोटो काढतात, त्याच्या मागेमागे चालतात असे त्याला वाटू लागले. लोकांचे भीतिदायक आवाज त्याच्या कानात येऊ लागले. त्यामुळे त्याने बाहेर जाणेदेखील बंद केले. त्याने घरात दरवाजा आणि खिडकी लावून स्वत:ला बंद करून घेतले. नातेवाईक त्याला बाहेरची बाधा झाली आहे, असे समजून भगताकडे फे-या मारत राहिले. तेव्हा त्यांच्या एका परिचिताने तो व्याधिग्रस्त असून, त्याला डॉक्टरची गरज असल्याचे सांगितल्यावर ते त्याला हॉस्पिटलला घेऊन आले. त्याला अ‍ॅडमिट केल्यानंतर आज तो पूर्ण बरा झाला आहे.


या रुग्णाला मानसिक आजार होता. आजाराचे नाव (छिन्न मनस्कता) या विकृतीत विचार प्रक्रियेतील संघटन बिघडते आणि व्यक्ती विचारात व भावनेत ताळमेळ राहत नाही. त्याचे विचार आणि वास्तवातील जग यात अंतर निर्माण होऊन त्यास भ्रम निर्माण होतात. या व्याधीने ग्रस्त असलेली व्यक्ती शिक्षण किंवा दैनंदिन कामे करण्यास असमर्थ ठरते. योग्य उपचाराअभावी आणि अंधश्रद्धेमुळे आजाराचे गांभीर्य वाढतच जाते. काही रुग्ण या आजारात आत्महत्या करून त्यांचे जीवन संपवतात. या आजारांचे उपप्रकार आणि त्यांची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.


1) विभ्रमी प्रकारची छिन्न मनस्कता : या रुग्णांना इतरांचा सारखा संशय येतो. जसे लोक आपल्यावर नजर ठेवतात, आपल्याकडे पाहून हसतात, आपल्याविरुद्ध कट कारस्थाने रचतात, अन्नात विष घालतील, गुप्तहेर मागे लावलेले आहेत इ. अशाप्रकारे त्यांच्यात छळण्याविषयक भ्रम जास्त निर्माण होतात. काही वेळेला त्यांना त्यांचे विचार दुस-याला आपोआप कळतात, असे वाटते. कानात देवाचे किंवा शत्रूंचे आवाज ऐकू येतात. कधीकधी तर हे आवाज त्यांना आदेश देतात आणि रुग्ण तसे वर्तनही करतात. हे रुग्ण कधीकधी या संशयामुळे दुस-यावर पोलिसांत तक्रारदेखील करतात किंवा त्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्नदेखील करतात. जी व्यक्ती त्याचा पाठलाग किंवा छळ करत आहे असे त्यांना वाटते त्यांच्यावर हे रुग्ण धावून जातात. अशाप्रकारे त्यांच्यात विचित्र, अतार्किक व नेहमी बदलणारे विभ्रम निर्माण होतात.


2) ताण अवरुद्ध प्रकार : या प्रकारच्या रुग्णांमध्ये कधी अतिउत्तेजितता तर कधी अचेतना दिसते. अतिउत्तेजिततेच्या काळात रुग्णांचे वागणे हिंसक बनते. अचेतनेच्या काळात रुग्ण कसलीही हालचाल करत नाही. शरीर त्याच अवस्थेत तासन्तास पडून असते. तसेच ते टक लावून पाहतात. कधीकधी तर ही अवस्था काही दिवसांसाठीही राहू शकते. हालचालींअभावी त्यांचे शरीर ताठर बनते. स्वत:ला खाण्यापिण्याचीही काळजी नसते. मलमूत्र विसर्जनाकडे लक्ष देत नाहीत. चेहरा निर्विकार बनतो.


3) अविभेदित प्रकार : या रुग्णांमध्ये विक्षिप्त वर्तन, विस्कळीत विचार, संवेदन भ्रम किंवा विभ्रम दिसून येतात. छिन्न मनस्कतेच्या इतर प्रकारांमध्ये रुग्णांचे वर्तन बसवता आले नाही की रुग्ण या प्रकारात मोडतो. या रुग्णांमध्ये सर्व लक्षणे आलटूनपालटून येतात. यात भीती, स्वमग्नता, गोंधळलेली अवस्था, उत्तेजितता, विभ्रम, अवसाद आदी लक्षणे दिसतात.


4) विसंघटित प्रकार : या रुग्णांमध्ये विनाकारण किंवा एकटेच हसणे,वेडेवाकडे हातवारे करणे, स्वत:शी बडबडणे ही लक्षणे वाढत जातात. त्यांचे बोलणे असंबंध व बालिश होत जाते. विचारांची साखळी तुटते आणि त्यांचे बोलणे व विचार हे कृतीस सुसंगत राहत नाहीत. रुग्ण कचरा जमा करून खिशात भरतात, एकदम हसायला किंवा रडायला लागतात, स्वत:चे मलमूत्र ते उचलतात किंवा भिंतींना लावतात. अशा प्रकारचे रुग्ण बरे होण्याची शक्यता कमी होत जाते.


5) अवशिष्ट प्रकार : छिन्न मनस्कता ही विकृती बरी झाल्यावर रुग्णात शिल्लक राहिलेली या आजाराची सौम्य लक्षणे यात दिसतात. म्हणून छिन्न मनस्कता म्हणजे देवाची करणी, शाप, भूतबाधा, भानामती नसून हा एक मानसिक आजार आहे. मनोविकार तज्ज्ञांकडे नेल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.